संपादकीय – सप्टेंबर २०१७

_mg_0080दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबरपासून सगळीकडे उत्सवाचे वातावरण असते. प्रथम दहीहंडी, त्यानंतर गणपती. पार्ल्यात हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. याहीवर्षी ते साजरे होत आहेत पण त्यात थोडा फरक जाणवतो.

ह्यावर्षी पार्ल्यात कमी हंड्या लागल्या होत्या. त्याचप्रमाणे गोंगाटसुद्धा थोडा कमीच होता. काय कारण असावे ह्याचे? कोर्टाच्या निर्णयानुसार मोठ्या मंडपांवर, ध्वनिवर्धकांवर निर्बंध असल्यामुळे कर्णकर्कश गाणी नव्हती. त्याचप्रमाणे नोटबंदीमुळे हंड्यांवर लागणाऱ्या बक्षिसांचे प्रमाणही कमी होते. आपल्याला माहित आहेच की गेल्या काही वर्षात ह्या दोन्ही सणांचे खूपच बाजारीकरण झाले आहे. मोठमोठी बक्षिसे, मोठमोठी होर्डींग्ज आणि सिनेमातील कर्कश गाणी वाजवणाऱ्या मिरवणूका. ह्या सर्वांमुळे ह्या सणांचा मूळ उद्देशच कुठेतरी हरवल्यासारखा झाला होता. मनोरंजनाला कोणाचा विरोध असायचे कारण नाही पण गणपतीसमोर ‘आयटमसॉंग’वर चाललेला बीभत्स नाच ही आपली संस्कृती नाही हे नक्की !

गेल्या आठवड्यात गणपती आले. ह्यावेळी श्रींच्या आगमनाच्या मिरवणुकीतील आवाजाची पातळी काहिशी कमी होती. गणेशोत्सवावरदेखील नोटबंदीचे व आर्थिक तणावाचे सावट पडल्याचे स्पष्ट जाणवत आहे. पार्ल्यात अनेक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत व दरवर्षी सजावट आणि देखाव्यावर अमाप खर्च होतो. तो खर्चसुद्धा ह्यावर्षी कमी झालेला दिसत आहे. काही मंडळे आवर्जून कागदाची मूर्ती ठेवत आहेत. यंदाचे वर्ष हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. तेव्हा आपण सर्व पार्लेकरांनी ह्या बदलाचे स्वागतच करायला पाहिजे!

गेली अनेक वर्षे महापालिकेतर्फे हनुमान रस्त्यावर कृत्रिम तलावाच्या माध्यमातून गणेश विसर्जनाची उत्तम सोय करण्यात येत आहे व त्याचा फायदा असंख्य पार्लेकर घेत आहेत. निर्माल्यापासून खत तयार करण्याचा उपक्रमदेखील राबवला जात आहे. अर्थात ही केवळ सुरुवात आहे व सुधारणेला अजून भरपूर वाव आहे. ध्वनिप्रदूषण टाळले, पर्यावरणाची काळजी घेतली तर सण साजरे करण्यातील उत्साह द्विगुणित होईल, नाही का ?

Advertisements

संपादकीय – ऑगस्ट २०१७

_mg_0080‘पुलंची सिडी लावू का ?’ श्रीधरचा प्रश्न.

अमेरिकेतील बृहन महाराष्ट्राचे अधिवेशन आटपून आम्ही डेट्रॉईटवरून शिकागोला बाय रोड जात होतो. पुलं कितीही प्रिय असले तरी मला आता अमेरिकेविषयी, इथल्या मराठी माणसांविषयी ऐकण्यात जास्त रस होता. मी म्हणालो “नको, आपण गप्पा मारूया’.

