राखीव उद्यान अपडेट स्थायी समितीव्या बैठकीत प्रस्तावाला मंजूरी

मालवीय मार्गावरील दीपा बिल्डिंगसमोरील सुमारे 1200 चौ.मीटर जागेवरील मोकळा भूखंड (क्र.1025) मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असून हा उद्यानासाठी आरक्षित आहे. जुलै 2013 च्या ‘आम्ही पार्लेकर’मध्ये या जागेवर ‘स्पेशल’ मुलांसाठी राखीव उद्यान उभारण्यात यावे अशी कल्पना मांडण्यातआली होती. त्यानंतर सर्वच माध्यमांमधून म्हणजे फोन, पत्र, इमेल, फेसबुक, एसएमएसमार्फत या उपक्रमाला पाठिंबा दर्शवणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आल्या.

‘महाराष्ट्र टाइम्स’सारख्या अग्रगण्य वृत्तपत्रानेदेखील या बातमीची दखल घेऊन दि. 11, 12 व 13 सप्टेंबर असे तीन दिवस विशेष वृत्त प्रसिध्द केले आणि ही संकल्पना महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.

विलेपार्ले परिसरात मानसिक तसेच शारीरिक दृष्टया विकलांग मुलांच्या अनेक शाळा आहेत. त्यापैकी दिशा कर्णबधीर विद्यालय, उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालय, कलबाग अपंग पुनर्वसन केंद्र, आशियाना इन्स्टीटयूट ऑफ ऑटिझम, कुमुदबेन द्वारकादास व्होरा इंडस्ट्रीअल होम फॉर ब्लाईंड वुमन, आनंदी हाफवे होम फॉर मेंटली चॅलेन्जड ऍण्ड ऑटिस्टीक चिल्ड्रन या शाळांमधील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवणारी निवेदने आमच्याकडे सादर केली. या सर्व निवेदनांच्या प्रतींची फाईल प्रभाग क्र.80च्या नगरसेविका ज्योती अळवणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असून उद्यानाच्या बांधकामासाठी 50 लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे असे श्रीमती अळवणी यांनी ‘आम्ही पार्लेकर’शी बोलताना सांगितले. या उद्यानाचे आधुनिकीकरण, व्यवस्थापन आणि देखभाल याचा भार उचलण्यासाठी लोकमान्य सेवा संघाने तयारी दर्शवली आहे.

सदर उद्यानात विशेष मुलांप्रमाणेच परिसरातील नागरिकांसाठी काही वेळ किंवा उद्यानाचा काही भाग राखून ठेवला जावा अशासुध्दा काही सूचना पुढे येत आहेत.

‘कोण आहे अस्सल पार्लेकर’? सप्टेंबर महिन्याच्या प्रश्नांची उत्तरे

1.     हनुमान मार्ग हे नाव कुठल्या हनुमान मंदिरावरून पडले? – ठोसरांचे हनुमान मंदिर

1921-22च्या सुमारास कै.नारायण ठोसर यांनी ठोसरवाडी येथे हनुमान मंदिर बांधले. पुढे या मंदिराजवळून जाणाऱ्या रस्त्याला ‘हनुमान रस्ता’ असे नाव पडले. शिर्डीच्या साईबाबांच्या सांगण्यावरून बांधण्यात आल्यामुळे या मंदिरास ‘साई हनुमान मंदिर’ म्हणतात.

2.    पार्ल्यातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे सुरू झाला? – राम मंदिर (पार्ला मार्केट)

यंदा शंभर वर्षेपूर्ण केलेल्या महात्मा गांधी रस्त्यावरील राम मंदिराची स्थापना कै.विष्णू विश्वनाथ गोखले यांनी केली. 1920 साली टिळकांच्या निधनानंतर त्याच वर्षी या मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर 1923 पासून तो लोकमान्य सेवा संघाच्या गोखले सभागृहात साजरा केला जात आहे.

3.    पार्ल्यातल्या पहिल्या चित्रपटगृहाचे नाव काय? – लक्ष्मी थिएटर

सध्या ज्या जागेवर ‘सनसिटी’ चित्रपटगृह आहे त्याच जागेवर पूर्वी ‘लक्ष्मी थिएटर’ होते. 1942 साली बाबुराव जोशी, ओंकारनाथ तिवारी, चांदोरकर व बाबुभाई दोशी यांनी बांधण्यात आलेल्या या चित्रपटगृहासाठी बाबुराव परांजपे यांच्याकडून भाडेतत्वावर जागा घेण्यात आली होती. सिनेशौकिनांमध्ये हे थिएटर ‘ताडपत्री मेट्रो’ म्हणून प्रसिध्द होते.

4.    जोडया जुळवा

पार्लेकर कलाकार गाजलेली नाटके
सतिश दुभाषी माणसाला डंख मातीचा
दत्ता भट एक शून्य बाजीराव
माधव वाटवे संध्याछाया
चंद्रकांत गोखले पर्याय

5.          नेहरू रोडवरील पेट्रोल पंपाच्या समोरच्या चाळीत कुठल्या सुप्रसिध्द हिंदी

संगीतकाराचे वास्तव्य होते?

-सचिन देव बर्मन

बंदिनी, गाईड, आराधना अशा अनेक चित्रपटांमधील गाजलेल्या रचनांमुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे सुप्रसिध्द संगीतकार सचिन देव बर्मन हे 1951 पर्यंत  नेहरू रोडवरील एका कौलारू चाळीत रहात असत.

6.    महापालिकेतील शिपायाची नोकरी ते साहित्य संमेलनाध्यक्ष असा विलक्षण

प्रवास करणारे सुप्रसिध्द पार्लेकर कवी कोण?

– नारायण सुर्वे

काही काळ गिरणी कामगार त्यानंतर शिपाई, मग प्राथमिक शिक्षकाची नोकरी असे टप्पे पार करता करता 1995 च्या परभणी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तर 1998 सालचा पद्मश्री पुरस्कार असा विलक्षण प्रवास करणारे सुप्रसिध्द कवी नारायण सुर्वे पार्ल्यात जीवन विकास केंद्रानजिकच्या परिसरात रहात असत. तळागाळातल्या श्रमिकांच्या सहवासामुळे त्यांच्या कवितेतील वास्तव हे प्रत्यक्षाला अधिक भिडणारे होते.

7.    ‘कमळाचे तळे’ म्हणून ओळखला जाणारा जलाशय पार्ल्यात कुठे होता?

– हनुमान मार्ग

सुमारे 50 वर्षांपूर्वी हनुमान मार्गावर सध्या ज्या ठिकाणी गुरुप्रसाद सोसायटी आहे तिथे एक कमळांचं तळं होतं. आजुबाजुच्या परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन या तळयात केले जात असे. पुढे ते बुजवून त्याठिकाणी इमारतींचे बांधकाम करण्यात आले.

8.    जोडया जुळवा

पार्लेकर लेखक पुस्तके
मधु मंगेश कर्णिक जुईली
विजय तेंडुलकर मी जिंकलो मी हरलो
रवींद्र पिंगे शतपावली
रमेश मंत्री सह्याद्रीची चोरी

9.  हळदीपुरांचा काच कारखाना पार्ल्यात कुठे होता? – संत जनाबाई मार्ग

वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी केमिकल इंजिनियरींगची पदवी घेतल्यावर निरंजन हळदीपूर यांनी 1944 साली ‘हल्दिन ग्लास वर्क्स’ची स्थापना केली. या कारखान्यातून अनेक मोठमोठया औषध कंपन्यांना काचेच्या बाटल्या पुरवल्या जात. सध्या जिथे हायवे रोझ सोसायटी आहे त्याच्या जवळ हा कारखाना होता.

