आशा आणि विश्वास ह्यांचे प्रतीक: डॉ. रमेश प्रभू

Dr_Ramesh_Y_Prabhoo._bw.jpgमुंबईच्या उपनगरात विलेपार्ले अगदी वेगळे आणि सुंदर आहे कारण त्याला सामाजिक कार्यकर्त्यांची न संपणारी मोठी परंपरा आहे. बाबुराव परांजपे, सखाराम पंडित, रामभाऊ बर्वे, मोहनराव आपटे आणि नुकतेच 11 डिसेंबरला परलोकवासी झालेले डॉ. रमेश प्रभू. सामाजिक बांधिलकीला प्रभूंनी ‘कॉर्पोरेट लुक’ दिले हे त्यांचे अनन्यसाधारण वैशिष्ठ्य. प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या नावाने 1997 मध्ये त्यांनी बांधलेले अद्ययावत क्रीडा संकुल, विविध क्रीडा दालनातून आणि जलतरण तलावाजवळून फिरून पाहिले की नको तेथे नको तेवढी काटकसर न करणारा आणि हवा तेथे हवा तेवढा खर्च करणारा हा विश्वकर्मा आहे हे लक्षात येत असे. येथून आपली मुले ऑलिम्पिकला गेली पाहिजेत हे त्यांचे स्वप्न होते आणि त्यादिशेने त्यांचा जीवनक्रम आखला गेला होता.

डॉ रमेश प्रभू घरचे श्रीमंत होते. पण त्यांनी विलेपार्ल्यात आणि एकंदर मुंबईत जी लोकप्रियता आणि आपुलकी मिळविली ती कष्टातून, उपक्रमशीलतेतून आणि प्रामाणिकपणातून मिळविली. पंधरा वर्षांपूर्वी पार्लेकरांनी गुढी पाडव्याला भल्या पहाटे स्फूर्ती यात्रा काढण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला तेव्हा त्या यात्रेचे बिनीचे शिलेदार एक शोभिवंत गजराज होते. तो हत्ती प्रभूंनी आणला होता. त्यांना काही कमी नव्हते. पण हे सगळ्यांना कदाचित माहीत नसेल की पन्नास वर्षांपूर्वी डॉक्टरांनी पार्ल्यात वैद्यकीय व्यवसायाला सुरवात केली तेव्हा ते सायकलीवरून आणि पुढच्या दांडीवर सहायकाला बसवून लांबलांबपर्यंत रुग्णांच्या घरी भेट देत असत. वैद्यकीय सल्लागार किंवा समुपदेशक म्हणून पार्लेकरांच्या नाडीवर त्यांनी बोट ठेवले आणि त्यातून येथील लोकांची हृदय स्पंदने त्यांना कळू लागली. म्हणून जनसेवा समिती,लोकमान्य सेवा संघ, बाबासाहेब गावडे रुग्णालय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र अशा कितीतरी सामाजिक संस्थांशी डॉ प्रभू जोडले गेले. त्यांनी पूल बांधले, गटारे साफ केली, अंधेरीचा वेश्या व्यवसाय हलविला. अनेकांना व्यसनमुक्त केले. ते मुंबईचे महापौर झाले. शिवसेनेच्या माध्यमातून तीन वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. सभ्य राजकारणी म्हणून ते ओळखले जात. ही दुर्मीळ उपलब्धी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि ते ह्यांचे काय बिनसले ते दोघांनाच किंवा काही कारस्थान्यांना ठाऊक. पण सेना- भाजप युतीच्या पहिल्या सरकारात डॉ रमेश प्रभू ज्येष्ठ मंत्री म्हणून समाविष्ट व्हायला पाहिजे होते असे राजकीय निरीक्षकांचेही मत आहे. एखाद्या योजनेची सर्वांगांनी पाहणी आणि आखणी करून तिची सुफलदायी कार्यवाही करण्यात प्रभू कुशल होते. मंत्रिमंडळाचा ते आधार ठरले असते. तथापि सेनेने लादलेल्या विजनवासातून प्रभूंनी कडवटपणा येऊ दिला नाही. आपल्या सेनेतल्या अनुपस्थितीने त्यांनी पार्ल्यातील वातावरण गढूळ होऊ दिले नाही.

