संपादकीय एप्रिल २०१९

_mg_0080मला आठवतेय, तो १९९४-९५ चा काळ होता. ‘आम्ही पार्लेकर’ने रस्त्यांच्या सततच्या होणाऱ्या खोदकामांविरुद्ध आवाज उठवला होता. पार्ल्यातील टेलिफोन निगम कार्यालयावर मोर्चा काढला होता, तिकडील अधिकाऱ्यांना घेरावही घातला होता. कुठलीही पूर्वसूचना दिल्याशिवाय सुरु होणाऱ्या रस्त्याच्या खोदकामांनी नागरिकांना त्रास होतो. म्हणून अश्या प्रकारचे काम सुरु होण्या अगोदर स्थानिक रहिवाश्यांना कामाची कल्पना देणे अनिवार्य असावे, तसा बोर्ड कामाच्या ठिकाणी लावण्यात यावा, अश्या प्रकारच्या आमच्या मागण्या होत्या. त्या मान्य होऊन पुढील काही दिवस त्यांचे काटेकोरपणे पालनसुद्धा होत होते. मात्र काही दिवसांनी परिस्थिती ‘जैसे थे’ झाली.

आजचे पार्ल्यातील चित्र काही वेगळे नाहीये. ठिकठिकाणी खोदकाम चालू आहे. आमचा त्याबद्दल काहीच आक्षेप नाही. नागरिकांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी लागणाऱ्या केबल्स, पाईप ह्यांसाठी खोदकाम आवश्यकच आहे पण ह्या कामांचे सुद्धा नियोजन करता येऊ शकते ना ? प्रथम टेलिफोनवाले रस्ता खोदणार, त्यांनी काम संपवून पूर्ववत केलेला रस्ता परत अडानी कंपनीचे लोक खोदणार. त्यांनी नीट केलेला रस्ता महानगर गॅसवाले खोदणार. म्हणजे रस्त्यांवरचे खोदकाम सतत सुरूच! वेळ, पैसे, मेहेनत, ह्या सवांचा केवढा अपव्यय ? शिवाय नागरिकांना होणार त्रास वेगळाच ! ही सर्व कामे एकाच वेळी एकदाच रस्ता खोदून होऊ शकत नाहीत का ?

गेले काही महिने पारल्यात अनेक ठिकाणी नगरसेवक निधीतून कामे सुरु आहेत, अनेक रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. या सर्वांचा पार्लेकारांना विशेषतः पावसाळ्यात व नंतरही फायदाच होणार आहे हे आम्ही जाणतो तरी सुद्धा वेगवेगळ्या एजन्सीजमध्ये सुसूत्रता आणली तर नियोजन बद्ध काम होऊ शकते व रहिवाशांना होणारा त्रास कमी होऊ शकतो. गेल्या काही वर्षात वाढलेली वाहनांची गर्दी, रस्त्याच्या दुतर्फा केलेले पार्किंग ह्यामुळे आधीच नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात ह्या खोद्कामांची भर ! विद्यमान लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन ह्याकडे लक्ष देणार काय ?

Advertisements

संपादकीय – मार्च २०१९

_mg_0080दिवाळीपासूनच पार्ल्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची धामधूम सुरु होते व ती साधारण होळीपर्यंत चालते. दिवाळी पहाट, वेगवेगळे गाण्याचे कार्यक्रम, साहित्यिक परिसंवाद, ह्या व इतर अनेक कार्यक्रमांच्या आनंदात पार्लेकर अक्षरशः न्हाऊन निघतात. आठवडा तसा शांततेत जातो पण weekend ह्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे जास्त व्यस्त व happening असतो असे गमतीने म्हटले जाते. उगाच नाही मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाला पार्ल्यात यायचे असते, पार्ल्यात घर घ्यायचे त्याचे स्वप्न असते !