10.    पार्ल्यातील कुठल्या संस्थेने हिमालयावर यशस्वी मोहीम प्रथम पार पाडली? – हॉलिडे हायकर्स क्लब

1965 साली प्रा.आनंद चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाकर केसकर, बाबुराव काळसेकर, रामदास शिराळी आदी मंडळींनी ‘हॉलिडे हायकर्स क्लब’ ची स्थापना केली. 1978  साली या क्लब तर्फे जोगिन  3 हे हिमालयातील 20,065 फूट उंचीवरील शिखर सर करण्यात आले. यानंतर या क्लबने हिमालयात अनेक मोहिमा काढल्या. ह्या सर्व मोहिमांचे वैशिष्टय म्हणजे यात शेरपा नसत.

‘कोण आहे अस्सल पार्लेकर’? ऑगस्ट महिन्याच्या प्रश्नांची उत्तरे

1.     सहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरू झाला? – 1982

1942 सालापर्यंत मुंबईचा विमानतळ जुहू येथे होता, मात्र समुद्राच्या खूप जवळ असल्यामुळे पावसाच्या दिवसांमध्ये विमान वाहतुकीला अडथळे निर्माण होत असे. त्यानंतर सांताक्रूझ येथे तो हलवण्यात आला. मात्र अधिक मोठया जागेच्या गरजेपायी आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी सहार येथे त्याचा विस्तार करण्यात आला. 1982 पासून सुरू झालेल्या या विमानतळाला छत्रपती शिवाजी यांचे नाव देण्यात आले.

2.    नेहरू रोडवरील आदर्श पेट्रोल पंप कुणी सुरू केला?  – शशीबेन जानी

शशीबेन जानी यांनी सुरूवातीच्या काळात साऊथ आफ्रिकेमध्ये नर्सींगचे काम केले होते. पुढे स्वत:चा व्यवसाय उभा करण्याच्या जिद्दीने त्यांनी  नेहरू रोडवरील आदर्श पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उचलली. ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या शशीबेन त्या काळातील  एकमेव महिला होत्या. व्यवसायाबरोबरच त्यांनी अनेक गरजू संस्थांना मोलाची मदत केली आहे.

3.    ‘मेरी आवाज सुनो’ स्पर्धेच्या पहिल्या सिझनची पार्लेकर विजेती कोण?

–  सोनाली भाटवडेकर (कर्णिक)

व्यास संगीत विद्यालयात संगीताचे प्राथमिक धडे गिरवणाऱ्या सोनालीने पुढे मनोहर जोशी, पं शंकर अभ्यंकर व अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. आजवर 1200 पेक्षा अधिक सुगम संगीताच्या कार्यक्रमात गायलेल्या सोनालीने 1997 मध्ये ‘स्टार प्लस’  वाहिनीवरील ‘मेरी आवाज सुनो’ ची पहिली विजेती म्हणून ‘लता मंगेशकर ट्रॉफी’ मिळवली.

4.    हे व्यंगचित्र कुठल्या पार्लेकर कलावंताने चितारले आहे?  –  वसंत सरवटे

सतराव्या वर्षापासून व्यंगचित्रकलेकडे वळलेल्या वसंत सरवटे यांच्या कुंचल्यांनी अनेक मासिके तसेच ‘पु.ल.एक साठवण’ सारखी अनेक पुस्तके सजली. ललीत मासिकातील ‘ठणठणपाळ’ अतिशय प्रसिध्द झाला. ‘ललीत’च्या गेल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांवर त्यांची व्यंगचित्रे झळकली आहेत. ‘इंडियन इंस्टिटयूट ऑफ कार्टुनिस्ट’ या संस्थेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कलेशी संबंधीत अनेक पुस्तकांचे लेखन/संपादन त्यांनी केले आहे.

5.          ‘चौफेर’ हे गाजलेले वृत्तपत्रीय सदर लिहिणारे पार्ल्यातील साहित्यिक कोण?

-माधव गडकरी

झुंझार पत्रकार व उत्तम लेखक म्हणून मान्यता पावलेले माधवराव गडकरी यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये प्रमुख उपसंपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर ‘दैनिक गोमंतक’, ‘मुंबई सकाळ’, ‘लोकसत्ता’ या दैनिकांच्या व ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या संपादकपदाची त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. 1990 साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री किताब देऊन सन्मानित केले. तीसहून अधिक पुस्तके लिहिणाऱ्या गडकरी यांचे ‘लोकसत्ता’ मधील गाजलेले ‘चौफेर’ हे सदर राजकीय विश्लेषकांच्या व अभ्यासकांच्या दृष्टीने विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.

6.    भारतीय हवाईदल प्रमुख पदावर पोहोचलेले पा.टि.वि.चे माजी विद्यार्थी कोण?

– प्रदीप नाईक

एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक हे भारतीय हवाईदलाचे एकोणीसावे प्रमुख. नागपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. पार्लेटिळक विद्यालयात शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सैनिक स्कूल, सातारा व नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला येथे पुढील प्रशिक्षण घेतले. 1971  च्या युध्दात सहाभाग घेतलेल्या नाईक यांना अनेक सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.

7.    खो-खो या क्रिडाप्रकारासाठी 1982 साली शिवछत्रपती पुरस्कार व 1983 साली अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूचे नाव काय?

– वीणा परब गोरे

खो-खो या क्रीडाप्रकारासाठी 1982  साली महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्कार तर 1983साली राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरकाराच्या मानकरी असणाऱ्या वीणा परब गोरे यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कारा’नेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. 1975 साली हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी 25 गडी बाद करण्याचा विक्रम केला होता त्याचप्रमाणे चार वेळा महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषविले आहे.

8.    पार्ल्यातील विठोबाचे एकमेव देऊळ कुठल्या रस्त्यावर आहे? – तेजपाल स्किम नं. 3

श्री. लक्ष्मीदास तेजपाल यांनी 1935 साली तेजपाल स्किम रोड नं 3  येथे विठ्ठल रखुमाई मंदिर बांधले. या मंदिरात एक देवनागरी तर एक गुजराथी शिलालेख कोरलेला आहे. येथे आषाढी एकादशी, कार्तिकी पौर्णिमा, तुळशी विवाह साजरे केले जातात.

9.  हे शिल्प कुठल्या पार्लेकर कलावंताने साकार केले आहे? – गणपतराव काशिनाथ म्हात्रे

शिल्पकलेच्या क्षेत्रात जागतिक किर्ती प्राप्त केलेले गणपतराव म्हात्रे यांनी निर्माण केलेल्या ‘टू द टेंपल’ या असामान्य कलाकृतीने अनेक मानाचे पुरस्कार मिळवले तसेच देशविदेशातील वृत्तपत्रात व जर्नल्समध्ये कला समिक्षकांनी याची विशेष दखल घेतली. राजा रविवर्मा, रवींद्रनाथ टागोर यांनीदेखील  म्हात्रे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. त्यांनी निर्माण केलेले 150पेक्षा अधिक पूर्णाकृती पुतळे भारतभरातील अनेक राजवाडे, म्युझियम्स, उद्यानांची शोभा वाढवत आहेत. ब्रिटिश सरकारने त्यांना ‘रावबहादुर’ ही पदवी दिली. पार्ल्यात पार्लेश्वर मंदिरामागे त्यांचा स्टुडियो होता. हनुमान मार्गावरील दत्तमंदिरातील सुंदर दत्तमूर्तीदेखील म्हात्रे यांनीच साकारली आहे.

10.    छपाई शाई बनविण्याचा पार्ल्यातील पहिला कारखाना कुठला ? – युनायटेड इंक्स

1929च्या काळात स्वदेशीच्या मंत्राचे सर्वत्र गारूड होते. त्यावेळी विनायक गणेश साठये यांनी संपूर्णपणे स्वदेशी व्यवस्थापनाखाली छपाई शाई बनवण्याचा देशातील पहिला कारखाना विलेपार्ल्यात सुभाष रोड येथे स्थापन केला. शरद व मधुसूदन ह्या त्यांच्या दोन्ही मुलांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व्यवसायाचा विस्तार केला. जागेची वाढती गरज लक्षात घेऊन 2000 साली हा कारखाना तळोजा येथे स्थलांतरित करण्यात आला.

