बघा पटतंय का !

काही गावाच्या नावांवरून आणि वैशिष्ट्यांवरून काही वेळा म्हणी तयार होतात. उदाहरणार्थ “पुणे तेथे काय उणे’, “कोल्हापूरी, जगात लई भारी.’ असं पुणेकर किंवा कोल्हापूरकर अभिमानाने म्हणतात. खरं तर पारल्याच्या बाबतीतही अशी काही तरी म्हण तयार व्हायला हवी होती. कारण पारल्याचंही एक वैशिष्ट्य आहे. या छोट्याश्या उपनगरात विविध क्षेत्रातली असंख्य दिग्गज मंडळी पूर्वीपासून वास्तव्य करून होती, सध्या राहत आहेत आणि पुढेही असतीलच. साहित्य, काव्य, नाट्य, चित्रपट, चित्र-शिल्प अशा विविध क्षेत्रातल्या नामवंतांनी पारल्याला एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. याशिवाय डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, प्राध्यापक, बांधकाम व्यावसायिक अशांनीही मुंबई महानगरातलं हे छोटंस उपनगर गजबलेलं आहे. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला विमानतळ यामुळे पारल्याच्या वाढीला आपसूकच मर्यादा आली आहे. पूर्वीचं हे छोटंसं निसर्गरम्य व टुमदार गाव आता गजबजून गेलंय. छोटे छोटे बंगले आणि झाडांनी भरलेल्या या गावात आता उंच इमारती उभ्या राहत आहेत. त्यांच्या किंमती ऐकून छाती दडपून जाते. पण तरीही पारल्याबद्दल अनेकांना आकर्षण वाटतं. त्याचं कारण आहे इथे असलेलं सुसंस्कृत शांत वातावरण आणि त्यातून निर्माण झालेली संस्कृती!

मी मूळचा पुणेकर. शिक्षणासाठी मुंबईला आलो आणि १९७० ते १९८४ अशी तब्बल चौदा वर्ष दारदरला राहिलो. दरम्यानच्या काळात एका पार्लेकर मुलीच्या प्रेमात पडलो आणि लग्न करून मालाडला संसार सुरू केला. पण मालाडला जाताच मला जे अनुभवाव लागलं, त्यामुळे मी हबकलोच. ते खरोखरीच सहन करण्यापलीकडचं होतं. कोणत्याही रस्त्यावर जा. सगळीकडे फक्त दुकानं, टपऱ्या, विविध वस्तू विकणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्या आणि प्रचंड गर्दी! त्यात उत्तरप्रदेशी, गुजराथी, बिहारी, दाक्षिणात्य अशा मिश्र संस्कृतीत काही मराठी मंडळीही दिसत. सहाजिकच ते चेहरा नसलेले उपनगर वाटलं यात नवल ते काय! शिवाय मूळचा पुणेकर आणि १४ वर्षे दादरकर असलेल्या माझ्यासाठी मालाड ते मी शिकवत असलेल्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टपर्यंतचा प्रवास हे एक दिव्यच ठरलं. मालाडला राहण्यासाठी गेल्यावर पहिल्याच दिवशी मालाडच्या रेल्वे स्टेशनवर १९८४च्या जून महिन्यात मी जे अनुभवलं ते आठवून आजदेखील माझ्या अंगावर काटा येतो. त्यादिवशी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मधे जाण्यासाठी मी सकाळी पावणेआठ वाजता मालाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पोचलो. प्लॅटफॉर्म गच्च भरला होता. गाडी आली, प्रचंड रेटारेटी झाली आणि मी पुढे जाण्याऐवजी मागे ढकललो गेलो. अर्थातच त्या गाडीत चढू शकलो नाही. त्यानंतर दुसरी गाडी आली. माझी अवस्था तीच होती. अशा चक्क चार गाड्या सोडल्या. मग सरळ दांडी मारायचं ठरवलं आणि घराकडे निघालो. जीना चढून वर आलो आणि पुलावर दम खात उभा होतो. खाली प्लॅटफॉर्मवर नव्याने एक लोकल बोरीवलीकडून आली आणि मालाड स्टेशनात शिरली. प्लॅटफॉर्मवर विलक्षण वळवळ सुरू झाली. जागच्या जागी माणसं वळवळत होती. स्वत:ला लोकलच्या दरवाज्यातून आत घुसवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत होती. गाडी थांबण्यापूर्वीच काहीजण सफाईने गाडीत शिरले. त्यापाठोपाठ इतरही घुसू लागले. गाडी थांबली आणि डबा गच्च भरला. दरवाज्याबाहेर लोंबकळणाऱ्या जीवांसकट ती गच्च भरलेली गाडी मुंबईकडे रवाना झाली. हे दृश्य बघून हादरलेल्या मनस्थितीतच मी घरी पोचलो. माझी अवस्था आणि मी जे.जे.त न जाता परतलेलो बघून शेजारचे आजोबा म्हणाले, “अहो परत का आलात?’ त्याचं कारण सांगताच ते म्हणाले “आता उद्यापासून मालाडला बोरीवलीकडे जाणाऱ्या गाडीत बसा आणि त्याच गाडीतून मुंबईपर्यंत पोहोचा’. मालाडला होतो तोपर्यंत तो सल्ला ऐकला. पण त्यावेळी एक निश्चित केलं की मालाड सोडायचंच.

सुदैवाने १९८७ पासून पारल्याला राहायला आलो आणि पुणं, दादर आणि मालाड अशा “तीन गावचं पाणी प्यायलेली’ माझी स्वारी “पार्लेकर’ झाली. हळू हळू पारल्याची ओळख होत गेली. कुठे भेळ चांगली मिळते तर कुठच्या गाडीवर मिसळ छान असते त्याचा शोध लागू लागला. भजी, बटाटेवडे कुठले खावेत हे कळू लागलं आणि त्यासोबतच पार्ल्यातल्या संस्था, संस्थानिक, असामान्य आणि सामान्य माणसंही लक्षात येऊ लागली. अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पारल्यात आपण राहातोय याचा अभिमान वाटू लागला.

