विलेपार्ले – शून्य कचरा परिसर कधी होणार?

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकांच्यावेळी “आम्ही पार्लेकर’ ने “पार्लेकरांचा जाहीरनामा’ प्रसिद्ध करून सर्वच पक्षांसमोर पार्लेकर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्या आणि त्यावरील संभाव्य उपाययोजना, सूचना यांची यादी भावी लोकप्रतिनिधींपुढे मांडली होती. यातील समस्यांवर गेले आठ महिने आपण विशेष लेखांच्या माध्यमातून विस्तृतपणे चर्चा करत आहोत. त्यावरील उपाययोजनाही सुचवत आहोत. मात्र या समस्या दूर करणे केवळ शासन, पक्ष कार्यकर्ते, पोलीस यंत्रणा यांच्याच हातात नाही तर यामध्ये मोठा सहभाग पार्लेकर नागरिकांचा असण्याची फार गरज आहे. जानेवारीच्या पहिल्याच लेखात आपण पार्ल्यातील घनकचरा व्यवस्थापनावर चर्चा केली होती, त्यात सोसायटी अथवा प्रत्येक इमारतीतील कचरा व्यवस्थापन कसे करायला हवे यावरही माहिती दिली तसेच वैयक्तिक स्तरावर घरगुती पद्धतीने कचर्‍याची विल्हेवाट लावणे कसे शक्य आहे हेही सांगितले पण त्यातून कितीजणांनी स्फूर्ती घेतली?

नुकतेच १८ जुलैला लोकमान्य सेवा संघात नागरी दक्षता समितीतर्फे “घनकचर्‍यापासून शून्य कचर्‍याकडे’ हे सेमिनार घेण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन या विषयावर स्वयंस्फूर्तीने कार्य करणार्‍या तसेच निर्माल्य, भाजीपाला यापासून मोठ्या प्रमाणावर खतनिर्मितीचा प्रकल्प राबवणार्‍या प्रतिभा बेलवलकर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. त्याला महानगरपालिकेचे अधिकारी पिंपळे, पार्ल्याचे सर्व लोकप्रतिनिधी तसेच अनेक नागरिक उपस्थित होते. यात “देवांगिनी’ सोसायटीतील कार्यकर्ते मंडळींनी कचर्‍याचे व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केलेच पण विजयनगर सोसायटीतील लहान मुलांनी याच विषयावरील पथनाट्यही सादर केले.

विजयनगर सोसायटीत कचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प जानेवारी महिन्यापासून कसा यशस्वीपणे राबवला जात आहे याची माहिती “विजयनगरच्या टीमने दिली. “देवांगिनीनंतर या विषयावर गांभीर्याने काम करणारी ही बहुधा एकमेव सोसायटी.

विजयनगर सोसायटीचा शून्य कचरा प्रकल्प

पूर्वी विजयनगरच्या दारात दोन कचराकुंड्या होत्या त्यामुळे सोसायटीत प्रवेश करतानाच त्याच्या दुर्गंधीने लोक हैराण होत. विजयनगरचा पूर्ण विकास झाल्यापासून ह्या कचराकुंड्या हलवाव्यात असे सर्वांनाच वाटत होते. त्यासाठी काही मेंबर्सनी महानगरपालिकेच्या अधिकार्‍याची भेट घेतली असता त्यांनी मुळातच घनकचर्‍याचे व्यवस्थापन करणे किती गरजेचे आहे ते सांगितले. कचराकुंड्या नुसत्या हलवण्यापेक्षा मुळात कचराच संपवून टाकला तर हा प्रश्न उभा राहणार नाही हे लक्षात आले. त्यानंतर येथील मंडळींनी त्या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात केली. कचर्‍याचे वर्गीकरण कसे करायचे व त्यानंतर त्यावर प्रक्रिया कशी करायची यासाठी “देवांगिनी’ च्या कार्यकर्त्यांशी तसेच घरगुती कचरा व्यवस्थापन करणार्‍याशीही बोलणी केलीच. पद्मश्री डॉ. शरद काळे तसेच “स्त्रीमुक्ती’ संघटनेच्या रश्मी जोशी यांना बोलावून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. रश्मी जोशी यांच्या मदतीने रोजच्या व मासिक कचर्‍याचा अंदाज घेतला. त्यासाठी साधारणपणे खर्च किती येईल? त्यासाठी किती जागा लागेल याचा अंदाज घेऊन सर्व कामाला लागले. सोसायटीतील ५० जणांनी कार्यकर्ता म्हणून काम करायचे कबूल केले व ते आजही कार्यरत आहेत.

लोकांच्यात जागृती यावी म्हणून घरोघरी जाऊन या गटाने प्रत्येकाला सुका व ओला कचरा वेगळा करण्याच्या पद्धती समजावल्या. सुकृता पेठे लिखित व दिग्दर्शित लहान मुलांचे पथनाट्य बनवून त्याचे सोसायटीत प्रयोग केले. प्रत्येकाला सुका कचरा टाकण्यासाठी हिरव्या रंगाचा डस्टबीन दिला व त्यावर त्या फ्लॅट क्रमांकाचे स्टिकर्सही लावले ज्यामुळे कोणाकडून कचरा वर्गीकरण होऊन येत नाही हे सहज कळते. ओल्या व सुक्या कचर्‍याचे चित्रांसकट चार्ट बनवून ते घरोघरी वाटले व ते सगळ्यांच्या दृष्टीक्षेपात येतील असे लावण्यास सांगितले. यामुळे लोकांच्या मनातील गोंधळ कमी झाला. या सगळ्यात दोन महिने गेले. त्याचवेळी रश्मी जोशींनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे आपल्याला किती कचरा-हौद लागतील याचा अंदाज घेऊन ४४२  फुटाचे १२ हौद बांधून घेतले. त्यातील अधिकचे पाणी निघून जाण्यासाठी भोके पाडून घेतली त्याचप्रमाणे ते साचून काही दुर्गंधी राहू नये म्हणून पन्हळ करून त्याला वाट करून दिली. जवळच पाण्याचे कनेक्शन घेतले, ज्यामुळे  स्वच्छता राखणे सोपे जाईल. या कामासाठी सोसायटीने आता स्त्रीमुक्ती संघटनेकडील तीन महिला कर्मचारी मासिक वेतनावर नेमल्या आहेत. ओल्या कचर्‍याची तपासणी करणे, त्यात सेग्रीगेशन पावडर मिसळणे, कचर्‍याचा ओलावा प्रमाणित ठेवणे, रोज तो हलवला जाणे तसेच कचर्‍यापासून खत बनल्यावर ते गच्चीत वाळवणे ही सर्व कामे त्या करतात व विजयनगरची कार्यकर्ते मंडळी यावर लक्ष ठेवतात. त्यांना हातमोजे, गमबुट, सोल्युशन, मॅजिक पावडर आदि आवश्यक वस्तू सोसायटी पुरवते. खताची पहिली प्रक्रिया पूर्ण होण्यास तीन महिने लागले मात्र पुढचे प्रत्येक खत एक महिन्यात आता तयार होते आहे. हे सर्व करताना काही अंदाज चुकले, प्रक्रियेत चुका झाल्या पण त्या समजून घेत, बदल करत, दुरुस्ती करत ही मंडळी पुढे गेली. आता हा प्रकल्प व्यवस्थित चालू आहे. त्यांच्या खताला ठउऋ चे प्रमाणपत्रही मिळाले आहे. “वसुंधरा हरित सेंद्रिय खत’ या नावाने आज दर महिना सरासरी ४००/४५० किलो खत बनते. “वसुंधरा हरित सेंद्रिय खत’ विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच सोसायटीत निर्माण होणारा सुका कचरा “आकार’ संस्थेची माणसे घेऊन जातात.

ओल्या कचर्‍याच्या डस्टबीनमध्ये घालण्यासाठी “युथ एक्स्प्रेशन’ या संस्थेतील मुले कागदी पिशव्या त्यांना आणून देतात ज्या अंध मुलांनी बनवल्या आहेत. आता आणखी पुढचे पाऊल टाकायच्या विचारातून विजयनगरचे कार्यकर्ते “क्रशर’ आणू इच्छित आहेत ज्यामुळे ओल्या कचर्‍यावरील प्रक्रिया कमी वेळात होईल. डायपर्स व सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीनेही त्यांची खटपट चालू आहे.

“स्वच्छ- सुंदर- सांस्कृतिक- आधुनिक विजयनगर’ या तत्वाने प्रेरित होऊन ही मंडळी एका वाटेवर निघाली आहेत. त्यातील स्वच्छ विजयनगर म्हणजे आमचा कचरा दुसर्‍याच्या दारात असे होऊ नये म्हणून ती आटापिटा करत आहेत. या सार्‍याना “आम्ही पार्लेकर’ कडून मनःपूर्वक शुभेच्छा व इतरांनीही त्यांचे अनुकरण करावे ही विनंती.

ही सोसायटी मोठी आहे, त्यांच्याकडे जागा जास्त आहे म्हणून त्यांना कचर्‍याचे व्यवस्थापन करणे जमते असा दावा अनेकजण करतील पण तसे नसून प्रत्येक छोट्या सोसायटीसही हे करणे सहज शक्य आहे. अथवा एकाच विभागातील ८/१० इमारतींनी एकत्र येऊनही हे करणे शक्य आहे. अशी उदाहरणे पुण्यात आहेत. अशा प्रकल्पासाठी लागणारे मार्गदर्शन द्यायलाही विजयनगरमधील कार्यकर्त्यांची तयारी आहे. जानेवारीच्या याच विषयावरील लेखात घरच्याघरी कचर्‍याचे व्यवस्थापन करण्यासाठी अनिरुद्ध देशपांडे यांनी मार्गदर्शन केले होते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यानंतर १५/२० जणांनी फोन करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. आज ते सर्वजण यशस्वीपणे वैयक्तिक पातळीवर हा प्रकल्प राबवीत आहेत. याच लेखात प्रतिभा बेलवलकर यांनी कचर्‍यापासून खतनिर्मितीसंबंधी माहिती दिली होती. ही प्रक्रीया लवकर होण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या ऑरगॅनिक बॅक्टेरीया कल्चर पावडरचीदेखील अनेकांनी बेलवलकर यांच्याकडे मागणी केली. अशा प्रकारे अनेकांनी वैयक्तिक पातळीवर कचर्‍याचे व्यवस्थापन सुरू केले आहे. मात्र अजूनही ही जागरूकता अल्प प्रमाणातच आहे असे म्हणावे लागेल कारण अजूनही सोसायटीच्या पातळीवर सामुदायिक प्रयत्न होताना दिसत नाहीत तसेच वैयक्तिक प्रकल्पांची संख्याही फारच थोडी आहे. विजयनगर प्रमाणेच आपल्या सर्वांनी आपापल्या इमारतींमध्ये कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. “विलेपार्ले- शून्य कचरा परिसर’ हे स्वप्न प्रत्यक्षात आलेले पाहायचे आहे.

मार्गदर्शनासाठी संपर्क: वर्षा बापट- ९८२१६९६०९८, सुकृता पेठे- ९८९२३३९४००, महेश आठल्ये- ९९६७३६३१७६

रोजच्यारोज टनावारी कचरा आपल्या घरातून सरळ डंपिंग ग्राऊंडकडे जातोय. हवा, जमीन, पाणी दुषीत करतोय. पर्यावरणाचे संतुलन बिघडवतोय आणि आपण त्याविषयी फक्त चर्चा करायच्या, लेख वाचायचे हे कितपत योग्य आहे? पूर्वी कचरा गोळा करणार्‍या महिला कचरा कुंड्यांजवळ बसून त्यातील कागद, प्लास्टिक गोळा करत. त्यामुळे परिसर बकाल आणि दुर्गंधीपूर्ण होत असे हे जरी खरे असले तरी कचर्‍याचे प्राथमिक वर्गीकरण काही प्रमाणात होत असे. नंतर स्वच्छतेच्या दिशेने पुढचे पाऊल म्हणून सर्व सार्वजनिक कचरा कुंड्या हटवण्यात आल्या. अर्थात रस्ते मोकळे झाले, परिसर नीटनेटका दिसू लागला. पण घरातल्या डस्टबीनमध्ये जमा होणार्‍या प्लास्टिकच्या पिशव्या, कंटेनर्स, रॅपर्स, खोके, बाटल्या, कागद यांचं काय? या सर्व गोष्टी आता सरळ डंपिंग ग्राऊंडवर जमा होत आहेत. कचर्‍याच्या गाड्यांवरील कर्मचारी एका ठिकाणापासून पुढच्या ठिकाणी जाईपर्यंत मिळत असलेल्या एखाद दुसर्‍या मिनिटाच्या अवधीत काही मोठ्या बाटल्या, कॅन्स अशा ठोकळ गोष्टी वेगळ्या करतात. पुढचा स्टॉप आला की त्यावर नवीन कचर्‍याचा ढीग ओतला जातो. 

घरगुती कचरा आणि पालिकेची कचरा गोळा करणारी गाडी यांच्यातली कचरावेचकांची मधली फळी नाहिशी झाल्याने समस्या दृष्टीआड झाल्यासारखी वाटली तरी अधिक उग्र झाली आहे. या दुष्टचक्रातून बाहेर यायचा पहिला मार्ग म्हणजे आपल्या घरच्या कचर्‍याचे वैयक्तिक पातळीवर केले जाणारे व्यवस्थापन आणि शेवटचा मार्ग म्हणजे सोसायटीच्या पातळीवर केले जाणारे व्यवस्थापन.

होर्डिंगमुक्त पार्ले?

होर्डिंगमुक्त पार्ले?

ऑगस्ट महिना उजाडला की आपल्याला वेध लागतात ते सणांचे, उत्सवांचे. कारण रक्षाबंधन, नागपंचमी या घरगुती सणांबरोबरच येतात, दहीहंडी, गणपती आणि नवरात्रासारखे सार्वजनिक उत्सव. त्यातही गणपती आणि नवरात्र म्हणजे दहा दहा दिवसांचे उत्सव. यात वेगवेगळे भरगच्च कार्यक्रम, स्पर्धा आदींचे आयोजन होते. त्याची माहिती तसेच या उत्सवाच्या वातावरणात जमणाऱ्या गर्दीचा जाहिरातबाजीसाठी उपयोग करून घेणारे व्यावसायिक, राजकीय पक्ष आणि नागरिकांना सूचना करणाऱ्या पोलीस व सरकारी यंत्रणा या साऱ्यांचेच होर्डींग्ज जागोजागी झळकू लागतात. आता गल्ल्यांच्या तोंडाशी तात्पुरती प्रवेशद्वारे उभी करून त्यावर ही होर्डींग्ज लावली जातात.

या उत्सव काळात लोकांपर्यंत पोहोचण्याचा मंडळांचा, राजकारण्यांचा आणि व्यावसायिकांचा प्रयत्न अगदीच चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. प्रश्न येतो तो अतिरेकाचा. अनेकदा या होर्डींग्जचा इतका अतिरेक होतो की आजूबाजूच्या इमारती, बागा, मैदाने या सर्वांखाली अक्षरश: झाकली जातात. उत्साहाने ही होर्डींग्ज लावणारी मंडळे, उत्सव संपल्यावर ती काढायची मात्र सोईस्करपणे विसरून जातात. मग फाटकीतुटकी लोंबणारी होर्डींग्ज सर्व परिसराला विद्रूप करून टाकतात. हा झाला उत्सवांच्या वेळचा भाग. पण इतरवेळीही कुणाची जयंती, मृत्यु, वाढदिवस, अभिनंदन, १०वी- १२वी च्या विदयार्थ्यांना शुभेच्छा आदी फुटकळ कारणांसाठीही होर्डींग्ज लावून स्वतःची जाहिरात करण्याची मधूनमधून टूम निघते.

खरंतर महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांनी होर्डिंग्जविरुद्ध दमदार पावले उचलली आहेत. आता महानगरपालिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणीही होर्डींग्ज लावू शकत नाही. ती परवानगी होर्डींग्ज बरोबरच लावली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे ती किती काळासाठी दिली गेली आहे याची माहिती कोणाही नागरिकास होऊ शकते. शिवाय परवानगी देतानाच महानगरपालिका अनामत रक्कमही घेते. ज्यामुळे निर्धारीत वेळेत ही होर्डींग्ज न उतरवल्यास अथवा नियमभंग केल्यास होर्डींग्ज उतरवायचा खर्च अथवा नियमभंगाचा दंड यातून वसूल करता येतो. या कायद्याची अंमलबजावणी मुंबईत तरी बऱ्याच प्रमाणात समाधानकारकरीत्या होते आहे. त्यामुळे गेलं वर्षभर तरी हा होर्डींग्जचा त्रास बराच कमी झाला आहे. शिवाय महानगरपालिकेची गाडी यासाठी सतत वेगवेगळ्या परिसरात फिरत असते व कारवाई करत असते. असे असले तरी या कामासाठी आपल्या के पूर्व वॉर्ड ऑफिसमध्ये अवघी ४/५ माणसे आहेत व त्यांच्याकडे मिलन सबवेपासून जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड व इकडे मिठी नदीपर्यंतचा परिसर आहे. त्यामुळे त्यांचे प्रयत्न अनेकदा कमी पडतात. संस्थांच्या अथवा वैयक्तिक होर्डींग्जवर लगेच कारवाई होते पण राजकीय होर्डींग्जवर कारवाई करायला गेल्यावर २५/५० कार्यकर्ते येऊन विरोधात उभे ठाकतात. अशावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पोलीस बंदोबस्त घेऊनच होर्डींग्ज उतरावी लागतात. पण पोलीस अनेक कार्यात व्यस्त असल्याने (आपला परिसर विमानतळानजीक असल्याने व्हिआयपींसाठी कार्यव्यस्तता जास्त असते) कारवाईमध्ये दिरंगाई होते.

१. प्रवेशद्वारांसाठी रस्ते खोदणे

उत्सवाच्या उंच प्रवेशद्वारांसाठी व रस्त्यावरील विद्युत रोषणाईसाठी बांबू पुरायला रस्ते खणले जातात. उत्सव संपल्यावर प्रवेशद्वारे व बांबू काढून टाकल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करून देणे ही खोदणाऱ्यांची जबाबदारी असते पण ती नेहमीच सोईस्कररीत्या विसरली जाते. महानगरपालिका त्यासाठी ही अनामत रक्कम घेते पण त्यांच्याकडून रस्तेदुरुस्ती सरकारी गतीनेच होते व या खड्यांचा त्रास जनसामान्यांनाच होतो. एरवी खड्डे प्रश्नावर हमरीतुमरीवर येणारे विरोधी पक्षही स्वतःच्या कार्यकर्त्यांनी खणलेले खड्डे परत बुजवण्याची तसदी घेत नाहीत. नागरिकांनीच एकत्र येऊन निर्माण झालेली मंडळे आणि नागरिकांचे हितचिंतक म्हणवणारे यासंबंधी थोडीशी जागरूकता दाखवतील का? आपल्या परिसरातील अशा गोष्टींचा त्रास होणाऱ्या नागरिकांनीही असे नियमभंग महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या साईटवर तक्रार केल्यास ताबडतोब कारवाई होऊ शकते.