अधिवेशनाबद्दल श्रीधर भरभरून सांगत होता. अमेरिकेत राहणाऱ्या मराठी लोकांचा हा दर दोन वर्षांनी येणारा आनंदोत्सवच जणू. गाण्याचे, गप्पांचे कार्यक्रम, मराठी नाटके, कवी संमेलने, स्थानिक मंडळाने सादर केलेले कार्यक्रम आणि तीन दिवस अस्सल मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद! इतर शहरांतून, देशांतून येणाऱ्यांच्या स्वागतासाठी असंख्य हसतमुख कार्यकर्ते सज्ज! मला तर तीस पस्तीस वर्षांपूर्वीचा आमच्या सोसायटीतील गणेशोत्सव आठवला. ‘BMM दर वेळी वेगळ्या शहरात असल्याने प्रत्येक मंडळाला आयोजनाची संधी मिळते. त्यानिमिताने गाठी भेटी होतात.’ मला आपल्याकडील उत्सवांचे सध्याचे स्वरूप आठवले. बीभत्स नाच आणि कर्कश गाणी! या अमेरिकेतील अधिवेशनाला मराठी कलाकार आवर्जून हजेरी लावतात. “फक्त अधिवेशनापुरते नाही तर अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळे मराठी कलाकारांचे, गायकांचे कार्यक्रम तसेच मराठी सिनेमे ह्यांचे सतत आयोजन करत असतात.’

श्रीधर सुमारे 25 वर्षांपूर्वी अमेरिकेत आला. एका खूप मोठ्या IT कंपनीत वरिष्ठ हुद्‌द्यावर आहे पण मंडळाच्या कार्यक्रमासाठी कुठलेही काम करायला सदैव तयार. करिअर फुलवण्यासाठी इथे आला तरी पुणे सोडल्याचे दु:ख अजूनही मनात खदखदते. मराठी संस्कृतीवर अफाट प्रेम. साधारणपणे अशीच कहाणी येथे आलेल्या बहुतेक मराठी माणसांची.

“आता आम्ही पक्के अमेरिकन झालो आहोत पण आपली मराठी संस्कृती का म्हणून सोडायची ?’ श्रीधरने मुद्दा मांडला. मुख्य अधिवेशनाबरोबर इतरही छोटे छोटे कार्यक्रम होतात. एक दिवसाची बिझनेस कॉन्फरन्स, मुंबई पुण्यातील काही शाळांची Reunions. अरे हो, त्यात आपल्या पार्ले टिळकचेसुद्धा reunion झाले. फार जण नव्हते पण जे होते ते शाळेविषयी, शिक्षकांविषयी व आपल्या शाळेतील सवंगड्यांविषयी भरभरून बोलत होते.

आज अमेरिकेतील मराठी समाज समृद्ध आहे, आनंदी आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या हृदयातसुद्धा महाराष्ट्र आहे. आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत आहेत !

संपादकीय – जुलै २०१७

_mg_0080नुकताच दहावीचा निकाल लागला व अपेक्षेप्रमाणेच पार्ल्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. ह्याचे श्रेय जसे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आहे, त्याचप्रमाणे ते शिक्षकांना, पालकांना व पार्ल्यातील शैक्षणिक सजगतेला सुद्धा आहे. त्याच बरोबर ह्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे की दहावीत चांगले मार्क मिळवले की सर्व काही झाले असे नाही व दहावीत अपेक्षाभंग झाला तर आयुष्य फुकट गेले असेही नाही !

हल्ली विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ज्याप्रकारे मार्क मिळत आहेत त्याचे वर्णन ‘मार्कांचा महापूर’ असेच करावे लागेल. ह्याला बहुतांशी परीक्षेचा व प्रश्नांचा पॅटर्न कारणीभूत आहे. मात्र ह्या पुढील पायरीला, अकरावीला तेवढे मार्क मिळत नाही व आमचा पठया गोंधळून जातो. ह्यातच अनेक वेळा अभ्यासावरील, खेळावरील, इतर उपक्रमांवरील लक्ष उडते व आयुष्याची दिशाच चुकते. ह्यामुळे अकरावीचे वर्ष त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