राखीव उद्यान अपडेट

जुलैच्या ‘आम्ही पार्लेकर’मध्ये मालवीय मार्गावरील भूखंडावर ‘स्पेशल’ मुलांसाठी राखीव उद्यान उभारण्यात यावे अशी कल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर सर्वच माध्यमांमधून म्हणजे फोन, पत्र, इमेल, फेसबुक, एसएमएसमार्फत या उपक्रमाला पाठिंबा दर्शवणाऱ्या असंख्य उत्स्फूर्त प्रतिक्रिया आमच्यापर्यंत आल्या.

विलेपार्लेपरिसरात मानसिक तसेच शारीरिक दृष्टया विकलांग मुलांच्या अनेक शाळा आहेत. त्यापैकी दिशा कर्णबधीर विद्यालय, उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालय, कलबाग अपंग पुनर्वसन केंद्र, आशियाना इन्स्टीटयूट ऑफ ऑटिझम, कुमुदबेन द्वारकादास व्होरा इंडस्ट्रीअल होम फॉर ब्लाईंड वुमन, आनंदी  हाफवे होम फॉर मेंटली चॅलेन्जड ऍण्ड ऑटिस्टीक चिल्ड्रन या सर्वच शाळांमधील शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवणारी निवेदने आमच्याकडे सादर केली.

उद्यानासाठी राखीव असलेल्या महापालिकेच्या या भूखंडावर जर विकलांगांसाठी असा विशेष प्रकल्प उभारला जायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी यासंबंधीचा ठराव पालिकेत मांडून तो मंजूर करून घेणे गरजेचे आहे.

तेव्हा हा ठराव मांडताना व त्यानंतर पाठपुरावा करताना उपयोग व्हावा या उद्देशाने या सर्व निवेदनांच्या प्रतींची फाईल विलेपार्ले विभागाच्या (वॉर्ड क्र.80) नगरसेविका ज्योती अळवणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे या उद्यानाचे आधुनिकीकरण, व्यवस्थापन आणि देखभाल याचा भार उचलण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकमान्य सेवा संघाकडेदेखील सदर निवेदनांची फाईल देण्यात आली आहे.

या विषयावरील पुढल्या सर्व घडामोडी ‘आम्ही पार्लेकर’  वेळोवेळी वाचकांसमोर आणेलच.

‘कोण आहे अस्सल पार्लेकर’? जुलै महिन्याचे उत्तरे

जुलै महिन्याचे ‘अस्सल पार्लेकर’ (विजेत्यांची नावे)

शालिमा सुशिल वालावलकर, वसंत पांडुरंग म्हात्रे

1.     सध्या अगरवाल मार्केट जिथे आहे तेथे पूर्वी एक आलिशान बंगला होता. त्याचे नाव काय? – मोर बंगला

1904 साली शेठ गोवर्धनदास तेजपाल यांनी हा प्रासादतुल्य बंगला बांधला.चार एकराच्या भव्य परिसरातील या आवारात विस्तिर्ण बगीचा, पवनचक्की, गोशाळा व पोहोण्याचा तलावदेखील होता. हा बंगला बांधायला सुमारे पाच वर्षेलागली. त्याच्या शिखरावर असलेल्या पत्र्याच्या दिशादर्शक भव्य मोरामुळे याला ‘मोर बंगला’ हे नाव पडले. स्वातंत्र्यसंग्रामातील पार्ल्यातील सर्व मोठया सभा याच बंगल्याच्या आवारात होत.

2.    वामन मंगेश दुभाषी मैदानात कुठल्या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या जातात?

– कबड्डी

1995 पासून वामन मंगेश दुभाषी मैदानावर कबड्डीच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या जातात. पार्ल्यातील गजानन क्रीडा मंडळातर्फे आजपर्यंत 11 वेळा या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. यात राज्यभरातून सुमारे 30-32 संघ सहभागी होतात.

3.    पार्ल्यातील सर्वात जूने देवालय कुठले?

–  पतितपावन राम मंदिर-बामणवाडा

बामणवाडा येथील पतितपावन राममंदिर हे देवालय 1905 साली एका रामदासी साधूने बांधले. या पश्चिमाभिमुख मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. हे पार्ल्यातील पहिले मंदिर.

4.    पार्ल्यात सुरू झालेली पहिली बँक कोणती?

–  फर्स्ट सिटीझन बँक

1955च्या सुमारास पार्ल्यात फर्स्ट सिटीझन बँक सुरू झाली. सध्या पार्ल्याच्या मार्केटमध्ये जिथे ‘ट्रेंड सेटर’ दुकान आहे तिथे एका टुमदार घराच्या तळमजल्यावर ही बँक होती. पुढे ती बुडणार अशा वावडया उठल्या, त्यावेळी बँकेच्या बाहेर खातेदारांनी लांबच लांब रांगा लावल्याचे जुन्या पार्लेकरांना स्मरत असेल. नंतर या बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्यात आले.

5.    साठये कॉलेजच्या पहिल्या प्राचार्यांचे नाव काय?

– प्रा. चिंतामण बळवंत जोशी

1959 साली पार्ले टिळक विद्यालयात सुरू झालेले पार्लेकॉलेज 1960 साली सध्याच्या इमारतीत हलवण्यात आले. प्रा. चिंतामण बळवंत जोशी हे या कॉलेजचे पहिले प्राचार्य. त्याआधी 1952 पासून 1959 पर्यंत ते रुपारेल कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांच्या कारकीर्दीत महाविद्यालयाचा दर्जा व प्रगती शिखरावर गेली.

6.    पार्ल्यात वास्तव्य असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रथम नगरसेविका कोण?

– श्रीमती रमाबाई चेंबूरकर

सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रमाबाई माधवराव चेंबूरकर यांनी 1935 पासून लोकमान्य सेवा संघाच्या अनेक शाखांसाठी कार्य केले. सोशन सर्वीस लीगमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले. स्त्रियांसाठी विनामूल्य शिवणकाम, भरतकाम, हिंदी भाषा वर्ग चालवले. 1938 पासून सतत 15 वर्षेत्या महानगरपालिकेच्या निवडणूकांमध्ये निवडून येत होत्या.

7.    पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले आयुर्वेदिक डॉक्टर कोण?

– डॉ.सुरेशचंद्र चतुर्वेदी

डॉ. सुरेश चतुर्वेदी हे 1951 पासून पार्ल्यात आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत. त्यांची आरोग्यशास्त्रावरील 25 पुस्तके प्रसिध्द आहेत. एड्स, कॅन्सर, डायबेटीस, स्थूलता, हृदयरोग यावरील संशोधनाला मान्यता मिळून त्यांना 2000 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री सन्मान बहाल करण्यात आला.

8.    लंडनच्या आर्ट गॅलरीत असलेल्या ‘डिव्होशन’या 18 फुटी चित्राचे पार्लेकर चित्रकार कोण?

– कृष्णराव केतकर

होतकरू विद्यार्थ्यांसाठी 1915 साली मुंबईत स्थापन झालेल्या ‘केतकर आर्ट इंस्टिटयुट’चे संस्थापक केतकर मास्तर म्हणजेच कृष्णराव केतकर. त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून आर्ट मास्टर पदवी घेतली व प्रतिष्ठेच्या मेयो सुवर्णपदकासह अनेक बक्षिसे मिळवली. लॅण्ड्स्केपस व पोर्ट्रेट्स मध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते. 1933 पासून पार्ल्यात ‘कलामंदिर’ मध्ये त्यांचे वास्तव्य होते. नंतर त्या रस्त्याचे ‘चित्रकार केतकर मार्ग’ असे नामकरण करण्यात आले.

9.  पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानावर चित्रीकरण झालेला मराठी सिनेमा कुठला?

– वीर सावरकर

16 नोव्हेंबर 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वीर सावरकर’ ह्या सिनेमाची निर्मिती ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ या संस्थेने सुप्रसिध्द संगीतकार सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली केली. जनसामान्यांच्या देणग्यांमधून तयार झालेल्या या सिनेमातील सावरकरांच्या एका सभेचे चित्रीकरण पार्लेटिळक शाळेच्या मैदानावर झाले होते.

