संपादकीय – ऑगस्ट २०१८

_mg_0080हल्लीच्या विद्यार्थ्यांचे मार्क बघितले कि दिवसभरात निदान २५ तास तरी ही मुले अभ्यास करत असावीत असे वाटते. मग खेळायला, हुंदडायला वेळ कुठला मिळणार? काही सन्माननीय अपवाद सोडता बहुतेक मुले हि आई वडलांच्या दबावामुळेच अभ्यास करतात. आपल्या मुलाने उत्तम मार्क मिळवावेत, उच्चशिक्षण घ्यावे, चांगले कॅरिअर करावे ह्या पालकांच्या अपेक्षेत काहीच गैर नाही पण त्यासाठी आपल्या मुलाची क्षमता न ओळखता त्याला अभ्यासाच्या जोखडाला जुंपायचे हे कितपत बरोबर आहे? आणि अभ्यास(म्हणजे विज्ञान व गणित) जमला नाही म्हणजे तो / ती पूर्णपणे नालायकच का? अनेकांना संगीत, चित्रकला, अभिनय अश्या अभ्यासेतर विषयात जास्त रुची व गती असू शकते आणि त्यात सुद्धा भविष्यात अनेक संधी उपलब्ध आहेत हे प्रथम पालकांनाच उमजत नाही, मग ते आपल्या मुलाला काय समजावणार ?

खरे म्हणजे असे वर्गीकरण शाळेच्या सुरवातीच्या काही वर्षातच व्हयला पाहिजे. कुठल्या विद्यार्थ्याला काय आवडते, त्याचा कल कुठे आहे हे पाहूनच त्याच्या शिक्षणाचे विषय ठरले पाहिजेत. सध्याच्या व्यवस्थेत संगीत व चित्रकलेचा तास म्हणजे जवळ जवळ ऑफ पिरियड असतो. खरे म्हणजे मोठे झाल्यावर ह्यातील अनेक जण मोठमोठ्या क्लासेस ना जाऊन जाऊन ‘म्युझिक’ व ‘पेंटिंग’ शिकतील आणि मला ह्यातच कसा रस होता, कसे पालकांच्या दबावामुळे इंजिनियरिंग केले ह्याच्या कहाण्या सर्वांना सांगत फिरतील. ह्यातील विनोदाचा भाग सोडला तर हे आपल्याला मान्य करावे लागेल कि लहानपणीच कल ओळखण्याचे व त्यानुसार विषयात बदल करण्याचे स्वातंत्र्य हि शिक्षण व्यवस्था आपल्याला देत नाही. त्यामुळे ह्या व्यवस्थेतच अभ्यासाबरोबरच खेळ, कला इत्यादी विषयात मुलांची प्रगती कशी होईल ह्याची काळजी शाळेने घ्यावी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व द्यावे अशी अपेक्षा ठेवणे गैर आहे का? पण आपल्या शाळांवर सुद्धा पुर्णपणे ‘मार्कस’ वादी विचारांचा पगडा आहे.

म्हणूनच बच्चन, तेंडुलकर, मंगेशकर ह्यासारखी व्यक्तिमत्वे व्यवस्थेतून नव्हे तर स्वतःच्या हिमतीने व मेहनतीने निर्माण होतात !

Advertisements

संपादकीय – जुलै २०१८

_mg_0080विसाव्या शतकाच्या सुरुवातीला विले पार्ले हे एक मुंबईच्या बाहेर असलेले छोटे गाव होते. हळूहळू जशी मुंबई वाढायला लागली तसे हे टुमदार गाव मुंबईच्या वेशीपर्यंत पुढे सरकले. येथील वस्ती बहुतांशीकोळी व ख्रिश्चन समाजाची होती. १९५० च्या सुमारास बाबुराव परांजपे ह्यांनी विलेपार्ले  ह्या गावात सहनिवास बांधण्यास सुरवात केली व अनेक मध्यम वर्गीय मराठी कुटुंबांसाठी ही एक पर्वणी ठरली. एक प्रकारे पार्ल्यातील मध्यम वर्गाची मुहूर्तमेढबाबुरावांनी घातली असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. हेही पण खरे की ही  मराठी कुटुंबे मुख्यत्वे करून चाकरमानी होती, नोकरी करणारी होती. व्यवसाय करणारे मराठी कुटुंब अपवादानेच होते. यथावकाश स्वतःच्यामेहेनतीने ह्या लोकांनी थोडाबहुत पैसा गाठीला बांधला, आपल्या मुलांना व्यवस्थित शिकवले, चांगले संस्कार दिले. स्वातंत्र्यानंतर शिक्षण घेतलेले तरुण मोठ्या हुद्द्यावर काम करू लागले, काही परदेशातही गेले.