प्रभूंच्या राजकीय कार्यकालाच्या आलेखाला ऐतिहासिक स्वरूपाचे राष्ट्रीय परिमाण आहे. त्यांनी 1987 मध्ये पार्ल्यातून विधानसभेची पोटनिवडणूक लढविली आणि प्रचंड मताधिक्याने ते निवडून आले. ही निवडणूक ते हिंदुत्वाच्या मुद²द्यावर लढले. तथापि न्यायालयाने प्रभूंचा विजय अवैध ठरविला. धर्माच्या आधारावर मते मागितली ह्या कारणाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षासाठी रद्द करण्यात आला. पुढे मनोहर जोशींनी हिंदुत्वाच्या मुद²द्यावर विधानसभेची निवडणूक लढवून सर्वोच्च न्यायालयाकडूनही आपल्या विजयावर मोहर उठवून घेतली. ह्या संदर्भात प्रभू आणि हिंदुत्व हा विषय समजून घेतला पाहिजे. ते तत्वचिंतक नव्हते. विधायक दृष्टीचे, कामाचा उरक असणारे ते कार्यकुशल नेते होते. त्यांनी हिंदुत्वावर व्याख्याने दिली नाहीत पण हिंदुत्वावरील परिसंवादात ते शेवटपर्यंत न कंटाळता बसून राहत आणि शांतपणे ऐकत. ते हिंदुत्वाला अनुकूल होते. नेत्याची आज्ञा प्रमाण मानून त्यांनी वादग्रस्त ठरु शकणाऱ्या विषयावर आखाड्यात उडी घेतली आणि पंचानी बाद ठरविल्यावरही पुढच्या आयुष्यात एकदाही त्यांनी हिंदुत्वाला प्रतिकूल असा शब्द तोंडातून काढला नाही हा ते आणि छगन भुजबळ किंवा नारायण राणे ह्यांच्यातील फरक ठळकपणे लक्षात येतो. त्यांचे बाळासाहेबांशी बिनसले होते. हिंदुत्वाशी नाही. सावरकरांचे लोकसभेत तैलचित्र लावणे आणि मार्सेलिसला त्यांचे स्मारक होणे ह्या प्रयत्नात तोशीस सोसून ते आघाडीवर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या लक्षात प्रभूंचा हा स्वभावविशेष आला होता. प्रभू महापौर असतांना मोदी त्यांना भेटून आणि व्यवस्थित चर्चा करून गेले होते आणि ते संबंध शेवटपर्यंत शिळे झाले नव्हते. काही कारणाने मागे पडलेल्या परंतु सत्पात्र असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना, ‘अच्छे दिन’ आणण्याच्या दृष्टीने प्रचलित राजकीय व्यवस्थेत खेचून घेण्याच्या मोदींच्या सूत्राप्रमाणे रमेश प्रभूंच्या अनुभवाचा लाभ घेण्याचे ठरले होते. त्यांना राज्यपालपद देण्याचे घाटत होते. प्राथमिक बोलणी झाली होती. पण प्रभूंना अनंताच्या प्रवासाला निघण्याची घाई झाली होती असे म्हटले पाहिजे.

महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या शोकसभेत रॅंगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे म्हणाले की त्यांना आता ‘रघू’ अशी हाक मारणारे कोणी राहिले नाही. डॉक्टर गेल्याचे कळले तेव्हा माझी काहीशी तशी अवस्था झाली. आज पार्ल्यात मला अरेतुरे करणारे कोणी राहिले नाही. गिरगावातल्या विल्सन हायस्कुलमध्ये प्रभूं मला दोन वर्षे पुढे होते. ही प्रशाला इतकी आखीवरेखीव आणि एकात्मिक वातावरणाची होती की येथील विद्यार्थ्यांचे सौहार्दाचे संबंध नंतरही टिकून राहत. प्रभूंनी शाळेतले सोबतीपण शेवटपर्यंत टिकवून धरले. ते महापौर झाल्यावर, त्यांनी तसे करू नको असे सांगितले असतांनाही, मी त्यांना ‘अहोजाओ’ करायला सुरवात केली. परंतु ते मला शेवटपर्यंत ‘अरेतुरे’ करीत होते आणि मला त्याचा अभिमान वाटत असे. त्यांनी 1987 मध्ये विधानसभेची ती पुढे गाजलेली निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी मला त्यांच्या मतदारसंघाचा खोलवर अभ्यास करून त्यांना विजयाची शक्यता किती आहे ह्याची अटकळ बांधण्यास सांगितले. मी त्यांच्या मतदारसंघाचे काही गट पडून प्रातिनिधिक स्वरूपात आणि शक्य तेव्हढ्या खोलात शिरून सात दिवसात साठ मुलाखती घेतल्या आणि रमेश प्रभूंना 27,000 मते पडतील असा निष्कर्ष काढला. त्यांचे विरोधक प्रभाकर कुंटे आणि जनता पक्षाचे प्राणलाल व्होरा ह्यांना प्रभूंपेक्षा प्रत्येकी 10,000 मते कमी पडतील असे भाकीत केले. तसा लेख त्यावेळी मी काम करीत असलेल्या ‘दि आफ्टरनून’ ह्या सायं दैनिकात लिहिला. प्रभूंकडे लोक सैल शब्दाचा राजकीय नेता म्हणून न बघता कळवळ्याने काम करणारा विधायक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कसे बघतात हे विस्ताराने सोदाहरण लिहिले. प्रत्यक्ष परिणाम घोषित झाले तेव्हा प्रभूंना 27,000 मते पडली होती. कुंटे आणि व्होरा ह्यांना प्रत्येकी 10,000 मते कमी पडली होती. इतके अचूक भाकीत वर्तविले म्हणून बाळासाहेबांनी मला घरी बोलावून घेतले. अभिनंदन केले आणि साप्ताहिक मार्मिकमध्ये तशी चौकट टाकली. ह्या निवडणुकीमुळे राजकीय लेखनाचा वेगळा मार्ग मला सापडला. लोकांशी बोलत असताना त्यांच्या डोळ्यांकडे बघून आणि शब्दोच्चाराच्या चढउतारावरून त्यांच्या बोलण्याचा खरेखोटेपणा ठरविता आला पाहिजे असे मी ठरविले. पुढे अशी अनेक राजकीय भाकिते अचूकपणे करण्यात मला ह्या पद्धतीमुळे अवघड वाटले नाही.