२. होर्डिंग्ज वेळेवर उतरवणे गरजेचे

होर्डींग्ज लावणे हे सर्वथा गैर आहे असे नाही. चांगल्या कामांची, कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी ठराविक ठिकाणी होर्डींग्ज जरूर लावावी. पण त्याची कालमर्यादा, आकारमान व आवश्यकता ओळखून लावावी. त्याचप्रमाणे नियमानुसार पुन्हा काढून टाकण्याचीही जबाबदारी सामाजिक संस्थांनी किंवा सांस्कृतिक मंडळांनी घ्यावी.

३. रस्ते खणताना माहितीफलक आवश्यक

बहुतेक राजकीय पक्षांचे सूचना फलक किंवा फळे वेगवेगळ्या रस्त्यांवर कायमचे असतातच. लहानसहान गोष्टी त्यावर खडूने लिहूनही ते काम चालवू शकतात. केलेल्या कामांची माहिती देण्यासाठीही सर्व नगरसेवक, आमदार, खासदार होर्डींग्जस लावतात ते काही प्रमाणात योग्यही आहे पण ते ठराविक काळाने उतरवायची दक्षता घेणे जरुरीचे आहे.

काही फलक जे लावले जाण्याची आवश्यकता आहे व ते नियमानुसारही लावलेच पाहिजेत असा कायदा आहे ते फलक मात्र कोणी लावताना दिसत नाही. हे फलक कुठले हे आपल्याला माहित आहे का? जेव्हा विजमंडळे, गॅस पाईप, पाण्याच्या पाईपलाईन, गटारे तसंच रस्ता अथवा फुटपाथ दुरुस्ती आदि कारणांसाठी रस्ते खणले जातात, वाहतूक बंद ठेवली जाते अशावेळी काम करणाऱ्या कंत्राटदाराने तशी पूर्वसूचना लावणे त्याला नियमानुसार बंधनकारक आहे. ते काम किती काळात पूर्ण होईल, पर्यायी वाहतूक कुठल्या मार्गाने होईल हेही नमूद करणे गरजेचे आहे.

पण हे फलक कधी कुठे लागल्याचे तुम्हाला स्मरते? त्यामुळे होणारी गैरसोय, कालपव्यय आपण सोसतो. पण त्याविरुद्ध आवाज उठवण्याबद्दल आपण विचारही करत नाही. या फलकांची नागरिकांना जास्त गरज आहे याकडे केवळ नेते मंडळींनीच नाही तर नागरिकांनीही लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे. एरवी आपापल्या पक्षाच्या होर्डींग्जवरून हातघाईवर येणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांनी जर हे फलक लावले जाण्याकडे लक्ष दिले तर त्यांच्या नेत्यांना जाहिरातींचे फलक लावायलाही लागणार नाहीत. प्रश्न तसा छोटासाच आहे पण प्रत्येकाने थोडीशी शिस्त पाळली तर सहज सुटणाराही आहे. आपले पार्ले सुंदर व नीटनेटके दिसायला याची नक्कीच गरज आहे.

“होर्डींग्ज लावणे मला व पराग अळवणी (आमदार) यांना मुळातच पटत नाही. आम्ही केलेल्या कामाचे फलक लावायला आमचा विरोधच असतो. कधीकधी कार्यकर्ते उत्साहाने अशा गोष्टी करतात तेव्हा, तसेच पार्ले महोत्सवाच्या वेळी लावलेले होर्डींग्ज वेळेत उतरवण्यासाठी आम्ही कायम दक्ष असतो. पार्ले महोत्सवाचे होर्डींग्जही आम्ही ठराविक जागांवर मुख्यतः बसस्टॉपवर लावतो. तेही पूर्ण परवानगी घेऊनच. काही वेळेस कोणी ज्येष्ठ नेते येणार असतील तर त्यांच्या स्वागताचे होर्डींग्ज लागतात पण ते भाजपाच्या जिल्हा कार्यालयातून लागतात. तरीही वेळेवर ते उतरवायची दक्षता आम्ही घेतो.” – ज्योती अळवणी (नगरसेविका, वॉर्ड क्र. ८०)

“होर्डींग्जवर बंदी हा आमच्या महानगरपालिकेचा नियमच आहे. त्यामुळे आम्ही तो पाळतो. अशा पद्धतीने परिसर विद्रुप होणे चूकच आहे. उत्सव काळात या गोष्टी जास्त होतात मात्र नियमानुसार ती वेळेत काढणे गरजेचेच आहे हे मंडळांनी व कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.” – शुभदा पाटकर, (नगरसेविका, वॉर्ड क्र. ७९)

आपले पार्ले आहे सुरक्षित; तरी सतर्क राहण्याची गरज

वर्तमानपत्रे आणि बातम्यांचे चॅनल्स, कधीही बघायला गेलं तरी हल्ली त्यात मोठ्या प्रमाणात दिसतात त्या भ्रष्टाचाराच्या बातम्या आणि त्या खालोखाल, दरोडे, बलात्कार, चोरी, खून आदी गुन्ह्यांच्या आणि अपघाताच्या बातम्या. त्यालाच संलग्न म्हणजे वेगवेगळ्या धार्मिक आणि जातीय तणावांच्या बातम्या. या सर्व बातम्या ऐकताना, बघताना सामान्य माणसाला स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षेबद्दल काळजी न वाटली तरच नवल. राष्ट्रीय, राज्यीय आणि मुंबई व आसपासच्या प्रदेशांतील सुरक्षा विषयक पार्श्वभूमीवर विलेपार्ल्याचा विचार करता आपले उपनगर खुपच सुरक्षित वाटते. पार्लेकरांबरोबरच, पोलिस यंत्रणा व सामाजिक संस्था यांच्याशी या विषयावर चर्चा करतानाही हेच सत्य सामोरे आले.

मुळात पार्ल्यात सुशिक्षित वर्ग ८०% आहे. त्यांची सांपत्तिक स्थितीही चांगली आहे. २०% समाज हा निम्न अथवा कनिष्ठ आर्थिक गटात मोडणारा व अल्प शिक्षित असला तरी तो मुख्यत्वे याच ८०% समाजाशी पिढ्यानपिढ्या जोडलेला आहे. त्यांच्याही मुलांचे शिक्षण पार्ल्यातील मान्यवर शिक्षणसंस्थांत आजवर झाले आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या मानाने येथील कनिष्ठ आर्थिक वर्गदेखील जास्त संस्कारी, विचारी आणि सजग आहे हे जाणवते.

जवाहर बुक डेपोजवळ झालेला बॉम्बस्फोट अथवा क्वचित ठिकाणी झालेले खून ह्या पार्ल्यात वर्षानुवर्षात क्वचितच घडणार्‍या घटना. त्यामुळे पार्ल्यातील गुन्हे या सदरात मोडतात त्या अधूनमधून होणार्‍या घरफोड्या व मुख्यत्वे चेन, मंगळसूत्र यांच्या चोर्‍या. याविषयी अधिक माहितीसाठी विलेपार्ले पोलिस स्टेशनच्या मुख्य पोलिस अधिक्षक रक्षा महाराव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हे गुन्हेही आटोक्यात आल्याची माहिती दिली. घरफोड्या आटोक्यात रहाण्याच्या दृष्टीने काही उपाययोजनाही सुचवल्या. सोनसाखळी चोरांची ४-५ जणांची टोळी नुकतीच पकडून त्या सर्वांना गजाआड केल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे २५/२६ तक्रारदारांना त्यांच्या चिजवस्तूही परत मिळाल्या. पोलिसांतर्फे पार्ल्यातील जास्त रहदारीच्या रस्त्यांवर किंवा लहान गल्ल्यांच्या कोपर्‍यांवर बाहेरून मदत फोर्स मागवून दोन दोनच्या गटाने पोलिस व महिला पोलिसही तैनात केलेले आहेत. ते आपल्या सर्वांनाच पार्ल्यात गस्त घालताना दिसतात. त्यामुळे चेन खेचण्याचे प्रकार आटोक्यात असले तरी अजूनही अनेक महिला व काही पुरूषदेखील दागिन्यांचं अवास्तव प्रदर्शन करत फिरत असतात. मॉर्निंग वॉकला जाताना अथवा एकटेदुकटे फिरताना महिलांनी दागिन्यांचा सोस केला नाही तर हे प्रमाण कमीतकमी राहू शकते असेही रक्षा महाराव यांनी सांगितले.

पार्ल्यात महिला छेडछाडीचे फारसे गुन्हे होत नाहीत असा दावा रक्षा महाराव यांनी केला. मात्र असे काही प्रसंग आपल्या आजुबाजुला घडत असतील तर नागरीकांनी दक्षता घेणे व अशावेळी त्यांना हटकणे हे केलेच पाहिजे. गरज पडल्यास पोलिसांकडे मदत मागावी. कधीही कुणी संशयास्पद व्यक्तींचा वावर इमारतीमध्ये किंवा रस्त्यावर दिसला तर सतर्क राहणे गरजेचे आहे. ‘आमच्या शंभर पोलिसांच्या दोनशे डोळ्यांच्या बरोबर तुम्हा सर्व नागरिकांचे लाखो डोळे जर लक्ष ठेवून असतील तर गुन्हेगारीला निश्चित आळा बसू शकेल. तुमच्या परिसरात काही आक्षेपार्ह गोष्टी दिसल्या तर त्या नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही गस्त घालत असताना त्याची जरूर दखल घेऊ. प्रत्येक वेळी तक्रारच नोंदवावी लागत नाही. अनेक घटना नुसत्या पोलिस समजावणीने थांबतात असे त्यांनी आवर्जून सांगितले. घरगुती हिंसाचाराचे गुन्हेही पार्लेपरिसरात आटोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले. वृद्ध पालकांना मुलांनी त्रास देणे, सासू-सुनांची भांडणे अशा तक्रारी अधूनमधून येतात पण बहुतेक गोष्टी समजावणीनंतर थांबतात. त्याला गुन्ह्याचे स्वरूप येत नाही. तसेच पार्ल्यात जातिय प्रश्नही नाहीत त्यामुळे एकंदरीत वातावरण शांत आहे असे त्यांचे मत आहे.

याचाच अर्थ पार्ले हे एक सुरक्षीत व म्हणूनच राहण्यासाठी थोडे महागडे झाले आहे. मात्र पार्ल्याचा हा तोरा असाच रहावा असे वाटत असले तर नागरीकांना जागरूक, सतर्क राहणे गरजेचे आहे. पोलिस व सुरक्षायंत्रणा कार्यरत राहतीलच पण त्यांना सहकार्य देणे ही नागरीकांचीच जबाबदारी आणि ती पार्लेकर बजावतीलच.

पार्ल्यातील पहारा फाउंडेशन या संस्थेने नागरी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक स्तुत्य उपक्रम राबवले आहेत. यासंबंधी माहिती देण्यासाठी संस्थेचे कार्यवाह शरद पटवर्धन यांची भेट घेतली. “पहारा’ च्या सभासदांनी पहाटेच्या वेळी जोडीजोडीने रस्त्यांवर फेर्‍या घालत घरफोड्या थांबवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे पोलिसांनी आता त्यांना “पोलिसमित्र’ घोषीत करून ओळखपत्रेही दिली आहेत. पहारा फाउंडेशनने नागरी सुरक्षेसाठी श्रीमती रेणूका दुर्गेयांच्या मदतीने १५० मुलींना स्वरंक्षणाचे प्रशिक्षण दिले आहे.

एकट्या राहणार्‍या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून त्यांना नियमित भेट घेणे आजकाल कमी झाले आहे. अधून मधून फोन करून त्यांची खुशाली जाणून घेतली जाते असे समजते. मराठी मित्र मंडळ या संस्थेतर्फे त्यांच्या नोंदणीकृत २०० वरीष्ठ नागरीकांकडे मंडळाचे सदस्य आठवड्यात दोन वेळा भेट देतात व त्यांना मदतीचा हात देतात.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता शाळा भरायच्या व सुटायच्या वेळांना तेथे पोलिस तैनात करता आले तर तेथील वाहतुकीला शिस्त येईल. मुख्यत्वे पार्लेटिळक शाळेजवळ दुपारच्या वेळी याची फार गरज आहे. कारण चार शाळांची मुले तेथे एकाच वेळेला रस्त्यावर ये-जा करतात. तसेच महिला संघ व पार्लेटिळक समोरील रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग करणेही अगत्याचे आहे.

घराची सुरक्षा आणि विम्याचे कवच

आपण सर्वजण आयुर्विमा, आरोग्यविमा याबद्दल जागरूक असतो. पण आयुष्याभर काडी काडी जमवून जे घर उभे करतो, त्याचे आग, चोरी, दरोडा यापासून संरक्षण व्हावे यासाठी विमा का नाही उतरवत? आपल्या घरातील टिव्ही, म्युझिक सिस्टिम, कम्प्युटर, लॅपटॉप, ऍन्टीक पिसेस अशा मौल्यवान वस्तू तसेच दागदागिने (जरी आपण बॅंकेत ठेवले तरी शुभप्रसंगी घरी आणले जातातच) यांना संरक्षण मिळावे या हेतूने त्यांचा विमा उतरवणे गरजेचे झाले आहे. आपल्या गरजेनुसार व घरातील वस्तुंच्या किंमतीनुसार विम्याचे हप्ते ठरतात. मात्र दहशतवादी हल्ल्यामधून होणारे नुकसान व नैसर्गिक आपत्ती (पूर, भूकंप आदि) या विम्यात संरक्षित होत नाहीत. आजकाल अनेक घरांमध्ये दिवसभर कोणीच नसते. अथवा फक्त एकटे वृद्ध अथवा मुले घरात असतात. अशावेळी हे विमा संरक्षण घेणे गरजेचे होते. मंगळसूत्र, चेन खेचणे आदि चोरींमध्येही चार लाखांच्या आत किंमत असल्यास आता दागिन्याची खरेदी पावतीही विमा कंपनी मागत नाही.

नागरी सुरक्षेसाठी पोलिसांकडून सूचना

१.     वाहतुकीच्या नियमांचे पालन करून अपघात टाळण्याचे प्रयत्न करावे.

२.    आपल्या दागिन्यांचे प्रदर्शन टाळावे. एकट्या दुकट्याने फिरताना शक्यतो खोटे दागिनेच वापरावेत.

३.    आपण परगावी जाणार असतो तर शेजार्‍यांना तशी सूचना द्यावी. जाताना मौल्यवान वस्तू बॅक लॉकरमधे ठेवाव्या.

४.    परगावी जाताना शेजार्‍यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्यांच्या मदतीने घरात अधूनमधून दिवे लावणे किंवा गॅलेरीत कपडे वाळत घालणे, ते अधूनमधून बदलणे अशा हालचाली कराव्या यामुळे घर बंद असल्याचे लक्षात येणार नाही.

५.    वयस्क वा एकट्या राहणार्‍या व्यक्तींनी शेजार्‍यांच्या घरात वाजणारी बेल बसवून घ्यावी ज्यामुळे तुम्हाला संकटकाळी मदत मिळेल. तसेच घराबाहेर चपलांचे एकदोन जोड ठेवावे.

६.     संशयीत व्यक्ती वा वस्तू आढळल्यास पोलिस मदत यंत्रणा – १०० नं ला त्वरित कळवावे.

७.    इमारतीतील शेजारी व परिसरातील लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध राखावेत. ज्यामुळे ते आणिबाणीच्या वेळी मदतीला पुढे येतील.

८.    सुशिक्षितांनी कायद्यांसंबंधी जुजबी माहिती जाणून घ्यावी व त्यातील आवश्यक बाबी घरकामासाठी येणार्‍यांनाही सांगाव्या.

९.     घरातील नोकरांची माहिती व फोटो पोलिसांना देण्याची दक्षता घ्यावी.

वॉचमन-उपयोग की समस्या ?

इमारतींना वॉचमन ठेवावा का? यावर दोन मते दिसतात. काहींच्या मते ठेऊ नये कारण हे लोक दिवसभर रिकामे बसलेले असतात. त्यामुळे जाणार्‍या येणार्‍यांशी गप्पा मारताना अथवा पैशाच्या अमिषाने इमारतीतील रहिवाशांबद्दल बातम्या ह्यांच्याकडूनच बाहेर पडू शकतात. तर दुसरे मत असे की वॉचमन असल्यावर इमारतीत शिरताना कोणालाही थोडातरी विचार करावा लागतो. येणार्‍यांना हटकले जाते. हे सर्व खरे असले तरी वॉचमन ठेवताना तो मान्यताप्राप्त एजन्सी कडूनच ठेवावा असे पोलिंसाचेही मत दिसले. तसेच त्याच्या हातात नक्की किती पगार मिळतो हेही माहित करून घ्यावे. फारच अल्प असेल तर अनेकदा पैशासाठी माणूस लवकर फितूर होतो. तसेच थोडे त्यांच्याशी माणुसकीने वागले तर कमी समस्या उद्भवतील. तसेच उद्या काही विपरीत घडले आणि आपण विमा संरक्षण घेतलेले असले तर क्लेमच्या पैशांची मागणी पूर्ण करताना इमारतीस वॉचमन नसला तर विमा कंपनी क्लेम मान्य करत नाहीत.

कुत्र्यांचा धोका

दोन वर्षांपूर्वी पार्ल्यातील सर्व गल्ल्या व रस्त्यांवर कुत्र्यांचा भयंकर सुळसुळाट झाला होता. वडलांबरोबर जाणा जाणार्‍या एका लहान मुलीवरही कुत्र्यांनी जबरदस्त हल्ला केला होता. पण आता महानगरपालिकेने बहुतेक ढिकाणचा हा त्रास खुपच कमी झाला आहे. निर्बिजीकरणामुळे कुत्र्यांची पुढील पिढी निर्माण होत नाही. तसेच त्यांच्या स्वभावातील आक्रमकताही कमी होत जाते. या कामात अनेक पार्लेकरांचेही सहकार्य लाभले. निर्बिजीकरणानंतर महानगरपालिकेचे लोक प्रत्येक कुत्र्याला जिथून पकडला असेल तेथेच नेऊन सोडतात. यावर अनेक पार्लेकरांनी आक्षेप घेतला. पण त्याच ठिकाणी सोडल्याचे काही फायदेच आहेत. परीचित जागेत परत आल्यावर कुत्र्यांना संरक्षीत वाटते व ते आक्रमक होत नाहीत. तसेच त्यांच्या भागात ते इतर प्राण्यांना शिरकाव होऊ देत नाहीत त्यामुळे मानवी संरक्षणात भरच पडते.