पण त्यासोबतच अशा व्यक्तींची माहिती इतरांना व्हावी यासाठी पारल्याच्या इतिहासपर ग्रंथांशिवाय फार काही घडलेलं नाही हे देखील लक्षात येऊ लागलं. त्याची अनेक उदाहरणं आहेत. त्यातलं एकच उदाहरण बघुया. शिल्पकलेच्या क्षेत्रातील एका फार मोठ्या कलावंताचा स्टूडिओ व वास्तव्य पारल्यात होते. त्यांचं नाव रावबहादूर गणपतराव म्हात्रे (जन्म १८७६ – मृत्यू १९४७) म्हात्रे यांनी १८९६ मध्ये ते जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधे शिकत असताना “मंदिर पथ गामिनी’ नावाचे एका मराठमोळ्या स्त्रीचे शिल्प घडविले. या शिल्पातली तरूणी नऊवारी साडी नेसली असून तिच्या उजव्या हातात पुजेचं तबक व डाव्या हातात पाण्याचं भांडं आहे. या शिल्पातील तिची डौलदार चाल, तिनं नेसलेल्या नऊवारी लुगड्याच्या चुन्या, केसांचा घातलेला अंबाडा व त्यावरील फुलांची वेणी या सर्वांचा उत्कृष्ट आविष्कार अनुभवून या शिल्पाबद्दल थोर चित्रकार राजा रवीवर्मांसह अनेक इंग्रज कलावंतांनीही त्याची प्रशंसा केली एवढंच नव्हे तर रवींद्रनाथ टागोरांनीही मंदीर पथ गामिनी या शिल्पाचे फोटो बघून त्याची प्रशंसा करणारे दोन लेख लिहिले. पुढील काळात गणपतराव म्हात्रे यांनी अशी अनेक शिल्पे घडवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात पारितोषिके मिळवली. स्मारक शिल्पांच्या क्षेत्रात तर म्हात्रे यांनी युरोपियन कलावंतांची मक्तेदारी मोडून भारतीय शिल्पकारांची स्मारकशिल्पांची परंपरा सुरू केली. त्यांनी केलेली स्मारक शिल्पे भारतात व परदेशातही लागली आहेत. असे ज्येष्ठ व व थोर कलावंत गणपतराव म्हात्रे हे आपल्या पार्ल्याचे भूषणच म्हणावे लागेल. पण आजच्या पिढीला त्यांचे नावही माहित नाही. याला आपण पार्लेकरच जबाबदार आहोत, कारण आपण अशा थोर व्यक्तींचे ना कधी उचित स्मरण केले, ना कधी त्यांचे एखादे शिल्प गौरवाने पारल्यात लावले.

खरं तर “आम्ही पार्लेकर’तर्फे दोन वर्षांपूर्वी असा प्रयत्न झाला होता. पार्लेश्वर मंदिरात गणपतराव म्हात्रेंची “मंदिर पथ गामिनी’ही मूर्ती लावावी व त्यासोबत या थोर कलावंताची माहितीही द्यावी असा लेखी प्रस्ताव दिला होता. पण अद्यापही त्याबाबत संबंधितांतर्फे काहीही प्रतिसाद मिळाला नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. शिवाय यासाठी पार्लेश्वर मंदिराला केवळ चौथरा उभारण्याचा खर्च करायचा होता व “मंदिर पथ गामिनी’ या मूर्तीची प्रतिकृती गणपतराव म्हात्रेंचे प्रणतू डॉ. हेमंत पाठारे देणगी स्वरूपात देणार होते. पण संबंधितांची उदासीनता माझ्यासारख्या कलावंताला व्यथित करणारी आहे.

अशा काही गोष्टी अनुभवून मला खरोखरच आम्ही पार्लेकर मंडळी सुसंस्कृत आहोत का, आमचे कलाप्रेम खरोखरीच काय दर्जाचे आहे असा प्रश्नच पडतो. पारल्यातला अनेक चांगल्या गोष्टी आपण नेहमीच अनुभवतो. पण अशा काही त्रुटी दूर करण्याचा आपण प्रयत्न केल्यास दुधात साखर पडल्यासारखे होईल.

समस्त पारलेकर बंधु-भगिनींनो, बघा पटतयं का! पार्लेश्वर मंदिराला गणपतराव म्हात्रेंचे मंदिर पथ गामिनी हे शिल्प लावण्यात रस नसेल तर उत्कर्ष मंडळाच्या चौकात ते निश्चितच शोभून दिसेल.

पार्लेकर असणं…एक एहसास !