10. हे व्यंगचित्र कुठल्या पार्लेकर कलावंताने चितारले आहे?

गेल्या महिन्यातील ‘कोण आहे अस्सल पार्लेकर’मध्ये ‘हे व्यंगचित्र कुठल्या पार्लेकर कलावंताचे आहे?’ या दहाव्या प्रश्नाबरोबरचे चित्र काही तांत्रिक बिघाडामुळे छापले गेले नाही. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

हाच प्रश्न पुन्हा या महिन्याच्या प्रश्नावलीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

राखीव उद्यानाच्या कल्पनेला पार्लेकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा

काही कारणाने गेल्या महिन्यातील लेख ज्यांच्या वाचनात आला नसेल अशांसाठी थोडक्यात परामर्श-

मालवीय रोडवरील दीपा बिल्डिंगसमोरील मोकळा भूखंड आता महापालिकेच्या ताब्यात असून तो उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या जागेवर शारीरिक किंवा मानसिक दृष्टया विकलांग मुलांना खेळण्यासाठी एक स्वतंत्र उद्यान/क्रिडांगण उभारण्यात यावे अशी संकल्पना यात मांडण्यात आली. सर्वसामान्य मुले ज्या मैदानांत किंवा उद्यानांमध्ये खेळतात तिथे ही मुले मोकळेपणाने, सुरक्षितपणेखेळू शकत नाहीत. अशा ‘स्पेशल’ मुलांना मनमुराद बागडण्यासाठी उपनगरांमध्ये तर सोडाच पण संपूर्ण मुंबईत एकही उद्यान नाही.

त्यामुळे अशा प्रकारचे राखीव उद्यान पार्ल्यात सुरू करण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे. पार्ल्याच्या लोकप्रतिनिधींनीदेखील या संधीचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा.

या भूखंडाच्या आजूबाजूचा परिसर जर बघितला तर त्यात साठये उद्यान, डॉ. हेडगेवार मैदान, वामन मंगेश दुभाषी मैदान अशा मोकळया जागांचा पार्ल्यातील मुले आणि ज्येष्ठ नागरिक उत्तम प्रकारे उपयोग करताना दिसतात. त्यामुळे या भूखंडावर पुन्हा सर्वसामान्यांसाठी उद्यान उभारण्यापेक्षा विकलांग मुलांसाठी असे एखादे वैशिष्टयपूर्ण, सर्व विशेष सोयींनी युक्त उद्यानच व्हायला हवे.

अशा मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या अनेक शाळा पार्लेपरिसरात आहेत. या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, मार्गदर्शक, मुलांचे पालक अशा सर्वांनीच या कल्पनेचे स्वागत केले.

– x –x-x-

गेल्या महिन्याच्या ‘आम्ही पार्लेकर’मध्ये मालवीय मार्गावरील भूखंडावर ‘स्पेशल’ मुलांसाठी राखीव उद्यान उभारण्यात यावे अशी कल्पना माडण्यात आली  आणि उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला. सर्वच माध्यमांमधून म्हणजे फोन, पत्र, इमेल, फेसबुक, एसएमएस आणि प्रत्यक्ष भेटून अनेकजण या उपक्रमाला जोरदार पाठिंबा दर्शवत आहेत.

दिशा कर्णबधीर विद्यालय, उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालय, कलबाग अपंग पुनर्वसन केंद्र, आशियाना इन्स्टीटयूट ऑफ ऑटिझम, कुमुदबेन द्वारकादास व्होरा इंडस्ट्रीअल होम फॉर ब्लाईंड वुमन, आनंदी  हाफवे होम फॉर मेंटली चॅलेन्जड ऍण्ड ऑटिस्टीक चिल्ड्रन अशा पार्लेपरिसरातील शाळांमधील शिक्षकांनी व पालकांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवणारी निवेदने ‘आम्ही पार्लेकर’कडे सादर केली आहेत. यातील विशेष उल्लेखनीय निवेदन आहे, उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालयाच्या 31 विद्यार्थ्यांचे.

लोकमान्य सेवा संघाने या विषयासंदर्भात महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे एक निवेदन सादर करून उद्यानाचे आधुनिकीकरण, व्यवस्थापन आणि देखभाल याचा भार उचलण्याची तयारी दाखवली आहे. पार्ल्यातील इतर संस्थांनीही अशाच प्रकारचा पुढाकार घेऊन हा प्रकल्प तडीस नेण्यासाठी हातभार लावणे गरजेचे आहे.

उद्यानासाठी राखीव असलेल्या महापालिकेच्या या भूखंडावर जर विकलांगांसाठी असा विशेष प्रकल्प उभारला जायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी यासंबंधीचा ठराव पालिकेत मांडून तो मंजूर करून घेणे गरजेचे आहे आणि पार्ल्याचे लोकप्रतिनिधी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतील याची आम्हाला खात्री आहे.

या विषयावरील पुढल्या सर्व घडामोडी ‘आम्ही पार्लेकर’  वेळोवेळी वाचकांसमोर आणेलच.

काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया-

”आमच्या मुलांना चालणे हा मुख्य शारीरिक व्यायाम गरजेचा असतो स्वत:चा तोल सांभाळून सरळ रेषेत चालणे त्यांच्यासाठी सोपे नसते पण गरजेचे असते. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीमुळे त्यांना नेणे कठीण होते. तसेच सर्व विकलांग मुलांच्या हालचाली संथ असतात त्यामुळे सार्वजनिक बागांमध्ये सामान्य मुलांशी स्पर्धा करून झोपाळा व घसरगुंडी मिळवणे त्यांना शक्य होत नाही व ती खेळाचा आनंद लुटू शकत नाहीत. त्यामुळे अशी बाग ही त्यांच्यासाठी फारच मोठी आनंदाची ठेव होऊ शकेल. – डॉ. अच्युत गोडबोले (संगणक तज्ज्ञ, लेखक)

या जागेवर राखीव उद्यान उभारण्याची कल्पना उत्तम आहे. या प्रश्नाचा पाठपुरावा करणाऱ्या ‘आम्ही पार्लेकर’चे प्रथमत: अभिनंदन.

या कल्पनेशी मी पूर्णपणे सहमत आहे. मानसिक व शारीरिकदृष्टया विकलांग मुलांमध्ये अंध, अपंग, मूकबधीर, मतिमंद, ऑटिस्टिक अशा अनेक प्रकारच्या मुलांचा समावेश होतो. या स्पेशल मुलांच्या गरजादेखील वेगवेगळया असतात, स्वतंत्रपणे हिंडणे, खेळणे अनेकदा कठीण असते.  या सर्व बाबींचा विचार उद्यान उभारताना करणे आवश्यक आहे.

हा परिसर पुरेसा प्रशस्त आहे त्यामुळे शक्य असल्याच या जागी एक लहानसे कौन्सेलिंग सेंटर सुरू करता आले तर त्याचा मुलांना व पालकांना खूप चांगला उपयोग होऊ शकतो. – डॉ.स्ेहलता देशमुख, माजी कुलगुरू

ही कल्पना मनापासून आवडली. अशा मुलांच्या गरजांचा संपूर्ण विचार मात्र व्हायला हवा. विशेषत: पावसाळयातदेखील ह्या जागेचा कसा उपयोग करून घेता येईल यासंबधी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. माझ्या मते या जागेवर काही छोटया खोल्या किंवा हॉल बांधला तर तिथे काही ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सुरु करता येईल. याशिवाय या उद्यानात जर शाळेप्रमाणेच प्रशिक्षित माणसं नेमता आली तर  या मुलांच्या पालकांनाही थोडा मोकळा वेळ मिळू शकेल. विकलांग मुलांच्या गरजांचा विचार करताना त्यांच्या पालकांचाही विचार करता आला तर बरे होईल. – डॉ.माधवी पेठे, प्राचार्या – म.ल.डहाणूकर कॉलेज