रमेश प्रभूंविषयी लोकांच्या मनात आदर होता, विश्वास होता. प्रेम होते. ते त्यांचे स्मारक आहेच. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल आणि जुहूच्या शिवाजी महाराजांचे शिल्प ह्यामुळे त्यांची आठवण लोकांना येत राहील. पण त्यांचे जातिवंत स्मारक म्हणजे त्यांचा द्वितीय पुत्र अरविंद आहे असे म्हटल्यास सर्वार्थाने ते उचित ठरेल. हा मुलगा मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असतांना त्याला तीस वर्षांपूर्वी फार मोठा अपघात झाला आणि त्याची संपूर्ण मज्जासंस्था खिळखिळी झाली. ह्या मुलाचा मेंदू, डोळे, कान आणि नाक व्यवस्थित आहेत पण धडावरचा कोणताही अवयव बाहेरच्या आवाहनाला प्रतिसाद देऊ शकत नाही. तो सदैव व्हील चेअरवर असतो आणि एक सहायक त्याचे उपांग म्हणून नेहमी त्याच्या समवेत उपस्थित राहणे भाग पडते. कोणत्याही मुलाचा बाप ह्या अपघाताने फुटून गेला असता. पण प्रभू त्यावेळी नेहमीप्रमाणे खंबीर, शांत, आशावादी राहिले. विश्वाच्या रहस्याचा शोध घेणारा तत्वचिंतक आणि शास्त्रज्ञ ज्या विश्वासाने, चिकाटीने आणि नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेने मार्ग शोधत राहतो तसे प्रभू मुलाबरोबर काम करीत राहिले. आपल्याला फार मोठे कर्तृत्ववान आयुष्य जगायचे आहे आणि त्यासाठी जे काही करायचे ते आपल्याला एकट्यानेच करायचे आहे असा आत्मविश्वास त्यांनी मुलगा अरविंद ह्यांच्या मनात निर्माण केला आणि आज तो धडधाकट माणसे करू शकणार नाहीत अशी कामे करीत कर्तृत्ववान आयुष्य जगत आहे. तो केबल ऑपरेटर संघटनेचा अध्यक्ष आहेच पण भारत सरकारच्या एका मोठ्या योजनेत तो सहभागी आहे. ग्रामीण महाराष्ट्र डिजिटल करण्याची केंद्राची जी योजना तिचा आढावा आणि उपाययोजना सुचविण्याच्या प्रकल्पसंघाचा अरविंद रमेश प्रभू महत्वाचा घटक आहे. त्यासाठी त्याला महाराष्ट्राचे दौरे करावे लागतात, लोकांच्या संपर्कात राहावे लागते आणि वृत्तांत कथनासाठी दिल्लीला कधीतरी जावे लागते. हे तो उत्साहाने आणि अपंगत्वाचा मागमूसही दिसू न देता पटाइतपणे पार पडतो. डॉक्टर रमेश प्रभूंनी काळाच्या मुखातून आपल्या मुलाला बाहेर काढले आणि त्याला जगण्याचा आनंद आस्वादण्याचा हुरूप दिला, शक्ती दिली. हे मन्वंतर कसे झाले ह्याविषयी अरविंद प्रभू आपले अनुभव कथन करतील आणि ते शब्दरूपाने प्रकट होतील त्यावेळी शून्यातून विश्वनिर्मिती करणाऱ्या शास्त्राचा तो मोठा ठेवा होऊ शकेल. म्हणून अरविंद प्रभू हेच रमेश प्रभू ह्यांचे यथोचित जिवंत स्मारक आहे असे म्हणता येते. अरविंदची आई आणि मोरारजींच्या काळातले महाराष्ट्राला एक नामवंत राजकारणी गणपतराव तपासे ह्यांची कन्या पुष्पाताई, मोठा भाऊ राजेंद्र, बहीण लीना, मेहुणे कृष्णा हेगडे, पुष्पाताईंचे बंधू (सगळे विल्सन शाळेतले) असा मोठा परिवार अरविंदच्या बरोबर आहे. तो आता प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचा अध्यक्ष झाला आहे. त्यामुळे पार्लेकरांच्या तो नित्य संपर्कात येणार आहे. सगळे पार्ले आपल्या जवळचा आशावाद आणि विश्वास घेऊन पुढील वाटचालीसाठी तुझ्याबरोबर आहे असे मी ह्या निमित्ताने अरविंद रमेश प्रभू ह्यांना सांगू इच्छितो.

– अरविंद विठ्ठल कुळकर्णी

9619436244

arvindvk40@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s