‘दहावी नंतर काय ?’ ह्या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार सोडवतो. एकेकाळी चांगले मार्क मिळाले की मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ठरलेले असायचे. पण आज विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय आहेत. आर्थिक क्षेत्रापासून ते कला क्षेत्रापर्यंत सर्वच क्षेत्रात आज इतक्या संधी उपलब्ध आहेत की आपल्या आवडीचे रूपांतर करिअरमध्ये करणे सहज शक्य आहे व आज अनेक विद्यार्थी चाकोरीबद्ध अभ्यासक्रमाऐवजी आपल्या आवडीच्या क्षेत्राला पसंती देत आहेत. पार्ल्याच्या निकालाकडे नजर टाकली तर असे लक्षात येते की काही ठराविक शाळांचे निकाल वर्षोनुवर्षे 100% लागत आहेत, इंजिनिअरिंग, मेडिकल की आर्किटेक्चर अशा चर्चांचे फड जमत आहेत, अकरावी बारावीसाठी उत्तमोत्तम क्लासेसची चौकशी होत आहे, मात्र पार्ल्यातीलच काही शाळांमध्ये मात्र नापासांची संख्यासुद्धा डोळ्यात खुपण्यासारखी आहे. का आहे हा फरक ? पार्ल्यासारख्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर म्हणवून घेणाऱ्या समाजाला हे शोभते का ? पार्ल्यातील प्रथितयश शाळा इतर शाळांना काही मदत करू शकतील का ? पार्लेकर नागरिक म्हणून आपली ह्याबाबतीत काही जबाबदारी असू शकते का ?

पार्ल्यातच असलेल्या या दुसऱ्या पार्ल्याशी आपण ओळख करून घेतली पाहिजे, त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. ह्यातच पार्ल्याचे खरे यश आहे.

संपादकीय – जून २०१७

_mg_0080पार्ल्यात नुकतीच फुटबॉलची ‘VPPL’ स्पर्धा पार पडली. खेळाडूंचा ओसंडून जाणारा उत्साह, प्रेक्षकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद व प्रायोजकांची मोलाची साथ ह्यामुळे दरवर्षी ही स्पर्धा अधिकाधिक उंची गाठत आहे ह्यात काही शंका नाही. काही वर्षांपूर्वी पार्लेकर तरुणाला क्रिकेटने वेड लावले होते. आज मात्र तो फुटबॉलवेडा झाला आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. खेळाडूंनी व प्रेक्षकांनी तुडुंब भरलेली मैदाने बघणे हे अतिशय नयनरम्य दृश्य आहे. 

‘नवीन पिढीने मैदानाकडे पाठ फिरवली आहे, मुलं पूर्ण वेळ कॉम्पुटरवरचे गेम्स खेळण्यातच घालवतात’ अशी ओरड सर्वच पालक करतात. हे बऱ्याच अंशी खरे आहेच पण मला समाधान वाटते की आपल्या पार्ल्यात मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. खरे म्हणजे पार्ले गावाची ओळख ही शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून होती. 1995 साली ‘आम्ही पार्लेकर’च्या पुढाकाराने पार्ल्यात सिझन क्रिकेट प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आणि डहाणूकर कॉलेजचे मैदान लहानग्या क्रिकेटर्सनी बहरले ते अगदी आजपर्यंत. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे स्विमिंग,रायफल शुटिंग, टेबल टेनिस, कॅरम इत्यादी खेळांना प्रोत्साहन मिळाले. 2000 साली ‘पार्ले महोत्सव’ सुरू झाला आणि पार्ल्यातील सर्वच खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. सुमारे 20,000 स्पर्धकांचा सहभाग असणारा दुसरा स्पोर्ट्‌स इव्हेंट मुंबईत तरी नाही. कबड्डीचे सामने दुभाषी मैदानावर अनेक वर्षांपासून होत होते. त्यात भर पडली ती क्रिकेट व फ़ुटबॉंलच्या लीगची. ह्या खेळांचा हा नवीन फॉरमॅट तरुणांना खूपच आवडलेला आहे.