पार्ल्यात अनेक सांस्कृतिक, सामाजिक संस्था आहेत व त्या आपल्या विचाराने, आपापल्या परीने पार्लेकरांचे मनोरंजन, प्रबोधन करत असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन करत असतात. ह्या सर्वांमुळेच आपले भावविश्व अधिक सुधृढ आणि समृद्ध होते. ह्या संस्थांचे व त्यामध्ये नि:स्वार्थी भावाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पार्लेकर सदैव ऋणी राहातील.

गेल्या महिन्यात तीन मोठे कार्यक्रम होते. ‘मॅजेस्टिक गप्पा’, ‘वसंत व्याख्यानमाला’ व ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’. तीनही कार्यक्रम सुंदर होते, महत्वाचे होते, लोकांना आवडतील असे. पण एक छोटीशी गडबड होती. हे सर्व कार्यक्रम एकाच वेळी होते. एका कार्यक्रमाला गेले तर दुसरे दोन चुकतात. काय करायचे लोकांनी ? हा अनुभव पहिल्यांदाच येत नाहीये तर अनेक वेळा अशी परिस्थिती पार्ल्यात ओढवते. एकाच वेळी अनेक चांगले कार्यक्रम असतात.

खरे म्हणजे आयोजकांनी थोडेसे जागरूक राहिले तर आपण ही परिस्थिती टाळू शकतो. ह्यासाठी पार्ल्यातील संस्थांमधील संवाद थोडा वाढला पाहिजे. कार्यक्रमांची आखणी करताना इतर संस्थांच्या कार्यक्रमांची माहिती घेणे गरजेचे आहे. अशी काळजी जर आपण घेतली तर सर्वच कार्यक्रमांचा पुरेपूर आस्वाद रसिकांना घेता येईल व आयोजकांना सुद्धा पूर्ण समाधान मिळेल. संस्थांचा दृष्टिकोन एकमेकांशी स्पर्धा करण्याचा नसून पार्लेकरांची सांस्कृतिक व बौद्धिक भूक भागवण्याचा असला पाहिजे, होय ना ?

 

संपादकीय – फेब्रुवारी २०१९

_mg_0080“ही कविता म्हणजे होनाजी बाळांची भूपाळी आहे व संगीत वसंत देसाईंचे आहे” कृष्णा म्हणाला व सर्वांनी त्याला दुजोरा दिला. तो ‘घनश्याम सुंदरा’ ह्या गाण्याविषयी बोलत होता. शाळेतील आमच्या वर्गाच्या re-union ची सहल होती व मराठी गाण्यांच्या भेंड्या सुरु होत्या. कृष्णा शाळेत शेवटच्या बाकावर बसायचा, अनेक वेळा बाईंच्या हातचा मार खायचा. पुढे ‘टप्प्या टप्प्याने’ Bcom पूर्ण केले व आजतागायत बँकेतील नोकरी टिकवून आहे. पण पठ्याला मराठी गाणी सर्व पाठ, अगदी गीतकार व संगीतकारासकट ! मी बघितले कि बहुतेक जणांना सर्वच गाणी पाठ आहेत. मी विचार करू लागलो, संगीताचा एवढा मोठा संस्कार आमच्यावर कोणी केला ? कृष्णा सारख्या अति सामान्य विद्यार्थ्यांची अभिरुची इतकी अभिजात कशी ?

आमच्या शाळेत शाळा सुरु व्ह्याच्या आधी तसेच प्रत्येक सुट्टीनंतर टोले पडले कि जुन्या मराठी गाण्यांची रेकॉर्ड लागायची. मैदानात खेळात असलेल्या मुलांना वर्गात जाऊन बसायला २/३ मिनिटे लागत. त्या वेळात ही सुंदर भावगीते लागत. ‘केशवा माधवा’, ‘ने मजसी ने’, देहाची तिजोरी’ ह्या सारखी एकाहून एक सरस गाणी आमच्या कानावर पडत व शब्दांचा, सुरांचा संस्कार आमच्या कोवळ्या मनावर नकळत होत गेला. थोडी चौकशी केली तेव्हा समजले कि पार्ल्यातील इतर शाळांतही रेकॉर्ड ची प्रथा होती, आहे.

