विलेपार्ल्याचा पुनर्विकास-“फनेल झोन’ची संकल्पना

सध्या आपण पार्ल्यामधे अनेक इमारतींचे पुनर्विकासाचे काम सुरू असलेले बघतो. तसेच अनेक सोसायटींमधे इमारतींच्या पुनर्विकासाबाबत चर्चा होताना दिसते. या विषयावर विचार करीत असताना इमारतीची उंची किती असावी याबाबतीत काही मर्यादा घातलेल्या आहेत असे आढळून येते. काही इमारती या 3-4 मजली आहेत तर काही इमारती यापेक्षा उंच आहेत. तसेच अनेक वेळा आमची सोसायटी एअरपोर्टच्या फनेल झोन मधे येते आणि म्हणून आम्ही उंच इमारत बांधू शकत नाही हा विषय चर्चेचा ठरतो. पण हे एअरपोर्टचे फनेल म्हणजे नक्की काय आणि मग आमच्याच इमारतीवर उंचीबाबत अशी मर्यादा का असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
ऍप्रोच फनेल म्हणजे नक्की काय?
विमानतळाभोवताली असणारी नैसर्गिक परिस्थिती आणि पर्यावरणाचा प्रभाव विमानांच्या सुरक्षित कार्यावर पडतो. या गोष्टींचा परिणाम मुख्य करून विमानांच्या टेक-ऑफ आणि लॅंडिंगच्या मार्गावर होतो. या मार्गावर कोणतेही अडथळे असल्यास विमानांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ शकतो. तसेच विमानतळाच्या परिसरात कोणतेही अडथळे निर्माण झाल्यास ते निकामी होऊ शकतात. म्हणूनच हा सर्व प्रदेश अडथळ्य़ांपासून मुक्त असणे गरजेचे आहे.
विमानतळाची धावपट्टी जेथे संपते त्या टोकापासून आणि धावपट्टीच्या विस्तारित केंद्ररेषेपासून काटकोनात जर आपण विमांनांच्या टेक-ऑफ आणि लॅंडिंगच्या दिशेत समांतर द्विभुज चौकोनाच्या आकाराचा पट्टा काढला तर तयार होणारा भाग हा ऍप्रोच फनेल म्हणून ओळखला जातो. या संपूर्ण पट्ट्यामधे बांधण्यात येणाऱ्या इमारतींवर उंचीची बंधने आहेत.
विलेपार्ले पूर्व आणि विलेपार्ले पश्चिमेचा काही भाग हा मुंबई धावपट्टी 14 आणि जूहू-धावपट्टी 26 यांच्या ऍप्रोच फनेल मधे समाविष्ट आहे.
आंतरराष्ट्रीय सिव्हील एव्हिएशन ऑर्गनायझेशन यांनी प्रकाशित केलेल्या एअरपोर्ट सर्व्हिस मॅन्युअल मधे कंट्रोल ऑफ ऑब्स्टॅकल्स या भागात या विषयीचे सर्व नियम नमूद केले आहेत. यानुसार विमानतळापासून 20 किमी पर्यंतचे अंतर हे विशिष्ट पद्धतीने विभागले आहे.
1. ऍप्रोच सर्फेस
2. ट्रान्झिशन सर्फेस
3. इनर हॉरिझॉंटल सर्फेस
4. कोनिकल सर्फेस
5. आउटर हॉरिझॉंटल सर्फेस
या सर्व विभागांनुसार त्या परिसरात असलेल्या इमारती, झाडे तसेच इतर कोणत्याही प्रकारचे बांधकाम यांवर असलेल्या उंचीच्या मर्यादा ठरवण्यात येतात. यापैकी ऍप्रोच सर्फेस हा विमानाच्या टेक-ऑफ आणि लॅंडिंग मार्गाचा भाग आहे आणि ट्रान्झिशन सर्फेस ही जादा सोडलेली जागा आहे. विले पार्ले पूर्व हा भाग ऍप्रोच सर्फेस, ट्रान्झिशन सर्फेस आणि इनर हॉरिझॉंटल सर्फेस मधे समाविष्ट होतो.
इमारतींच्या उंचीवर मर्यादा घालण्याचे कारण काय?
ऍप्रोच फनेलमधे समाविष्ट असलेल्या भागामधे इमारतीच्या उंचीवर जी मर्यादा घालण्यात आली आहे यामागची मूळ कारणे –
विमानांच्या सुरक्षित कार्यासाठी
व्हीओर, डीएमइ, व्हीएचएफ, डीएफ अशा अनेक प्रकारच्या रेडिओ कंपनांच्या रक्षणसाठी
अनेक प्रकारच्या रडार कंपनांच्या रक्षणासाठी
युएचएफ(अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी ) च्या रक्षणासाठी या व अशा अनेक सुरक्षा सुविधांच्या रक्षणासाठी.
या सर्व सुविधा विमानांच्या सुरक्षितेतसाठी वापरण्यात येतात. या सुरक्षा सुविधांच्या कार्यामधे कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठीच ऍप्रोच फनेल मधील भागामधे इमारतींच्या उंचीवर मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत.
14 जानेवारी 2010 रोजी प्रकाशीत झालेल्या गॅझेट ऑफ इंडिया मधे असे नमूद केले आहे की विमांनांच्या सुरक्षिततेसाठी विमानतळापासून 20 किमी अंतरामधे असणाऱ्या भुखंडातील इमारती किंवा वास्तू ठराविक उंचीपेक्षा जास्त उंच बांधण्यास मनाई आहे. म्हणून या भागातील प्रत्येक इमारातीस भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून इमारतींच्या उंचीसंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. अशा इमारतींच्या बाबतीत ना हरकत प्रमाणपत्र नसेल तर त्याबाबत योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आहे. मुंबईमधे या बाबतीतील निर्णय घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका ही सरकारी संघटना जबाबदार आहे.
तर मग इमारतींच्या पुनर्विकासाबाबत विचार करताना सर्वप्रथम तुमची इमारत फनेल झोन मधे नक्की कुठे येते हे बघा आणि मगच इतर बाबींचा विचार करा.
मुंबई परिसरात इमारत बांधताना आपणाला महानगरपालिकेच्या परवानगीसाठी सिव्हिल एव्हिएशन एन.ओ.सी. घेणे अत्यंत आवश्यक असते त्या सिव्हिल एव्हिएशन एन.ओ.सी. शिवाय आपणाला जमिनीच्यावर 1 इंचही बांधकाम करता येत नाही.
जुहू, कोलडोंगरी, कुर्ला, घाटकोपर टेकडी अशा वेगवेगळ्या विमानमार्गांसाठी मुंबई विमानतळावर एकूण चार धावपट्ट्या वापरल्या जातात. त्याचप्रमाणे जुहू विमानतळावरील दोन धावपट्ट्यांपैकी वापरात असलेल्या एका धावपट्टीचा विचार ही एन.ओ.सी. देताना केला जातो.
सिव्हिल एव्हिएशन एन.ओ.सी.चा विचार करताना संबंधीत कक्ष कार्यालय हा विचार करतात की ज्या जागेवर इमारत बांधण्यासाठी परवानगी द्यावयाची आहे ती जागा हवाईमार्गाच्या आरंभापासून किती अंतरावर आहे, ती फनेल झोनमध्ये येते का ही माहिती विमानतळाच्या नकाशावरून समजते. त्याच वेळी संबंधीत जागा समुद्रसपाटी पासून किती उंचीवर आहे याचा ही विचार करतात. आपल्या विलेपार्ले पूर्व परिसराची समुद्र सपाटीपासूनची उंची 30 फुट किंवा 9 मिटर आहे त्यामुळे सिव्हिल एव्हिएशनकडून मिळणाऱ्या परवानगी मध्ये असे लिहिलेले असते की इमारतीची उंची समुद्र सपाटीपासून 70 फुट हवी म्हणजेच जमीनीच्या वर 40 फुट याचा अर्थ आपणाला आपली इमारत जमिनीच्यावर जास्तीत जास्त 40 फुट बांधता येते. त्यामुळेच मुंबई महानगरपालिका बांधकाम चालू करण्याअगोदर सिव्हिल एव्हिएशन एन.ओ.सी. असल्याशिवाय जमिनीवरच्या बांधकामाला (कमेन्समेंट सर्टिफिकेट)देत नाही. ही गोष्ट प्रत्येक नागरिकाने लक्षात घेऊन सिव्हिल एव्हिएशन एन.ओ.सी. मिळाल्याशिवाय जागा रिकामी करू नये.
एन.ओ.सी.साठी लागणारी कागदपत्रे
1. परवाना अर्ज.
2. स्टॅंप पेपरवर अंडरटेकींग.
3. समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचा महानगरपालिकेचा दाखला.
4. अक्षांश व रेखांश चा महानगरपालिकेचा दाखला.
5. प्रस्तावित इमारतीची उंची दाखवणारा सेक्शनल ऐलेव्हेशन ड्रॉईंग.
6. आपल्या जागेची स्थिती दाखवणारा महानगरपालिकेचा दाखला.