ह्या सर्व खेळांसाठी फक्त पार्ल्यातूनच नव्हे, फक्त मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू, संघ येतात व खेळाचा, स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटतात. म्हणूनच आजचे पार्ले हे केवळ शैक्षणिक किंवा सांस्कृतिक केंद्र राहिले नसून आता ते विविध खेळांचे आणि खेळाडूंचेसुद्धा केंद्र बनले आहे. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे !

संपादकीय – मे २०१७

_mg_0080‘नावात काय आहे ?’ असे कुणीसे म्हटले आहे पण पार्लेकरांना ते तितकेसे रुचत नाही असे दिसते. पार्ल्यातील चौकांच्या, उद्यानाच्या नामकरणाचे वाद आता आघाडीच्या वर्तमानपत्रांमध्ये रंगू लागले आहेत व ही बाब पार्ल्याला शोभा देणारी खचितच नाहीये. काही विषय हे राजकीय किंवा आपल्या संस्थांचे अभिनिवेश बाजूला ठेऊन हाताळावे लागतात. मालवीय रस्त्यावरील उद्यान हे ह्या बाबतीतील एक ताजे उदाहरण !

ही जागा अनेक वर्षे एका बिल्डरकडे होती. 2013 मध्ये ती पालिकेच्या ताब्यात आली तेव्हासुद्धा त्याच्या श्रेयावरून राजकीय वाद झाले होते. पालिकेने ही जागा उद्यानासाठी आरक्षित करून त्यावर कुठलेही बांधकाम घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी ह्या जागेवर दिव्यांग मुलांसाठी उद्यान व्हावे अशी कल्पना ‘आम्ही पार्लेकर’ ने मांडली होती. पार्ले परिसरात अशा मुलांसाठीच्या अनेक शाळा आहेत. त्यांना तसेच मुंबईतील इतर दिव्यांग मुलांनाही ह्या उद्यानाचा खूप फायदा होईल हा हेतू त्यामागे होता. ह्या कल्पनेला सर्वच थरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकप्रतिनिधी व प्रशासनानेदेखील ह्याबाबत संवेदनातील व सकारात्मक भूमिका घेतली. आज संपूर्ण उद्यान नाही तरी त्यातील अर्धा भाग अशा मुलांसाठी राखीव असून त्याच्यासाठी विशेष क्रीडा साहित्य, उपकरणे उपलब्ध होणार आहेत. ह्या उद्यानात खेळणाऱ्या लहानग्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद प्रत्येक सुसंस्कृत पार्लेकराच्या मनात अतीव समाधान निर्माण करेल ह्यात शंका नाही.

ह्या उद्यानाला काय नाव द्यावे ह्यावरून सध्या पार्ल्यात मोर्चेबांधणी होत आहे. राजकीय पक्ष, सामाजिक संस्था ह्यात हिरीरीने भाग घेत आहेत. अनेक नावे चर्चेत आहेत. त्यात एका नावाची भर घालून आम्ही गोंधळ वाढवू इच्छित नाही. मात्र ह्या चर्चेचे रूपांतर वादात व राजकीय भांडणात होऊ नये अशीच सामान्य पार्लेकरांची इच्छा आहे. पार्ल्यातील बदलती सामजिक परिस्थितीसुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. असे प्रश्न चर्चेतून, समन्वयातून व खेळीमेळीच्या वातावरणात नक्कीच सोडवले जाऊ शकतात, निदान पार्ल्यात तरी !

संपादकीय – एप्रिल २०१७

_mg_0080आपल्या पार्ल्यात अनेक सांस्कृतिक उपक्रम वरचेवर होत असतात. संगीत, साहित्य, नाटक यात पार्लेकरांना मनापासून रस आहे. पण खेदाने असे म्हणावेसे वाटते की इतर कलांना मात्र तितकासा लोकाश्रय मिळत नाही. उदाहरणार्थ चित्रकला व शिल्पकला!

खरे म्हणजे ह्या दोहोंतही कलेचा व संस्कृतीचा अत्युच्च आविष्कार घडतो, ह्या कला आत्मसात करायला इतर कलांसारखेच अफाट परिश्रम करायला लागतात. एखादे सुंदर चित्र किंवा शिल्प आपल्याला एकदा नव्हे तर वर्षोनुवर्षे आनंद देत राहते.