नवीन इमारतींमधील सुरक्षा योजना

हल्ली पुनर्विकास झालेल्या अनेक इमारतींमध्ये सभासदांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या इमारतींना आत शिरताना मुख्य गेट बंद असते. त्यावर वॉचमन असतोच पण शिवाय तेथे एक टेलिफोन सारखे मशिन बसवलेले असते त्यावर आपल्याला ज्या फ्लॅटमध्ये जायचे त्याचा नंबर डायल करायचा की त्या फ्लॅटमधे इंटरकॉम वाजतो. तसेच फ्लॅट मधील स्क्रिनवर आपण दिसू लागतो. म्हणजेच घरातील माणसे आपल्याला ओळखून मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून आपल्याला आत घेतात. अशीच सोय प्रत्येक फ्लॅटच्या दारावरील डोअरबेललाही उपलब्ध असते. त्यामुळे अपरिचित व्यक्ती इमारतीत अथवा फ्लॅटमधे शिरणे टाळता येते. जुन्या इमारतीमध्येही अशी सोय करणे सहज शक्य आहे तरी याचा विचार व्हावा.

सीसी टीव्ही कॅमेरा

पार्ल्याच्या नागरी सुरक्षेसाठी महत्त्वाच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी आला होता. त्यावेळी उद्योजक दीपक घैसास यांनी स्वखर्चाने ५ कॅमेरे बसवूनही दिले पण पुढील काळात त्याची व्यवस्था नीट न राखल्यामुळे ते निरुपयोगी ठरले. “शार्गी कम्प्युटरर्स ऍन्ड सेक्युरीटि’चे मुकेश शिरपूरकर या आपल्या पार्लेकरांनीच एक प्रस्ताव पुढे ठेवला आहे. शिपूरकर यांनीच मंत्रायल, मातोश्री, सिद्धी विनायक, हायकोर्ट, आर्मी हेडक्वार्टर, आदि मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांसह अनेक हॉटेल्स, बॅंका आदि ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तसेच मुकेश शिपूरकर हे पोलिसांचे अधिकृत टेक्नीकल ऍडव्हायझरही आहेत.

त्यांनी पार्ल्यासाठी ३ मेगा पिक्सल्सचे २०० कॅमेरे उपलब्ध करून दिले आहेत. त्या कॅमेऱ्यांचा बसवण्याचा खर्च, वायरींग इतर गॅझेटस व यासकट पुढील चार वर्षांची देखभालही ते स्वखर्चाने करणार आहेत. त्यातील काही कॅमेरे बसवण्याचे कामही सुरू झाले आहे.

वीणा भागवत यांनी आपल्या “मंगलाबाई भागवत’ ट्रस्ट मधून तेजपालस्किम बी मधे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत. त्या स्वत:, मुकेश शिपूरकर व अरविंद प्रभू यांच्या एकत्रित सौजन्याने सीसीटीव्ही कॅमेरे पार्ल्यात बसवण्याची योजना आकार घेत आहे. याचा सर्व्हर हनुमान रोडवरील बीट पोलिस चौकीत बसवला असून त्यावर पोलीस लक्ष ठेवून असेल. ही सुविधा आपापल्या भागांमधे हवी असल्यास नागरिकांनी फक्त कॅमेराचा खर्च करणे अपेक्षित आहे. बाकी सर्व खर्च वरील तीन मान्यवरांकडून होणार असल्याचे समजते तरी ज्यांना कॅमेरे बसविण्यात अथवा डोनेट करण्याची इच्छा असेल त्यांनी या तिघांशी संपर्क साधावा. वीणा भागवत – ९८२१५५२०५२, मुकेश शिपूरकर – ९८२१०४२९३५, अरविंद प्रभू ९८२१३६७७४२

पार्ल्यातील बागा आणि वृक्षराजी थोडा है, थोडे की जरूरत है।

गेला संपूर्ण महिना आपण सर्वचजण वैशाख वणव्याने होरपळून निघत आहोत. ग्लोबल वॉर्मिंगवर तर मला वाटतं पहिलीतल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच आपली मते हिरीरीने मांडत असतात. ॠतुमानात होणारे बदल, अवकाळी पाऊस, गारांचा वर्षाव या रोजच्याच बातम्या झाल्या आहेत. पण या सर्वांचे खापर फक्त निसर्गावर फोडण्याचा आपल्याला अधिकार आहे का? निसर्गातील समतोल बिघडवायला आपणही तेवढेच जबाबदार नाही का? असं म्हणतात, शहरवस्तीतले बागबगिचे, मैदाने ही त्या शहरांची फुफुस्सं असतात. मग आपणही विचार करूया की आपल्या श्वासोच्छ्वासाबद्दल कितीसे जागरूक आहोत!

एकेकाळी विलेपार्ले म्हणजे घनदाट झाडीत वसलेले टुमदार उपनगर होते. ती हिरवाई आता खूपच कमी झाली असली तरी अजूनही विमानातून बघताना पार्ल्यातील वृक्षराजी डोळयांत भरते. पण उद्यादेखील ही स्थिती राहील? पार्लेश्वर सोसायटी, जयविजय सोसायटी, शुभदा सोसायटी किंवा इतर अनेक इमारतींमध्ये वृक्षांची चांगली काळजी घेतल्याचे दिसते. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वृक्षांचे काय? गेली काही वर्षे सातत्याने अनेक वृक्षांची पडझड होते आहे. कारण रस्त्यांची व इतर वीज, टेलिफोन आदि कामे करताना त्यांच्या मुळांना होणारी दुखापत तसेच नवीन रस्ता बांधताना त्यांच्या खोडापर्यंत केले जाणारे कॉंक्रिटीकरण! मुळांना श्वास घ्यायला ना माती, ना हवा, ना पाणी मुरायला जागा. साहजिकच यामुळे अनेक मोठे वृक्ष सुकायला, मरायला लागले आहेत. रस्तेबांधणीत प्रत्येक वृक्षाच्या मुळाशी थोडी जागा ठेऊन त्याला चौकोनी आळे बांधून नवीन माती, खत दिले तर ते सहज वाचवता येतील याकडे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वळवण्याची गरज आहे.

या प्रश्नाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. सार्वजनिक बागांच्या दुर्दशेकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ठेकेदाराकडे बोट दाखविले. खरं तर ठेकेदारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या विभागाचीच असताना बगिच्यांवर ही वेळ का यावी हा मोठा प्रश्न आहे. यापुढे लक्ष घालू, तक्रारी सांगा असे आश्वासनही या अधिकाऱ्यांनी दिले. सावरकर उद्यान, केसकर बाग व ठक्कर रोडवरील बागेच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव आहे व लवकरच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण होईल असेही सांगण्यात आले. या बागांमधील जॉगिंग ट्रॅक सुधारण्याचीही सूचना त्यांना केली. हे ट्रॅक सुधारल्यास प्रबोधनकार ठाकरे उद्यान व दुभाषी मैदानावरील पडणारा भार कमी होऊ शकेल व मैदान मुलांना खेळण्यासाठी उपयोगी पडेल.

यासंबंधी नगरसेविका ज्योती अळवणी यांच्याशी सविस्तर बोलणे झाले असता त्या म्हणाल्या,”माझ्या विभागातील बगीचे व झाडे यांचे जतन व्हावे असे मला मनापासून वाटते. माझ्या कार्यकाळात पार्ल्यातील बगीच्यांमध्ये नक्की सुधारणा होईल. त्यासाठी मी व गार्डन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामाला सुरूवात केली आहे. मिलन फ्लायओव्हर खालील भुखंडामधे आम्ही नैसर्गिक गवताचे फुटबॉल मैदान, क्रिकेट ग्राऊंड बनवून घेतले आहे. बाजूने ग्रील लावून बॉल क्रिडांगणाच्या बाहेर जाणार नाही यासाठीही काम चालू आहे. सर्व्हीस रोडवरील शहीद स्मारकाची जागाही मुलांसाठी खेळायला खुली केलेली आहे. या वर्षाच्या विकासनिधीमधून ठक्कर रोड, आझाद रोड व सर्व्हीस रोड येथील बगिच्यांचा विकास केला जाईल. तेथे मुलांसाठी पाळणे, घसरगुंडी असे खेळ असलेला किड्‌स झोन तसेच मोठ्यांसाठी ओपन एअर जिमची मागणी केली आहे. शिवाय तेथे नवीन झाडांची लागवडही होणार आहे. जेथे जेथे जॉगर्स ट्रॅक आहेत ते दुरूस्त करून घेण्यात येतील. शिवाय आझाद रोड, मिलन सबवे व ठक्कर रोडवर 170 नवीन झाडे लावली आहेत. तशीच लागवड आता हनुमान रोड, तेजपाल स्किममध्ये होईल. 2017च्या आत ही सर्व कामे पूर्ण होतील असा मला विश्वास वाटतो.’

महानगरपालिकेच्या बगिच्यांच्या अवस्थेबद्दल नगरसेविका शुभदा पाटकर यांच्याशीही चर्चा केली. त्यांच्या प्रभागातील शहाजी राजे मार्गावरील सावरकर उद्यान व मार्केटमधील केसकर बागेबद्दल त्यांनीही चिंता व्यक्त केली. ही दोन्ही उद्याने दत्तक घेण्यासाठी त्यांची व माजी नगरसेवक शशिकांत पाटकरांची इच्छा असल्याचे व त्यासाठी त्यांची खटपट सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या बागांच्या सुरक्षेबाबतीत लक्ष घालण्याचेही त्यांनी मान्य केले मात्र त्यांचाच पक्ष महानगरपालिकेत कित्येक वर्ष सत्तेत असूनही त्यांची खटपट फलद्रुप का होत नाही हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

पार्ल्यात अनेक ठिकाणी दूर्मीळ वृक्ष आहेत. जसे पार्ले टिळकच्या आवारातील करमक, साठे कॉलेजच्या परीसरातील शेंदरी, वरूण, हनुमान सोसायटीतील सीता अशोक, साठे कॉलेजच्या आवारातील बिब्ब्याची झाडे, संतूर सोसायटीजवळील चंदन वृक्ष, बोटॅनिकल गार्डनमधील अनेक दुर्मिळ जातीचे निवडूंग अशी झाडे निवडून त्यांच्या योग्य देखभालीची आज गरज आहे. आज अनेकजण हाही प्रश्न विचारतील की पार्ल्यात मोठी झाडे लावायला जागाच कोठे आहे? पण या प्रश्नाचेही उत्तर तयार आहे. काही वर्षांपूर्वी वनस्पतीतज्ञ डॉ. चंद्रशेखर लट्टू, टिळक मंदिराचे सध्याचे सह-कार्यवाह नंदकुमार आचार्य व स्वा.सावरकर केंद्राचे कार्यवाह सुरेश बर्वे यांनी पार्ले परिसराची संपूर्ण पाहणी करून वृक्ष लावता येतील अशा सुमारे 30-35 जागा निवडल्या. त्यांची यादी महानगरपालिकेच्या गार्डन विभागाकडे सुपूर्द केली. पण अजूनही त्यावर काही ठोस कारवाई मात्र झालेली नाही.

अनेक इमारतींमध्ये दरवर्षी फांद्यांची छाटणी केली जाते. मात्र अनेकदा छाटणीच्या ऐवजी मोठमोठ्या फांद्यांची तोडणी करून झाडांचे अतोनात नुकसान केले जाते. पुनर्विकासाच्या वेळीही इमारतीतील रहिवाशांनी जास्तीत जास्त झाडे वाचवण्यासाठी बिल्डरबरोबर आग्रही राहायला हवे. महिला संघाजवळील कुपर बंगल्याच्या जागी नवीन इमारत झाली पण आवारातले काटेसावरीचे झाड सुस्थितीत राहिले. अशी उदाहरणे डोळ्यासमोर ठेवायला हवीत. जी झाडे हलवणे शक्य नाही, तोडणे गरजेचे आहे. त्याच्या बदली इमारत बांधून झाल्यावर नवीन वृक्ष लावणे तितकेच गरजेचे आहे. ही झाडे मध्यम आकाराची व आपल्या इमारतींचे सौंदर्य वाढवणारी असावीत. वनस्पतीतज्ञ डॉ. लट्टू यांनी काही झाडे सुचविली आहेत. ज्यांच्या इमारती रस्त्यालगत आहेत त्यांनी ‘आसूपालव’ लावावा. उंच, सरळ वाढणारा वृक्ष इमारतीस त्रासदायक होत नाही व वर्षभर हिरवागार राहातो. मध्यम वर्गातील रातराणी, कुंती, तगर, बहावा, वायकर्ण, चकारांडा (नीलमोहोर), किंजळ, मुरूड शेंग, कण्हेर, बिट्टी, बोगनवेल, चिनायमेंदी (यात 5/6 रंग मिळतात) ही झाडे वेगवेगळया ॠतुंमध्ये बहरतात. आपल्या परिसराचे सौंदर्य व आपल्याला प्रसन्नता देतात.

जिकडे तिकडे चाललेली इमारतींची बांधकामे, वाहनांचा धूर व मुख्य हायवे व विमानतळाजवळची भौगोलिक स्थिती यामुळे पार्ल्याला वायू व ध्वनी प्रदूषणाचा धोका जास्त आहे. त्याला नियंत्रित ठेवायचे असेल तर वृक्षराजी व बगिचांचे संगोपन व संवर्धन ही आपली नैसर्गिक गरज ठरते. आज पार्ल्यात सर्वत्र इमारतींचे पुनर्वसन चालू आहे. नवीन मिळणाऱ्या मोठया जागेच्या लालसेने आपलेही याकडे दुर्लक्ष होत आहे तरी निदान इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर कंपाऊंडला लागून पुन्हा काही झाडे लावली, जोपासली तर आपण झालेली हानी भरून काढू शकतो. पुढच्या पिढीसाठी आरोग्यदायी निवारा द्यायचा का सिमेंटचे प्रदूषित जंगल हे आता आपणच ठरवायचे आहे.

विलेपार्ले पूर्व म्हणजे तब्बल सहा-सात उद्यानं आणि तीन सार्वजनिक मैदानं लाभलेलं वैशिष्ट्यपूर्ण उपनगर! इथल्या मुलांच्याच नव्हे तर सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने ही मोकळा श्वास देणारी फुफुस्सं कार्यक्षम आणि निरोगी ठेवण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न करणं आपल्याच हातात आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान

सनसिटी थिएटरच्या समोर स्वा. सावरकर केंद्राला लागून असलेल्या बागेची दूरावस्था पहावत नाही. मोक्याची जागा व बऱ्यापैकी मोठा भूखंड असूनही ही बाग आज ओसाड पडलेली दिसते. बागेचे संपूर्ण लोखंडी कंपाऊंड जागोजागी तोडलेले आहे. स्वा. सावरकर केंद्रातून बागेत उघडणारे प्रवेशद्वार बंद करून ठेवले आहे. कारण ते मोडले आहे. हे मोडलेले प्रवेशद्वार केवळ दोरीने बांधून ठेवलेले दिसते. जे कधीही कुणाच्या अंगावर पडून जीवावर बेतू शकते. बहुतेक दिवे बंद तरी आहेत किंवा झाडांमध्ये लपलेले आहेत त्यामुळे संध्याकाळनंतर हा बगिचा मिट्ट काळोखात असतो. बागेत कुत्रे व माकडांचा सुळसुळाट असून त्यांना कोणीही हाकलत नाही. पाण्याची पाईपलाईन तुटलेली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा कमी होतो, त्यातच रस्त्यावरील अनधिकृत उपहारगृहे तेथूनच पाणी वापरतात त्यामुळे टॅंकरने पाणी मागवावे लागते. एक देऊळ बगिच्यात असून तेथे अपरात्री पूजाअर्चा चालतात अशी नागरिकांची तक्रार ऐकू आली. रात्री आठनंतर सुरक्षा रक्षक बागेला कुलूप लाऊन गेल्यानंतर तेथे अनधिकृत ये-जा व समाजकंटकांचा वावर असल्याने आजुबाजुच्या रहिवाशांत दहशत पसरत आहे असेही कानावर आले.

पार्क रोडवरील साठे उद्यान

महानगरपालिकेची देखभाल असून बऱ्यापैकी व्यवस्थित असलेले उद्यान. इथे माळी व वॉचमन नियमितपणे काम करत असल्याने आणि पार्लेकट्टा सारखे उपक्रम तेथे होत असल्याने हे उद्यान चांगल्या स्थितीत आहे. पार्क रोड सारख्या मध्यवर्ती पार्ल्यात असलेल्या, छोटयाशा पण टुमदार अशा या उद्यानात अजूनही चांगली स्थित्यंतरे होऊ शकतील हे मात्र नक्की.

मालवीय मार्गावरील राखीव उद्यान

मालवीय मार्गावरील वादग्रस्त भूखंड जुलै 2013 पासून महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडे आला. अंदाजे 1200 चौरस मीटर इतक्या प्रशस्त जागेवर “स्पेशल’ मुलांसाठी राखीव उद्यान उभारले जावे असा प्रस्ताव “आम्ही पार्लेकर’ने मांडला होता. सर्वसामान्य मुले ज्या मैदानांत किंवा बगिच्यांमध्ये खेळतात तिथे ही “स्पेशल’ मुले सुरक्षितपणे खेळू शकत नाहीत. जी गरज शारीरिक दृष्ट्या विकलांग मुलांची तीच, किंबहुना जास्त गरज मानसिक दृष्ट्या कमकुवत मुलांची असू शकते. अशा मुलांसाठी उपनगरांमध्ये तर सोडाच पण संपूर्ण मुंबईत एकही उद्यान नाही या विचारातून हा प्रस्ताव मांडण्यात आला.

या प्रस्तावाला पार्ले परिसरातल्या स्पेशल मुलांच्या सहा-सात शाळा, शिक्षक, पालक, सामाजिक संस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यासंबंधीचे निवेदन महापालिकेच्या सुपूर्द करण्यात आले. लवकरात लवकर येथे राखीव उद्यान उभारले जावे या प्रतिक्षेत समस्त पार्लेकर आहेत.

नवीनभाई ठक्कर रोडवरील उद्यान

राजपूरीया हॉलसमोरील या जागेला बगिचा म्हणायचे पण येथिल अवस्था ना बाग ना मैदान अशी आहे. बाजूला महानगरपालिकेचे मैदान आहे. पण तेही देखभालीअभावी दुरावस्थेत आहे. बागेच्या भूखंडात दोन भाग असून एका भागात मोठी मुले व्हालीबॉल खेळताना दिसतात, तर अर्ध्यात झोपाळे, घसरगुंडी आदि गोष्टी आहेत. चालायला जॉगिंग ट्रॅक आहे पण देखभालीचा संपूर्ण अभाव आहे. हिरवळीचा, झाडाफुलांचा संपूर्ण अभाव आहे.