आज पार्ल्यात अनेक यशस्वी गायक, संगीतकार आहेत. भावगीतांच्या, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना पार्ल्यात उदंड प्रतिसाद मिळतो. पार्लेकर रसिकांसमोर आपले गाणे सादर करायला अनेक प्रथितयश गायक उत्सुक असतात. गायक, संगीतकारांबरोबर पार्लेकर रसिकांनी सुद्धा आपले एक स्थान संगीत क्षेत्रात निर्माण केले आहे असे म्हटले तर चूक होणार नाही. ह्या सर्वाचे मूळ शाळेत वाजवल्या जाणार्या मराठी भावगीतांच्या रेकॉर्ड मध्ये आहे का ? मला आपले तसे वाटते. लहान वयात ऐकलेल्या गोष्टी खूप खोलवर रुजतात, खरे ना !

 

संपादकीय – जानेवारी २०१९

_mg_0080पार्ल्यात अनेक नागरी प्रश्न आहेत व त्यांचा उहापोह आपण ह्या सदरातून वेळोवेळी करत आलो आहोत. पण ह्या सर्व प्रश्नांना विसरायला लावणारे वातावरण सध्या आपल्याकडे आहे व त्यात संपूर्ण पार्ले नागरी न्हाऊन निघत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे वातावरण आहे विविध खेळांचे !

आज अनेक कारणांवरून तरुणांना दोष देण्याची प्रवृत्ती दिसते. ते अभ्यास करत नाहीत, ते कॉम्पुटर वर आणि मोबाईल वर वेळ वाया घालवतात, प्रमाणाबाहेर हॉटेलिंग करतात, अनेक वाईट सवईंना बळी पडतात, एक ना दोन, अनेक कारणांवरून घरातले, समाजातले जेष्ठ लोक तरुणाईच्या नावाने बोटे मोडत असतात. त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी थोडे आजूबाजूला निरखून पाहावे.  वर्षभर अनेक खेळांची धामधूम असणारे क्रीडा संकुल, हजारो खेळाडूंना संधी देणारा पार्ले महोत्सव, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी इत्यादी खेळांचे दर वर्षी होणारे उत्सव ह्या सर्वांनी आपल्या पार्ल्याचे व पार्लेकरांचे जीवन अत्यंत समृद्ध केले आहे ह्यात शंका नाही.

तसे म्हटले तर पार्ले हे पूर्वापारपणे  ‘मुंबई ची सांस्कृतिक राजधानी’ व ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखले जायचे. ‘आम्ही पार्लेकर’ अंकाचा सुध्हा बराचसा भाग हा त्या विषयाच्या बातम्यांनी व लेखांनी व्यापलेला असायचा. पण गेल्या काही वर्षात आपल्या उपनगरांची ओळख ‘क्रीडा नागरी’ म्हणून सुध्हा पुढे येत आहे. ह्याचे योग्य प्रतिबिंब आपल्या अंकात पडतेच, पडायलाच पाहिजे.

ह्या बदलाचे श्रेय क्रीडा आयोजकांचे आहेच पण त्यापेक्षाही मोठा वाटा पार्ल्यातील असंख्य खेळाडूंचा व त्यांचे नैपुण्य बघायला येणाऱ्या, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणाऱ्या पार्लेकर क्रीडा रसिकांचा आहे हे नाकारून कसे चालेल.

 

संपादकीय – वार्षिक विशेषांक २०१८

_mg_0080‘आम्ही पार्लेकर’ ने वार्षिक अंकाची प्रथा सुरु करून दोन तपे लोटली पण प्रत्येक वेळी तो एक नवा अनुभव देऊन जातो.

