आमची कराची सोडताना

karachi mumbai15 ऑगस्ट 1947 हा भारताचा स्वातंत्र्यदिन. याच दिवसाशी देशाच्या फाळणीच्या कटू आठवणीही जोडल्या गेल्या आहेत. हजारो लोकांवर नेसत्या वस्त्रानिशी देश सोडण्याची पाळी आली होती. पार्ले टिळक विद्यालयातील विद्यार्थीप्रिय कलाशिक्षक कै. श्रीधर गावडे हे अशाच विस्थापितांपैकी एक. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी आपल्या काही आठवणी लिहून काढल्या व आपले स्नेही सुखशील चव्हाण यांच्याकडे सुपुर्द केल्या. 17 मे 2014 रोजी गावडेसरांचे निधन झाले. त्यांच्या आठवणीतील काही संपादित अंश…

जून 1947 मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून चित्रकला शिक्षकांचा ट्रेनिंग कोर्स पूर्ण करून मी कराचीला गेलो आणि आमच्या कराचीच्या मराठा हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून हजर झालो. मी याच शाळेचा विद्यार्थी असल्याने इथले मुख्याध्यापक मा.सी. पेंढारकर सर आणि इतर कमिटी मेंबर्स मला ओळखत होते. वर्गातली मुलं उत्साही दिसली व मलाही आनंद झाला की मी शिकून आलो त्याचा उपयोग किंवा प्रयोग मी करीत होतो. मुले चित्रकला तासाला आनंदाने येत होती. एकूण वातावरण शांत व उत्साही होते. कोठेही फिरा, कसली भीती नाही. शांत जीवन चालू होते पण ऑगस्ट 1947 देशाची फाळणी होणार होती व आमची कराची पाकिस्तानमध्ये जाणार होती. पुढे काय होणार हे समजत नव्हते. जसे जसे फाळणीचे दिवस जवळ येऊ लागले तसे वातावरण बदलू लागले.

कराची शहराचा ताबा गुंडांनी घेतला. रस्त्यावर हिंदु दिसला मग ती बाई असो किंवा मुले, त्यांना कापायचे. रस्त्यावर मुडदे पडत होते. हिंदुंना कोणीही वाली नव्हता. सरकारचे पोलीस वगैरे कोणीही दिसत नव्हते. मरून पडलेल्या माणसांचे मुडदे उचलायलाही कोणी नव्हते. सहसा कोणी बाहेर पडत नव्हते कारण बाहेर पडलेला घरी परत येईल याची शक्यता नव्हती. शाळा बंद पडल्या. ज्यांच्याजवळ पैसा होता ते हिंदु लोक विमानाने, बोटीने, रेल्वेने भारतात जात होते.

हे सर्व घडत असताना स्थानिक मुसलमानांनी मात्र आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. हिंदूंना मारण्याचे हे प्रकार त्यांना आवडले नाहीत. पाकिस्तान सरकार म्हणून जे काही होते ते कोणाला कोणते पद पाहिजे यावरून आपापसात भांडत होते. त्यामुळे त्यांना ह्या किरकोळ गोष्टी बघायला वेळच नव्हता.

पण घरात बसून खाण्याच्या वस्तू कशा मिळणार, त्यासाठी चोरून बाहेर पडताना दोनवेळा मी गुंडांच्या हल्ल्यातून बचावलो. एकदा धावता धावता आमच्या बिल्डींगच्या तळमजल्यावरील मुस्लीम बाईने मला ओढून घरात घेतले आणि तिच्या मुलाची मुस्लीम पद्धतीची टोपी दिली. त्या टोपीमुळे मी बाहेर निर्धास्तपणे फिरू शकलो.