झाली असतील काही वर्षं! म्हणजे पार्ले टिळक शाळेची जुनी इमारत पाडण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा मेळावा होता, त्यावेळची गोष्ट.
अचानक वाटेत थांबून मला “मग येतोयेस ना?’, “येताय ना?’ असे प्रश्न विचारायला सुरूवात झाली. मला चटकन संदर्भ कळला नाही त्यामुळे मी “बघू, बघतो, जमलं तर!’ अशी उत्तरं दिली. परंतु, एकाने मात्र मला गाठलेच.”तू कोणत्या बॅचचा रे?, आपल्या बॅचमध्ये तो जोशी नव्हता का रे? तो पुढच्या बेंचवर बसायचा, मी त्याच्या बरोब्बर मागे बसायचो!’ मी गोंधळलो कारण माझ्या बॅचमधले यच्चयावत जोशी पुढच्या बाकावर आणि कुळकर्णी/कुलकर्णी पुढून तिसऱ्या बाकावर बसायचे… तो संदर्भ लागेना तेव्हा त्या एकानं मला अजून दोन चार रेगे, सामंत, पाटील अशा नावांचे संदर्भ दिले. मग त्याच्या लक्षात आलं की मला काही उमजत नाहीये. तेव्हा म्हणाला “तू 75च्या बॅचचा ना?’ मग एकदम कोडं उलगडल्यागत म्हणाला “हां हां, तुझ्या बाबांची बदली झाली आणि तू धुळ्याला गेलास, तोच बर्वेना?’
“आपण यांना पाहिलंत का?’ हा संवाद आटोपून तो म्हणाला, “ते जाऊ दे रे, कुठच्या का बॅचचा असेनास, परवा मेळाव्याला ये म्हंजे झालं!!’
बरीच कोडी उलगडली आणि मी म्हटलं, “अरे, मी पार्ले टिळकचा विद्यार्थी नाहीये”
यावर त्या एकाने “मुझे आपसे ये उम्मीद नही थी!’ असा लुक देऊन नजरेनं सुचवलं की मित्रा, तू पार्ल्यात राहात असलास, तरी अस्सल पार्लेकर नाहीस बरं!’
ती नजर आणि लुक मनात दीर्घकाळ रेंगाळत राहिला आणि “आम्ही पार्लेकर’ मधून फोन आला तेव्हा, मला आश्चर्य वाटलं. मी तसं म्हटलंही, पण “असं काही नाहिये हो, वुई वेलकम यू टू द फोरम!’ असं उत्तर मिळालं.
मी अर्थातच होकार दिला आणि मनात माझं आणि पार्ल्याचं नातं तपासू लागलो. मनात बरेच प्रश्न उपस्थित झाले, काही मूलभूत शंका निर्माण झाल्या.
माणूस आणि त्याचा निवास, माणूस आणि त्याचं जानपद याचं नातं शोधण्याचा प्रयत्न करू लागलो, या नात्यांचे पेड किती घट्ट आणि वळसे किती वळणदार असतात याचा विचार करू लागलो.
आपल्या गावाबद्दल इतकी आपुलकी वाटण्याची मुळं कुठे गुंतलेली आहेत? ते प्रेम इतकं का टिकतं? त्या नात्यात कम्फर्ट झोन कसा तयार होतो? ते नातं हे सोशल नेट वर्किंगचा सेफ झोन असतो? की त्या नात्यात साचलेपणा येतो? नात्यामधल्या कम्फर्ट स्पेसमुळे आधार मिळतो, की त्या आधाराच्या भूमीत पाय गाडले जातात?
पार्ले पूर्व या उपनगरानं या प्रश्नांची उत्तरं शोधली आहेत, असं वाटतं. पण या नात्याच्या धाग्यांच्या गोफाचा गुंता होत चाललाय असंही वाटतं. मुळात माझ्यासारख्या काहीशा अंतर्मुख माणसाला इथल्या “सोशल लिविंग’मुळे गुदमरायला तर होत नाही ना? असंही वाटतं.
माणूस या प्राण्यानं शेती करून आपली गुजराण करता येते आणि वरकस धान्य जपून ठेवलं तर पावसापाण्यात, दुष्काळात त्याचा उपयोग होऊ शकतो, हा शोध लावला. तो कोणाच्याही नावावर लिहिलेला नाहीये कारण ती सामूहिक ज्ञानप्राप्ती होती. त्याचबरोबर, एकत्रपणे राहिल्यास अधिक सुरक्षित वाटतं, वस्तीमधल्या स्त्रिया आणि मुलांच्या संरक्षण आणि संगोपनाकरता जाणता अवकाश मिळतो याची ही जाण माणसाला आली.
धान्यधुन्याच्या या हरितशेती क्रांतीचे हे उपफायदे माणसाला कळले आणि वस्ती करून राहाण्यातलं शहाणपण त्यानं जपलं. सुरक्षितपणे राहाण्याकरता समूहानं, एकजुटीनं परस्परांना सहाय्य करीत जगण्याचं हे “ग्यान’ माणसाच्या डीएनएमध्ये ठसलं, ते कायमचं.
या घटनेला लाखो वर्षं उलटून गेली तरी आपण शहाणपणाचा तो वारसा जपून ठेवलेला आहे. अशा वस्त्या सुरूवातीला अर्थातच मोठमोठ्या जलाशयाच्या काठी, नदीच्या तटावर वसल्या पण त्या जागांना अर्थातच मर्यादा होती. शेती पाठोपाठ व्यापार उदिमाचा शोधही माणसानं लावला आणि लोकवस्तीने नदीचे किनारे आणि जलाशयाचे काठ सोडले. त्याने इतरत्र वस्ती करायला सुरूवात केली.
या घटना घडल्यानंतरही बराच काळ लोटला तोवर कुठेही वस्ती करून, परस्परांशी प्रेम आणि सहकार्याचं नातं जोडून जगण्याचा कानमंत्र माणसानं पिढ्यान पिढ्या गिरवला. सर्वसामान्य माणसाचा इतिहास हा असाच असतो. तिथी आणि सनावळ्यांच्या खुंट्यावर न टांगलेला! त्याची नोंद इतिहासकार घेत नसले तरी ती आपल्या मनावरची गोंदणं असतात. (मला पार्ल्यामध्ये अशी गोंदणं खूप दिसतात.)
माणसाच्या इतिहासातलं एक मोठं धसमुसळं पर्व जन्माला आलं आणि माणसाच्यां मनातली ही सुरक्षिततेवर आधारलेली सुव्यवस्था ढासळली. वाफेची इंजिनं इग्लंडात धडधडू लागली आणि भारतात त्याचा धूर निघू लागला.