गेली अनेक वर्षे मराठी साहित्य क्षेत्रात दिवाळी अंकांची परंपरा आहे. सुमारे ४०० ते ४५० दिवाळी अंक दार वर्षी प्रकाशित होतात व हा एक मान्यता प्राप्त साहित्य प्रकार झाला आहे. असे असतानाही दिवाळी अंकांची भाऊगर्दी टाळण्यासाठी व स्वतःचे वेगळे अस्तित्व जपण्यासाठी आम्ही पार्लेकर ने वार्षिक अंकाची प्रथा सुरु केली व यशस्वीपणे राबवली. काही वेळा आम्ही ह्या अंकासाठी विशिष्ठ विषय निवडले, उदाहरणार्थ  क्रीडा, घरकुल, मनोरंजन विश्व इत्यादी. पण ह्यामुळे इतर विषयांवर अन्याय होतो व अंकातील वैविध्य कमी होते असे आमच्या लक्ष्यात आले. ह्याचमुळे गेली काही वर्षे आपला वार्षिक अंक हा जास्तीत जास्त विषयांना स्पर्श करणारा असावा असा आमचा प्रयत्न असतो. ह्या निमित्ताने अनेक विषयांवर अनेक लेखकांशी, विचारवंतांशी, तज्ज्ञांशी चर्चा होते. कुठले विषय महत्वाचे आहेत ? लोकं सध्या काय वाचतात ? समाजात नवीन काय बदल घडतायत ? ह्याचे भान येते आणि म्हणूनच २०१८ चा ‘आम्ही पार्लेकर’ चा वार्षिक अंक वाचकांना सुद्धा एक नवा अनुभव देईल अशी खात्री वाटते. ह्या अंकातील मराठी जगतातील काही वैशिष्टयपूर्ण व्यक्तींशी संवाद साधणारे ”थेटभेट’, अनेक क्षेत्रात पारंपरिक गोष्टींकडे नव्याने पाहण्याच्या प्रवाहाचा लेखाजोगा मांडणारे ‘जुनं …… नव्याने’, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय माध्यमांवर २०१८ मध्ये ठसा उमटवणारे ‘न्यूसमेकर्स’ हे विभाग आपल्या पसंतीस नक्कीच उतरतील. त्याच बरोबर मराठी सारस्वतातील उत्तुंग व्यक्तिमत्वे ग दि माडगूळकर, पु.ल देशपांडे व सुधीर फडके ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना वाहिलेली मानवंदना अत्यंत वाचनीय अशी आहे. पुलंच्या विविध  व्यक्तिरेखांवर आधारित ‘व्यक्ती आणि वल्ली रिटर्न्स’ हा व्यंगचित्रांचा संच तर केवळ अफलातूनच आहे. वार्षिक अंकाच्या मुखपृष्ठावर पार्लेकर चित्रकारांचाच हक्क आहे अशी आमची अनेक वर्षांपासूनची भूमिका आहे व आजपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या चित्रकृती आपण पाहात आला आहेत. ह्यावेळच्या मुखपृष्ठावरील चित्र सुद्धा अश्याच एका जेष्ठ कलाकाराच्या कुंचल्यातून साकारले आहे.

सरत्या वर्षातील मासिक अंकात सुद्धा ‘आम्ही पार्लेकर’ ने अनेक विषयांना स्पर्श केला. ‘लक्षवेधी’, ‘झेप’, ‘स्टार्टअप’, ‘गुरुवंदना’ ह्यासारख्या सदारांना छापील अंकाबरोबरच डिजिटल विश्वात सुध्हा भरघोस प्रतिसाद मिळाला. पार्ल्यात अनेक जुन्या वाड्या, वस्त्या आहेत. तेथील रहिवाश्याच्या जीवनावर प्रकाश टाकणारी, त्यांच्या समस्यांचा उहापोह करणारी आमची लेखमाला सर्वांच्या पसंतीस उतरली. पुढील वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये सुद्धा ‘आम्ही पार्लेकर’ च्या मासिक अंकात अनेक वैशिष्ठ्यपूर्ण सादरे असतील ह्याची खात्री बाळगा ! ‘पार्लेकर youtube चॅनेल’ नुकताच सुरु झाला आहे. त्याला सुध्हा पार्लेकरांचा प्रतिसाद आश्वासक आहे.