पालिकेच्या भूखंडावर जर विकलांग मुलांसाठी राखीव उद्यान सुरू झाले तर ती निश्चितच एक चांगली आणि अभिमानास्पद बाब होईल. या मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शालेय शिक्षणाबरोबरच खेळाचीही आवश्यकता आहे. त्यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणेच इतर सुविधा उपलब्ध करून द्यायलाच हव्यात. पार्ल्यातील अनेक संस्था अशा कामासाठी पुढाकार घेतील असा मला विश्वास आहे. या संबंधीचा ठराव पालिकेत मांडला जाईलच पण त्यासाठी काही विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते आणि त्यासाठी काही कालावधी लागेल याची आपण सर्वांनी नोंद घेणे आवश्यक आहे. मी हा ठराव पालिकेच्या सभागृहात मांडीन व तो मंजूर करूनघेण्यासाठी निश्वितच प्रयत्न करीन. – ज्योती अळवणी, स्थानिक नगरसेविका (वॉर्ड क्र.80)

मला ही बातमी वाचून अतिशय आनंद  झाला. स्पेशल मुलांसाठी शाळा असते परंतु अशा मुलांसाठी बाग,नाचण्या बागडण्यासाठी उद्यान अथवा क्रीडांगण असावे ही कल्पना  स्तुत्य आहे. – डॉ.राजेंद्र बर्वे (मानसोपचार तज्ज्ञ)

ही कल्पना अतिशय नाविन्यपूर्ण आहे. अपंग मुलांसाठी अशा उद्यानाचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. फक्त मनात आले की एवढा मोठा प्रकल्प उभारायचा तर त्यासाठी प्रचंड खर्च येईल. तो कसा उभा राहिल? प्रवेशशुल्क आकारले जाईल का? त्याची देखभाल करण्याची जबाबदारी कोण घेईल? वगैरे.

पण कल्पना खूपच चांगली आहे. ती नेटाने पूर्णत्वास न्यायला हवी. – अनुराधा गोरे, शिक्षणतज्ञ.

राखीव उद्यानाची संकल्पना चांगलीच आहे आणि निश्चितच गरजेची आहे. अनेक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पार्ल्यात जर शारीरिक व मानसिक दृष्या विकलांग मुलांसाठी असे सर्व सोईंनी युक्त उद्यान आकाराला आले तर ते अतिशय भूषणावह ठरेल. – डॉ. कविता रेगे, प्राचार्या – साठये कॉलेज

ह्या उपक्रमाबाबत दुमत असण्याचा प्रश्नच नाही. अशा मुलांचे आपण काही देणे लागतो या भावनेतून हे साकारायला हवे. मात्र हे उद्यान उभारताना त्या त्या विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या जागेचा प्रत्येक कोपरा सुरक्षित आणि सोयीसुविधांनी युक्त होईल. संपूर्ण देशातील हे प्रथम उदाहरण होऊ शकेल. – डॉ.शशीकांत वैद्य बालरोग तज्ज्ञ

‘आम्ही पार्लेकर’ ने मांडलेली ही कल्पना ‘स्पेशल’ मुलांच्या जडणघडणीसाठी खूप महत्त्वाची आहे. अशा प्रकारचे राखीव उद्यान उभारण्यासाठी पार्ल्यातील सुसंस्कृत समाजाने पुढाकार घेणे स्वाभाविकच आहे. या प्रकल्पाला माझ्या शुभेच्छा!  – सचिन खेडेकर अभिनेता

मालवीय रस्त्यावरील भूखंड

विकलांगांसाठी राखीव उद्यान साकारण्याची सुवर्णसंधी

  • सुमारे 1200 चौ.मी.चा भूखंड आता महानगरपालिकेच्या ताब्यात.
  • उद्यानासाठी राखीव.
  • पार्ले परिसरात विकलांगांसाठी अनेक शाळा/संस्था.
  • ‘राखीव जागा ही आमच्या विद्यार्थ्यांची मूलभूत गरज’ – या शाळांच्या पदाधिकाऱ्यांचे आग्रही मत.
  • मुंबईत अशा प्रकारचे राखीव मैदान/उद्यान एकही नाही.
  • सर्वसामान्यांसाठी पार्ले परिसरात अनेक मैदाने/उद्याने उपलब्ध.

Free Municipal Plot on Malviya Road

गेल्या महिन्यात ‘आम्ही पार्लेकर’ने मालवीय मार्गावरील वादग्रस्त भूखंड (अंदाजे 1200 चौरस मीटर) आता महापालिकेच्या ताब्यात आल्याची बातमी प्रसिध्द केली होती.  दीपा बिल्डिंगसमोर असलेला हा भूखंड गेल्या अनेक वर्षांपासून एका बिल्डरच्या ताब्यात होता. माजी नगरसेवक चंद्रकांत पवार यांच्या पुढाकाराने बाबा कुलकर्णी, शंकर जाधव, माजी नगरसेविका मंगलाताई जोशी व इतर अनेकांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि तो भूखंड आता महापालिकेच्या उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

ही बातमी वाचल्यावर पार्ल्यातील ज्येष्ठ नागरिक यशवंत जोशी यांनी ‘या जागेवर मूकबधीर व अपंग मुलांसाठी स्वतंत्र मैदान उभारावे’  अशी एक अभिनव कल्पना मांडली. ही कल्पना निश्वितच स्वागतार्ह आहे. सर्वसामान्य मुले ज्या मैदानांत किंवा बगिच्यांमध्ये खेळतात तिथे ही मुले मोकळेपणाने, सुरक्षितपणे खेळू शकत नाहीत. जी गरज शारीरिक दृष्टया विकलांग मुलांची तीच, किंबहुना जास्त गरज मानसिक दृष्टया कमकुवत मुलांची असू शकते.  अधिक चौकशी केली असता असेही कळले की अशा ‘स्पेशल’ मुलांना मोकळा श्वास घेण्यासाठी, मनमुराद बागडण्यासाठी उपनगरांमध्ये तर सोडाच पण संपूर्ण मुंबईत एकही उद्यान नाही.

एकंदरीतच भारतात कुठेही रस्ते, उद्याने, स्टेशन्स, शाळा इ. सार्वजनिक ठिकाणी अपंगांच्या सुविधांचा विचार केलेला आढळत नाही. जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहताना एकूण लोकसंख्येपैकी लक्षणीय वाटा असणाऱ्या अशा नागरिकांच्या सोयीसुविधांबद्दल इतके उदासीन राहून कसे चालेल? खरे तर अशा प्रकारचे राखीव उद्यान पार्ल्यात सुरू करून एक उत्तम पायंडा पाडण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. पार्ल्याच्या लोकप्रतिनिधींनीसुध्दा या संधीचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा. या भूखंडाच्या आजूबाजूचा परिसर जर बघितला तर त्यात साठये उद्यान, डॉ.हेडगेवार मैदान, वामन मंगेश दुभाषी मैदान, नान-नानी पार्क अशा मोकळया जागांचा पार्ल्यातील मुले आणि ज्येष्ठ नागरिक उत्तम प्रकारे उपयोग करताना दिसतात. त्यामुळे या भूखंडावर पुन्हा सर्वसामान्यांसाठी उद्यान उभारण्यापेक्षा विकलांग मुलांसाठी असे एखादे वैशिष्टयपूर्ण, सर्व विशेष सोयींनी युक्त उद्यानच व्हायला हवे.

अशा मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या अनेक शाळा आहेत. तेंव्हा या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, मार्गदर्शक अशा मंडळींशी या विषयावर सविस्तर चर्चा करावी, या मुलांच्या गरजांविषयी अधिक जाणून घ्यावे अशा हेतूने ‘आम्ही पार्लेकर’ने त्यांच्याशी संपर्क साधला.  या सर्वांनी राखीव उद्यानाच्या कल्पनेचे इतक्या उत्फूर्तपणे स्वागत केले की आजपर्यंत ह्या गोष्टीचा विचार का झाला नाही याबद्दल खेद वाटला.