शेतीतलं उत्पादन बेभरवशाचं वाटू लागलं. रोजगारीकरता, कारखान्यातल्या दिवस आणि रात्रपाळ्या करून हातावर नाण्यांचा खणखणाट होऊ लागला. जगभरातल्या शेती व्यवस्थेपुढे मोठी आवाहनं निर्माण झाली. गिरण्यांचे भोंगू वाजू लागले. गेटवरच्या माणसांची आवकजावक सांभाळण्याकरता माणसांची गरज भासू लागली. त्यांच्या सुट्ट्या, पगार, विक्री खरेदी, तयार माल, कच्चामाल यांची मोजदाद, नोंदणी आणि व्यवस्थापनाकरता चार बुकं शिकलेल्या बुद्धिजीवी मंडळींची गरज भासू लागली.
कामगारांच्या पाठोपाठ हा बुद्धीजीवी वर्ग झपाट्यानं शहरात स्थलांतर करू लागला. या मध्यमवर्गीय मंडळीनी मनाशी कळत नकळत खूणगाठ मारली. जोवर चटपट हिशोब करता येतोय, पत्रोपत्री करता येतेय, टंकलेखन करता येतंय, तोवर आपला निभाव लागणार. एका जाहिरातीत युवराज सिंह म्हणतो, “जब तक बल्ला चलेगा, तब तक!’ जोवर शिक्षण आहे तोवर आपण आहोत. हा कित्ता इथे गिरवला जाऊ लागला.
सुशिक्षितपणा हा सुरक्षित जीवनाचा कानमंत्र झाला. जगातल्या लाखो शहरांची ही गोष्ट आहे पण त्यात पार्ले पूर्व उपनगर आपलं वैशिष्ट्य जपून आहे कारण सुशिक्षणाचा आणि उत्तम शिक्षण देणाऱ्या संस्थाचा वसा पार्ल्यानं घेतला तितका क्वचितच कोणी घेतला असेल. हां, पुण्याची मंडळी आता चुळबुळ करू लागतील. पण पार्ल्याची गोष्ट वेगळी आहे कारण पार्ले हे अखेर मुंबईचं उपनगर आहे. मुंबईचा स्वभाव आणि वैशिष्ट्यं पार्ले पूर्वमध्ये प्रतीत होतात.
पार्ल्यानं शैक्षणिक संस्थांमध्ये भरीव कामगिरी केल्याचं इथल्या रस्त्यारस्त्यावर आढळतं. सकाळच्या वेळी नीटनेटका गणवेश घातलेली सर्व थरातील, विविध आर्थिक स्तरातली मुलं घोळक्यानं शाळांकडे कूच करतात. त्यांच्या डोळ्यातली स्वप्नं आणि सळसळणारा उत्साह बघितला की पार्ल्याच्या समृद्धतेची साक्ष पटते.
सुमारे 70-80 वर्षां पूर्वी बर्वे कुटुंब पार्ले पूर्वमध्ये घर घेऊन राहात असे तेव्हा देखील पार्ले मधील शाळा हेच प्रमुख आकर्षण होतं. कालवशात ते घरही गेलं आणि या बर्वे कुटुंबानं पार्ल्याचा साश्रुनयनानी निरोप घेतला. पुन्हा 60 वर्षांनी हा नवा बर्वे पार्ल्याशी घरोबा करायला आला. हा एक प्रकारचा “पोएटिक जस्टिस’ माझ्या बर्वे कुटुंबाशी झाला.
पार्ल्याला “आधार’ देणारी अनेक बर्वेकुटुंब आहेत. पैकी माझं घरकुल त्याच्यामधील नाही. (मूळ गाव मुंबईच्या उत्तरेकडचं वसईगाव, माझं शिक्षण तिथे बर्वे एज्युकेशन सोसायटीच्या न्यु इंग्लिश स्कूलमध्ये झालं! त्या एकाला सांगायचं राहून गेलं, ते इथे सांगतो इतकंच)
पार्ले गावाची गोष्ट सांगतासांगता आपण मानवी संस्कृतीमधल्या नागरीकरणाच्या इतिहासाचा लेखाजोखा घेतला.
त्या सर्व शहरीकरणाच्या प्रक्रियेप्रमाणे पार्ले (पूर्व) इथे मध्यमवर्गीयानी मोठी वस्ती केली. ती जगरहाटी झाली.
मग पार्ल्याचं वैशिष्ट्य काय? एका भुकेल्या माणसानं देवाकडे स्वत:करता मागणी केली. पोटाची खळगी भरण्याकरता देवानं त्याला खायला तोंड आणि राबायला हात दिले. मीठ भाकरीची व्यवस्था करून दिल्यावर तो माणूस समाधान पावून जाऊ लागला तेव्हा देवानं त्याच्या हातात एक सुंदरसं फूल दिलं. अन्नानं तुला जगता येईल तर हे “फूल’ जगायचं कशासाठी हे शिकवेल!
फुलाच्या नाजूक सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा हा आशीर्वाद पार्ले पूर्वकरांनी मन:पूर्वक स्वीकारला. पार्ल्यामध्ये “काव्य-शास्त्र-संगीत-विनोदाने’ कसं जगावं याचा उत्तम प्रत्यय येतो. काव्यशास्त्र, संगीत आणि विनोद या कलाविष्कारांच्या अनुभवात पार्लेकर गुलाबजामासारखे आनंदाने डुंबत असतात.
इथे सदैव कसली न कसली मैफल रंगलेली असते. इथल्या कट्ट्यावर चर्चा रंगतात. फक्त “शेअर मार्केट’वर नाहीत तर या “राष्ट्राचं’काय होणार या विषयावर, कोणी काय लिहिलं? कोणतं गाणं नव्यानं अवतरलं? कोणत्या नाटकामधलं नाट्य दुसऱ्या अंकातल्या तिसऱ्या प्रवेशात नंतर कसं खुलतं यावर!
पार्ल्याचं हे वैशिष्ट्य खरोखर लक्षणीय आहे. या रसिक-अभ्यासक-वाचक-श्रोत्या पार्ल्याची ओळख पटली म्हणून तर इथे आलेला पार्लेकर केव्हा इथला होऊन जातो हे त्यालाही कळत नाही.
पार्ले पूर्व इथे राहणं हा निवास नसून इथला श्वास-निश्वास आहे. पार्लेकर म्हणून वावरणं हा एहसास आहे. जगण्याचा वजूद आहे.
पार्ले पूर्व मनात भिनलं की काही जुन्या मानसिक प्रश्नांची नव्यानं उकल होते.
घराशी आणि वस्तीशी आपलं नातं जुळतं ते त्यामागे असलेल्या सुरक्षितपणा आणि परस्परसहाय्याच्या पक्क्या विणीवर. पण सुरक्षित जगणं म्हणजे नुसतं जगणं झालं. त्या जगण्याला अर्थपूर्णता येते ती संस्कृतीच्या जोपासनेतून, सौदर्यांच्या आस्वादातून आणि सृजनात्मक प्रतिभेतून आविष्कारणाऱ्या काव्य-संगीत-नृत्य आणि नाट्य या कलाप्रकारातून !
इथल्या वस्तीनं जगण्याचं हे वैशिष्ट्य मनोमन जाणलंय. तो सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतता पार्ल्यानं जपलीय!!
इथे राहतो, जगतो माणूस म्हणून आणि जीवनाचा आस्वाद घेतो रसिक म्हणून!!!
– डॉ. राजेंद्र बर्वे

