टिळक मंदिर – मध्यावधी निवडणूकांच्या निमित्ताने…

लोकमान्य सेवा संघाच्या मध्यावधी निवडणुका 7 एप्रिलला होत आहेत व त्याकडे फक्त  टिळक मंदिराच्या सभासदांचेच नव्हे तर सर्व पार्लेकरांचे लक्ष लागलेले आहे.

लोकमान्य सेवा संघ ही पार्ल्यातील सर्वात जुनी सामाजिक संस्था आहे. तब्बल 90 वर्षांची परंपरा असलेल्या ह्या संस्थेचा आदर्श ठेवून पुढे पार्ल्यात अनेक संस्था सुरू झाल्या. त्यांचे काम पुढे बहरलेसुध्दा. पण टिळक मंदिराचे महत्त्व, त्याचा पार्लेकरांच्या मनावरील प्रभाव अबाधित राहिला. अनेक शाखा, त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम, ग्रंथालय, व्यायामशाळा, वैद्यकीय केंद्र, बालक-पालक केंद्र, वृध्दाश्रम असे महत्त्वाचे उपक्रम, ह्या सर्वांच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक जीवनातील जवळ जवळ सर्वच पैलूंना स्पर्श करणारी ही महाकाय संस्था. तिच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा रूबाब वेगळा, मान मोठा. अशा संस्थेच्या कार्यकारिणीवर जाण्याची संधी आपल्याला मिळावी असे अनेकांना वाटणे स्वाभाविकच म्हणायला पाहिजे. ह्यामुळे दर तीन वर्षांनी येणाऱ्या टिळक मंदिराच्या निवडणुकांकडे, निवडून आलेल्या कार्यकारिणीकडे  अनेकांचे बारीक लक्ष असते.

ह्या वेळची परिस्थिती मात्र खूपच वेगळी आहे. 2011 साली निवडून आलेल्या कार्यकारिणीने गेल्या दोन वर्षात अनेक वादळे बघीतली. पुलंच्या साहित्याच्या स्वामित्वाचा वाद कोर्टापर्यंत गेला व तिकडे सुध्दा संस्थेला पुरावे सादर करता न आल्याने सभासदांमध्ये नाराजी पसरली. ह्या व अशा अनेक मुद्यांवर कार्यकारिणीतील समन्वयाचा अभाव चव्हाटयावर आला व ह्या सर्व गोष्टींची परिणीती कार्यकारिणीवर अविश्वासाचा ठराव येण्यात झाली. ठराव संमत झाला व टिळक मंदिराच्या इतिहासात प्रथमच मध्यावधी निवडणुकांची वेळ आली.

झाले गेले गंगेला मिळाले. गेल्या काही वर्षात कुठल्या चुका झाल्या, कोण कसे वागले ही न संपणारी चर्चा करण्यात आता काहीच अर्थ नाही मात्र संस्थेची पुढील वाटचाल कशी असावी ह्याचा विचार करणे जास्त उपयुक्त ठरेल. बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचे भान ठेवून टिळक मंदिराने काही नवीन उपक्रम आखणे आता गरजेचे आहे. त्याच प्रमाणे कालबाह्य झालेले उपक्रम बंद करण्याचे धैर्यसुध्दा दाखवले पाहिजे.

तरुण व विद्यार्थी ह्यांना उपयुक्त ठरतील असे काही उपक्रम राबवता येऊ शकतात. इंटरव्ह्यू  टेक्नीक्स, ग्रुप डिस्कशन किंवा करिअर मार्गदर्शन  ह्या सारख्या विषयांसाठी एका स्वतंत्र शाखेची आज गरज आहे. सध्या पार्ल्यात ‘पुनर्विकास पर्व’ सुरू आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. सर्व सहनिवासांना उपयुक्त ठरेल अशी ‘पुनर्विकास मार्गदर्शन शाखा’ सुरू करायला काय हरकत आहे? भारत देश जरी वर्षागणिक तरुण होत असला तरी आपले पार्ले मात्र हळूहळू वृध्द होत चालले आहे. ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, त्यांना भावनिक आधार देणे हे सुसंस्कृत समाजाचे कर्तव्यच असते. बाहेरगावी वृध्दाश्रम सुरू करण्याबरोबरच पार्ल्यात राहणाऱ्या हजारो वृध्दांसाठी एक मदत केंद्र सुरू करता येऊ शकते. अशा प्रकारचे समाजाभिमुख उपक्रम राबवण्याची अपेक्षा पार्लेकर टिळक मंदिराकडून नाही तर कोणाकडून करणार ?