दयाळदास रोडवरील आजी आजोबा उद्यान

मुळातच हा बगिचा विलेपार्ल्याच्या एका कोपऱ्यात हायवेला लागून आहे. आजुबाजुला इमारती कमी व बैठया घरांची वस्ती जास्त. त्यातच आजुबाजूला रिक्षा दुरुस्तीची गॅरेजेस, यामुळे येथे जाण्यासाठी लोकांची पसंती थोडी कमीच. त्यात दिव्यांचा, उजेडाचा अभाव. मधील काही काळ नुसते रान माजले होते ते नगरसेविका ज्योती अळवणी यांच्या सहकार्याने तोडून घेतले गेले. पण बागेच्या एकूण देखभालीची अवस्था वाईटच आहे. बागेला माळीही नाही, सुरक्षारक्षकही नाही. नेहेमी चालायला येणारे लोकच झाडांना पाणी घालतात. हायवेकडील लोखंडी कंपाऊंडवरून कोणीही बागेत येऊन बसते. रात्रीच्यावेळी दारूडयांचा गोंधळ चालू असतो. बागेत अनेकदा दारूच्या बाटल्या, खाण्याच्या गोष्टींचा कचरा आदी पडलेला असतो. त्यामुळे उद्यान दिवसेंदिवस उपद्रवी आणि उपयोगशून्य होत चालले आहे.

आनंदीबाई केसकर उद्यान

विलेपार्ले मार्केटमधील हा सर्वात मध्यवर्ती बगिचा. संध्याकाळी बाजारहाट करतानाही मधेच विश्रांती घ्यावीशी वाटली तरी स्त्रियांना, वयोवृद्धांना उपयोगी पडू शकेल असा. मात्र प्रवेशद्वार सर्व फेरीवाल्यांनी व्यापून टाकलेले व आतला काळोखी परिसर, त्यामुळे येथे बगिचा असल्याचे लक्षातच येत नाही. बागेसारख्या पर्यावरण समतोल राखला जाणाऱ्या या जागीच रिलायन्सचा मोबाईल टॉवर स्थापन केलेला दिसतो. तोही शेजारी महानगरपालिकेची शाळा असताना. रहिवाशांसाठी उपयुक्त अशा या बागेतील जुने मोडके बाक काढून टाकले गेले पण नवीन बाक बसवताना मात्र ते संख्येने कमी बसवले गेले. उन, पावसासाठी केलेल्या छत्र्यांचे पत्रे मोडके व गळके आहेत.

प्रबोधनकार ठाकरे महापालिका उद्यान

विलेपार्ल्यातील हे एकमेव अतिशय उत्तम स्थितीतील उद्यान. जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळण्याचा विभाग व छोटेस गणपती मंदिर व तेथे बसायला उत्तम सोय, मुलामाणसांनी भरलेले, वेगवेगळया झाडांनी, हिरवळीचे सजलेले हे उद्यान पार्लेकरांच्या पसंतीस उतरलेले आहे. उद्यान महानगरपालिकेचे असले तरी देखभालीसाठी छत्रपती शिवाजी स्मारक समितीने दत्तक घेतले आहे व त्यामुळेच त्याची स्थिती चांगली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पूर्वीप्रमाणे पुन्हा त्यात मंद संगीत सुरु झाले तर इथली स्थिती सोने-पे-सुहागा अशी होईल. तरी याची दखल सदर समिती घेईल का?

पार्ल्याचे वैद्यकीय चित्र

मुंबईतील इतर उपनगरांच्या तुलनेत विलेपार्ले तसे स्वच्छ उपनगर! येथे सुविद्य लोक जास्त प्रमाणात राहतात. आर्थिक स्थितीही इतरांच्या तुलनेत चांगली आहे. मग अशा ठिकाणी वैद्यकीय सुविधा व नागरिकांचे आरोग्यही इतर उपनगरांच्या तुलनेत चांगले असले पाहिजे. नाही का? रस्त्यावरील कचराकुंड्या, गटारे याबाबत जागरूक असणारे पार्लेकर बाराही महिने मलेरिया, डेंग्यूचे रूग्ण का? कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग, क्षयरोग यांचेही प्रमाण रोज वाढतेच आहे. यासंबंधी विचार करणे गरजेचे आहे.

टपरीपासून फाव्हन स्टार हॉटेलपर्यंत विविधता असलेले हे उपनगर! पण वैद्यकीय सेवांचा विचार करता, सर्व सोयी एका जागी मिळणाऱ्या चांगल्या रूग्णालयाचा अभाव हे इथले एक मोठे वैगुण्य आहे. अशा रूग्णालयासाठी नानावटी, ब्रम्हकुमारी अथवा सेव्हन हिल्सपर्यंत पळावे लागते. पार्ल्यातील त्यातल्या त्यात मोठी रुग्णालये म्हणजे सदानंद दणाईत रूग्णालय (जीवन विकास केंद्र) व बाबासाहेब गावडे रुग्णालय. पण ही दोन्ही “ए’ ग्रेडमध्ये मोडत नाहीत. जीवन विकासमध्ये वाजवी दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. तरी पूर्वी श्री. दणाईत सर्व व्यवहारांमध्ये जातीने लक्ष घालत. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे आता ते कमी झाल्यापासून रुग्णालयात काहिसा ढिसाळ कारभार, निर्णयास विलंब आदी त्रुटी जाणवत आहेत, अशी तक्रार तेथील रूग्ण व नातेवाईकांकडून ऐकायला मिळते. गावडे रूग्णालय महानगरपालिकेच्या जमिनीवर उभे असले तरी “सामान्य माणसाला परवडणारे हे रूग्णालय नाही’ असाच सूर पार्ल्यातील नागरिकांकडून ऐकू येतो. पार्ल्यात मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय लोकांबरोबरच निम्न आर्थिक गटातील नागरिकही मोठ्या प्रमाणात राहतात. अशा लोकांसाठी किफायतशीर वैद्यकीय सुविद्या उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे.

खाजगी रूग्णालयात औषधोपचार उत्तम असले तरी खर्चाचा बोजा मोठाच असतो. शिवाय पार्ल्यातील जागांच्या वाढत्या किंमतींमुळे प्रत्येक रूग्णालय म्हणजे कोंबडीचे खुराडे बनत चालले आहे. महानगरपालिकेचे शिरोडकर रूग्णालय पाडल्याने सध्या वाजवी दरातील प्रसूतिगृहही उपलब्ध नाही. या रूग्णालयातील आरएमओ मुख्यत: आयुर्वेदिक अथवा अन्य पदवी/पदवीका घेतलेले आहेत. रुग्णांवर ऍलोपथीनुसार उपचार करणाऱया या रुग्णालयात एमबीबीएस झालेले आर.एम.ओ. नसणे ही मोठी त्रुटी आहे.

वैद्यकशास्त्रातील प्रगतीने मनुष्याचे आयुष्मान वाढले व एक नवा प्रश्न उभा राहिला तो घरातील वयोवृद्धांचा. आज अनेक घरातल्या वृद्ध व्यक्ती बरेचदा एकाकी असतात. त्यांची सुरक्षा, एकटेपणा यातून निर्माण झालेल्या मानसिक समस्या पार्ल्यात फार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. एकटेपणामुळे येणारे वैफल्य घालवायला वृद्धांना बाहेर पडणेही कठीण होत चालले आहे. अरूंद रस्ते, वाढती वाहतूक समस्या, वृद्धांना बसायला अपूऱ्या जागा, बागा यामुळे त्यांना घरात कोंडून राहणे भाग पडते. शिवाय या वयात होणारे पक्षाघात, डिमेंशिया, सांध्यांची दुखणी, हृदयविकार, रक्तदाब, मधूमेह आहेतच. त्यांच्यासाठी खरेतर चांगल्या केअरसेंटरची आवश्यकता पार्ल्यात निर्माण झाली आहे. पण जागा हा यातील फारच मोठा अडसर आहे.

तरूण मुलामुलींचे शिक्षण व करीअर मधील स्पर्धा यामुळे लग्नाचे वय वाढत चालले आहे. वाढती वये, मानसिक ताण व अनियमित कामांच्या वेळा यामुळे मोठ्या प्रमाणावर विवाहविषयक, तसेच संततीसंबंधी प्रश्न वाढत आहेत. मुलांना येणारा एकलकोंडेपणा, पालकांच्या अतिरेकी अपेक्षा, स्वत:च्या मुलांची क्षमता न जोखता त्यांच्यावर टाकले जाणारे दडपण यात मुले व पालक दोघांचेही मानसिक स्वास्थ ढासळते आहे. घरी राहण्याऱ्या व बराच काळ टिव्ही बघणाऱ्या स्त्रीवर्गामध्ये ओव्हेरीयन सिस्ट व अनियमीत मासिकपाळीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. लठ्ठपणा हा प्रश्न तर सर्वांनाच, विशेषत: मुले व तरूण वर्गात फारच मोठ्या प्रमाणावर आहे.

या सर्व बाबींचा विचार करता पार्ल्याचे आरोग्य उत्तम आहे असे तर आपण नक्कीच म्हणू शकत नाही. काही आरोग्यपूर्ण उपाययोजना करणे आपल्या हातात आहे असे वाटते. राहते घर, इमारत व रस्त्यांवरील स्वच्छतेबाबत दक्ष राहणे, पाण्याचा योग्य वापर करणे, स्वत:च्या व मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत दक्ष राहणे, घरातील व आजुबाजुच्या वृद्धांशी स्नेहपूर्ण वागणूक ठेवणे यातून आपण पार्ल्याचे आरोग्य “सरासरी ठीक’ आहे या शेऱ्याकडून “बहुतांशी उत्तम व आनंदी आहे’ याकडे नक्कीच नेऊ शकतो. यासाठी समस्त डॉक्टरवर्ग आपल्याला साथ देईलच पण आमचे नगरसेवक व इतर राजकिय नेतृत्त्व यात थोडे लक्ष घालून रक्तपेढी, उत्तम रुग्णालय विलेपार्ल्यात यावे म्हणून प्रयत्न करेल काय?

– पार्ल्यातील आरोग्यसेवांविषयी थोडक्यात ड्ढ

महानगरपालिकेचे व्हि.एन. शिरोडकर प्रसुतीगृह

सध्या हे हॉस्पिटल पुनर्बांधणीसाठी पाडलेले असून नेहरू रोडवरील महानगरपालिकेच्या दवाखान्यात गायनॅक, जनरल व पिडीऍट्रीक (लहान मुलांसाठी) ओपीडी, कुटुंबनियोजन केंद्र व लसीकरण यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र प्रसूतीसाठी अथवा इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी कूपर हॉस्पिटल किंवा बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पीटल (जोगेश्वरी) येथेच जावे लागते. सदर हॉस्पिटल सहा मजली करण्याचा पालिकेचा मनोदय असून त्यात सोनोग्राफी, लॅब, आदि जुन्या सुविधांसमवेतच वाढीव सुविधा होण्याची शक्यता आहे. मात्र त्याबद्दलची अधिकृत माहिती कोणाकडेच उपलब्ध नाही. डॉ. शिरोडकर सूतिकागृहाखेरीज पालिकेतर्फे नेहरू रोड व अजमल रोडचे दवाखाने व शहाजी रोडवरील आयुर्वेदिक दवाखाना हे उपलब्ध आहेत. याशिवाय सर्व झोपडपट्टी अथवा बैठ्या चाळी भागांमधे घरोघर जाऊन ओपीडी घेतली जाते व रक्ताच्या चाचण्या केल्या. जातात जास्त करून या फेर्या पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासाठी केल्या जातात. सध्या पार्ल्यात वाढलेल्या डेंग्यू व मलेरीयामागील कारणात गटारे, अस्वच्छता याबरोबरच अनेक सोसायट्यांतील बंद फ्लॅटमधील पाणीगळतीकडील दुर्लक्ष तसेच टाक्यांचे वाहून जाणारे पाणीही आहे. याबाबत सोसायट्या सहकार्य करत नाहीत अशी प्रतिक्रिया मेडीकल ऑफिसर डॉ. भूषण पाटिल यांनी दिली.

श्री लक्ष्मीबेन धरमसी करसन गाला डोळ्यांचे हॉस्पिटल

मालवीय रोडवरील हे हॉस्पिटल वाजवी दरातील डोळ्यांवरील उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. मोतीबिंदू, काचबिंदू व डोळ्यातील तिरळेपणावर येथे उपचार होतात. सकाळी 9 ते 10.30, 1 ते 3 व संध्या 3 ते 4 अशा तीन पाळ्यांत रूग्णांवर उपचार होतात. हे हॉस्पीटल जैन समाजातर्फे चालवले जात असले तरी ते सर्वांसाठी खुले आहे.

नानावटी हॉस्पिटल

विलेपार्लेपूर्व बाजूला एकही “टर्शरी केअर हॉस्पीटल’ (ज्यात सर्व सुविधा उपलब्ध आहेत व जे सर्व प्रकारचे रूग्ण हाताळते) नाही. विलेपार्ल्यातील लोकांना यासाठी पश्चिमेचे “नानावटी हॉस्पीटल’च गाठावे लागते. येथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. बायपास, कॅथलॅब, ऍन्जोप्लास्टी याबरोबरच पेट सिटी, एमआरआय, स्ट्रेस टेस्ट आदि सर्व प्रकराची वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. कॅन्सर पेशंटसाठी वेगळा विभाग ज्यात केमोथेरपी, रेडिएशन व लिनियर ऍक्सीडरचीही सुविधा आहे. प्लास्टिक सर्जरीचीही सोय इथे आहे. साडेतीनशे बेडसची सोय असलेल्या या हॉस्पिटलची स्वत:ची रक्तपेढीही आहे. पार्ल्यातील “सोबती’, “विसावा’ अथवा “मराठी मित्र मंडळा’तर्फे दाखल झाल्यास रूग्णांना बिलावर 10 टक्के सवलतही मिळते असे नानावटी हॉस्पिटलचे मॅनेजमेंट ऍडव्हायजर प्रमोद लेले यांनी सांगितले.

सदानंद दणाईत हॉस्पिटल

“सदानंद दणाईत हॉस्पिटल’ गेली अनेक वर्षेअत्यंत वाजवी दरात पार्लेकरांना वैद्यकीय सुविधा पुरवत आहे. हॉस्पिटलची स्वत:ची ऍम्ब्युलन्स सेवा व मेडीकल स्टोअरही आहे. अनेक दुर्मिळ औषधेही तेथे मिळतात. पॅथॅलोजीच्या सर्व टेस्ट, एमआरआय, सिटी स्कॅन, डायलेसिस, सोनोग्राफी, 2डी इको, इसीजी एक्स-रे आदि बहुतेक सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत.

सरकारी अनुदान न घेताही अतिशय वाजवी दरात ओपीडी व इतर वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. पूर्वी येथे रक्तपेढीही उपलब्ध होती त्यामुळे किडनी ट्रान्सप्लान्ट सारखी मोठी ऑपरेशन्सही येथे होऊ लागली होती. परंतु सरकारी अधिकाऱ्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून ती बंद करावी लागली असे डॉ. बी.एच.पांडे यांच्याकडून समजले.

बाबासाहेब गावडे हॉस्पिटल

पार्ला मार्केटस्थित बाबासाहेब गावडे हॉस्पीटल 35 बेडचे आहे. इसीजी, इइजी, 24 तास पॅथॅलॉजी, 2डी इको, स्ट्रेस टेस्ट, सोनोग्राफी, मॅमोग्राफी आदी सोईंबरोबरच लहान मुलांसाठी सहा बेडचे एनआयसीयु (काचेच्या पेट्या) उपलब्ध आहे.

रक्तपेढी

विलेपार्ल्यातील वैद्यकीय सुविधांमधील सर्वात मोठी त्रुटी म्हणजे रक्तपेढीची कमतरता. रुग्णास रक्ताची गरज लागल्यास नानावटी किंवा ब्रम्हकुमारी या पश्चिमेच्या हॉस्पिटलच्या रक्तपेढ्या त्यातल्या त्यात जवळच्या. त्यामुळे रूग्णांचा होणारा खोळंबा व नातेवाईकांची होणारी धावपळ ही नेहमीचीच. पुन्हा हे रक्त रास्त दरात मिळत नाही. रक्तपेढी सुरू होण्यासाठी तीन अडचणी पार्ल्यात दिसून येतात जागा, भांडवल व इच्छाशक्ती! रक्तपेढीसाठी लागणारी मोठी जागा, त्यासाठी मोठे भांडवल या अडचणी आहेतच. रक्तपेढीसाठी ती हॉस्पिटलला जोडलेली असणे ही एक महत्त्वाची अट आहे. आरोग्य खात्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून सदानंद रूग्णालयाची रक्तपेढी काही वर्षांपूर्वी बंद पडली व त्यामुळे तेथे वाजवी किंमतीत होणारी किडणी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही बंद पडली. गावडे हॉस्पिटलला अजुनतरी परवानगी मिळत नसल्याचे सांगण्यात आले. तर शिरोडकरच्या तळघरात ही सोय व्हावी यासंबंधीचा प्रस्ताव विनानिर्णय पडून आहे. डॉ. संजय जाधव यांनी खूप प्रयत्न करूनही रक्तपेढी सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वरचे सुशील देशपांडे अजूनही रक्तपेढी सुरू होण्यासाठी धडपडत आहेत. महापालिका सध्या नव्या रक्तपेढ्या सुरू करण्यासाठी उत्सुक आहे असे समजते. याचा फायदा पार्ल्याचे लोकप्रतिनिधी घेतील का?

मराठी मित्र मंडळ

सर्व प्रकारची जेनरीक औषधे येथून पुरवली जातात. पार्क रोडवरील त्यांच्या ऑफिसमधे प्रथम नोंदणी करून औषधे मिळतात मात्र त्याचा फायदा म्हणावा तेवढा अजूनही घेतला जात नाही.

फॅमिली डॉक्टर संकल्पना नष्ट होण्याच्या मार्गावर

पार्ल्यातच नाही तरी पूर्वी सर्वच ठिकाणी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना महत्त्वाची मानली जात असे. रुग्णांचा त्यांच्यावर विश्वास होता. लहानमोठी आजारपणे, दुखापत यासाठी फॅमिली डॉक्टरकडेच लोक जात. पण आज ही संकल्पना संपत आली आहे. आज पार्ल्यात कार्यरत मोजक्या फॅमिली डॉक्टरांमधे बहुतेक 60च्या वयोगटातील आहेत. त्यापैकी घरी व्हिजिट देणारे दोनतीनच! आजकाल अनेक आयुर्वेदिक, होमिओपाथी, युनानी शाखांचे डॉक्टरही ऍलोपाथीची औषधे देतात, पण मृत्युचे प्रमाणपत्र देण्याला नकार देतात. पार्ल्यातील लोक स्वत:ला विद्वान समजत असल्याने ते अनेकदा गरज नसतात वेगवेगळ्या तपासण्या करणे, स्वत:च औषधोपचार करण्याचे ठरवतात. तसेच प्रत्येक लहानसहान आजारासाठी आज सर्वांना स्पेशालिस्ट लागतात. त्यातून वाढणाऱ्या खर्चामुळे संपूर्ण डॉक्टरीपेशाला नावे ठेवतात. अनेक घरात मुले परदेशी स्थायिक आहेत. हे लोक फोनवरून डॉक्टरना त्यांच्या पालकांची काळजी घेण्यास सांगतात पण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. अनेक वेळा त्या पेशंटच्या हॉस्पिटलच्या खर्चाची जबाबदारी घेत नाहीत. त्यामुळे नविन पिढी एमबीबीएस होऊन फॅमिली डॉक्टर होण्यास तयार नाही. त्यात जागांच्या वाढणाऱ्या किमती त्यांना वाजवी दरात प्रॅक्टीस करणे अवघड करत आहे. फॅमिली डॉक्टरांची ही शेवटची पिढी हेच आजचे वास्तव आहे.