बदलते पार्ले – बदलते वैद्यकीय जग

मी  सबकुछ पार्लेकर! बालमंदीर – रमाबाई परांजपे बालमंदीर, शाळा  पार्ले टिळक विद्यालय, कॉलेज  पार्लेकॉलेज. त्यानंतर मात्र थोडा बदल म्हणून नायर हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल आणि त्यानंतर फिरून गाडी व्यवसायासाठी मात्र परत पार्ल्याला.

1950 पासून ते 2014 पर्यंतची पार्ल्यातील स्थित्यंतरं नजरेखालून गेली. त्यातील आठवणीतले दिवस साधारणपणे 1960 नंतरचे. बहुतेक पार्लेकर त्यावेळी चाळीवजा छोट्या घरात रहात होते. मातीचे रस्ते, दोन्ही बाजूला मेंदीची कुंपणं आणि शेताड्या. त्या शेताड्यांमध्ये आम्ही मुले डबाऐसपैस, गोट्या, भोवरे, लगोरी, लपंडाव, खेळायचो. अगदी श्रीमंती असेल तर क्रिकेट. विमानतळावरची ध्वनीवर्धकावरची इंग्रजीतली सूचना, आम्हाला मालवीय रोडच्या चाळीत, रात्रीच्या शांततेत ऐकायला यायची. इतकंच काय तर विमानतळाच्या डोक्यावर फिरणारा पांढरा-हिरवा दिवासुद्धा घरातल्या आतल्या खोलीतून दिसायचा.

शाळेत शिक्षणाच्या माध्यमाला पर्याय नव्हता. मराठी आणि मराठीच. मराठी आईच्या कुशीतच आम्ही समाधानाने वाढलो. इंग्रजी नावाची परदेशी पाहुणी आयुष्यात पाचवीत असताना आली व आज मात्र ती मराठीच्या पुढे जाऊन घराघरातून ठाण मांडून बसली.

आपले पाय किंवा सायकली हीच दळणवळणाची राजमान्य साधने होती. काही ठराविक मोटारी पार्ल्यातून फिरायच्या. माझ्या आठवणीतल्या म्हणजे डॉ. जोगळेकर, डॉ. व्होरा यांच्या मोटारी. एखाद्या स्त्रीने मोटार चालवणे हे अप्रूपच होते. फियाट चालवणाऱ्या डॉ. जोगळेकरांच्या पत्नी या माझ्या आठवणीतल्या महिला. त्यावेळेचे डॉक्टरसुद्धा अगदी मोजके. डॉ. जोगळेकर, डॉ. गडियार, डॉ. टिळक, डॉ. वर्तक, डॉ. व्होरा, डॉ. शानभाग, डॉ. कर्णिक ही काही आठवणीतली नावं.

ही सर्व डॉक्टर मंडळी प्रामाणिकपणे वैद्यकीय व्यवसाय करताना त्या त्या कुटुंबाचे सामाजिक सल्लागार म्हणूनही कार्यरत असत. पु.लंच्या “सुंदर मी होणार’या नाटकात डॉ. पटवर्धन म्हणून एक पात्र आहे. त्याला जशी महाराजांच्या कुटुंबातील प्रत्येक लहानथोरांची दखल होती,तशीच दखल त्यावेळच्या “फॉमिली डॉक्टर’ना होती. हातात कातडी चौकोनी बॅग, त्यात दाटीवाटीने भरलेली औषधं, सिरींज, सुया व ती बॅग घेऊन व्हीजीटच्या वेळी पुढे पुढे चालणारा गृहमालक व त्याच्या मागे गळ्यात स्टेथॉस्कॉप अडकवून रूबाबात चालणारी डॉक्टर ही व्यक्ती हे दृष्य नियमित होतं.  आजूबाजूच्या चाळीतल्या सर्वांना जाणीव करून देणारं हे दृष्य म्हणजे अमूक अमूक घरी कोणतरी जास्त आजारी आहे. मग ती बॅग परत पोचवण्याचं कामही गृहमालकाचंच. षटकोनी उभ्या बाटलीतून (ज्यावर किती डोस द्यायचा हे दर्शवणारी कारतलेला उभी कागदी पट्टी असायची) औषध भरून आणायचे व पुड्या, इंजेक्शने यावर रूग्ण बरा व्हायचा. बराचसा डॉक्टरवरच्या विश्वासानं. एकूण कुठेही तक्रारी नव्हत्या.

