टिळक मंदिर AGM

  • आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी
  • अहवालाच्या पुनर्मुद्रणाची नामुष्की

24 जून रोजी टिळक मंदीराची वार्षिक सर्वसाधारण  सभा (AGM) पार पडली. पुलंच्या साहित्याच्या स्वामित्वहक्कासंबंधीच्या कोर्ट केसमुळे आणि निरनिराळया पत्रकांद्वारे अंतर्गत मतभेद उघड झाल्यामुळे या सर्वसाधारण सभेला गर्दी होणार हे अपेक्षितच होते, त्याप्रमाणे सुरुवातीपासूनच गोखले सभागृह तुडुंब भरले होते.

मागील सभेच्या इतिवृत्तानंतर कार्याध्यक्ष लक्ष्मण देवरे यांनी अहवालातील दूरूस्त्या सांगण्यास सुरूवात केली. मात्र त्यांच्या निवेदनानंतर उपस्थित सभासदांनी अहवालातल्या इतक्या चुका, त्रुटी आणि आक्षेपार्ह मजकूर लक्षात आणून दिला की, अहवालाचे पुनर्मुद्रण केले जाईल असे अध्यक्ष मुकुंद चितळे यांनी जाहीर केले. 88 वर्षात ही घटना प्रथमच घडली. मोहन करंदीकर, प्रसाद कुलकर्णी व स्मिता पुराणिक असे तीन कार्यवाह असूनही अहवाल तपासला गेला नाही याबद्दल कार्याध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त केली.

या सभेच्या थोडे दिवस आधी जुन्या कार्यकर्त्यांनी एक पत्रक काढले होते. त्यातील मुद्यांच्या आधारे कार्यकारिणीवर, विशेषत: संघ कार्यवाह व कार्याध्यक्ष यांच्यावर टीकेची प्रचंड झोड उठवण्यात आली. अनेक सभासदांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. त्याचप्रमाणे कार्यवाह, कार्याध्यक्षांनी सुध्दा आपापली बाजू मांडली. पण कुठल्याही प्रश्नावर ठोस उत्तर दिले गेले नाही.

पत्रकातील काही मुद्दे याप्रमाणे –

1.     पुलंच्या साहित्यावरील स्वामित्त्वहक्काच्या केसमुळे झालेली संस्थेची बदनामी.

2.    गुंतवणूक शाखेच्या सर्व सभासदांचे राजीनामे व उपक्रम बंद पडणे.

3.    अपंग पुनर्वसन केंद्राच्या पालकसभेत झालेले वादविवाद.

4.    ग्राहक पेठ शाखेच्या अध्यक्ष/कार्यवाहांचा कारण्यात आलेला अपमान, त्यांचे राजीनामे.

5.    संस्थेत अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या  कर्मचाऱ्यांचा पदत्याग.

6.    कार्यवाह, कार्याध्यक्ष तसेच कार्योपाध्यक्ष यांचा आपापसातील विसंवाद व याचा संस्थेच्या कार्यावर होणारा दुष्परिणाम.

कुठल्याच प्रश्नावर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर सर्वसाधारण सभेचे प्रयोजन तरी काय ?  AGM चे  सर्व कामकाज कार्याध्यक्ष आपल्याच खाद्यांवर घेऊन का चालले होते? असे प्रश्न उपस्थित सभासदांना पडले होते.

काही सभासदांनी ‘सध्याची कार्यकारिणी काम नीट करीत नसल्यामुळे बरखास्त करावी’ असे निवेदन पाठवले होते. मात्र AGM पूर्वीच झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत हे निवेदन फेटाळण्यात आले. या बद्दलची माहिती कार्याध्यक्षांनी दिली, तेव्हा या ठरावावर जर सभासदांचे मतदान घेतले असते तर कार्यकारिणी वाचली नसती असे मत अनेकांनी व्यक्त केले.

स्वीकृत कार्यवाह स्मिता पुराणिक यांचा कार्यकाल सर्वसाधारण सभेच्या दिवशी म्हणजेच 24 जून पासून संपुष्टात येत असल्याची माहिती कार्याध्यक्षांनी यावेळी दिली.

साडेसात तास चाललेली मॅरथॉन सभा

वार्षिक अहवालाबाबत ठळक आक्षेप

1.     पृष्ठ क्र. 4 – संस्थेचे उपाध्यक्ष गिरिश जाखोटिया यांचा उल्लेख संस्थेचे अध्यक्ष असा केला आहे.

2.    पृष्ठ क्र. 3 – संस्थेच्या घटना-नियमात 5 विश्वस्त असतील अशी तरतूद असताना सहाव्या विश्वस्ताचे नाव टाकले आहे.

3.    पृष्ठ क्र. 14- सांस्कृतिक शाखेला कोल्हटकर कुटुंबियांकडून देणगीप्रीत्यर्थ ‘माधव दत्तात्रय कोल्हटकर’ यांचे नाव देण्यात आले. परंतु अहवालात ‘मनोहर दत्तात्रय कोल्हटकर’ असा उल्लेख केला आहे.

4.    पृष्ठ क्र.- 38 इमारत शाखा व माहिती तंत्रज्ञान शाखांच्या कार्यवाहांनी अहवाल दिला नसल्याने संघ कार्यवाहांना नाइलाजास्तव अहवाल द्यावा लागत आहे असा उल्लेख आहे. सामान्य सभासदांच्या दृष्टीने हा संस्थेचा अहवाल आहे. तसेच या शाखांवर असलेल्या पदाधिकाऱ्यांची व सभासदांची नावेही छापली नाहीत.

5.    पृष्ठ क्र. – ग्राहकपेठ अध्यक्ष व कार्यवाहांनी पदत्याग केला असताही त्यांची नावे छापली गेली.

6.    पृष्ठ क्र. 4 – 88वी वार्षिक सर्वसाधारण सभावृत्तांत (5) क्रमांकाखाली 2011-2012 च्या अर्थसंकल्पाऐवजी सन 2010-11 चा अर्थसंकल्प असा उल्लेख आहे.तसेच कार्यकारी मंडळ/कार्यवाहांची निवडणूक झाल्याचा उल्लेख नाही.

7.    पृष्ठ क्र. 6 – कर्मचारीवर्गाची 31/3/2010 ची यादी छापण्यात आली व अपंग पुनर्वसन केंद्रात सध्या  एकच शिक्षक असताना शिक्षकांची पूर्ण यादी छापण्यात आली.