– डॉ. सुहास पिंगळे

चांगल्या घरातील लोकही आजारी

हल्ली पार्ल्यात बाराही महिने मलेरिया, डेंग्यूचे रूग्ण सापडत आहेत. झोपडपट्टीतील नाले, घरांवरील ताडपत्र्या, त्यात साठणारे पाणी हे कारणीभूत आहेतच. पण घरांतील फिशटॅंक, कारंजी, फुलदाण्या व इतर भांड्यांतील पाणी न बदलणे यामुळे डासांचे प्रमाण वाढते आहे. तसेच तरूण वर्गातील वाढते डाएटचे प्रमाण, जंकफुड खाण्याची आवड, मैदानी खेळांचा अभाव यामुळे नवी पिढीत एकतर काडीपैलवान असतात नाहीतर ओव्हरवेट तरी. पण दोन्ही प्रकारात आयर्न, कॅलशियमचे प्रमाण कमीच आढळते. योग्य आहार मिळण्याची कौटुंबिक व आर्थिक क्षमता असूनही तरूणवर्गाचे हिमोग्लोबीन बरेच कमी दिसते. त्यामुळेच वाढत्या गर्दीत लागण होऊन क्षयरोगाचे प्रमाण चांगल्या घरातील व्यक्तीमधे वाढते आहे ही चिंतेची बाब आहे. त्याचप्रमाणे इमारतींचे पुनर्विकास प्रकल्प, रस्ते खणणे व गटाराच्या पाईपमधील गळती यामुळे एकाएका विभागातून एकाच प्रकारचे संसर्गीत रूग्ण येत आहेत. ह्या कामांवर महानगरपालिकेच्या अधिकारीवर्गाचे व नगरसेवकांचे लक्ष असणे जरूरी आहे. रूग्णास रक्त लागले की फार धावाधाव होते अशावेळी प्रत्येक सोसायटीने आपापली रक्तदान करणाऱ्यांची यादी बनवली तर ते फार फायद्याचे होईल.

– डॉ. मेधा शेट्ये

पार्ल्याचे क्रीडाविश्र्व अपुऱ्या सोयी आणि संभ्रमित पालक

गेले काही दिवस आपण सर्वजणच क्रिकेट विश्वचषकामधे बुडून गेलो होतो. आपले खेळाडू चांगले खेळले, भारतीय संघ जिंकला की लगेच आपण त्यांना डोक्यावर घेतो व हरला की ताशेरे ओढायला सुरूवात करतो. जूनमधे कॉलेजच्या प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्या की आपल्याला आठवते की अमक्या ढमक्याला स्पोर्टस कोटात प्रवेश मिळाला अथवा खेळाचे काही गुण वाढवून मिळाले. त्यावर तावातावाने चर्चा सुरू होतात. पण या हरण्याजिंकण्यामागे अथवा काही वर्षं खेळत आंतरशालेय, राज्यीय अथवा राष्ट्रीय स्पर्धांत भाग घेऊन त्यासाठी उरफोड मेहनत करणाऱ्या मुलांच्या मेहनतीचा कितीजण विचार करतात? आपल्याही मुलाने असा एखादा वेगळा खेळ खेळावा. त्यात प्रविण्य मिळववं असा किती पालकांचा दृष्टीकोन असतो?
आपण मुलांना शालेय वयात किती वेळ मैदानी खेळ खेळू देतो? आज काही मुलांना व्यायामशाळेत अथवा जिमनॅस्टिक किंवा तत्सम खेळांकडे पालक पाठवतात. पण त्यात केवळ मुले दोन तास बिझी राहावीत, अथवा माझा मुलगा अमूक खेळ खेळतो असे मिरवण्याची वृत्तीच जास्त दिसते. एका खेळातून दुसऱ्या खेळाकडे वारंवार बदलले जाते. वयाच्या आठव्या वर्षापर्यंत जिमनॅस्टिक, बु्दीबळ, कराटेचे प्रशिक्षण पूर्ण होऊन आता तो क्रिकेट अथवा फुटबॉल प्रशिक्षणाला जातो असे अभिमानाने सांगणारे पालकही दिसतात. काहिजण मुलांना व्यवस्थित एखाद्या खेळाच्या प्रशिक्षणाला पाठवतात. त्याकडे चांगले लक्षही पुरवतात. ही मुले मोठमोठ्या स्पर्धांमधे नावही कमावतात. त्यांचे कौतुकच वाटते पण तेवढ्यात १० वी १२वी ची “महत्त्वाची’ वर्षं येतात व या सर्व क्रीडा प्राविण्याला बाजूला सारून फक्त “टक्के’ प्राविण्याची जबाबदारी येऊन पडते व खेळ मागे पडत जातो. यात पालकांचाही पूर्ण दोष आहे असे नाही. मुळातच आपल्या देशात, समाजात खेळाला, खेळाडूंना मान नाही. आज क्रिकेटमधे पैसा चांगला मिळतो म्हणून त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन थोडासा बदलला आहे. पण इतर क्रीडाप्रकारांचे काय? त्यांना किती मान मिळतो? इतर देशांप्रमाणे आपल्या इथे खेळाडू केवळ खेळ खेळून पोट भरू शकत नाही. त्यासाठी त्याला शैक्षणिक पात्रतेवरच अवलंबून राहावे लागते अथवा स्वयंरोजगाराचाच मार्ग अनुसरावा लागतो त्यामुळे पालक पूर्णता चुकीचे ठरत नाहीत.
आज पार्ल्यातील खेळाडू व त्यांचे प्रशिक्षण यांच्यासमोरही हा सर्वात मोठा प्रश्न आहेच. पण ज्यावर मात करूनही ते आपला मार्ग चालू इच्छित आहेत. आज पार्ल्यातून अनेक चांगली मुले वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात चमकताना दिसतात. पार्लेकर नागरिक व येथील राजकीय नेतृत्व त्यांचे आदरसत्कार करून त्यांना मिळणारे यश साजरेही करताना दिसतात. कौतुक हे झालेच पाहिजे. पण त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पार्लेकर, अनेकविध संस्था, सर्वच पक्षांतील राजकीय नेतृत्व यांचे काहीच कर्तव्य नाही? आपल्याला चांगले खेळाडू हवे असतील तर त्यांच्या मागे खंबीर उभे राहणेही आपलेच काम आहे. पार्ल्यात प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, लोकमान्य सेवा संघ, स्वा. सावरकर केंद्र आदि संस्था यासाठी अविरत झटत आहेत. पार्ले टिळक, महिला संघाच्या शाळाही या प्रयत्नांत सामिल आहेत पण हे प्रयत्न काही महत्त्वाच्या अडचणींमुळे तोकडे पडत आहेत.
यातील पहिली अडचण जागेची! पार्ल्यात वाढत चाललेल्या जागांच्या भावांमुळे प्रशिक्षणासाठी मोकळी जागा मिळणे अशक्य झाले आहे. इनडोअर जागेत (सभागृह वगैरे) पुरेसे उत्पन्न मिळत असेल तरच सुविधा द्यायची वृत्ती त्यामुळे बळावत आहे. मैदानांबाबत बोलायचे तर पार्ले टिळक शाळेची तीन मैदाने, महिला संघाचे एक, परांजपे शाळेचे एक व डहाणूकरचे एक व टिळक मंदीराचे एक ही खाजगी मैदाने पण त्यातील टिळक मंदिराच्या मैदानात व्यायामशाळा व इतर वेळी अनेक कार्यक्रमांनी ते व्याप्त असते. डहाणूकरचे मैदान क्रिकेटसाठी राखीव केले गेले आहे कारण इतर खेळ खेळल्यास तेथील खेळपट्ट्या खराब होतात. परांजपे शाळेचे मैदान सोसायटी व शाळा यांच्या वादात सापडले आहे त्यामुळे इतरांना तेथे प्रवेश नाही. महिला संघाचे मैदान फक्त शाळेच्या खेळाडूंकरता व पार्लेटिळक आयसीएससीचे सध्या त्यांच्या वैयक्तिक कारणांनी कोणाला दिले जात नाहिये. मराठी माध्यमाच्या मैदानात व्यायामशाळा तर इंग्लिश मिडीयमच्या मैदानात व्हॉलिबॉलचे प्रशिक्षण चालते. म्हणजे इतरांना (फुटबॉल, कबड्डी वगैरे) उरली ती महानगरपालिकेची दोन मैदाने. दुभाषी मैदान व आझाद रोडचे मैदान. आझाद रोडचे मैदान महानगरपालिकेच्या आत्यंतिक ढिसाळ देखभालीची शिकार ठरले आहे. काही स्थानिक मुले तेथे खेळतात पण शिस्तबद्ध प्रशिक्षणासाठी ते वापरता येत नाही.
दुभाषी मैदानात सकाळ संध्याकाळ चालायला येणाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे सकाळी ८ ते संध्या ४ यावेळातच तेथे खेळता येते. पण ही वेळ मुलांच्या शाळा कॉलेजची असते. म्हणजे पार्ल्यातील खेळाडूंनी खेळायचे कोठे? त्यातही आमच्या थोर मुंबई महानगरपालिकेने त्यावर “क्रिकेट, फुटबॉल खेळण्यास मानाई’ असा फलक लावला आहे मैदान हे खेळण्यासाठी नसेल तर कशासाठी असते? या दोन्ही मैदानांवर स्वच्छतागृहांची व कपडे बदलण्याची सोय नाही. त्याचा त्रास मुलींना भोगावा लागतो. त्यांनी यातून कसा मार्ग काढायचा? इतर खाजगी मैदानांप्रमाणे दुभाषी मैदानाला रात्री कुलूप लावले जात नाही. तेथे सुरक्षारक्षक नाही. दिव्यांची पुरेशी सोय नाही. त्यामुळे अंधार पडल्यावर संशयास्पद व्यक्तींचा येथे वावर सुरू होतो. जे आजुबाजुच्या इमारतीतील रहिवाशांसाठी व खेळाडूंच्या सुरक्षेसाठी घातक आहे. उत्कर्ष मंडळाच्या चौकात दिव्यांची रोषणाई करून आजूबाजूच्या इमारतीतील लोकांना रात्रभर त्रास भोगावयाला लावणाऱ्या दिग्गजांना दुभाषी मैदानातील अंधार मात्र जाचत नाही. ही मोठी आश्चर्याची बाब आहे. तेथे भरपूर उजेडाच्या दिव्यांची सोय केल्यास रात्री ८ ते १०/११ पर्यंत लहान घरांमधील गरजू मुले अभ्यासासाठी त्या जागेचा वापर करू शकतील हे यांना कळेल का?
खेळांतील सुविधा पाहिजेत हे खरे आहे पण त्यासाठी लागणाऱ्या पैशाचं काय? त्याची जबाबदारी पार्ल्यातील समाजिक संस्था म्हणजेच पर्यायाने पार्लेकर नागरिक घ्यायला तयार आहेत का?
पार्ल्यात आज महत्त्वाची गरज आहे ती एका मध्यवर्ती क्रीडा संघटनेची! सर्व क्रीडाप्रकारातील प्रशिक्षक, संस्था, शाळा व मैदाने असणार्‍या संस्था, पार्ल्यातील मान्यवर यांनी एकत्रित येऊन उपलब्ध जागा/ मैदाने सर्वांना कशी कशी आलटून पालटून वापरता येतील, उपलब्ध साधन सुविधांचा एकमेकांशी मेळ घालत कशाप्रकारे जास्तीतजास्त उपयोग होऊ शकेल यावर विचार करण्याची आज खरी गरज आहे. आपले वैयक्तीक अहम, कुरबुरी, राजकीय मतभेद बाजूला ठेऊन जर क्रीडाक्षेत्रात आपण आदर्श ठरलो तर राज्य किंवा देशालाच काय जगाला आपण उत्तम क्रिडापटू देऊ शकू एवढी गुणवत्ता येथील मुलांमधे नक्कीच आहे. खेळाबद्दलची मानसिकता बदलण्याचे काम आपण पार्लेकर नाही करणार तर कोण करणार?
“परदेशातील धोरणांप्रमाणे आपल्याकडेही “क्रिडा सल्लागार’ (स्पोर्टस कन्सलटन्ट) नेमण्याची व त्यांचा सल्ला प्रत्येक खेळाडूने घेणे अनिवार्य केले पाहिजे. ६/७ वर्षाचे मुल स्वत:ला योग्य क्रीडाप्रकाराची निवड करू शकतेच असे नाही. शिवाय त्याचा स्वभाव, अंगकाठी, शारीरिक क्षमता बघून ते त्याला खेळ ठरवायला मदत करतील अशी मुले जास्त काळ पर्यंत खेळू शकतील’.
– गणेश देवरुखकर (मल्लखांब प्रशिक्षक ).
माझा मुलगा सुश्रुत १३ व १६ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धांमधे विजेता ठरत होता. मधे त्याचे एक वर्ष दुखापतीने वाया गेले. पण स्वत:च्या मेहनतीने तो त्यातून वर आला. अर्थात डॉक्टर व त्याचे कोच उदय पवार यांची खूपच मदत झाली. पवारांनी आम्हाला त्याच्या प्रामाणिक मेहनतीवर व मुलांना आवडते ते त्यांना करू द्यावे या आमच्या विचारावर ठाम राहण्यास सांगितले. आज खेळातही, वैयक्तिक कामगिरी व्यतिरिक्त, समालोचक, कोचिंग, पंच, सल्लागार असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळे भविष्याची तशी भीती नाही वाटत. – मिलिंद करमरकर (पालक)
माझी मुलगी दुर्वा लॉन टेनिसमध्ये उत्तम यश मिळवत आहे. पण अजून ती सातवीत आहे. या पुढील वर्षांमधे तिच्यावरचा शैक्षणिक भारही वाढेल. त्यावेळी दोन्हीतील कशावर एकाग्र व्हायचे हा निर्णय तिचा तिने घ्यावा असे आम्हाला वाटते. मात्र तिला जर फक्त खेळावर एकाग्र व्हायचे असेल तरी आमचा त्याला पाठींबाच राहिल.
– राजेश देव (पालक)
फुटबॉल
पार्ले टिळक इ.मि.स्कुल, पार्ले टिळक आय सी एस सी स्कुल, महिला संघ यांचे फुटबॉलचे संघ आहेत. शिवाय पीपीएल हेही पार्ल्यात फुटबॉल मॅचेस भरवतात. ह्या खेळाचे कोच प्रसाद परांजपे सांगतात “महत्त्वाच्या शाळा, कॉलेजच्या वर्षांनांही यातील खेळाडूंची गळती होत नाही. मुलांचा पालकांचा चांगला प्रतिसाद आहे’ पण त्यांचा कोचिंगसाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्यांना सरावासाठी चांगले मैदानच नाही. शाळांची खाजगी मैदाने वापरता येत नाहीत. उरता उरले दुभाषी मैदान. तेथे चालायला येणारी मंडळी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंतच खेळू देतात. पण ही वेळ मुलांच्या शाळा कॉलेजची असते त्यामुळे सतत भांडणे होतात. शिवाय येथे क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी सर्वच असल्याने जागेचा प्रश्न निर्माण होतो. रोज नवे मैदान शोधावे लागते. या सर्व कारणांनी लहान वयातच प्रशिक्षण सुरू करता येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय, खेळाडू निर्माण करणे गुणवत्ता असूनही अशक्य झाले आहे.
बॅडमिंटन
बॅडमिंटनचे कोचिंग सध्या फक्त महिला संघच्या ओरायन स्कुलमधे उपलब्ध आहे. संस्थेने इमारतीच्या मागच्या मध्यवर्ती भागात उत्तम दर्जाचे कोर्ट बांधून दिले आहे. शाळेच्या वेळा संभाळून दिवसात ३वेळा येथे कोचिंग चालते. कोच अनंत चितळे सांगतात मुलांचा व पालकांचा प्रतिसादही येथे चांगलाच आहे. मात्र हा खेळ खर्चिक आहे. त्यामुळे सामान्य अथवा कनिष्ठ वर्गातील मुलांना परवडणे कठीण जाते. त्यासाठी चांगल्या शिष्यवृत्यांची सोय व्हायला हवी.
स्वा. सावरकर केंद्रातील बॅटमिंटन कोर्ट उघड्या मैदानात आहे. पावसाळ्यात चिखलामुळे तिथे सराव घेता येत नाही व बंदिस्त कोर्ट करण्याचा ठराव महानगरपालिकेच्या नियम व अटिंमधे अडकून पडला आहे. त्यामुळे आज खेळाडूंचा मात्र तोटा होतो आहे. वर्षानुवर्षे महानगरपालिकेत पार्ल्यातून निवडून येणारे नगरसेवक स्वत:च्या पक्षाची सत्ता पालिकेत असूनही याबाबत काही करू शकत नाहीत का?
स्विमिंग
पोहोण्यातील प्रशिक्षणासाठी पार्ल्यातली एकमेव जागा म्हणजे ठाकरे क्रीडासंकुलाचा जलतरण तलाव. पार्ले टिळक शाळेच्या ज्या विहिरीत इथल्या मुलांच्या अनेक पिढ्या पोहायला शिकल्या ती विहिर गेले काही वर्षे बंद पडलेली आहे. आजच्या मुलांवरही मार्कांच्या रॅटरेसचा ताण आहेच त्यात अभ्यास, पोहोणे, अजून एखादा खेळ त्यातच नृत्य अथवा गायन अशा अनेक क्लासना मुलं जात असतात. त्यांच्या वेळा आणि त्यातील कष्ट यामुळे ती कशावरच नीट एकाग्र होऊ शकत नाहीत व त्याचा प्रशिक्षणावरही परिणाम होतो. त्यातच आजच्या पालकांना प्रत्येक गोष्टीत “फास्ट रिझल्ट’ लागतात. पोहोण्याच्या सर्व मोठ्या स्पर्धा साधारण एप्रिल नंतर सुरू होतात. पण मार्चमधे शालेय व कॉलेजच्या परीक्षा येतात. इतर सर्व राज्यांत स्पर्धांसाठी खेळाडूंना शाळा, कॉलेज व परीक्षांमधे कन्सेशन दिले जाते. जे महाराष्ट्रात मिळत नाही. बहुतेक मुले ९वी १०वी नंतर चांगला परफार्मन्स मिळत असूनही गळतात. स्पर्धेतील सर्व तयारी जरी कोच करून घेत असते तरी जी काळजी, उदा. मुलांची मानसिक काळजी, त्यांचा आहार, पालकांनी घ्यायची ती विशेष घेतली जात नाही असे कोच संदीप नेवाळकरांचे म्हणणे आहे.
व्यायामशाळा
पार्ले टिळक शाळा, टिळक मंदिर, हेडगेवार मैदान या ठिकाणी लहान मुलांसाठी व्यायामशाळा उपलब्ध आहेत. थोडेफार वार्मअपचे व्यायाम व नंतर मुलांना आपल्या मनाप्रमाणे ऍथलॅटटिक, फुटबॉल, व्हॉलिबॉल, साखळी, फिस्की, लगोरी पद्धत. मुलांना मैदानावर मनसोक्त खेळायला मिळावं हा त्यामागील हेतू आहे.
पालकांची अपेक्षा फक्त मुलांना खेळायला मिळावे अशी असल्याने एखाद्या खेळाचे विशेष प्रशिक्षण देता येत नाही. पार्ले टिळक मधे मैदानाची देखभाल नीट झाली व त्यात ट्रॅक आखता आले तर ऍथलेटिक्सची तयारी मुलांकडून करून घेणे शक्य आहे. थोड्याफार सोई उपलब्ध झाल्यास लांब उडी, गोळाफेक घेता येणे शक्य आहे. त्यासाठी संस्थेकडून पाठींबा मिळण्याची गरज आहे. सध्या पार्ल्यातील मुलांना ऍथलेटीक्ससाठी जुहूला जावे लागते यात वेळ जातो असे प्रशिक्षिका मोहिनी जुवेकर यांनी सांगितले.
जिमनॅस्टीक्स
प्रबोधनकार, टिळक मंदीर येथील प्रशिक्षणाला पालकांचा व मुलांचा चांगला प्रतिसाद असलेला हा खेळ. पण या खेळासाठी लागणाऱ्या सामुग्रीची (गाद्या, बॅलन्स बीम, रोलिंग रोप इत्यादी) कमतरता हा यातील सर्वात मोठा प्रश्न असे प्रशिक्षिका मृदुला दातार यांनी सांगितले टिळकमंदिरात ते हा खर्च कसाबसा भागवतात पण त्यामुळे त्यांना मर्यादीत ४० मुलेच घेता येतात. जिमनॅस्टीक्स प्रशिक्षक निलम बाबर सांगतात या खेळासाठी लागणारी उपकरणे अत्यंत महागडी (अनेकदा २/३ लाखाची) असल्याने संस्थांना स्वत:ची घेणे कठीण होते. यासाठी सरकारची ग्रॉंट मिळावी यासाठी प्रचंड पेपरवर्क करावं लागतं. तसेच सरकारी निधीतून मिळणारी उपकरणे देतात जी दुय्यम दर्जाची असतात. आज दोन्ही संस्थांची मुले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धात भाग घेत आहेत. त्यांच्या अधिक तयारीसाठी पूर्वी संस्थेचे प्रशिक्षक त्यांना बालेवाडीलाही घेऊन जात. पण आता बालेवाडीतील उपकरणेही जुनी व वापरता येण्याजोगी राहिली नाहीत.
मल्लखांब
मल्लखांब या देशी खेळाचे प्रशिक्षण पार्लेश्वर व्यायामशाळा व हेडगेवार व्यायामशाळेत दिले जाते लंगडी, आट्यापाट्या, मल्लखांब खोखो आदि देशी खेळांना आपले सरकारच प्रोत्साहन देत नाही. त्याचा समावेश सी ग्रेडच्या खेळांत केला जातो व त्यामुळे राष्ट्रीय खेळातही त्यांच्या स्पर्धा ठेवता येत नाहीत. या खेळांनी खेळाडूंमधे “स्पोर्टस फिटनेस’ येतो. आपण रग्बी सारखे विदेशी खेळांना प्रोत्साहन देत आहोत पण देशी खेळांकडे दुर्लक्ष करीत आहोत. आज रग्बीमधे पुढे येणारे खेळाडू (आपल्या देशाचे) मुख्यत्वे आट्यापाट्या मल्लखांबातून प्रशिक्षित झालेले आहेत.
कबड्डी
पार्ल्यात कबड्डीचे सामने भरवणारे गजानन क्रीडा मंडळाचे दादा मोडक सांगतात पार्ल्यात कबड्डीचे संघ आहेत. शिवाय महिलांचे तीन संघ आहेत. पण त्यांच्यासाठीही सरावासाठी मैदान हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. रोज वेगळ्या जागी सराव करावा लागतो. मुलगे एकवेळ येतात पण एक हेगडेवार मैदान सोडले तर इतर मैदानांवर स्वच्छतागृहाची व कपडे बदलण्यासाठी जागेचा अभाव आहे याचा त्रास मुलींना फार प्रमाणात होतो. याकडे कोणाचेच लक्ष नाही.
क्रिकेट
पार्ल्यात क्रिकेटला तशा काहीच अडचणी नाहीत असे क्रिकेट प्रशिक्षक सुरेन आयरे यांचे म्हणणे आहे. डहाणूकरचे मैदान पूर्णपणे त्यांच्यासाठी राखीव आहे. पार्ले टिळक असो.ने त्यावर प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी धावपट्टी बनवलेली आहे. गुणवान खेळाडू येथे घडत आहेत. तरीही अधूनमधून बेधूंद मंडळी येथे चोरटा प्रवेश करून बाटल्या व त्यांच्या काचा टाकत असतात. या मंडळींचा बंदोबस्त होऊ शकतो का?