खालील नकाशामध्ये मुख्यत: मुंबई विमानतळाच्या ऍप्रोच फनेलच्या कक्षात येणाऱ्या विलेपार्ले पूर्व परिसरातील भाग दर्शविण्यात आला आहे.
क्र.1 मध्ये दर्शवण्यात आलेला वेगळ्या रंगाचा भाग हा फनेलमध्ये येणारा परिसर दर्शवतो. या भागातील इमारतींच्या उंचीवर निर्बंध येतात. मात्र या संपूर्ण पट्ट्याला एक नियम लागू होत नाही. धावपट्टीपासून इमारत जितकी जवळ तितकी उंचीची मर्यादा अधिक हे लक्षात घ्यायला हवे.
क्र.2 ने दर्शवण्यात आलेल्या ठळक रेषा फनेलच्या बाजूचा परिसर दर्शवतो. या भागातील इमारतींना प्रत्यक्ष फनेल झोनपेक्षा अधिक उंचीसाठी परवानगी मिळत असली तरी त्यावरही सुरक्षिततेच्या दृष्टीने काही विशिष्ठ मर्यादा असतात. याच कारणामुळे आपल्याला एकाच रस्त्यावरील इमारतींसाठी उंचीच्या मर्यादा वेगवेगळ्या असू शकतात.
क्र.3 ने दर्शवण्यात आलेला पट्टा हा मुंबई विमानतळ आणि जुहू विमानतळावरील कंट्रोल टॉवर्सना संदेशवहनासाठी जोडणारा भाग आहे. त्यामुळे या भागातील इमारतींसाठी उंचीच्या मर्यादेवर निर्बंध आहेत.

vp funnelमार्गदर्शन
– अरुण धुरी (निवृत्त ए.जी.एम., ए.टी.सी.) Mo:9833063906
– यशवंत जोशी (आर्किटेक्ट) Mo:9892554879
शब्दांकन
– अमृता आपटे Mo:9820555054

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s