दहशतीच्या वातावरणामुळे अनेक हिंदू कुटुंबे घर-दार सोडून भारतात जात होते. आम्ही दोन तीन कुटुंबे वगळता बिल्डिंगमधली सर्व हिंदू कुटुंबे निघून गेली होती. माझे चित्रकलेचे गुरु कुलकर्णी सर जवळच राहत होते, त्यांना कुटुंबासह आगबोटीने कराची सोडण्यात मी मदत केली. ते गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी उजाडताना दरवाजाचा जोरदार खट्‌खट असा आवाज आला. पहातो तर दोन मुसलमान गुंड हातात सुरे घेऊन उभे! थोडी भीती वाटली. एवढ्यात त्यांनी दरडावून हुकुम केला, जाना है तो सिर्फ दो घंटो मे निकल जाव. सिर्फ कपडा लेके जाव! आम्ही आमचे कपडे बॅगमध्ये भरून ठेवलेले होतेच. माझी सहा कबुतरे होती फार चांगल्या जातीची, त्यांचा खाण्याचा धान्य भरलेला डबा त्यांच्या खोक्यात ठेवला. त्यांचा व घराचा निरोप घेतला. घरामध्ये आम्ही जेवण करीत होतो ते सर्व सामान तसेच टाकून एक कपड्याची बॅग घेऊन बाहेर पडलो. घराला नमस्कार केला. खाली आलो व ज्या बाईने मला वाचविले तिचा निरोप घेऊन त्यांची टोपी परत केली. ती रडायला लागली, आम्ही रस्त्याने चालत असताना माझी तीन कबुतरेही आमच्याबरोबर निघाली. माझे बंधु रागावले. म्हणाले, “आता ह्यांना सुद्धा घेऊन जाणार?’. तेवढ्यात माझी शाळा आली आणि ती उडून निघून गेली. त्यांना काय माहीत आता आपला मालक परत येणार नाही.

अशा रितीने सर्व हिंदुंना योजनाबद्धपणे गुंडांकरवी धाकदपटशा दाखवून घरे सोडण्यास भाग पाडण्यात आले.

घरं सोडलेली यातली सर्व मराठी माणसे आमच्या मराठा हायस्कुलमध्ये आश्रयाला येत असत. रोज दोन-तिनशे माणसांचा जमाव असे. पंडितसाहेबांनी स्वखर्चाने या सर्वांची आगबोटीने भारतात पाठवण्याची सोय केली होती. लोक आपल्या कुवतीनुसार पैसे देत पण पैशासाठी कुणालाही अडवण्यात आले नाही. कराची सोडणाऱ्यांना कुठलेही गुंड त्रास देत नसत.

शेवटच्या बोटीत आम्ही सर्व स्वयंसेवक आणि इथले भिकारीही होते. निघताना आम्ही सर्वांनी पंडित साहेबांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला. मी माझ्या आवडत्या शाळेलाही साष्टांग नमस्कार घातला आणि पाणावलेल्या डोळ्यांनी कराचीचा निरोप घेतला. सरकारी अधिकाऱ्यांनी सर्वांच्या सामानाची कसून तपासणी केली. कराचीमध्ये जे गुजराथी, सिंधी वगैरे व्यापारी होते ते आधीच सर्व माल, सोनेनाणे वगैरे घेऊन गेले होते. पाकिस्तान सरकारला मात्र उशीरा जाग आली. आम्हाला मात्र आमचे सगळे सामान, भांडीकुंडी तिथेच टाकून भारतात यावे लागले.

आम्ही सर्व स्वयंसेवकांनी सर्वजण आगबोटीत आल्याची खात्री करून घेतल्यावर आगबोट सोडण्याची विनंती केली. बोटीने आपला हॉर्न वाजवून बोट चालू केली. बोट सुटल्याबरोबर आम्ही सर्वांनी “भारत माता की जय’ असे ओरडून आनंद व्यक्त केला. संपूर्ण बोटीमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते. बोट सुटल्यावर आम्हाला खात्री होती की कोणताही हिंदू म्हणजेच मराठी माणूस कराचीला राहिला नाही, भिकाऱ्यांनासुद्धा पाकिस्तानात राहाणे नको होते.

मराठी गरीब, श्रीमंत माणसाला भारतामध्ये सुखरूप आणण्याचे काम अॆ.बी. पंडित साहेबांचे आहे. पंडित साहेबांनी जर बोटीची सोय केली नसती तर आमची गरीब माणसे पाकिस्तानी सरकारने पोसलेल्या गुंडाकडून नाहक मारली गेली असती.