वाहतूकीचा चक्रव्यूह उदासीन प्रशासन-बेजबाबदार नागरिक

रस्त्यावरून चालत असताना अनेकदा करकचून मारलेला ब्रेक, अंगाला चिकटून गेलेली रिक्षा अथवा बाईक हा आपल्याला तसा रोजचाच अनुभव. त्यात वेगळे काही नाही. तरीपण जेव्हा जेव्हा हे घडते तेव्हा तेव्हा आपण भांबावून जातो, वैतागून तात्पुरते ओरडतो. ट्रॅफीकला, पोलीसांना, वाहनचालकांना व सरकारला शिव्या घालतो व पुन्हा “ये रे माझ्या मागल्या’ करत आपल्या रोजच्या दिनचर्येत बुडून जातो. कुणाला अपघात झाला, कुणाचा जीव गेला तर हा विषय डोक्यामधून जायला थोडा अधिक वेळ लागतो इतकंच. पण पुढे काय? यावर काही ठोस उपाय आपण करणार की नाही?

विलेपार्ल्यातील ट्रॅफिक समस्या दिवसेंदिवस आणखीनच भीषण होते आहे. विमान तळावर पार्किंगचे शूल्क वाढवल्यापासून ट्रॅव्हल कंपन्यांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात पार्ल्याच्या वेगवेगळ्या गल्ल्यांमधे पार्क केल्या जातात. त्यांचे वाहनचालक घोळक्याने उभे असतात. त्यांच्यासाठी खाण्याचे ठेले वाढू लागले आहेत. रिकाम्या मंडळींकडून येणाऱ्याजाणाऱ्या मुलींची महिलांची छेडछाड काढली जाते. वाहक आजुबाजुस असल्याने गाडी “टो’ करून नेली जात नाही. एकूणच अनधिकृत पार्किंग ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. गेल्या महिन्यात आमदार ऍड. पराग अळवणी व नागरिकांनी याविरुद्ध एकत्र येऊन यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थितीमध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही. एकीकडे ही समस्या तर दुसरीकडे अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या. म.गांधी रोडवर भाजी मार्केट मधे भाजीवाल्यांच्या दुप्पट अनधिकृत फेरीवाले आहेत. गाडी घेऊन भाजी व इतर खरेदीसाठी येणारे लोक प्रत्येक ठिकाणी गाडी थांबवत थांबवत खरेदी करत राहतात. त्यामुळे इतक्या रूंद रस्त्यावरही दोन्ही बाजूस गाड्यांच्या रांगा लागतात व येण्याजाण्याला मिळून जेमतेम एक गाडी जाण्याची जागा शिल्लक राहते.

फुटपाथ तर जवळजवळ कुठे शिल्लकच नाहीत. फुलवाले, वडापावच्या गाड्या, अपंगाचे स्टॉल, भिकारी यांनाच ते आंदण दिलेत की काय अशी शंका येते. कुठे थोडाफार शिल्लक असलेच तर ते उंचसखल, तर कुठे पेव्हर ब्लॉक उखडलेले असतात. फुटपाथच्या उंचीमधे कोणतेही समान प्रमाण नाही. तो चढण्यासाठी भल्याभल्यांचा जीव मेटाकुटीस येतो. हे सर्व काय आहे? याकडे आपण एकजुटीने लक्ष घालणार आहेत का फक्त प्रशासनाच्या नावाने बोटे मोडत शांत बसणार आहोत?

हेच सर्व प्रश्न घेऊन “आम्ही पार्लेकर’ची टिम वाहतूक सल्लागार समिती सदस्य प्रसाद कुलकर्णी यांच्या समवेत ट्रॅफिक पोलिस इनचार्ज श्रीधर हंसाटे यांना भेटली. त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चाही झाली. त्यांनीही त्यांच्या समस्या मांडल्या. शिवाय पार्लेकरांच्या सहाय्याने यावर उपाय योजना करण्याची तयारीही दाखवली. त्यांच्या अखत्यारीत बीकेसी, निर्मलनगर, आंतरराष्ट्रीय विमानतळ, विलेपार्ले, खेरवाडी, वाकोला एवढी उपनगरीय प्रभाग येतो. त्यात १४०० जंक्शन येतात व दिमतीला फक्त २८०० पोलिस स्टाफ आहे. विमानतळ असल्याने सतत व्हीआयपी लोकांचे येणे जाणे तसेच सततचे राजकिय, सामाजिक, समारंभ अनेकविध मोठ्या कंपन्यांची मुख्यालये, पासपोर्ट व विविध देशांची व्हिसा ऑफिसेस त्यामुळे स्टाफ नेहमीच कमी पडतो.

अनेक गल्ल्यांना पाट्या नाहीत, मार्गदर्शक फलक सुस्थितीत नाहीत. शाळा व तत्सम जास्त रहदारीच्या जागी झेब्रा क्रॉसिंग साठी लागणारी साधनसामुग्री हे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विषय. पण महानगरपालिका सहकार्य देत नाही. गाडी “टो’ करण्यासाठी अजूनही जुन्या क्रेनचाच वापर होतो. आताच्या नविन गाड्या त्यापद्धतीने उचलता येत नाहीत. उचलल्यास बंपर तुटतो. त्या हलवता येऊ नयेत म्हणून चाकांना क्लॅम्प लावता येतो पण एवढ्या मोठ्या विभागासाठी फार कमी क्लॅम्प पुरवले जातात. अशावेळी केवळ ट्रॅफिक पोलीस वाहतूक समस्येवर काय करणार?

पार्ल्यातील काही रस्त्यांची परिस्थिती इतकी बिकट आहे की त्यावरील खड्‌ड्यांमुळे आणि उखडलेल्या पेव्हरब्लॉक्समुळे रस्त्यांवरून चालणे आणि वाहन चालवणे हे अत्यंत जिकीरीचे झाले आहे. उदा. श्रद्धानंद रोडच्या साईबाबा मंदिराच्या आसपासचे सर्व रस्ते, पार्क रोड, नरिमन रोड इ. महानगरपालिकेचा अनेक ठिकाणी असलेला असहकार मोडून काढणे. नियोजित कामांना वेळेत निधी पुरवणे व आपल्या आमदार, खासदार निधीतून सांस्कृतिक कार्यक्रम करण्यापेक्षा वॉर्डन, क्लॅम्पस पुरवणे, रस्त्यांची योग्य दुरूस्ती वेळोवेळी करणे, विविध सिग्नल चालू करून घेणे, उघडी गटारे, त्यावरील झाकणे या सर्व प्रश्नांमधे मुख्यत: नगरसेवकांनी जातीने लक्ष घालण्याची गरज आहे.

पार्ल्यातील सामाजिक संस्था व नागरीक एकत्र आले तर सर्व ट्रॅफिक पोलिस यंत्रणा आपल्या सहकार्याला तयार आहे. त्यांनी सुचवलेले काही तोडगे खालीलप्रमाणे :-

१.     बीकेसी मधे त्यांनी होमगार्ड किंवा तत्सम ठिकाणच्या रीटायर्ड लोकांना प्रशिक्षण देऊन वाहतूक व सुरक्षेसाठी काम करणारे ४० लोकांचे पथक तयार केले आहे. त्यांचा खर्च तेथील मोठ्या बॅंका व कंपन्या देतात. असे वॉर्डनसचे पथक पार्ल्यात निर्माण करायचे असेल तर प्रशिक्षण द्यायची त्यांची तयारी आहे.

२.    नो एन्ट्री, नो पार्किंग इ. मार्गदर्शक फलक व रस्त्यांचे नामफलक यासाठी कुणी प्रायोजक मिळाल्यास ते योग्य प्रकारे लावून घेण्याची सोय होईल.

३.    रहदारीच्या जागी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखण्यासाठी आर्थिक तरतूद होत असल्यास करून देण्याची तयारी आहे.

४.    म. गांधी मार्ग (सनसिटी ते भोगले चौक) “नो स्टॉपिंग झोन’ करण्यात यावा.(गाडी थांबवण्याची परवागनी नाही)

५.    गर्दीच्या ठिकाणच्या अनधिकृत पार्किंगच्या समस्येवर गाडीला लावायचे ४०/५० क्लॅम्प जर पार्लेकरांनी पुरवले तर ही समस्या झटकन सुटू शकते. (एका क्लॅम्पला रुपये ३/४ हजार पडतात)

नागरिकांसाठी सूचना

१.     रस्त्यावरून बेदरकारपणे दुचाक्या चालवणे, एका दुचाकीवर ३/४ जणांनी बसणे हे स्वत:च टाळणे गरजेचे आहे.

२.    हनुमान रोड सीसीडी येथे सिग्नल पाळला जात नसल्याने वाहतूकीचा गोंधळ निर्माण होतो.

३.    भाजीबाजार, हनुमान रोड, येथे खरेदी करताना दुकानांशी गाडी थांबवून खरेदी करणे टाळावे.

४.    वनवेमधे वाहने घालून पादयाऱ्यांना व समोरून येणाऱ्या चालकांचा गोंधळ उडवणे बरोबर नाही.

५     फुटपाथवर दुचाक्या पार्क करून ठेवणे अयोग्य आहे.

६. पालकांनीही वाहनासकट शाळेच्या दारावर उभे राहाणे टाळावे व नियमांचे पालन करूनच वाहने चालवावीत. नो एंट्रीत घूसू नये कारण मुले बेसावधपणे चालत असतात.

पदपथांची दूरावस्था

१.     बहुतेक ठिकाणी पदपथ आस्तित्वातच नाहीत.

२.    जेथे आहेत तेथे विकलांगांचे बुथ, दुधाच्या टपऱ्या, फुलवाले, वडापाववाले व लहान मोठ्या फेरीवाल्यांनी पदपथ अडवले आहेत.

३. पुर्नबांधणी चालू असलेल्या अनेक इमारतींच्या गेटसमोरील उतार वाहनांसाठी एवढे उतरते ठेवले आहेत की तेथून चालताना चक्क तिरके चालावे लागते, जे वयोवृद्धांनाच काय सामान्य माणसासही अवघड होते. इमारतींच्या कार्यकारणीने याची दखल घेऊन योग्य उपाययोजना करावी.

४.    अनेक पदपथांवरील पेवर ब्लॉक्स उखडलेले आहेत. त्यामुळे चालणे अशक्य होते.

५.    अनेक पदपथांवर भिकारी संसार थाटून बसलेले आहेत उदा. म. गांधी रोड पार्ले टिळक शाळे बाहेरील फुटपाथ, गरवारे चौक ते बहार जंक्शन.

६.     काही ठिकाणी पदपथांची उंची इतकी जास्त आहे की त्यावर चढणे अशक्य होते. उदा. बहार जंक्शनचे तोंड मोठे केल्याने रस्ता ओलांडणाऱ्यास धावत रस्ता ओलांडावा लागतो व लगेच समोर येणाऱा पदपथ खूप उंच आहे.

पार्लेकरांच्या मागणीनुसार ४ जानेवारी पासून ट्रॅफिक पोलिसांचे नवीन ऑफिस नेहरूरोड जवळील हायवेवर पुलाखाली (हॅपीहोम सोसायटीसमोरील बाजू)सुरू झाले आहे. चुकीच्या पार्किंगसाठी उचलण्यात येणारी पार्ले परिसरातील सगळी वाहने इथे आणली जातात. मात्र अजून इथे वीज व पाणी या सारख्या प्राथमिक सुविधादेखील पुरवण्यात आलेल्या नाहीत. संध्याकाळी बॅटरीच्य़ा प्रकाशात डासांचा त्रास सहन करत इथले कर्मचारी काम करत आहेत. ही परिस्थिती लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे.

ट्रॅफिक पोलिसांसाठी काही सूचना

१.     म. गांधी मार्ग (सनसिटी ते नेहरू रोड) टो अवे रोड किंवा नो स्टॉपिंग झोन करावा (म्हणजेच वाहन चालण्यास परवानगी, थांबण्यास नाही) कारण अनेकजण दुहेरी गाड्या उभ्या करत खरेदी करतात. गाडीत चालक असल्याने कारवाई होत नाही.

२.    वि.स. खांडेकर मार्ग हनुमान रोड टोक ते पार्ले बिस्किट फॅक्टरी हा रस्ता रुंद करावा व तेथून दुहेरी वाहन मार्ग चालू करावा. म्हणजे म. गांधी मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्ग मिळेल.

३.    स्टेशन ते रामकृष्ण हॉटेल पर्यंतचा एकेरी केलेला मार्ग दुहेरी करावा. उगाचच सर्व वाहतूक भाजी मार्केटमधून जाते व अडकते.

४. क्रंची मंची, अगरवाल मार्केट आदी ठिकाणी पार्किंगच्या जागी अनधिकृत फेरीवाले आहेत त्यांना हटवून पार्किंगच्या जागा मोकळ्या कराव्यात.

५.    गरवारे चौक व बहार जंक्शन येथे सिग्नल का नाहीत? दिवसभर तेथे वाहतुकीचा गोंधळ असतो. पोलीस हजर असूनही त्यांना आवरणे अशक्य होत असते.