निवडणुकीला उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांना आमच्या शुभेच्छा! मात्र त्यांना एकच विनंती आहे की जरी जिंकून आला नाहीत तरी नाउमेद न होता आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवा व निवडून आलेल्या कार्यकारिणीला संपूर्ण सहकार्य द्या. पार्लेकरांचे सामाजिक व सांस्कृतिक जीवन जास्तीत जास्त समृध्द करणे हे आपल्या सर्वांचे अंतीम ध्येय असले पाहिजे, होय ना?

  • रविवार दि. 7 एप्रिल – सकाळी 10 ते दुपारी 3
  • 2 संघ कार्यवाह पदासाठी 5 उमेदवार
  • 15 कार्यकारी मंडळ सभासदांसाठी 43 उमेदवार
  • मुख्य निवडणुक अधिकारी-श्रीनिवास गोगटे

आम्हालाच मत द्या कारण …

या निवडणुकांच्या निमित्ताने संघ कार्यवाहपदासाठी इच्छुक उमेदवारांशी आम्ही बातचीत केली. ते म्हणतात…

”सन 2011 च्या निवडणुकीच्या वेळी बरीच जूनी मंडळी सततच्या वादविवादाला कंटाळून बाहेरच राहिली. मात्र आता संस्थेप्रती पार्लेकरांना वाटणारी काळजी लक्षात घेऊन जून्या मंडळींना काहीतरी केले पाहिजे हे जाणवले व काहीजण पुढे आले. मी, पद्मजा जोग आणि नंदकुमार आचार्य एका पॅनल खाली निवडणूक लढवत आहोत. आम्ही दोघेही संस्थेत गेली 25/30 वर्षेकाम करीत आहोत. मी स्वत: संस्थेच्या जवळ जवळ सर्व शाखांमध्ये कोणत्या ना कोणत्या पदावर काम केलेले आहे. कार्यकारीणी सभासद निवडताना निव्वळ निवडणूक जिंकणं हा निकष न ठेवता दिलेल्या शाखेला वेळ आणि क्षमता या दोन्ही दृष्टीने न्याय देऊ शकतील असे उमेदवार आमच्या पॅनलमध्ये आहेत. संस्थेचे काम आम्ही सर्व मिळून यशस्वीपणे पुढे नेऊ असा विश्वास वाटतो. ”

– पद्मजा जोग व नंदकुमार आचार्य

”शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या संस्थेच्या उपक्रमांमध्ये काळानुरूप बदल घडणे आवश्यक आहे आणि त्यासाठी संस्थेच्या कार्यात तरूणांनी जास्तीत जास्त पुढाकार घ्यावा. इमारतीची पुनर्बांधणी तसेच तरुणाभिमुख उपक्रम डोळयांपुढे ठेवून तरूण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याची, वाव देण्याची गरज आहे याचा विचार मतदारांनी जरूर करावा. ”

– प्रसाद कुलकर्णी

”संस्थेच्या सर्व शाखा स्वावलंबी होणे तसेच चालू उपक्रमांना आवश्यक ती जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेची आहे आणि त्यासाठी संस्थेची पुनर्बांधणी करणे अत्यंत गरजेचे आहे. मी स्वत: ऑगस्ट 2011 मध्ये नव्या बांधकामाचा आराखडा तयार केला आहे, ज्यामध्ये तळघरात वाहनतळ, भांडार, तळमजल्यावर वाचनालय, स्वच्छतागृहाची सोय इत्यादी गोष्टींबरोबरच बालक-पालक केंद्र, पाळणाघर, दिलासा, स्री शाखा, क्रीडा शाखा इ. शाखांना स्वतंत्र व मोठी जागा देण्यात आली आहे.  याशिवाय नवीन कलादालन तसेच नाटकांच्या तालमींसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. सावरकर पटांगणाची जागा जराही कमी न करता हे सर्व करणे शक्य आहे. मी स्वत: वास्तुविशारद असल्याने हे सर्व बांधकाम मुंबई महानगरपालिकेच्या नियमांप्रमाणे आहे याबद्दल शंका असण्याचे कारण नाही.  हे सर्व प्रत्यक्षात आणण्याची संधी आपण द्याल अशी आशा करतो. ”

– यशवंत जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s