आज पार्ल्यातील तरुण हे त्या अर्थाने मध्यम वर्गाची चौथी पिढी. ह्या वेळेपर्यंत बरयाच कुटुंबांनी उच्च मध्यम वर्गात स्थलांतर केले होते. एकविसाव्व्या शतकात विशेषतः भारतीय अर्थव्यवस्थेने स्वीकारलेल्या उदारीकरण व जागतिकीकरण ह्या तत्त्वांमुळे अनेक व्यावसायिक क्षेत्रे उदयास आली आहेत. अमेरिकेचे आकर्षण अजूनही कमी झालेले नाही पण जे तरुण भारतातच राहायचे ठरवतात त्यांच्यासाठी नोकरी हा एकमेव पर्याय उरलेला नाही. अनेक नवे पर्याय त्यांना खुले झाले आहेत. पण हे पर्याय निवडण्यासाठी प्रथम स्वतःला काय आवडते, काय जमते

ह्याचा विचार करणे गरजेचे आहे. सचिन तेंडुलकर ला अनेक खेळात गती होती पण वयाच्या आठव्या वर्षीच त्याने ठरवले की मी फक्त क्रिकेट खेळणार, दुसरे काही नाही. तात्पर्य, अनेक गोष्टीत गती असणे पुरेसे नाही, त्यातून आयुष्यभर पुरेल अशी एखादीच गोष्ट, एखादाच विषय निवडता आला पाहिजे. हे जमले तर पुढला प्रवासनक्कीच सुखदायी व मनोरंजक होईल ! ‘Jack of all trades and master of ONE’ हा या युगाचा मंत्र आहे.

संपादकीय – जून २०१८

_mg_0080जून म्हणजे १० वी १२वी च्या निकालांचा महिना. इतर वर्षांपेक्षा ह्या वर्षी विद्यार्थी जास्त अभ्यास करतात. कुणी क्लासला जातात, कोणी शिकवणी लावतात. ही वर्षे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दिशादर्शक वर्षे असतात. ह्या वर्षी केलेल्या अभ्यासावर, घेतलेल्या निर्णयावरच त्यांच्या शिक्षणाची दिशा व झेप ठरत असते. एका अर्थाने हा विद्यार्थीदशेतील सर्वात कठीण काळ असतो.

एके काळी आपल्या करिअरची निवड करणे सोपे होते. सर्व हुशार मुले (किंवा जास्त मार्क मिळवणारी मुले असे म्हणू) विज्ञान शाखेकडे जात, थोडे कमी मार्क पडले कि वाणिज्य शाखा व अगदीच काठावर पास झाले कि कला शाखा हे ठरलेले असायचे. पण आता काळ खूपच बदलला आहे. विद्यार्थ्यांना अनेक नवी क्षितिजे खुणावू लागली आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणामुळे व जागतिकीकरणामुळे अनेक क्षेत्रे उदयास आली आहेत. त्यामुळे करिअरच्या असंख्य संधी निर्माण झाल्या आहेत. आजचा विद्यार्थी ह्या वाटा चोखाळायला उत्सुक आहे पण दुर्दैवाने आजचे पालकच अजून जुन्या कल्पना, जुने विचार ह्यांना चिकटून आहेत. त्यांना अजूनही इंजिनीरिंग व मेडिकल हेच शिक्षणाचे परमोच्च बिंदू वाटतात आणि हेच कालबाह्य ज्ञान ते आपल्या मुलांच्या डोक्यात बळजबरीने कोंबू पाहतात. विद्यार्थ्यांवर अभ्यासाने जेव्हढा ताण येत नसेल तेव्हढा पालकांच्या असल्या मूर्ख अपेक्षांमुळे येतो व त्यातूनच भीती, नैराश्य येते, निर्णय क्षमता कमी होते. प्रसंगी आत्महत्येसारखे टोकाचे विचार सुद्धा येतात. आमचे सुशिक्षित व सुसंस्कृत पालक ह्या गोष्टी कधी समजणार ?