आता थोडे पार्ल्याविषयी. ह्या वर्षी पावसाळ्यात पाणी जास्त तुंबले नाही ह्याचे श्रेय महानगरपालिकेच्या कामाला व त्याचबरोबर त्यांचा पाठपुरावा करणाऱ्या आमच्या लोकप्रतिनिधींना द्यावे लागेल. ह्या वर्षी अनेक रस्त्यांचे दुरुस्तीकरण सुद्धा झाले. पार्ल्यातील वाहतुकीचा प्रश्न मात्र दिवसेंदिवस उग्र बनत चालला आहे व त्याचे उत्तर शोधण्यात कोणालाच रस नाही अशी लोकांची भावना होत आहे. वाढत जाणारी गाड्यांची संख्या, पार्किंग च्या जागेचा अभाव, पुनर्विकास प्रक्रियेमुळे उभ्या राहणाऱ्या उंच इमारती, रस्त्यावर दुतर्फा वस्तीला असणारे फेरीवाले ह्या सर्वांमुळे सामान्य पार्लेकर पादचाऱ्यांचा फारच गैरसोय होत आहे. ह्या व अश्या अनेक प्रश्नांत प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. हे मला पूर्ण मान्य आहे की मुंबईतील इतर अनेक उपनगरांपेक्षा पार्ल्यात कमी समस्या आहेत, लोकं सभ्य, सुसंस्कृत आहेत व कायद्याने वागणारी आहेत. गुंडगिरीची, चोऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. असे असले तरी अनेक बाबतीत लोकांना मदतीची गरज असते व त्याचसाठी प्रशासन आणि आपल्यातील दुआ म्हणून आपण लोकप्रतिनिधी निवडतो. अर्थात लोकांच्या अपेक्षा १०० टक्के पूर्ण करणे अशक्य असते पण आपला प्रतिनिधी आपल्यासाठी काम करत आहे ही भावना निर्माण करणे गरजेचे आहे.

समस्त पार्लेकरांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेछा !

संपादकीय – नोव्हेंबर २०१८

_mg_0080“आमचे सर्व काम गेले चुलीत” पंचाहत्तरी पार केलेले व उभे आयुष्य सामाजिक कार्यात घातलेले लेले काका उद्वेगाने म्हणाले. “ज्यांच्या साठी करतो त्यांना त्याची जाणीव नको का ? नाही रे, आमची लायकीच नाही सुसंस्कृत म्हणवून घेण्याची” आयुष्याच्या संध्याकाळी नशिबी असा तळतळाट येणे यासारखे दुखः नाही.

“आम्ही पार्ल्यातील वाहतूक कोंडीसाठी ट्राफिक पोलिसांना दोष देतो पण खरे म्हणजे ट्राफिक कोण करतो ? आम्हीच ना ! वाहतुकीच्या रस्त्यावर डबल पार्किंग कोण करते ? आपणच ना !” काकांचा मुद्दा बिनतोड होता.

“अनधिकृत फेरीवाले हटवण्याची आपण मागणी करतो पण त्यांच्यापेक्षा जास्त जागा रस्त्याच्या दोन्ही बाजूला केलेल्या पार्किंग ने व्यापली असते. बरे, ह्या फेरीवाल्यांकडून भाजी आम्हीच घेतो ना ?मग त्यांना घालवण्याची मागणी करण्याचा आम्हाला नैतिक अधिकार आहे का ?”