पार्ल्याला जशी नाट्यकर्मींची, गायकांची परंपरा आहे तशी शिल्पकार, चित्रकारांचीसुद्धा आहे. लंडनच्या आर्ट गॅलरीत विराजमान झालेले राजा रविवर्मा, गुरुदेव टागोर यांनी गौरविलेले ‘मंदिरपथगामिनी’ हे शिल्प आपल्या पार्ल्याच्या रावबहाद्दूर गणपतराव म्हात्रे यांनी साकारले आहे ना ! पार्ल्याची शिल्पकलेची परंपरा म्हात्रे, डिझी कुलकर्णी ह्यांच्यापासून अजूनही कार्यरत असलेल्या विठ्ठल शानभागांपर्यंत अनेकांनी समृद्ध केली आहे. चित्रकलेतसुद्धा उत्तमोत्तम शिष्य घडवणारे केतकर मास्तर, श्रेष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे, वसंत सोनावणी, रमाकांत देशपांडे, वसंत सवाई, सुखशील चव्हाण, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई ह्यांच्यापासून चित्रा वैद्य, चंद्रशेखर पंत, कविता जोशी ह्यांच्यासारख्या नव्या दमाच्या चित्रकारांमुळे पार्ल्याला चित्रकलेचीसुद्धा एक भव्य परंपरा आहे ह्यात शंका नाही.

वाईट ह्याचे वाटते की ह्या सर्व कलाकारांच्या कलाकृतींची प्रदर्शने बघण्यासाठी थेट दक्षिण मुंबईतच जावे लागते. बाकीच्या उपनगरांचे सोडा पण मुंबईची सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पार्ल्यात देखिल अशा प्रकारचे एकही चित्र-शिल्प प्रदर्शन भरू नये हे खचितच आपल्या सर्वांना शोभादायक नाही. अशा प्रकारची प्रदर्शने भरवण्यासाठी कायमस्वरुपी कलादालन उभारणे, हॉलमध्ये दिव्यांची रचना व चित्रे- शिल्पे ठेवण्यासाठी विशेष मांडणी करणे गरजेचे आहे पण ती काही प्रचंड खर्चाची बाब नव्हे. पार्ल्यात खरे तर अनेक  कलाप्रेमी, दानशूर नागरिक आहेत, सामाजिक संस्था आहेत, त्या संस्थांचे मोठे मोठे हॉल्स आहेत. थोडे कष्ट घेतले तर अशाप्रकारचे कलादालन पार्ल्यात निश्चितच उभे राहू शकते. प्रश्न आहे तो इच्छाशक्तीचा!

“उपनगरवासियांच्या समस्यांची प्राधान्याने दखल घेऊ’ – महापौर विश्वनाथ महाडेश्वर

mahadeshwar-colourगेल्या महिन्यात पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले आणि प्रभाग क्र. 87 मधून निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौर बनण्याचा मान प्राप्त झाला. प्रभाग क्र. 87 हा सांताक्रूझ परिसर विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात येतो. त्यामुळे डॉ. रमेश प्रभू (1987-88) यांच्यानंतर पार्ले परिसरातून महापौर झालेले महाडेश्वर हे दुसरे महापौर ठरतात.

सुमारे 35 वर्षांपासून राजकारण- समाजकारण क्षेत्रात कार्यरत असणारे महाडेश्वर मूळचे शिक्षक. घाटकोपरच्या शिवाजी मल्टीपर्पज टेक्निकल हायस्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे अध्यापन 17 वर्षे केल्यानंतर सांताक्रूझ येथील राजे संभाजी ज्यु. कॉलेजचे ते मुख्याध्यापक झाले. स्थायी समिती व शिक्षण समितीचे अध्यक्षपदही त्यांनी काही काळ भूषवले. महाडेश्वर सर मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल या गावचे. तिथेच त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे रुईया महाविद्यालयातून ग्रॅज्युएशन आणि वडाळा कॉलेजमधून बी.एड. करून त्यांनी शिक्षकी पेशाची वाट धरली. दरम्यान शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची राजकीय कारकीर्दही सुरु झाली.