६.     हनुमान रोड वरील सिग्नल कोणीच नीटपणे पाळत नाहीत. पोलीस समोर असून हे घडत असते.

७.    अनेक ठिकाणी वळणावरच मोठ्या पोलीस व्हॅन उभ्या असतात (हनुमान रोड, सुभाष रोड गरवारे चौक, पार्लेश्वर मंदिर). त्यांचा बंदोबस्त करणे

रिक्षाचालकांसाठी सूचना

उपनगरवासियांसाठी रिक्षा हे सोईस्कर वाहन आहे पण रिक्षावाल्यांचे वागणे, रिक्षा पार्क करणे आदि समस्या होऊन बसल्या आहेत.

१.     रिक्षावाले फक्त स्टेशनच्याच फेर्या मारायला तयार असतात इतर ठिकाणी जाणे नाकारतात.

२.    रिक्षा बहुतेक वेळा स्टेशनच्या दारात, रस्त्यांच्या वळणांवर, फाटकांच्या समोर उभ्या असतात. दुहेरी रांगाही लावल्या जाताना त्यामुळे चालण्यास फार अडचण होते.

३.    शिवाजी चौक शहाजी राजे मार्ग येथे फुटपाथच नाही. त्यामुळे वाहने विशेषत: रिक्षावाले रस्त्याच्या इतक्या कडेने वाहने चिकटवत आणतात की चालायला जागाच नसते.

शाळांसाठी सूचना

पार्ले टिळक विद्यालय व महिला संघ या शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होते. पार्ले टिळक शाळेच्या परिसरात ५/६ शाळा येतात. त्याच्या भरण्याच्या सुटण्याच्या वेळात १०/१५ मिनिटांचे अंतर आहे. तरीही स्कुलबस, रिक्षावाले व पालक आणि त्यांची वाहने यांनी परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होते. शाळांनी वेळांमध्ये थोडे बदल केल्यास हे गोंधळ नक्कीच कमी होऊ शकतात.

१. महिला संघ व पार्ले टिळकच्या सर्व शाळांसमोर मैदाने आहेत. तरी स्कुलबसेसना थोड्या वेळासाठी शाळेच्या आवारात उभे राहण्याची परवानगी द्यावी.

२. पार्ले टिळक मराठी माध्यमाची शाळा सोडताना विद्यार्थ्यांना रस्त्याकडच्या बाजूने बाहेर सोडण्याऐवजी मैदानात सोडावी व शाळेत येणारी मुले रस्त्याकडून घ्यावी. त्यामुळे मुलांची सुरक्षितताही जपली जाईल व पालकांचा अर्धा जथाही मैदानात उभा राहिल.

आपण पार्लेकर सुशिक्षित आहोत. सुसंस्कारीत व सामाजिक नियम पाळणारेही आहोत. अनेकांची मुलेबाळे परदेशी आहेत. मग परदेशाच्या वाऱ्या करून आल्यावर तेथील शिस्तीचे संस्कारही आपण घेतले आहेत हे दाखविण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे. विलेपार्ल्याला स्वत:ची वेगळी ओळख मुंबईतच नाही महाराष्ट्रातही आहे. भले देशातील ट्रॅफिकला शिस्त नसेल पण पार्ल्यात मात्र शिस्तशीर वाहतूकच होते हे जगाला (कारण आपली मुले जगभर आहेत) दाखवणे ही आता आपली नैतिक जबाबदारी आहे.

विषारी विळखा-मोबाइल टॉवर्सचा

१९४७च्या उत्तरार्धात विल्यम रेंच हा शास्त्रज्ञ एका अनोख्या “फ्रिक्वेन्सी बॅड’वर संशोधन करत होता. ज्याचा उपयोग सीआयए एका छुप्या मिशनसाठी करत होती. मिशन होते लोकांच्या नकळत त्यांच्यावर मानसिक नियंत्रण ठेवण्याचे. या लहरींमुळे लोकांत अस्वस्थता, मळमळणे, भावनिक-वैचारिक गोंधळ, ग्लानी आदि लक्षणे दिसू लागली. आपल्या संशोधनाचा उपयोग अमेरिकन सामान्य जनतेवर अशा भयंकर प्रकारे केला जात आहे हे रेंचच्या लक्षात यायला काही वर्षे गेली पण लक्षात येताच त्याने सीआयएशी बंड पुकारले व काम करण्यास नकार दिला. पुढे काही दिवसातच त्याचा खून झाला.

ही गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे याच संशोधित लहरींपैकी काहींचा वापर आज सर्रास केला जातो. तोही आपल्या नकळत, आपल्या सर्वाच्या लाडक्या “मोबाईल फोन’साठी! हो, मोबाईल फोनच्या प्रक्षेपणासाठी याच लहरींचा वापर त्याच्या टॉवर्सवरून केला जातो. या फोनच्या रूपाने आज एक जिवंत अणूबॉम्ब आपण आपल्या घरातच नाही तर हातात खेळवत आहोत याची आपल्याला कल्पना आहे? आज सामान्यातील सामान्य माणसाच्याच नाही तर अगदी लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत सर्वांवर या मोबाईल फोनची मोहिनी आहे. हा मोबाइल फोन व त्याच्या टॉवरमधून प्रक्षेपित होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटीक लहरी आपल्या मनावर, शरीरावर दिवसरात्र येऊन आदळत आहेत. ज्या लहरींचा जन्मच मुळी लोकांना मोठ्या प्रमाणावर नियंत्रित करण्यासाठी, त्यांच्या तनामनाला हानी पोहोचवण्यासाठी झाला आहे त्याला आज आपण आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे आणि त्याच्या विरोधात एक शब्दही ऐकून समजून घ्यायला कुणी तयार नाही.

याबाबत माहिती गोळा केली असता या लहरींवरील संशोधन मुख्यत्वे २०११ सालापूर्वीचे दिसते व तेही अमेरिका, इंग्लंड सारख्या देशात. जिथे ते मुख्यत्वे या लहरींपासून धोका असल्याचे अमान्य करतात.

सुमारे २०० फुट उंचीच्या मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅगनेटीक लहरी जरी जमिनीला समांतर जात असल्यातरी त्या क्रॉंक्रिटच्या भिंतीनाही भेदून जातात. एवढ्या ताकदीच्या लहरी आपल्या शरीरावर, मनावर परिणाम करणार नाहीत हे शक्य तरी आहे का?

म्हणूनच या टॉवर्ससाठी स्थानिक शासकिय यंत्रणांसाठी परवानगी कायद्याने घेणे आवश्यक केले आहे. मात्र मोबईल कंपन्या अनेक ठिकाणी अनधिकृत टॉवर्स उभारत आहेत. २००६साली महानगरपालिकेने या टॉवर्ससाठी काही नियमावली बनवली आहे ज्यात टॉवर पासून ३० ते ५० फूटापर्यंत शाळा, हॉस्पीटल व शेजारील इमारत असता काम नये. पार्ल्याचे क्षेत्रफळ बघता ३१४ टॉवरच्या रेंजमधे कोण येत नाही हाच खरंतर प्रश्न आहे. संशोधनात टॉवर्सच्या आसपासच्या परिसरातील वातावरणही साधारण २ अंशाने वाढते असे दिसले आहे. या निर्माण होणाऱ्या उष्णतेचाही मानवावर, पशुपक्षी व सर्वच निसर्गावर परिणाम होणे अभिप्रत आहे. आपण सर्व एक इलेक्ट्रोमॅगनेटिक कढईत उकळले जात आहोत व आपल्याला याचे भानही नाही.

मोबाईल टॉवर्सच्या दुष्परिणामांविरुद्ध गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी निकराने संघर्ष केला असे नाव म्हणजे नीला रविंद्र. महात्मा गांधी रस्त्यावरील त्यांच्या सात मजली इमारतीसमोर असलेला टॉवर बरोबर त्यांच्या घराच्या खिडकीसमोरच आहे. त्याच्यामुळे त्यांना व त्यांच्या पतीला कर्करोगाला तोंड द्यावे लागले. त्यांच्याच इमारतीतील त्यांचे नातेवाईक अलझायमरला बळी पडले. त्यांचा रोग झपाट्याने वाढला. टॉवरविरोधात लढा देताना त्यांच्या लक्षात आले की टॉवर बसवण्याची परवानगी दिल्लीहून आणावी लागते. या शासकीय चक्रव्युहाला काय म्हणावे? टॉवर बसवताना पालिकेने आखून दिलेल्या नियमांचे पालनही टॉवर कंपन्या करत नाहीत. त्यावर कोणतीही कारवाई होत नाही ही दु:खाची बाब आहे.

अनेक इमारती केवळ पैशाच्या लोभाने हे टॉवर इमारतींवर बसवण्यास परवानगी देतात. यातून निघणाऱ्या लहरींमुळे आजूबाजूचा परिसर दूषित होतोच पण अनेकदा जुन्या, इमारती या टॉवरसाठी केलेल्या ड्रीलिंगमुळे खिळखिळ्या होतात व भूकंप वा इतर नैसर्गिक आपत्तीत विनाशाला कारणीभूत होतात. चूकीच्या व जास्त दाबाच्या विजवाहक वायरींमुळे आगीचा धोकादेखील संभवतो. टॉवर कंपन्या या साऱ्याचा इन्कार करतात. मात्र कर्मचारी टॉवरचे फिटींग २/३ तासात करून चूपचाप पळून जातात ते कशामुळे? प्रक्षेपण बंद पडू नये म्हणून लावलेले जनरेटर्स व टॉवर्समधील लहरी यामुळे कंपन निर्माण होऊन इमारतीला धोका निर्माण होतो.

आज विलेपार्ल्यात बहुतेक ठिकाणी पुर्नबांधणी प्रकल्प चालू आहेत ज्यात इमारतींची उंची ७/८ मजल्यापर्यंत किंवा त्याहूनही जास्त होत आहे. पण आजचे जवळजवळ सर्व टॉवर्स ३/४ मजली इमारतींवर आहेत. म्हणजेच त्यातून बाहेर पडणाऱ्या लहरी सरळसरळ उंच इमारतींमधील घरात घुसत आहेत. शासनाच्या नियमानुसार आजुबाजूच्या इमारतींच्या उंचीपेक्षा टॉवर उंचावर असणे आवश्यक आहे पण त्याकडे आज तरी पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. टॉवर बांधण्या आधी आजूबाजूच्या इमारतींमधील रहिवाश्यांची पूर्व परवानगी घेणे देखील आवश्यक असायला हवे.

हे टॉवर व मोबाइल म्हणजे सरळ सरळ ट्रान्समीटर व रिसीव्हर आहेत. आपल्या घरातील वायफायसुद्धा यातच मोडते. पण त्याला गरज नसताना बंद ठेवणे आपल्या हातात असते. पण या टॉवर व मोबाईलच काय? या धगधगत्या बॉम्बपासून आपण कसे वाचायचे? असंख्य वाढत चाललेल्या मोबाइल कंपन्या, टॉवर बनवणाऱ्या कंपन्या, परदेशी तंत्रज्ञानाचा न समजता केला जाणारा अतोनात वापर, या साऱ्यांभोवती फिरणारे प्रचंड पैशाचे राजकारण आणि आपल्या राजकारण्यांची बेपर्वाई यात सामान्य जनता कोठे गरगरत जाणार आहे?

या समस्येवर सर्वमान्य तोडगा, मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रशासन, मोबाइल कंपन्या आणि नागरिक यांनी एकत्र येणे अत्यंत गरजेचे आहे.

केवळ मुंबईत २००० अनधिकृत टॉवर्स असल्याची नोंद २०१२ मधे घेतली गेली आहे. आज स्थानिक पातळीवर विचार करता केवळ विलेपार्ले (पू) विभागत ३१४ टॉवर्स असल्याची नोंद महानगरपालिकेत आहे.

संशोधन म्हणते

आयआयटी खरकपूर, कोलकत्ताचे नेताजी सुभाषचंद्र बोस रीसर्च इन्स्टीटयूट यांच्या संशोधनात टॉवरच्या आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांना नैराश्य, विस्मरण, डोखेदुखी, श्रवणशक्तीची होत गेलेली हानी आदी फरक जाणवले आहेत. त्याचप्रमाणे निद्रानाश, त्वचाविकार, हृदयरोग, अलझायमर आदिचे त्रास दिसून आले व त्यात झपाट्याने वाढ झाली. ज्या माता या वातावरणात राहत होत्या त्यांच्या काही नवजात शिशूंमधे जन्मजात दोष दिसून आले. अशाच प्रकारचे दोष हिरोशिमामधे अणूबॉम्बच्या स्फोटानंतर दिसून आले होते आणि तरीही मोबाईल आपल्यासाठी वदरान आहे?

डॉक्टर म्हणतात

डॉ. मेधा शेट्ये – ज्या ज्या परिसरात मोबाइल टॉवर्स आहेत. त्या परिसरातील इमारतींमधून गेल्या ५/१० वर्षात अचानक अनेक कॅन्सर पेशंटस येऊ लागले आहेत. त्याचप्रमाणे हार्टपेशंटस्‌ मानसिक अस्वस्थता तसेच या इमारतीतील तरूण मुलांत इनफर्टीलिटी (पुनरूत्पादन न होणे) चे प्रश्न निर्माण होत आहेत. डोके दुखी, निद्रानाश, रक्तदाब आदींचेही प्रमाण वाढते आहे.

डॉ. अनुया पालकर – या इलेक्ट्रोवेव्हजमुळे माणसातील पेशींचे आकार व बंधच बदलून जातात. ज्याच्या परिणाम पुढे येणाऱ्या पिढीवरही होणार आहे.

डॉ. शशांक जोशी (प्रसिद्ध इन्फ्रोक्रायनॉलॉजिस्ट-अंत:स्त्रावी ग्रंथीतज्ज्ञ) – या किरणांच्या प्रभावाने शरीरातील वाहणाऱ्या अनेक स्त्रावांवर (उदा. इन्शुलिन) विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच ब्रेन ट्युमरचीही शक्यता वाढत जाते.

थ्रीजीसाठी आवश्यक असलेल्या (८० ते १०० डी.बी.एस.) अतिशक्तीशाली प्रक्षेपणाची चांगली रेंज येण्यासाठी आवश्यकता असते. ही तीव्रता निश्चितच हानीकारक आहे. क्ष किरण व अतीनील किरणांपेक्षा आरएफ लहरी कमी धोकादायक आहेत असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे असले तरी बहुतेकवेळा टेलिकॉम कंपन्या इंटरनॅशनल कमिशन ऑफ नॉन-आयोडाइज्ड रेडिएशनने ठरवून दिलेली ६०० मायक्रोवॅट क्षमतेची मर्यादा ओलांडून व ७६२० पर्यंतच्या क्षमतेचे अतिदाहक प्रक्षेपण करताना आढळले आहेत. म्हणूनच आज विदेशात व भारतात अनेक व्यक्ती, संस्था या टॉवर्सच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत.

मोबाइल ही आज प्रत्येकाची गरज आहे. मात्र या टॉवर्समधील लहरींचा त्याचप्रमाणे मोबाइलचा आपल्या शरिराला कमीतकमी उपद्रव व्हावा यासाठी खालील पथ्ये पाळणे गरजेचे आहे.

१.     टॉवरसाठीचे कायदे अधिक कडक करणे

२.    परवानगीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना न देता टीआरएआय (टेलिकॉम रेग्युलेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया)सारख्यांना देणे. ज्यामुळे या कंपन्यांवर चाप बसू शकेल व भ्रष्टाचारालाही आळा बसेल.

३.    त्या त्या परिसरातील इमारतींची उंची लक्षात घेऊन टॉवरची परवानगी देणे.

४.    मोबाइलचा वापर केवळ संभाषणासाठी केला व इतर गोष्टींसाठी कम्प्युटरचा वापर केला तर टॉवरवरील भार कमी होऊन टॉवरची संख्या व त्यावरील फनेलची संख्या मर्यादीत राहिल.

५.    काम संपताच वायफायला विश्रांती देणे.

६.     घरात ऑफिसमध्ये असताना लॅण्डलाईनचा जास्तीत जास्त वापर करणे.

७.    समाजात जागृती घडवून सर्वांनी एकत्रीतपणे टॉवर कंपन्यांना नियमांचे काटेकोर पालन करायला लावणे.

समस्या कचऱ्याची… तोडगा नागरिकांच्याच हाती

आपले पार्ले अधिक स्वच्छ, सुंदर व सुरक्षित व्हावे या उद्देशाने पार्लेकर नागरिकांच्या मागण्यांचा एकत्रित जाहीरनामा ऑक्टोबर महिन्यात “आम्ही पार्लेकर’ तर्फे तयार करण्यात आला. या जाहीरनाम्यातील प्रमुख समस्यांविषयी आणि त्यावरील उपाययोजनांसंबंधी सविस्तर लेखमाला या महिन्यापासून सुरू करत आहोत. याविषयी आपल्या काही सूचना असतील तर आमच्याशी जरूर संपर्क साधावा.

आपले विलेपार्ले उपनगर ही मुंबईच्या पश्चिम उपनगरांची सांस्कृतिक राजधानी मानली जाते आणि संस्कृतीचा उगमच मुळी स्वच्छतेपासून होतो. कोणत्याही गोष्टीची स्थापना करताना आपण प्रथम ती जागा स्वच्छ करून घेतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या “स्वच्छता अभियाना’ची सुरूवात मुंबईत आपल्या पार्ल्यातील सुजाण आणि सुशिक्षित लोकांनीच केली पाहिजे. आज पार्ल्यातील बहुतांशी रस्ते लोकांच्या प्रयत्नांमुळे बऱ्यापैकी स्वच्छ दिसतात. पूर्वी जागोजागी भरलेल्या कचराकुंड्या, हे दृश्यही बदललेले दिसते. आपल्या प्रयत्नांना महानगरपालिकेचीही मोलाची साथ आहे. यासंबंधी के-पूर्व वॉर्डचे अधिकारी श्री. पिंपळे यांची भेट घेतल्यावर काही महत्त्वाची माहिती समजली. सर्व पार्ल्यातून रोजच्या रोज ६० ते ७० मेट्रीक टन कचरा महानगरपालिका उचलते. उपहारगृहांसाठी वेगळ्या गाड्यांची (रात्रीच कचरा नेणाऱ्या) सोयही पालिकेने केली आहे. भाजी बाजारातील रोजचा 2 टन कचरा जैविक खत प्रकल्पात जावा यासाठीही ते प्रयत्नात आहेत. पण हे सर्व म्हणजे स्वत:चे अंगण झाडून कचरा दुसऱ्याच्या आवारात टाकण्या सारखे आहे.