बरे, आजच्या युगात शैक्षणिक पात्रतेवर सर्व काही ठरते असेही नाही. अनेक क्षेत्रातील यशस्वी लोकांकडे आपण पहिले तर त्यांचे शिक्षण एकतर यथातथाच असते किंवा त्यांच्या शिक्षणाचा त्यांच्या करिअरशी काहीही संबंध नसतो. अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांवर किती ताण टाकायचा, आपली स्वप्ने त्यांच्यावर किती थोपवायची, ह्याचा साकल्याने विचार करण्याची वेळ आता पालकांवर आली आहे. थोडक्यात, समुपदेशनाची गरज आज विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनाच जास्त आहे !

 

संपादकीय – मे २०१८

_mg_0080इंग्रजी राजवटीच्या खुणा पुसण्याचा एक भाग म्हणून दक्षिण मुंबईतील काही जुने पूर्णाकृती पुतळे भाऊ दाजी लाड संग्रहालयात ठेवण्यात आल्याचे मध्यंतरी वाचनात आले. ह्यातील अनेक पुतळे पार्ल्याच्या म्हात्र्यांनी घडवले होते असेही समजले.

वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी ‘मंदिरपथगमिनी’  ह्या अद्वितीय शिल्पाची निर्मिती करणारे रावबहाद्दूर गणपतराव म्हात्रे ह्यांचे वास्तव्य आपल्या पार्ल्यात होते हे आता किती जणांना आठवते ? त्यांचा जन्म जरी गिरगावचा असला तरी त्यांची कर्मभूमी पार्ले नगरीच होती.

‘मंदिरपथगमिनी’ ह्या शिल्पाचे कौतुक पार इंग्लंडमध्ये सुद्धा झाले. रवींद्रनाथ टागोर, इत्यादी दिग्गज्जांनी ह्या कलाकृती विषयी गौरोवोद्गार काढले . म्हात्रे ह्यांनी बनवलेले असंख्य पुतळे देशातील कानाकोपऱ्यात तसेच परदेशात सुद्धा गेले, त्यांच्या अनेक शिल्पाची आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहव्वा झाली, रावबहाद्दूर हा किताब तसेच अनेक मान सन्मान प्राप्त झाले, भारतातील अर्वाचीन शिल्पकलेचे महर्षी म्हणून सर्वदूर कीर्ती पसरली. म्हात्रे ह्यांचा शिल्प कारखाना पार्ल्यातच टिळक विद्यालयाच्या समोर होता. पार्लेश्वर मंदिरातील नंदी तसेच दत्त मंदिरातील मूर्ती ह्या त्यांच्याच कलाकृती ! पार्लेश्वर मंदिराच्या स्थापनेसाठी त्यांनी आपली थोडी जमीन सुद्धा दिली होती.

असे असूनही आज पार्ल्यात म्हातार्यांचे एकही स्मारक नाही हि आमची खंत आहे.मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणवून घेणाऱ्या पार्ल्यात असंख्य कलाप्रेमी मंडळी राहतात. कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्था पार्ल्यात आहेत. ह्या सर्वांनी मनावर घेतले तर ह्या आद्य कलाकाराचे यथोचित स्मारक पार्ल्यात नक्कीच होऊ शकते.

ह्या संदर्भात असे सुचवावेसे वाटते की ‘मंदिरपथगमिनी’ हे शिल्प (किंवा त्याची प्रतिकृती) म्हात्रे यांच्या वंशजांच्या सहकार्याने पार्लेश्वर मंदिराच्या प्रांगणात उभे राहू शकते. तिथे ते नक्कीच शोभून दिसेल!