पण आज मात्र चित्र हळू हळू पालटत आजवरच्या मुक्कामाला येऊन पोचलं. डॉक्टर या संस्थेवर एकेकाळी विनातक्रार विश्वास ठेवणारी कुटुंबे कमी कमी होत गेली. पेशंट हा कन्झ्यूमर झाला व डॉक्टरी पेशाही अतिसावध पवित्र्याने वागू लागला. सर्वात मोठा बदल म्हणजे पार्ल्यात खऱ्या अर्थाने “फॅमिली फिजीशियन’ म्हणून ओळखावे असे डॉक्टर कमी कमी होत गेले. काही वयपरत्वे निवृत्त झाले. नवीन डॉक्टरांच्या पिढीला त्याकडे वळावेसे वाटेनासे झाले. प्रशिक्षण घेऊन सेवाभावी वृत्तीने व्यवसाय करणारा एम.बी.बी.एस विरळा होत गेला. ऍलोपथीचा अभ्यास जराही नसलेल्या पॅथीचे डॉक्टर बिनदिक्कत त्याचा वापर करू लागले. त्यांचा स्वत:चा इतकी वर्षे केलेला आपल्या पॅथीला अभ्यास त्यांना तिटकारावासा वाटला.  एक न्यूनगंड म्हणा, कमीपणा म्हणा किंवा अविश्वास म्हणा. फक्त आपलाच नेमून दिलेला व्यवसाय करतील असे उत्तमोत्तम वैद्यराज, होमिओपॅथीचे अभ्यासू (ज्यांची आज खूप गरज आहे) फारच कमी झाले. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना हळूहळू मोडीत निघत चालली. पार्ल्यात मात्र आजमितीलाही, प्रामाणिकपणे रूग्णसेवा करणारी सर्व कुटुंबाची काळजी घेणारी डॉक्टरांची पिढी आहे. त्यांचा सर्व पार्लेकरांनाही आदर व अभिमान आहे.

आजच्या वैद्यकीय शिक्षणाबद्दल तर बोलायलाच नको. अपवादात्मक अशा काही संस्था सोडल्या तर वैद्यकीय शिक्षण हे आयपीएल क्रिकेटच्या लिलावासारखे झाले. तुला रेडिओलॉजिस्ट व्हायचे ना? मग वैद्यकीय कॉलेजात भरती होतानाच इतके इतके कोटी शिक्षणसम्राटाकडे पोचव. तुला डरमॅटॉलॉजिस्ट व्हायचे ना!  मग इतके कोटी आहेत का तुझ्याकडे? इत्यादी इत्यादी. हा व्यवहार आज छुपा राहिलेला नाही. डॉक्टर होणे ही धनिकांची मक्तेदारी झाली. वैद्यकीय शिक्षणसम्राटांची विषवल्ली एवढी फोफावली की तिने निरागसतेने वाढवणाऱ्या वेलीफुलांना मारून टाकले.

पार्ल्यातली आमची पिढी  नायर, केईएम, सायन या म्युनिसिपल कॉलेजातून किंवा जे.जे. सारख्या गव्हर्नमेंट कॉलेजातून अत्यंत स्वस्तात शिकली. त्यावेळी मेरिट चालायचे. वैद्यकीय पुस्तके महाग म्हणून ग्रंथालयाचा आधार होता.

आज मात्र, पैशांचे ढीग मोजून डॉक्टरी बिरूद घेऊन बाहेर पडलेला डॉक्टर, वसूली कशी करायची ह्या इराद्याने व्यवसायाकडे पाहू लागला. किंबहुना परिस्थिती त्याला ओढत गेली. शिक्षणसम्राट राजकारणातले शिलेदार असल्याने त्यांना जाब तरी विचारणार कोण? एकूणच वैद्यकीय भ्रष्टाचार वाढीला लागला. समाज बदलला  डॉक्टरही बदलला. कमिशन प्रॅक्टीसच्या वाईट प्रथा चालू झाल्या व रूजल्या. त्यावर एकाही वैद्यकीय सेमिनारमध्ये चर्चा झाली नाही. डॉ. हिम्मतराव बावीसकरांसारखा महाडमधील एक डॉक्टर याला अपवाद ठरला. त्याला दिलेल्या कमिशनबद्दल त्याने आवाज उठवला व मेडिकल कौन्सिलला तक्रार केली. (विशेष असे की काही वर्षापूर्वी, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या प्रमुखालाच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दिल्लीतून निलंबित केले होते.) आज परिस्थिती अशी आहे की वाईटाची तक्रार कोणाला करायची? गुन्हेगारीची पोलिसखात्याला? अस्वच्छतेची म्युनिसिपाटीला? की वैद्यकीय भ्रष्टाचाराची मेडिकल कौन्सिलला? मात्र या सर्वांतूनही प्रमाणिक डॉक्टरांची एक पिढी सतत चांगल्यासाठी झटत आहे. लेखनातून, टि.व्ही.,  रेडिओ सारख्या विविध माध्यमातून आरोग्याचे मार्गदर्शन करीत आहे. चांगल्याचाच प्रचार करीत आहे. चुकीच्या जाहिरातींविरूद्ध प्रबोधन करीत आहे.

आजमितीला पार्ल्यात पूर्वेला छोटी छोटी सर्वविषयक इस्पितळे आहेत. पश्चिमेला नानावटी, कूपर आहे. निदानकेंद्रे, प्रसूतीगृहे आहेत. वाचादोष उपचार, भौतिकोपचार केंद्रे आहेत. लहान मुलांसाठी वेगळ्या पद्धतीचे भौतिकोपचार केंद्र आहे. बालकपालक मार्गदर्शक केंद्र आहे. मूकबधीर केंद्रे आहेत.