केवळ मुंबईच्या एका उपनगराचा रोजचा कचरा जर ६०/७० टन असेल तर संपूर्ण मुंबईचा किती? आणि तो टाकण्यासाठी लागणारे डंपिंग ग्राऊंड? आजच डंपिंग ग्राउंडचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना अजून काही वर्षातच त्याचे स्वरूप केवढे होईल! यासाठी योग्य पावले उचलणे अत्यंत निकडीचे झाले आहे. पण त्यासाठी केवळ शासकीय यंत्रणा काही करू शकत नाही. तर यासाठी प्रत्येक नागरीकाचा सहभाग जरूरीचा आहे.

कचऱ्यापासून जैविक खतनिर्मिती

गेल्या अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रतिभा बेलवलकर (९९८७७७५६३८) यांनी काही वर्षापूर्वी पार्लेश्वर मंदिरात निर्माल्याचे खत बनवण्याचा प्रकल्प यशस्वीपणे चालवला. कचऱ्याचा प्रत्येक कण हा उर्जेचा स्त्रोत आहे आणि त्याचा नाश करणे गैर आहे असे त्यांचे ठाम मत आहे. सध्या जोगेश्वरी येथे त्या हा प्रकल्प राबवीत आहेत. तिथे सिद्धीविनायक मंदिर, टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बागेचा कचरा, गणेशोत्सवात चौपाटीवरील निर्माल्य कलशातील साठणारे निर्माल्य यापासून जैंविक खत बनवले जाते. पण दुर्दैवाने पालेश्वर मंदिराने मात्र आपला कचरा पालिकेच्या गाडीत टाकणेच पसंत केले आहे.

जोगेश्वरी येथील प्रकल्पात प्रतिभाताईंनी ऑरगॅनिक वेस्ट ऑरगनायझर हे मिक्सरच्या प्रकारातील मशिन बसवले आहे त्यासाठी त्यांना एक्सेल इंडस्ट्रीज या कंपनीचा मोठा सहकार्याचा हात लाभला आहे. त्यांच्याकडे येणार निर्माल्य तसेच शाकाहारी (भाजी फळे आदींचा) कचरा, सुकी पाने इत्यादि कचरा या मिक्सरमधून बारीक केला जातो. नंतर त्यात शास्त्रोक्त रीतीने ऑरगॅनिक बॅक्टेरीया कल्चर पावडर एकत्रीत करुन खतासाठी टाकला जातो या मिक्सर व पावडरमुळे याचे १०/१२ दिवसात खत निर्माण होते. याचा उपयोग न केल्यासही खत बनते पण त्याला ३० दिवस लागतात. टाटा कॅन्सर सोसायटीमधील कचरा त्यांच्याकडे येऊ लागल्यावर मुख्यत: त्यात नारळाच्या झावळ्या असत. त्या वेगळ्या काढून त्याचे वेगळे खत बनवणे ज्यांनी सुरू केले. मुंबईतील गणपती उत्सवानंतर चौपाटीवरील निर्माल्य कलशांतून येणारे निर्माल्य तब्बल ७५० टनापर्यंत जाते. त्याचे खतनिर्मितीचे कामच ३/४ महिने करावे लागते. पार्लेश्र्वर मंदिरात ३/४ किलो निर्माल्यापासून सुरू झालेले त्यांचे काम १०० किलो पर्यंत पोहोचले होते. पण ते बंद करावे लागले.

निर्माल्य कलशातही लोक कोणताही कचरा टाकतात त्यात देवांच्या जुन्या मुर्ती, फोटो, मंदिरे तसेच पोथ्या, पुस्तके आदीही टाकतात. गणपतीच्या निर्माल्यात शेकडो निरांजने, सुपाऱ्या, प्लास्टिक आदि वस्तू मिळतात. त्यांना अलग करणे हेच मोठे काम होते. हा कचरा सहजपणे पालिकेच्या सुक्या कचरा गाडीत किंवा पोथ्या, पुस्तके रद्दीत पुर्नउपयोगासाठी टाकणे गरजेचे आहे व ते जनतेनेच समजून केले पाहिजे.

निसर्गाला एक इंच माती बनवण्यास १०० वर्षे लागतात आणि डंपिंग ग्राऊंडद्वारे आपण शेकडो एकर जमिनीतील माती नापिक करत आहोत.

“देवांगिनी’ इमारतीमधील आदर्श प्रकल्प

सतिश कोळवणकर यांनी (देवांगिनी सोसायटी, शहाजी राजे रोड) आपल्या इमारतीतील सर्वांना विश्वासात घेऊन एक आदर्श प्रकल्प राबवला आहे. ते कचऱ्याचे विभाग करतात.

१. स्वच्छ कागद, २. प्लॅस्टिक, ३. ई कचरा, ४. अस्वच्छ कागद, मेटल, काच, केर, ५. ओला कचरा

यातील पहिला तीन प्रकारचा कचरा पुनरूपयोगासाठी जातो. (कचरा गोळा करणारे किंवा रद्दीवाले ते विकत घेतात) चौथा प्रकार म्हणजे अस्वच्छ कागद, प्लॅस्टिक, काच, थर्माकोल इत्यादी. हा कचरा महानगरपालिकेची सुका कचरा नेणारी गाडी घेऊन जाते. व ओल्या कचऱ्याचे ते स्वत:च्या इमारतीतच खत बनवतात. असे खत बनवायला प्रत्येक फ्लॅटमागे एक ते दीड स्के. फुट जागा पुरेशी आहे पार्ल्यातील अनेक मोठ्या सोसायट्यांना ते शक्य आहे. सतिश कोळवणकर व सुजाता गांगुर्डे यांनी आपल्या इमारतीतील सर्वांना विश्र्वासात घेऊन या कचरा व्यवस्थापनाचे महत्व समजावून सांगितले. तो वर्गीकरण करुन साठल्यास येणारे फायदे समजाविले. सुरवातीला या वर्गीकरणामधे लोकांत थोडे गोंधळ होत पण आता सर्वांना हळूहळू सवय होत गेली. कचरा कमी झाल्याने सफाई कामगारही खूष झाले. ओला कचरा व्यवस्थापनात त्यांनी ओल्या कचऱ्याचे दोन भाग केले. ओली चहा पावडर, शिळे अन्न, मांसाहारी कचरा आदि वेगळा करून (घरातच वेगळा ठेवून) पालिकेच्या गाडीकडे दिला कारण यामुळे उंदारांचा त्रास होऊ शकतो. तर भाजीचा, फळांचा कचरा बारीक करून वेगळा साठवला. सोसायटितील फ्लॉवर बेड्‌समध्येच लाकडी फळ्यांनी त्यांची उंची वाढवून तेथे हा कचरा टाकण्यास सुरुवात केली. वेळोवेळी हलवत राहून त्यात मिस्वर पावडर टाकून खत निर्मिती केली. सुका कचरा उचलण्यास कचरा वेचणाऱ्या अनेक बायका तयार असतात. तसेच रस्त्यावरील कागद उचलणारे लोकही आनंदाने तो घेऊन जातात. ज्यांना हा प्रकल्प राबवायचा आहे त्यांना मदतीचा हात देण्यासही कोळवणकर, गांगुर्डे मंडळी उत्सुक आहेत.

घरच्याघरी खतनिर्मिती

कचरा व्यवस्थापन या विषयावर इमारतीमधील प्रत्येकाचे सहकार्य मिळेलच असे नाही. मात्र वैयक्तिकरित्या आपण आपला खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन या विषयावर अभ्यास करणारे एक नाव म्हणजे अनिरूद्ध देशपांडे. ज्यांना आपल्या घरातील कचऱ्याचे आपल्यापुरते व्यवस्थापन करायचे आहे त्यांच्यासाठी एक सहजसोपी आणि यशस्वी प्रक्रिया देशपांडे यांनी १० वर्षाच्या निरनिराळ्या प्रयोगांतून शोधली आहे. अतिशय स्वस्त अशा या प्रक्रियेसाठी एकातएक बसणाऱ्या दोन बादलीचे दोन संच घ्यावेत. बाहेरची बादली जशी आहे तशीच ठेवावी. आतील बादलीस ८/१० भोके पाडावी. आतील बादलीत आपला स्वयंपाकघरातील कचरा टाकण्यास सुरवात करावी रोज कचरा पडल्यावर त्यात अर्धा चमचा ऍनॉरबिक इनोक्युलेशन पावडर पसरुन टाकावी. बादलीवर कायम झाकण ठेवावे. ही बादली झाकणाखाली एक इंचापर्यंत भरली की ती झाकण बंद करुन १० दिवस बाजुला ठेवावी व दुसरा बादलीचा संच भरावयास घ्यावा. भरलेल्या संचातील बाहेरील बादलीत साठलेले पाणी दर दोन दिवसांनी काढून टाकावे म्हणजे वास येणार नाही. ह्या पाण्यात दुप्पट पाणी मिसळून ते झाडांना घातले तर झाडे उत्तम वाढतात. आणखी १० दिवसांनी त्या बादलीतील कुजलेल्या मिश्रणात थोडी माती अथवा आधी बनलेले खत घातले तर २५ दिवसात उत्तम खत निर्माण होते.

आधी त्यांनी हा प्रयोग नायलॉनच्या चेन असलेल्या पिशवीत केला. तो उत्तम जमला यात पावडरचाही उपयोग करावा लागत नाही. फक्त नायलॉन बॅगमध्ये तळात वर्तमानपत्र घालून त्यात कचरा टाकण्यास सुरवात करायची व चेन बंद करून टाकायची. बॅग भरल्यावर ती बंद करून बाजूला करायची व दुसरी वापरायची. फक्त आतील कचरा अधेमधे हलवायचा. हा प्रयोग अधिक सुटसुटित आहे मात्र यात क्वचित उंदारांचा त्रास होऊ शकतो जो पहिल्या प्रक्रियेत होत नाही. अशा प्रकारे देशपांडे यांनी गेल्या दहा वर्षात स्वत:च्या घरातील दीड टन कचरा पालिकेच्या गाडीत जाण्यापासून वाचवला आहे तर ३५० किलो खताची निर्मीती केली आहे.

प्लास्टिक, थर्माकोलचा कमीत कमी वापर करणे, खरेदीसाठी कापडी पिशवीचा कटाक्षाने वापर करणे हे तर आपण सहज करू शकतो. पण याही पुढे जाऊन “शून्य कचरा’या दिशेने जर पाऊल उचलायचे असेल तर सतिश कोळवणकर, प्रतिभा बेलवलकर, अनिरुद्ध देशपांडे यांच्यासारखे काहीजण प्रयत्न करीत आहेत व आपल्याला मदतीचा हात द्यायलाही तयार आहेत.

आपल्यापैकी प्रत्येकाने जर थोडी इच्छाशक्ती वापरली आणि सामुदायिक पद्धतीने अथवा स्वतंत्रपणे जर घरगुती कचऱ्याचा योग्य पुनर्वापर केला तर एक आदर्श कचरामुक्त उपनगर म्हणून विलेपार्ल्याचे नाव निश्चितच उंचावेल.

आपले पार्ले स्वच्छ, आदर्श उपनगर आहे असे अभिमानाने सांगण्यासाठी फार थोडे बदल आपण स्वत:त केले तर ते सहज शक्य आहे.

१.     प्रत्येकाने निदान ओला कचरा व सुका कचरा वेगळा टाकावा.

२.    शक्यतो ओल्या कचऱ्याचे आपल्याच इमारतीत खत करण्यास टाकावे

३.    सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून जास्तीत जास्त सुका कचरा पुर्नउपयोगात आणावा.

४.    उरलेला सुका कचरा पालिकच्या सुका कचरा गाडीत द्यावा.

५.    महानगरपालिका पार्ल्यातील 103 उपहारगृहांचा कचरा रात्री वेगळी गाडीने पाठवून उचलते. त्यात सर्व लहान उपहारगृहांनीही सामिल व्हावे.

६.     पार्ल्यात हिंदू देवालय संघटनेने एकत्र येऊन पार्ल्यातील सर्व मंदिरांमधील निर्माल्यसाठी खत प्रकल्प राबवावा. अथवा तसे करणाऱ्या संस्थांकडे पाठवावा. त्यासाठी होणारा नाममात्र खर्च देवस्थानांना सहज शक्य आहे.

७.    रूग्णालयातील विषारी कचरा पिवळ्या पिशवीत पालिका वेगळा उचलते पण अनेक लहान रूग्णालये सहकार्य देत नाहीत. त्यांना जैविक व विषारी कचरा वेगवेगळा पालिकेकडे द्यावा.

८.    पार्ल्यात सतत चालणारे पुर्नबांधणी प्रकल्प तसेच प्रत्येक घरात, सोसायटीत दुरूस्तीच्या वेळी जमा होणारे सिमेंट, विटा, टाइल्सचे ढीग पालिका वेगळे उचलते पण त्यासाठी प्रत्येकाने ते जाणिवपूर्वक केले पाहिजे.

९.     ओला कचऱ्याची प्रक्रिया करण्यासाठी पार्ल्यातच जागा मिळवून देण्यास इथल्या खासदार, आमदार व नगरसेवकांनी मदत करावी.

१०.    मुख्यत: नागरीकांनी जागरूक राहून या गोष्टी करणे सर्वांना भाग पाडावे.

घरगुती बांधकाम, दुरुस्तीपासून निर्माण होणारे डेब्रीज गोळा करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे किमान शुल्कासहीत “डेब्रीज ऑन कॉल’ ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. संपर्क-२६८४३१७२/२६८३४४८५ (एक्स्टेंशन ३०५/३०६)

१.     घरगुती कचरा व्यवस्थापनासाठी संपर्क अनिरुद्ध देशपांडे ९७०२०४८६५५

२.    सोसायटीतील कचरा विस्थापन मार्गदर्शनासाठी संपर्क -सतिश कोळवणकर ९८६९०८८४६३

सुजाता गांगुर्डे ९७६९११९२२२

३.    महानगरपालिकेच्या सुक्या कचऱ्याच्या गाडीसाठी संपर्क श्री. शितोळे ९९३०१८६८४४, श्री. जाधव ९९८७१७७०५७, श्री. पिंपळे ९००४४४५२३२

संपादकीय – वार्षिक अं‍क २०१४

“आम्ही पार्लेकर’चा वार्षिक अंक आपल्या हाती देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. दिवाळी अंकांच्या गर्दीत सामील न होता वर्ष अखेरीस “वार्षिक अंक’ प्रकाशित करण्याच्या कल्पनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे आमचा उत्साह वाढत आहे. ह्या वर्षीसुद्धा ह्या अंकात आपल्याला दर्जेदार व विचारांना प्रवृत्त करणारे साहित्य वाचायला मिळेल असा विश्वास वाटतो.

ह्या वर्षीच्या विशेषांकाचा विषय आहे मराठी सिने-नाट्य सृष्टी! गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमा एका संक्रमणातून जात आहे. वेगवेगळे विषय, अभ्यासपूर्ण संहिता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ह्या गोष्टींमुळे आपला स्वतंत्र ठसा उमटवून असला तरी मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहोचण्यात अजूनही कमी पडतो की काय असे वाटत राहते. कदाचित “बॉलीवूड’च्या धमाक्यापुढे मराठी सिनेमाचा आवाज दबला जात असेल. मराठी नाट्यसृष्टीसाठीसुद्धा सध्याचे दिवस खूप आव्हानात्मक आहेत. आज करमणुकीची अनेक साधने उपलब्ध असल्यामुळे नाटकांकडे प्रेक्षक खेचणे तेवढेसे सोपे राहिलेले नाही. त्या अर्थाने मराठी नाटके स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत असे म्हणणे उचित ठरेल. आपल्या पार्ल्याला मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. डहाणूकर आणि साठ्ये महाविद्यालयातील आय एन टी वगैरे स्पर्धांसाठीच्या एकांकीका, हल्लीच झालेल्या साठ्ये ऑडिटोरियममधील मराठी, हिंदी हौशी नाटकांचे प्रयोग किंवा डागडुजीनंतर पुन्हा सुरू झालेले दीनानाथ असो, या सर्वांमुळे पार्ल्यातील नाट्य चळवळीला नक्कीच बळ मिळते. मराठी सिने नाट्य चळवळीत सिंहाचा वाटा असणाऱ्या पार्लेकरांना ह्या विषयावरील अंकातील मंथन नक्कीच आवडेल, विशेषत: पार्ल्यातील नव्या जुन्या रंगकर्मींवरील फोटो फिचर “पार्ले-नक्षत्रांचे बेट’!

आपले पार्लेसुद्धा झपाट्याने बदलत आहे. पुनर्विकासाची प्रक्रिया जोमाने पुढे जात आहे. जुन्या घरांच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. पहिला वहिला मॉलही आता सुरू झाला आहे. “एरींळपस क्षेळपींी’नी तर कहरच केला आहे. युवकांच्या पसंतीच्या रेस्टॉरंट्‌सनी पार्ल्याचे अनेक रस्ते काबीज केले आहेत. हे सर्व चांगले आहे. काळानुसार पुढे गेलेच पहिजे. पण पायाभूत सुविधांचे काय? गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा नाही, बरेचसे फुटपाथ फेरीवाल्यांनी अडवलेले, वाहनसंख्येचा स्फोट व वाहतुकीची कोंडी, ह्यांनी सामान्य पार्लेकर आज त्रस्त आहे. पार्ल्यात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न उग्र होत आहे. विकास व्हावा पण तो योजनाबद्ध असावा, अशी अपेक्षा करणे चूक आहे का ?

हे वर्ष निवडणुकीच्या धामधुमीत कसे निघून गेले ते कळलेसुद्धा नाही. प्रथम लोकसभेच्या व नंतर विधानसभेच्या. दोन्ही वेळेला पार्लेकरांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला आपली पसंती दिली. आज लोकसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पूनम महाजन करतात तर नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विलेपार्ले मतदारसंघातून ऍड. पराग अळवणी विजयी झाले आहेत. ह्या लोकप्रतिनिधींच्या सहकार्यानेच आपल्याला पार्ल्याचे नागरी प्रश्न सोडवायचे आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “आम्ही पार्लेकर’ ने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. अनेक तज्ज्ञांच्या व जागरूक पार्लेकरांच्या मदतीने “नागरिकांचा जाहीरनामा’ तयार करण्यात आला आहे. पार्ल्याला भेडसावणारे नागरी प्रश्न व ते सोडवण्याचे संभाव्य मार्ग ह्याचा ऊहापोह ह्या मागणीनाम्यात केला आहे. नागरिकांसाठी, समाज सेवकांसाठी, सामाजिक संस्थांसाठी तसेच लोकप्रतिनिधींसाठी तो मार्गदर्शक व उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. अशा प्रकारचा “नागरिकांचा जाहीरनामा’ तयार करणारा विलेपार्ले हा महाराष्ट्रातील पहिलाच मतदारसंघ ठरावा.

नववर्षाबरोबरच स्वच्छ, सुंदर व सुरक्षित पार्ल्यासाठी सर्व पार्लेकरांना हार्दिक शुभेच्छा!