 

संपादकीय – एप्रिल २०१८

_mg_0080परीक्षांचा मौसम संपून आता मुलांच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत. पूर्वी परीक्षा संपल्याचा मुलांना कोण आनंद व्हायचा. आता दोन महिने अभ्यास नाही,कुठलेही वेळापत्रक नाही, आई बाबांचे ओरडणे नाही, फक्त स्वच्छंदपणे बागडायचे !

गेल्या काही वर्षात पार्ल्यात सुट्टीतील शिबिरे सुरु झाली. मुलांनी सुट्टीतील हा वेळ ‘वाया’ घालवण्यापेक्षा काहीतरी नवीन शिकावे हा त्यामागचा हेतू. हेतू स्तुत्य असला तरी त्याचा हल्ली अतिरेक होऊ लागला आहे असे वाटते. अनेक so called ‘शिबिरात  अभ्यासांचेच किंवा त्याच्याशी संलग्न असलेले विषयच शिकवतात. काही ठिकाणी तर चक्क पुढल्या वर्षीचा अभ्यास सुद्धा सुरु करतात. ह्या सर्व शिबिरांमध्ये मुले येवढी गुंतुन जातात की त्यांना सुट्टीचा ‘फील’ येतच नाही. आजच्या स्पर्धात्मक जगात ह्याला पर्याय नाही असा युक्तिवाद अनेक जण करतील पण मग मुलांचे व्यक्तिमत्व  सर्वांगाने कसे फुलणार ?

उन्हाळ्याच्या सुट्टीचा उद्देश काय असतो ? तर वर्षभर अभ्यास केल्यानंतर मुलांना थोडे दिवस पूर्णपणे टेन्शन विरहित खेळायला मिळावेत. रोजच्या चाकोरीबद्ध जीवनातून त्यांनी बाहेर पडावे, वेगवेगळे खेळ खेळावेत, सहलीला जावे, निसर्गाची गट्टी जमवावी, ज्यायोगे त्यांचा अभ्यासाचा शीण पूर्णपणे नाहीसा व्हावा. आज मात्र केवळ आई बाबांना वेळ नाही म्हणून मुलांना कुठल्यातरी शिबिरात अडकवायचे हे कितपत बरोबर आहे ? ह्यात अनेक वेळा मुलांच्या आवडीपेक्षा ‘ह्याचा पुढे काय उपयोग ?’ ह्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचाच प्रयत्न असतो.

व्यक्तिमत्व विकासाच्या शिबिरात जाण्यापेक्षा स्वच्छंदपणे बागडल्याने, मित्रांबरोबर गप्पा मारल्याने, वेगवेगळे खेळ खेळल्याने, प्रसंगी थोडी भांडणे, मारामारी केल्याने व्यक्तिमत्व जास्त सुदृढ होते असे माझे मत (व अनुभव देखील) आहे.

आपल्याला काय वाटते ?

संपादकीय – मार्च २०१८

_mg_0080सद्धया दहावी बारावीच्या परीक्षांचे दिवस आहेत. विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. मैदाने ओस पडली आहेत. अनेक आयांनी ऑफीस मधून परीक्षेसाठी सुट्टी काढली आहे. बाबांनी आउटस्टेशन टूर्स पुढे ढकलल्या आहेत. घरचा टीव्ही बंद झाला आहे. मोबाईल फक्त मित्राला अभ्यासातील शंका विचारण्यापुरता सुरु आहे. कुठल्याही प्रकारच्या मनोरंजनावर सक्त बंदी आहे. सर्व वातावरण कसे परीक्षामय झाले आहे.

वरील वर्णनात थोडी अतिशयोक्ती असेलही पण पार्ल्यातील अनेक घरांमध्ये अश्याच प्रकारचे वातावरण आहे हे आपण नाकारू शकत नाही. आजच्या युगात असलेली जीवघेणी स्पर्धा व त्यामुळे अभ्यासाला व मार्कांना आलेले अवास्तव महत्व ह्यामुळे मुलांचे बालपण व तरुणपण तर कोमेजले आहेच पण घरातील खेळीमेळीचे वातावरण, एकमेकातील नातेसंबंध ह्यावरसुद्धा ह्या परीक्षांचा परिणाम होत आहे. ह्या सगळ्याची खरंच कितपत गरज आहे ? कुटुंबाकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा व जीवघेण्या स्पर्धेचा ताण ह्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे; ह्याचाही विचार झाला पाहिजे. अनेक वेळा पालक आपली अपूर्ण स्वप्ने मुलांवर लादतात. हे सुद्धा चुकीचे आहे.