यापुर्वी दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या महाडेश्वर सरांना यंदा भाजपाची लाट असूनही सांताक्रूझच्या रहिवाशांनी पुनश्च निवडून दिले. तळागाळातील जनतेसाठी काम करण्याची इच्छा आणि स्थानिक लोकांशी असलेला सततचा संपर्क यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगण्यात येते. महाडेश्वर सरांच्या पत्नी सौ. पूजा गेल्या निवडणुकीत महिला आरक्षित सांताक्रूझ प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.

मुंबई शहराविषयीच्या त्यांच्या आगामी योजना जाणून घेण्यासाठी तसेच उपनगरातील समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी “आम्ही पार्लेकर’ टीमने त्यांची भेट घेतली. आमदार ऍड अनिल परब, माजी नगरसेवक शशिकांत पाटकर व शुभदा पाटकर हेदेखील त्यावेळी उपस्थित होते. मुंबईच्या प्रथम नागरीकाची भेट घेताना मनावर काहिसे दडपण होते मात्र अतिशय साध्या आणि सरळ स्वभावाच्या महाडेश्वर सरांशी बोलायला सुरुवात केल्यावर ते दडपण कुठल्याकुठे पळून गेले.

विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येणाऱ्या इमारतींच्या उंचीवर बंधने असल्याने विकासक या परिसरातील पुनर्विकास करण्यास उत्सुक नसतात. या इमारती सरासरी 40 ते 50 वर्षे जुन्या असल्याने त्यातील अनेक इमारती मोडकळीला आल्या आहेत. या परिसराला “प्रकल्पबाधित’ दर्जा देऊन काही तोडगा काढावा की क्लस्टर योजना राबवावी याविषयी भिन्न मतप्रवाह दिसून येतात. या समस्येबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले,”फनेल झोनमधील रहिवाशांच्या अडचणींची आम्हाला संपूर्ण कल्पना आहे. त्यांना पुनर्विकास करणे शक्य व्हावे यासाठी काही विशेष सवलती देण्याबाबत विचार सुरू आहेत.’

आजकाल महापालिकेच्या मराठी शाळांची दुरावस्था, तेथील शिक्षणाचा दर्जा आणि दिवसेंदिवस घटणारी पटसंख्या हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. याविषयी महापौर यांचे प्रतिपादन सकारात्मक होते. “जागतिकीकरणाच्या आजच्या युगात इंग्रजी भाषा अवगत असणं गरजेचं आहे मात्र त्यासाठी मातृभाषेच्या शिक्षणात तडजोड करण्याची गरज नाही. पालकांनीदेखील संपूर्ण इंग्रजी माध्यमाचा दुराग्रह टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महापालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे अनेक प्रोत्साहन योजनांचा विचार करण्यात येत आहे. पालिका प्रशासनातील नोकऱ्यांसाठी या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच या विद्यार्थ्यांचे क्रीडानैपुण्य पाहता त्यांच्यासाठी विशेष क्रीडा प्रशिक्षणाची सोय करण्यात येईल. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडासंस्थांना व तज्ज्ञ प्रशिक्षकांना पाचारण करण्यात येईल.’ असा विचार त्यांनी व्यक्त केला.

उपनगराच्या विकासाच्या दृष्टीने महापौरपदाच्या कारकीर्दीत काय बदल घडवण्याची इच्छा आहे असे विचारले असता, गेल्या काही वर्षांमध्ये उपनगरांतील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांच्या समस्यांची प्राधान्याने दखल घेतली जाईल. त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित व प्रदुषणमुक्त मुंबई हे आमचे ब्रीद आहे आणि त्यादृष्टीने शक्य होतील ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार महाडेश्वर यांनी व्यक्त केला.