आपण आपल्या गरजांबद्दल, हक्कांबद्दल किती जागरूक असतो! सरकारने हे करायला हवे, पालिकेने ते करायला हवे अशा मागण्या सतत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मांडल्या जातात. पण या मुलांविषयी आपल्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत का? मुक्त खेळणे ही सगळयाच मुलांची मूलभूत गरज आहे. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हे खूप गरजेचे आहे. पण अशा वेगळया मुलांसाठी जर कुठली जागाच नसेल तर त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी करायचे काय? सामान्य मुलं ज्या बागेत किंवा मैदानात जातात त्या ठिकाणी गर्दीमध्ये ही मुले भांबावतात, धडपडतात. कधी बघ्यांच्या टिंगलीचाही विषय होतात. मग या मुलांना खेळण्यासाठी राखीव मैदान किंवा बगिचा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी कोणाची?  ही जबाबदारी त्यांच्या पालकांची, शिक्षकांची असूच शकत नाही. समाजानेच त्यांच्यासाठी असे पाऊल उचलायला हवे. आपण पार्लेकरांनी ही संवेदनशीलता दाखवायची नाही तर कुणी दाखवायची? ही मुलं ‘आपली’  आहेत हे भान जागृत असायला हवे आणि एकदा कुणाला आपलं म्हटलं की त्याच्या सुखदु:खाविषयी सहसंवेदना असणे हेही ओघाने आलेच.

ही मुलं कर्णबधीर, अपंग, अंध, गतिमंद, मतिमंद, ऑटिस्टिक वगैरे कुठल्याही प्रकारात मोडणारी असू शकतात आणि त्याप्रमाणे त्यांच्या गरजा बदलतात. उदा. कर्णबधीर मुलांसाठी ठळक साइनबोर्ड्स गरजेचे असतात. अपंगांसाठी व्हिल चेअर्स बागेत सहज फिरू शकतील अशा मोकळया, रुंद मार्गिका आवश्यक असतात. अंधांसाठी कठडयांचा वापर करावा लागतो. नुसत्या फळयांच्या झोपाळयांऐवजी सुरक्षित अशा आरामदायी खुर्चीसारख्या झोपाळयांवर झोके घेण्याचा आनंद मतिमंद मुलं मनमुराद लुटू शकतात. रोजच्या सहवासातून, अनुभवातून अशा अनेक सूचना या मंडळींन कडून समोर आल्या. प्रत्येकाने आपली मते मोठया उत्साहाने आणि आशेने मांडली. त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवणे ही आता आपली जबाबदारी आहे. आता आपण सर्वांनी मिळून या सूचनेला भरघोस पाठींबा द्यायला हवा आणि महापालिकेकडून या प्रस्तावासाठी होकार मिळवायला हवा.

हे काम तडीस नेण्यासाठी स्थानिक नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, समाजातील दानशूर व्यक्ती यांची मदत महत्त्वाची आहे.

चला, मानसिक आणि शारीरिक दृष्टया विकलांग मुलांसाठी राखीव उद्यान असलेले उपनगर अशी एक वैशिष्टयपूर्ण ओळख विलेपार्ल्याला मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊया!

मानसिक व शारीरिक दृष्टया विकलांग मुलांच्या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, मार्गदर्शक व पालकांच्या प्रतिक्रिया

”आमच्या मुलांना चालणे हा मुख्य शाररीक व्यायाम गरजेचा असतो स्वत:चा तोल संभाळून सरळ रेषेत चालणे त्याच्यासाठी सोपे नसते पण गरजेचे असते सामान्य सार्वजनिक ठिकाणी, गर्दीमुळे त्यांना नेणे कठीण हाते. तसेच एकूण सर्व विकलांग मुलांच्या हालचाली संथ असतात त्यामुळे सार्वजनिक बागामध्ये सामान्य मुलांशी स्पर्धा करून झोपाळा व घसरगुंडी मिळवणे त्यांना शक्य होत नाही व ती खेळाचा आनंद लुटु शकत नाहीत. त्यामुळे अशी बाग ही फारच मोठी आनंदाची ठेव त्यांच्यासाठी होऊ शकेल.”

– आकांक्षा रानडे  (मुख्याध्यापक)   आनंदी  हाफवे होम फॉर मेंटली चॅलेंन्ज्ड ऍण्ड ऑटिस्टीक चिल्ड्रन

”अतिशय गरजेची व सुंदर कल्पना. परदेशात अशा जागेची फार गरज पडत नाही पण आपल्याकडे अजूनही समाज मानसिक व शारीरिक विकलांगांना आपले म्हणत नाही. त्यांचे या मुलांबरोबरचे वर्तन बहुतांशी तुसडे किंवा दया दाखवणारे असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मुलांना नेताना शिक्षकांना-पालकांना खूप त्रास होतो व मुलेही आनंद उपभोगू शकत नाहीत. शिवय अशा मुलांना काही विशेष सोईचीही गरज असते तीही तेथे पुरवता येईल. आमच्याकडून सर्व प्रकारची मदत देण्याची आमची इच्छा आहे.”

-सुहासिनी मालदे (संस्थापक व विश्वस्त) आशियाना इन्स्टिटयूट ऑफ ऑटिझम

”अतिशय अभिनव कल्पना! मुंबईत कोठेही असा बगीचा असल्याचे ऐकिवात नाही. परंतु आमच्या मुलांसाठी फार गरजेचे आहे. मुलांना घेऊन जाण्यासाठी एक सुरक्षित जागा निर्माण होईल. व्यवस्थित अभ्यास करून हा प्रकल्प राबवावा लागेल.”

– रीतू पाटील  (मुख्याध्यापक) आशियाना इन्स्टीटयूट ऑफ ऑटिझम

”’आम्ही पार्लेकर’ने मांडलेली ही कल्पना अतिशय सूज्ञ आहे. अपंग मुलांसाठी अशा प्रकारचा बगीचा फारच मोलाचा ठरेल. मी स्वत: पार्लेकर आहे. पार्ल्यात सर्व प्रकारच्या लोकांसाठी सोई उपलब्ध आहेत. पण विकलांग मुलांसाठी वेगळी राखीव जागा नाही. मुंबई उपनगरातील सर्वात जास्त विशेष मुलांच्या सर्वाधिक शाळा/संस्था पार्ल्यात आहेत. या सर्वांना त्याचा खूप उपयोग होईल.”

– चित्रा देशमुख (मुख्याध्यापक) कुमुदबेन द्वारकादास व्होरा इंडस्ट्रीअल होम फॉर  ब्लाईंड विमेन (लल्लुभाई पार्क, अंधेरी)

”अत्यंत सुरेख कल्पना आहे. शारीरिक व मानसिक विकलांग मुलांसाठी फारच उपयुक्त संकल्पना. बागेत मुलांना चालण्यासाठी, उडया  मारण्यासाठी, सोयी करता येतील. शिवाय वेगवेगळे खेळ निर्माण करता येतील. रोटरी, लायन्स सारख्या संस्थांकडुनही मदत घेता येऊ शकते. मुख्य म्हणजे पार्लेकर सुज्ञ व सुजाण आहेत तेही यासाठी नक्कीच मदत करतील.”

– अजय शुक्ला हायटेक फॅमिली एनरीचमेंट फाऊंडेशन (पार्ले)

मूकबधिर व अपंग मुलांसाठी स्वतंत्र मैदान आवश्यक

मालवीय रोडवर नगर रचना पाचमधील प्लॉट क्रमांक 112 हा मैदान म्हणून राखीव आहे. ह्याचे अंदाजे क्षेत्रफळ 1000 चौरस मिटर आहे. काही स्थानिक समाज कार्यकर्त्याच्या प्रयत्नांमुळे हा प्लॉट गेल्या महिन्यांत महानगरपालिकेने ताब्यात घेतला आहे. आजमितीला विलेपारले पूर्व विभागात मूकबधिर व अपंग मुलांसाठी असलेल्या शाळांमध्ये अनेक विद्यार्थी शिकत आहेत. ह्या शाळांना स्वत:चे कोणतेही मैदान नाही. ह्या मुलांच्या पुढील प्रगतीसाठी, विकासासाठी अशा मोकळया मैदनावर खेळण्याची संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

हे मैदान फक्त अशा प्रकारच्या सर्व अपंग मुलांसाठी उपलब्ध झाल्यास त्यांची तर कायमची सोय होईलच शिवाय अशा प्रकारचे राखीव मैदान हे मुंबई महानगरातील एक वैशिष्टय होईल.