आमची बँच बारावी होऊन आता ३५ च्या वर वर्षे झाली आहेत. त्यावेळी सुद्धा मार्कांवर आधारित जातीयवाद होताच. पण आता इतक्या वर्षांनंतर असे दिसते कि शाळेतील अनेक हुशार (?) विद्यार्थी पुढे म्हणावे तसे चमकले नाहीत ह्या उलट अनेक ढ (?) विद्यार्थ्यांनी पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात नावे कमवली. अनेकांनी तर ज्या विषयात शिक्षण झाले तो सोडून भलत्याच विषयाचे प्रोफेशन बनवले.

 मित्रांनो, ह्या सगळ्याचा अर्थ एकच. अभ्यास जरूर करा पण फक्त अभ्यास करू नका. इतरही आवडीच्या उपक्रमात सहभागी व्हा. भविष्याची जास्त चिंता करू नका व आई बाबांना सांगा Just Chill !

संपादकीय – फेब्रुवारी २०१८

_mg_0080फेब्रुवारी मार्च म्हणजे १० वी आणि १२वी च्या परीक्षांचा काळ. पुढील आयुष्याची दिशा व गती ठरवण्यासाठीचे हे दोन महत्वाचे टप्पे. अर्थातच विद्यार्थी व पालक ह्या काळात tension मध्ये असणे सहाजिक आहे.

पूर्वीच्या काळी मर्यादित संधी असल्यामुळे इंजिनीरिंग किंवा मेडिकल असे दोनच पर्याय हुशार मुलांपुढे असत. मार्क कमी पडले तर कॉमर्स आणि अगदीच काठावर पास असेल तर नाईलाजाने आर्टस्, असे साधारण ठरलेले असायचे. आर्टस् व कॉमर्स ची मुले १२वी मध्ये मजा करायची आणि सायन्स ची मुले नशिबाला दोष देत अभ्यास करायची. एखादी सरकारी खात्यात किंवा बँकेत नोकरी मिळाली तर आयुष्याची ददात मिटली असे वाटण्याचे ते दिवस होते.

१९९१ मध्ये आपल्या देशाने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि आपली अर्थव्यवस्था टप्प्या टप्प्याने खुली करण्याचे ठरवले. त्यामुळे गेल्या २६ वर्षात अनेक नवी क्षेत्रे उदयास आली व तो पर्यंत अस्तित्वात नसलेले अनेक अभ्यासक्रम शिक्षणात सामाविष्ट झाले. विद्यार्थी संख्येमुळे स्पर्धा जरी वाढली असली तरी आजच्या घडीला जागतिकारणामुळे भरपूर संधी व पर्याय उपलब्ध झाले आहेत. अनेक नव्या करिअरच्या वाटा निर्माण झाल्यामुळे इंजिनीरिंग आणि मेडिकल ची सद्दी संपली आहे. आज अनेक हुशार विद्यार्थी कॉमर्स व आर्टस् ला पसंती देत आहेत. नोकरीप्रमाणेच व्यवसायात सुद्धा अनेक संधी निर्माण होताहेत. एखाद्या विषयाची मनापासून आवड व त्यात प्रचंड मेहेनत करायची तयारी एवढ्या भांडवलावर आज जागतिक स्तरावर सुद्धा चमकता येते हे आजच्या तरुणाने ओळखले आहे व तो आपली स्वप्ने साकारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आजच्या ‘कम्फर्ट झोन’ मधून बाहेर येऊन थोडा धोका पत्करायची त्याची तयारी आहे. कुठलाही धोका न पत्करणे यातच सर्वात जास्त धोका आहे हे त्याने ओळखले आहे.

All the best my young friends !