याच चांगल्याची दुसरी एक गंभीर बाजू म्हणजे याच पार्ल्यातली सुव्यवस्था आज डबघाईला आली आहे. प्रत्येक दुकानदार आपल्या दुकानापुढे कचऱ्याचे प्रचंड ढीग रस्त्यावर लोटून रात्री दुकाने बंद करीत आहे. भाजीपाला रात्रभर रस्त्यावर कुजत आहे. आज दूषित पाण्याने सर्व पार्ले रोगग्रस्त झाले आहे. त्यामुळे आजारपणे लादली जात आहेत. महिनोन्‌ महिने रस्त्यांची कामे चालली आहेत. त्यांना कोणतीही दिशा नाही. ट्रॅफिक बेशिस्त आहे. यावर सर्वजण मिळून मार्ग काढणे गरजेचे आहे.

जाता जाता एक महत्त्वाचे, कुटुंबाचा वैद्यकीय विमा उतरवणे हा खर्च नसून उत्तम गुंतवणूक आहे.

डॉक्टरांची पेशंटकडून अपेक्षा

1.     खोटी सर्टिफिकीटे, बिले मागू नका.

2.    आपल्या “फी’ची पावती मागून घ्या.

3.    औषधे, तपासण्या यांची माहिती करून घ्या. इंजेक्शन दिले असल्यास त्याचे नाव लिहून घ्या.

4.    औषधांच्या ऍलर्जीची पूर्वसूचना डॉक्टरांना द्या.

5.    केमिस्ट हा डॉक्टर नसतो. त्याच्या सल्ल्याने औषध घेऊ नका. तो गुन्हा आहे व जिवावरही बेतू शकते.

6.    डॉक्टर हाही माणूस आहे. त्याचे प्राथमिक अंदाज चुकू शकतात. त्यातून मार्ग काढणे त्याला अवगत असते. म्हणून उगाचच डॉक्टर बदलत बसू नका.

7.    डॉक्टरलाही तुमच्याप्रमाणे विश्रांतीचे, करमणुकीचे क्षण, कुटुंबाबरोबर घालवण्याचा वेळ याची गरज असते. या वेळेवर अतिक्रमण करू नका.

8.    डॉक्टरांकडून आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठीची योग्य वेळ म्हणजे डॉक्टर क्लिनिकमध्ये असतानाची. अगदी आवश्यक असल्यासच घरी फोन करा.

9.    कुठेही सार्वजनिक ठिकाणी, डॉक्टर दिसला रे दिसला की त्याच्यावर तुमच्या वैद्यकीय शंका घेऊन तुटून पडू नका.

10.   डॉक्टरांना फोन केल्यास प्रथम एक कागद व व्यवस्थित चालवणारे पेन हाताशी ठेवा.

11.    मृत्यू प्रत्येकाला अटळ आहे. मृत्यूच्या वेळी जवळ असणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर, म्हणून प्रत्येक मृत्यूसाठी त्याला जबाबदार धरून कायदा हातात घेऊ नका.

 

डॉक्टर कसा असावा?

1.     स्वत:ला नवीन ज्ञानाने प्रगल्भ करीत राहणारा

2.    पेशंटशी व त्याच्या नातेवाइकांशी मोकळेपणाने पण सत्य न दडवता तसेच मानसिक दडपण न वाढवणारा सुसंवादी.

3.    फी’च्या बाबतीत पारदर्शक असणारा व रीतसर पावती देणारा

4.    दिलेल्या औषधाची व त्याच्या दुष्परिणामाची कल्पना देणारा

5.    पेशंटला योग्य दिशेने मार्गदर्शन करणारा व वेळप्रसंगी व वेळीच चांगल्या तज्ज्ञाकडे सुपूर्द करणारा.

6.    गंभीर आजारासाठी आपली किंवा पर्यायी सोय उपलब्ध करून देणारा

7.    भरमसाठ तपासण्यांची यादी न देता मोजकेच निवडणारा.

 

रॅपिड फायर….

•     शिक्षण कोणत्या भाषेतून असावं असं वाटतं ?

–     मराठी

•     आजच्या राजकारण व राजकारण्यांविषयी आपले काय मत आहे ?

–     अतिशय वाईट.

•     पार्ल्यातील संस्थांना काय सांगाल ?

–     सर्वांनी एकत्र येऊन काम करावे.

•     तरूण डॉक्टरांना आपण काय सांगाल ?

–     ज्ञानाबरोबरच रुग्णाशी संवाद वाढवावा

•     10 वर्षांनी मुंबई कशी असेल ?

–     कमी लोकांना परवडण्यासारखी.

•     आवडते साहित्यिक आणि आवडतं पुस्तक?

–     व्यंकटेश माडगूळकर, बनगरवाडी

•     तुमचे छंद कोणते आहेत ?

–     पेंटिंग,फोटोग्राफी

•     देवावर विश्वास आहे का ?

–     हो.

•     पार्लेकरांचं वर्णन कसं कराल ?

–     पार्ल्याविषयी अभिमानी.

•     हे पार्ल्यात व्हायला हवं ?

–     विकलांगांसाठी राखीव उद्यान

•     डॉक्टर झाला नसतात तर काय व्हायला आवडलं असतं?

–     चांगला पोलिस ऑफिसर

 

– डॉ.शशिकांत वैद्य

Mo : 9821054339

युवकांनो, वाचा, विचार करा, कृती करा!