– यशवंत जोशी

”उत्तम कल्पना. हे झालेच पाहिजे. मुलांना याचा फार फायदा होईल. पार्ल्यात सर्व थरातील लोकांसाठी सोयी आहेत. आमच्या या मुलांनाही ही सुविधा मिळाली तर फारच छान. अशी सुविधा असणारे मुंबईतीलच नव्हे तर भारतातील पहिले उपनगर ठरण्याचा मान पार्ल्याला मिळेल.”

– रेखा शिराळी   (मुख्याध्यापक) दिशा कर्णबधीर शाळा

”पार्लेकर सुजाण नागरिक आहेत. त्यांच्यामुळेच आज पार्ल्यात इतक्या विशेष मुलांच्या शाळा कार्यान्वित आहेत. असा प्रकल्प विलेपार्ल्यात व्हावा हेच योग्य. इथले नगरसेवकही याला पाठींबाच देतील. विकलांग मुलांसाठी विचार करून इथे खूप छान सोयी करून घेणे शक्य आहे. भूखंड तसा मोठा आहे. त्यामुळे त्याचा चांगलाच उपयोग होईल.”

– साधना सप्रे  (मुख्याध्यापक) उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालय, उत्कर्ष मंडळ

”आमच्या मुलांसाठी अतिशय उत्तम कल्पना. यात एका कोपऱ्यात वाळू खेळायला ठेवली तर मुलांना खूप आनंद होईल. त्याच्या शारीरिक व्यायामासाठीही ते उपयोगी पडेल. ‘आम्ही पार्लेकर’च्या या कल्पनेला आमचा पाठींबाच आहे.”

– अंजली ठोसर (पालक व ट्रस्टी) (कलबाग अपंग पुनर्वसन केंद्र)

”कृपया या कल्पनेला कोणीही विरोध करू नका. ही कल्पना राबवाच. आमच्या व इतर असंख्य मुलांची ही फार मोठी गरज आहे.”

– मोहन रानडे (पालक)

कोण आहे ‘अस्सल पार्लेकर’? (जून)

आपण सगळे पार्ल्यावर इतकं प्रेम करतो पण खरंच आपल्याला आपल्या पार्ल्याच्या परिसराविषयी किती माहिती आहे? चला तर मग, खालील प्रश्न सोडवा आणि 25 जून पर्यंत आपले नाव, पत्ता आणि फोन नंबर लिहून आमच्या ऑफिसमध्ये पोहोचवा अथवा इमेलने उत्तरे पाठवा. आकर्षक बक्षिसे जिंका. तुम्हीसुध्दा होऊ शकता जून महिन्याचे ‘अस्सल पार्लेकर’. विजेत्याचे नाव पुढील अंकात जाहीर केले जाईल.

1. कुठल्या नंबरची बस पार्ल्यात प्रथम सुरू झाली?

अ. 322, ब. 339, क. ए1, ड. 321, इ. टी1/टी2

‘चिमणा राम’ कुठल्या रस्त्यावर आहे?

अ. प्रार्थना समाज रोड, ब. सुभाष रोड, क. दयालदास रोड, ड. मकरंद घाणेकर रोड

3. डहाणूकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले केंद्रिय मंत्री कोण?

अ. राम नाईक, ब. मनोहर जोशी, क. मधु दंडवते, ड. सुरेश प्रभु

4. वैजयंतीमाला-राज कपूर यांच्या भूमिका  असलेल्या नजराना सिनेमातील काही दृश्यांचे चित्रीकरण पार्ल्यातील कोणत्या  बंगल्यात झाले होते?

5. ‘नमस्काराचार्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्लेकर शिक्षकांचे नाव काय?

अ. फणसळकर मास्तर, ब. नाईक मास्तर, क. भिडे मास्तर, ड. सोमण मास्तर

6. पहिल्या पार्लेभूषण पुरस्काराचा मान कोणाला देण्यात आला?

अ. मंगलाताई भागवत, ब. माधवराव गडकरी, क. कॅ.विनायक गोरे, ड. मामासाहेब कुलकर्णी

7. पार्ल्यातील कुठल्या वास्तुचे उद्धाटन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते?

8. खाद्यपदार्थ मिळण्याची ठिकाणे आणि तिथले लोकप्रिय पदार्थ यांच्या जोडया जुळवा

अ. वडा सांबार      1. पणशीकर

ब. पावभाजी           2. शॅक

क. आंबा बर्फी           3. रामकृष्ण हॉटेल

ड. पियुष             4. विजय स्टोअर्स

इ. सिझलर्स            5. फडके उद्योग मंदिर

9. पु ल देशपांडे यांचे खालीलपैकी कुठले नाटक रुपांतरीत नाही?

अ. भाग्यवान, ब. सुंदर मी होणार, क. तुझे आहे तुजपाशी, ड. अंमलदार

10. पार्ले बिस्किट फॅक्टरीने बाजारात आणलेले पहिले शीतपेय कोणते?

अ. थम्स अप, ब. लिम्का, क. गोल्ड स्पॉट, ड. पेप्सी

टिळक मंदिराच्या गणेशोत्सवात ‘पळा पळा कोण पुढे पळेतो’

यंदाच्या गणेशोत्सवात शनि.दि.22 सप्टेंबर रोजी टिळक मंदिरात युवा शाखेतर्फे ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ हे दोन अंकी धमाल विनोदी नाटक सादर करण्यात आले. पु.ल.देशपांडे सभागृहाचा वापर दोन अंकी नाटकासाठी करण्याची वेळ फारच क्वचित आली असावी. नाटकासाठी स्टेज सुमारे 4 फुटांनी वाढवून ते 21 फूट बाय 30 फूट करण्यात आले. व्यावसायिक नाटकाच्या धर्तीवर नरेंद्र आंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सेट उभारण्यात आला.

ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत मेहेंदळे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. आलोक हर्डीकर, उन्मेष पटवर्धन, हेमंत शिदोरे, पुष्कर पत्की, प्रकाश भाटवडेकर, प्रदीप प्रधान, रेखा चिटणीस, चित्रा वाघ, मृदुला दातार या कलाकारांनी त्यांना उत्तम साथ दिली. विश्वास मेहेंदळे यांनी पार्श्वसंगीताची, शाम चव्हाण यांनी प्रकाशयोजनेची तर राजन वर्दम यांनी रंगभुषेची जबाबदारी सांभाळली. सुचेता केळकर व ऋषिकेश पाटणकर या युवा शाखेच्या कार्यकर्त्यांनी बॅकस्टेजची अनेक लहानमोठी कामे पार पाडली.

सत्तरच्या दशकात अतिशय गाजलेल्या ह्या फार्सच्या पुनर्निर्मितीला पार्लेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

मेलबॉक्स

शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्टया संपन्न अशा पार्ल्याचा आपल्या सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. मात्र गर्दी, वाहतुकीची कोंडी, खराब फुटपाथ, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव अशा अनेक समस्यांना पार्लेकरांना सदैव तोंड द्यावे लागते. पार्ल्यातील ज्या भागात तुम्ही राहता तेथे अशा काही समस्या असतील किंवा तुम्हाला त्यावर काही उपाय सुचत असतील तर 100 शब्दांत लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्या समस्या/मते/उपाय पालिका प्रशासनाकडे सुपूर्द करून योग्य कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करू. आपलं पार्लं अधिक स्वच्छ, सुंदर होण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्नशील होऊया !