“मध्यंतरी आम्ही स्वच्छतेची मोहीम चालवली. ओला सुका कचरा वेगळा करायला सांगितलं. ते पाळायचे तर सोडाच, लोक रस्त्याच्या कडेला सुशोभीकरणासाठी ठेवलेल्या फुलझाडांच्या कुंड्यातच कचरा टाकते झाले.ह्याला काय म्हणावे ? “काका, येव्हढे चिडू नका, हळूहळू सवय होईल लोकांना” मी त्यांना समजवायचा प्रयत्न करत होतो.

“आणि तुला सांगतो, तुमच्या पेपर मध्ये जी विशेषणे तुम्ही पार्ल्याला लावता ना, शिक्षणाचे माहेरघर, मुंबईची सांस्कृतिक राजधानी वगैरे वगैरे, ती ताबडतोब बंद करा. आपण कुठले सुसंस्कृत ? भाषणाला टाळ्या वाजवून आणि गाण्याच्या कार्यक्रमात थापा मारून का कुठे सुसंस्कृतपणा येतो ?”काकांच्या चेहऱ्यावर संताप आणि डोळ्यात पाणी होतं.

काकांचे म्हणणे खरे होते. आपण पार्ल्यातील वाहतूक कोंडी, कचरा ह्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन सर्वांना दोष देतो पण स्वतःत सुधारणा करण्याची, बदल घडवण्याची वेळ आली कि कच खातो. ‘आम्हाला पार्ले स्वच्छ आणि सुंदर पाहिजे पण त्यासाठी आम्ही काहीच करणार नाही. सरकारला कर दिला कि आमची सर्व जबाबदारी संपली आणि आम्ही इतरांना दोष द्यायला मोकळे’ असा दृष्टिकोन ठेवून कसे चालेल ?

 

संपादकीय – ऑक्टोबर २०१८

_mg_0080नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात व बाहेरही अनेक ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. पुण्याचा गणेशोत्सव विशेष प्रेक्षणीय असतो असे म्हणतात व त्यातील वेगवेगळ्या गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी कोण गर्दी लोटते. आपल्या पार्ल्याचा गणेशोत्सव सुद्धा विशेष असाच असतो. पार्ल्यात अनेक वर्षांची परंपरा असलेली गणेश मंडळे व सेवाभावी संस्था आहेत. पार्ल्यातील कलाकारांनी साकारलेले देखावे अत्यंत प्रेक्षणीय तर असतातच पण त्यातून अनेक वेळा एक सामाजिक संदेश सुद्धा दिला जातो.

गेली काही वर्षे गणपती मिरवणुकीच्या निमित्ताने ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुढे आला आहे. अखेरीस उच्च न्यायालयाला ह्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला व कानठळ्या बसवणाऱ्या’डॉल्बी’ सिस्टीम च्या वापरावर बंदी घालावी लागली. पार्ल्यात गेल्या काही वर्षांपासून आवाजाची पातळी कमी कमी होत आहे व ह्या वर्षी तर आवाजाचा काहीच त्रास झाला नाही असे अनेकांनी आवर्जून ‘आम्ही पार्लेकर’ ला सांगितले. विसर्जनाच्या दिवशीच्यावाहतूक नियंत्रणाबद्दल सुद्धा लोकांनी समाधान व्यक्त केले.

गणेशोत्सवातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे विसर्जन कुठे व कसे करावे. गेल्या काही वर्षांपासून आमच्या लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने पार्ल्यात हेडगेवार मैदानात गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय केली जाते. अनेक सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते मदत करण्यासाठी येथे तत्पर असतात. दीड दिवसाचेच किमान दोन अडीच हजाराहून जास्त गणपती येथे बोलवले जातात असा अंदाज आहे. एवढी गर्दी असूनही कुठेही गोंधळ न होता सर्व काम अत्यंत शिस्तीत होते. पार्ल्यात हल्ली अनेक घरी मूर्ती शाडूच्या व कागदाच्या असल्यामुळे पर्यावरणाचे सुद्धा रक्षण होण्यास हातभार लागतो.