कराची ते मुंबई आगबोटीचा प्रवास तीन दिवसांचा होता. बोट आकाराने मोठी असल्यामुळे बसायला फिरायला, लहान मुलांना खेळ खेळायला भरपूर जागा होती. सगळे खाद्यपदार्थ, जेवण शाकाहारी, मांसाहारी अगदी ताजं गरम- गरम त्यामुळे खाण्याची काळजी नव्हती. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास आमची बोट मुंबई बंदराला लागली. मग आमची सर्व माहिती- नाव, जन्म तारीख, एखादी जन्म खुण असे नोंदवून आम्हाला ओळखपत्र देण्यात आले. हे सर्व काम झाल्यावर आम्हा सर्वांना बसमधून वरळीच्या म्युनिसिपल शाळेमध्ये आणले. शाळेमध्ये आल्यावर प्रत्येक कुटुंब प्रत्येक वर्गामध्ये राहिले. शाळेमध्ये संडास बाथरूमची सोय असल्यामुळे तेथे राहणे सोयीचे झाले. “रात्री जेवण सर्वांना मिळणार, सकाळी पाचला उठून आपल्या सर्व विधी आटोपून शाळेचे वर्ग मोकळे करावयाचे. संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटली की परत वर्गात यायचे.’ अशा सूचना सर्वांना दिल्या होत्या.

दिवसा कामधंदा शोधायला बाहेर पडायचे आणि रात्री वरळीच्या शाळेत परतायचे हाच दिनक्रम रोज सुरु झाला. काहींची आपापल्या नातेवाईकांकडे सोय झाली. काही गावी परतले. मीही नोकरीच्या शोधात फिरत होतो. एकदा कराचीचाच एक मित्र भेटला. त्याने पेंढारकर सरांची माहिती दिली. ते विलेपार्ल्याच्या पारले टिळक विद्यालयात असल्याचे समजल्यावर मी त्यांना तिथे जाऊन भेटलो. जून 1948 पासून मी चित्रकला शिक्षक म्हणून या शाळेत रुजू झालो.

मुंबईमध्ये सुखरूपपणे येऊन आपल्या प्रिय भारतात निर्भयपणे जगण्याचा आनंद घेऊ लागलो.

–    कै. श्रीधर पां.गावडे

सौजन्य : सुखशील चव्हाण

स्वातंत्र्यापूर्वीची कराची

karachiमी 1937 ते 1947 ऑक्टोबरपर्यंत कराचीला होतो. शहरातील मुख्य रस्ता बंदर रोड रोज सकाळी धुतला जात होता. पाने खाऊन पिचकाऱ्या मारणारे कोणी नव्हते. प्रत्येकजण स्वच्छतेची काळजी घेत होता. जगातल्या स्वच्छ शहरांमध्ये कराचीचा वरचा नंबर होता. चोऱ्या मारामाऱ्या फारशा नव्हत्या. बायका मुले बिनधास्त बाजारहाट करीत असत. धान्याची दुकाने धान्याने भरलेली असत. ऑर्डर दिली की धान्य घरपोच. दूध-दुभते भरपूर. दूध मोठ्या काहिलीमध्ये तापवित असत. दूध प्यायला मागितल्यावर मातीच्या भाजलेल्या भांड्यातून देत असत.

मराठी मोठी माणसे नाटकांचे प्रयोग करीत. ती बघायला बरीच माणसे बायका-मुले येत असत, हे नाटकांचे प्रयोग मात्र शाळांच्या मैदानावर होत असत. मैदानांच्या चारी बाजूंना कंपाऊंड असे. संपूर्ण भाग रेताड. एकही दगड दिसत नसे. मुले एकमेकांवर रेती टाकून खेळत. झाडे शिंदीची. आपल्याकडचे एकही झाड तिथे दिसत नसे.

प्रवासासाठी घोडागाड्या भरपूर असत. शंभर दिडशे माणसे बसतील अशा उंटाच्या, गाढवांच्या गाड्या असत. मासे विकायला तिकडे बायका नाही तर पुरुष कावड घेऊन येत असत. मासे खरेदी करताना पहिल्या माळ्यावरून दर ठरवायचा, टोपलीला दोरी बांधलेली खाली सोडायची व खरेदी करावयाची. कराचीला भाषा मात्र हिंदी. आमची दोन मराठी माणसे जरी रस्त्यात भेटली तर ती हिंदीतच बोलत.

कराचीमधील प्रत्येकजण एकमेकांना ओळखत असे. बाहेरून आलेल्या मुसलमानांनी आम्हा हिंदूंना मारण्याचा विडा उचलला होता. ठार मारण्याचाच. त्यामुळे आम्हा हिंदूंना कराची सोडून सर्व मालमत्ता सोडून भारतामध्ये येणे भाग पडले. आता ते एकमेकांना मारताहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s