‘आम्ही पार्लेकर’च्या या आवाहनाला वाचकांनी दिलेला हा प्रतिसाद –

  • सर्वशिक्षा अभियान राबवताना रात्रशाळांची मात्र उपेक्षा

1952 साली जनता शिक्षण मंडळ स्थापन होऊन त्यांच्यातर्फे ‘जनता नाईट हायस्कूल’ ही शाळा सुरू करण्यात आली. महात्मा गांधी मार्गावर म्युनिसिपल प्राथमिक शाळेच्या इमारतीत ही शाळा सायं 6.45  ते 9.30  या वेळेत भरत असे. दहा वर्षांपूर्वी शाळेला भरावयाचे भाडे तुंबल्यामुळे म्युनिसिपालिटीने रात्र शाळेचे हे वर्ग सुरू ठेवण्यास नकार दिला त्यामुळे अडचण निर्माण झाली. त्यावेळी श्रीमती माई बोरकरांनी मायेचा हात देऊन महापालिकेच्या भाडयापोटी एक लाख भरून रात्रशाळा पूर्ववत सुरू केली. शिवाय ‘महिला सल्ला केंद्राने’ यासाठी कार्यकारिणी बनवून अधिकृतपणे जनता शिक्षण मंडळाचे कामकाज सुरू केले. शाळेला क्रमिक पुस्तके, विज्ञान साहित्य, नकाशे, वह्या व पूरक पुस्तिका पुरवून आर्थिक पाठबळही दिले. गेल्या सात आठ वर्षांपासून बाहेरील तज्ञ शिक्षकांची मदत घेण्यास सुरुवात झाली. दिवसभर कोठेतरी राबणारी श्रमजीवी मुले अर्धपोटी शाळेत येतात. या मुलांसाठी पूरक खाणे पुरवण्यासाठी महिला सल्ला केंद्राने 96,000 रुपयांची मदत गोळा केली. हळुहळू शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. काही निवृत्त शिक्षिकांनी इंग्रजी व गणित विषयांसाठी आपल्या घरी वर्ग सुरू केले.

या रात्रशाळेचे हे हीरक महोत्सवी वर्ष. आनंदाची बाब म्हणजे या वर्षी दहावीला बसलेल्या 11 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर एका विद्यार्थिनीने 61% गुण मिळवले.

सध्या सर्वच मराठी माध्यमांच्या शाळांना विद्यार्थ्यांची कमतरता, आर्थिक विवंचना भासत आहे. बोलूनचालून ही रात्रशाळा. दरवर्षी तुकडया कमी कराव्या लागत आहेत. आठवी ते दहावीच्या तीन वर्गात 55 ते 60 च मुले-मुली आहेत. महापालिकेची महात्मा गांधी मार्गावरील प्राथमिक शाळा बंद होऊन तेथील मुले दीक्षित रोडवरील प्राथमिक शाळेत सामावण्यात आली. हा बदल फार जाचक ठरत आहे. फक्त तीन वर्गच रात्रशाळेसाठी दिले आहेत. कार्यालय,शिक्षक कक्ष व कपाटे ठेवण्यास तर जागाच देत नाहीत. शिवाय या तीन खोल्यांचे मासिक भाडेही शिक्षक आपल्या पगारातूनच भरतात. सर्वशिक्षा अभियान चालवणाऱ्या देशातील प्रगत महापालिकेला हे भूषणास्पद आहे का?

-आशा गांधी

  • शेअर रिक्षा आहेत तरी कुठे?

जूनच्या ‘आम्ही पार्लेकर’च्या अंकात शेअर रिक्षाची बातमी वाचली आणि हायसे वाटले. माझे वय 64 वर्षेतर माझ्या यजमानांचे 70. आम्ही राहतो कोलडोंगरीला. भाजी, खरेदी, लायब्ररी, काही कार्यक्रम, सिनेमे, नाटकं या निमित्ताने वरचेवर पार्ल्यात येणे होते. आम्हा दोघांनाही गुडघेदुखीमुळे चालायला त्रास होतो. पावसाळयात तर अक्षरश: हाल होतात. पार्ल्याहून रिक्षा मिळणे म्हणजे इतके कठीण की 10-12  रिक्षावाल्यांना विचारल्यावर एखादा तयार होतो आणि उपकार केल्यासारखा गरवारे चौकापर्यंत आणून सोडतो.

आता मात्र हा त्रास बंद होणार असे वाटले. अमुक तमुकच्या प्रयत्नाने शेअर रिक्षा सुरू झाल्या असे फलकही दिसू लागले. पण दुर्दैवाने परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. स्टेशनसमोरचे रिक्षावाले कोलडोंगरी म्हटलं की नेहमीप्रमाणे ट्रॅफिकचं कारण सांगून यायचं टाळतात. शेअर रिक्षाबद्दल विचारलं तर ‘हमको कुछ मालूम नहीं’ असं उत्तर मिळतं. या त्रासातून आम्हा ज्येष्ठ नागरिकांची सुटका कशी आणि कधी होणार?

– सौ.सरला वाटवे, अंधेरी.

  • महात्मा गांधी रोडवर फ्लायओव्हर ?

पार्ल्यात चांगली भाजी आणि खाद्यपदार्थ (स्नॅक्स) मिळतात म्हणून जुहू, अंधेरी, पवई आणि गोरेगावपासूनचे लोक पार्ल्यात खरेदीसाठी येतात. पण पार्लेकरांना मात्र त्याचा अनेकदा त्रास होतो. कारण ही मंडळी पार्ल्यातील गर्दी आणि मुख्य म्हणजे ट्रॅफीक जॅमला कारणीभूत होतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी रोड वरील चॅम्पीअन आणि जवाहर बुकडेपो समोरील परिसर. आधिच लहान रस्ता, त्यात फेरीवाले, त्यातच वाट्टेल तशा पार्क केलल्या भल्या मोठ्या गाडया, शाळा सुटायचीही तीच वेळ ! या सगळयामुळे संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत इथे इतकी प्रचंड गर्दी उसळते की गाडी चालवणे किंवा साधे चालणे ही जवळजवळ अशक्य होते. आता, बाहेरच्या लोकांना इथे यायला मज्जाव करता येणार नाही हे मान्य पण गर्दीचे, ट्रॅफीकचे काहीतरी नियोजन करायला हवे की नाही? माझ्या मते, संध्याकाळच्या वेळेत महात्मा गांधी रोड वर ‘नो पार्कींग’ करावे. जेणेकरुन वाहतूक सुरळीत राहील आणि चालणेही शक्य होईल. नाहीतर थोडयाच दिवसात तिथे एक फ्लाय ओव्हर बांधायची वेळ येईल !

– सौ.रजनी पाटील

  • पार्ल्यातला कुत्र्यांचा त्रास कधी कमी होणार ?

गेली अनेक वर्षे पार्ल्यात कुत्र्यांचा भयंकर उपद्रव सुरु आहे पण त्याबद्दल कुणीच काही करत नाही. रात्री तर पार्ल्यातील रस्त्यांवर त्यांचेच साम्राज्य असते त्यामुळे रस्त्यावर फिरणेदेखील कठीण झाले आहे. मध्यंतरी ह्याच भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलीवर हल्ला करून तिला जखमी केले होते तरीसुध्दा महापालिकेला जाग का येत नाही? आमचे नगरसेवक / नगरसेविका सुध्दा ह्या बाबतीत काहीच करत नाहीत. मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये हे ठीक आहे पण हेच मुके प्राणी आपल्या शरीराचा मुका (चावा) घ्यायला लागले तर काय करायचे? पूर्वी महापालिकेच्या गाडया अशा श्वानांना पकडून नेत असत पण आता मेनका गांधींच्या कृपेने तेही बंद झाले आहे. पार्ल्यातील काही अतिउत्साही श्वानामित्रांना तर त्यांच्या पोटात घास गेल्याशिवाय स्वतःचे अन्न गोड लागत नाही. अशा परिस्थितीत सामान्य माणसाने काय करायचे ? उद्या कोणाचा संयम सुटला व त्याने ह्या श्वानांचे काही बरे वाईट केले तर त्याची जबाबदारी कोणाची ?

 – श्री. पुरुषोत्तम म्हात्रे