मुंबईच्या पार्ले उपनगरात चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ माझे वास्तव्य आहे. पार्ल्याला येण्याअगोदर राजापूर, सातारा, पुणे, वाई, रत्नागिरी, अहमदाबाद, सांगली, सोलापूर, जळगाव, ठाणे आणि सरते शेवटी मुंबई, अशा अनेक शहरांमध्ये मी राहिलो आहे. या सर्व ठिकाणी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यानंतर प्राध्यापक, पुढे विद्यार्थी परिषद आणि सामाजिक संस्था, यांच्या माध्यमातून माझा अक्षरश: सहस्त्रावधी युवकांशी संबंध आला. या काळात, आकाशदर्शन, पदभ्रमण, सायकल प्रवास, खेळांचे सामने, विविध स्पर्धा, सूर्यनमस्कार संकल्प, व्यायामशाळा, अभ्यास वर्ग, चर्चासत्र, सांस्कृतिक असे विविध कार्यक्रम मी राबविले. या संबंधात युवकांच्या दृष्टीने आजचे चित्र आशादायक नाही. विषेशत: नेतृत्वगुण असणारे, अभ्यासू, आपल्या विषयाशिवाय देश आणि जग यांच्यामध्ये चालणाऱ्या घडामोडीचे ज्ञान असणारे, वक्तृत्व गाजविणारे, आपल्या परीघाबाहेर दोस्ती करणारे युवक आज अभावानेच आढळतात. करिअर आणि त्यामधून मिळणारा पैसा हेच आयुष्याचे एकमेव ध्येय असेल तर धडपडपणाऱ्या युवकांची फळी उभी राहणे जरा अवघडच आहे. या संबंधात किमान पार्ल्यातील युवकांशी हितगुज करावे असा विचार आहे. हे हितगुज म्हणजे उपदेश नसून सूचना आहेत ही गोष्ट लक्षात ठेवावी. त्यासाठी विद्यार्थीदशेतील आणि नोकरी करणारे असे सर्व युवक माझ्या डोळयांसमोर आहेत.  या सूचना म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडा पाषाण’, असा प्रकार नाही.  त्या त्या सूचनेच्या संबंधात मी स्वत: काय केले याचा जरूर उल्लेख करीन.

व्यायामाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास 

समाजात अग्रस्थानी यायचे असेल तर शरीरप्रकृती सुदृढ हवी. त्यासाठी दररोज प्रचंड मेहनत केली पाहिजे असे नाही. दररोज नमस्कार, योगासने व प्राणायाम एवढा व्यायाम पुरेसा आहे. मात्र मी स्वत: कॉलेजमध्ये असतानाच शतकांच्या संख्येत दंड, बैठका आणि नमस्कार घातले आहे. याशिवाय कुस्ती, डबलबार, सिंगलबार आणि वेट लिफ्टिंग हे व्यायाम प्रकार चोखाळले आहेत.  व्यायामामुळे दिवसभर शरीर उत्साही राहते. तुमच्या नुसत्या शारीरिक हालचालीतून समवयस्क युवक तुमच्याकडे आकृष्ट होतात.  नमस्कार हा भारतीय व्यायाम प्रकार इतका विलक्षण आहे की त्याचा परिणाम म्हणून सर्व प्रकारचे रोग तुमच्यापासून दूर पळून जातील.  आज पाश्चात्य देशातही या व्यायाम प्रकाराने लोकांना भुरळ घातली आहे. जर्मनीमध्ये ‘स्योनेन ग्रुस’ आणि ‘सन सॅल्युटेशन’ या नावाने हा व्यायाम प्रसिध्द आहे. तेथील महिलांनीही नमस्काराचा व्यायाम आत्मसात केला आहे. दररोज नमस्काराचा व्यायाम घेतलात तर एक वेगळेच व्यक्तित्व तुम्हाला प्राप्त होईल. सदा सर्वकाळ तुम्ही उत्साही राहाल. नमस्कार केवळ मुलांनीच घालावेत असे नाही. मुलींनीही अवश्य नमस्कार घालावेत. आज वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी मी दररोज 25 नमस्कार घालतो.  हा लेख वाचल्यानंतर निश्चय करा की दिवसात किमान सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यनमस्काराचा व्यायाम करणारच. काही महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वात बदल झाल्याचे तुमच्या लक्षात येईल.

मनोरंजनावर नियंत्रण

आज सारा महाराष्ट्र मनोरंजनात आकंठ बुडाला आहे. सामाजिक संस्था, कट्टे, दूरदर्शन, नाटयगृहे, चित्रपटगृहे सर्वत्र मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल आहे. शिवाय विविध सीरीअल्स, नटनटयांच्या मुलाखती, विनोदी कार्यक्रम यांचीही एकच गर्दी उडाली आहे. मनोरंजन या एकाच गोष्टीने आपले जीवन इतके व्यापून टाकले आहे की त्यामध्ये आपण आयुष्यातील किती अमूल्य वेळ बरबाद करतो याचे भान आपल्याला राहत नाही.  दूरदर्शनवरील सिरीअल्स पहात असताना आपण आपला मेंदू गहाण टाकतो, आपली विचार शक्ती आणि सर्जनशीलता नष्ट होते, ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. कार्यक्रमांच्या मध्यात सातत्याने होणारा जाहिरातींचा भडिमार तुमचे आयुष्य लुबाडत आहे, हे ध्यानात घ्या. चित्रपटात दाखविल्या जाणाऱ्या भीषण हाणमाऱ्या, बीभत्स नृत्ये, अचरट विनोद, तुमचे आयुष्य कुरतडून टाकीत असतात. दैनंदिन जीवनात जे अशक्य आहे तेच चित्रपटांमधून शक्य असल्याचे भासविण्यात येते. यालाच फसवणूक असे दुसरे नाव आहे.  एकदोन अपवाद सोडले तर मी स्वत:1958 सालापासून एकही हिंदी व मराठी चित्रपट पाहिलेला नाही.  त्यामुळे माझे काडीचेही नुकसान झाले नाही.

तुमच्या गप्पांमध्येही नट, नटया, क्रिकेट, सिरीअल्स मधीलप्रसंग यासारखेच विषय असतात. क्रिकेट हा आता खेळ राहिलेला नाही. कोटयावधी रूपयांची उलाढाल असणारा तो एक धंदा झाला आहे. नट, नटया आणि क्रिकेटपटू याना देवत्व देऊ नका. वरील सर्व गोष्टींवर कठोर नियंत्रण ठेवाल तरच आयुष्यात काही तरी करू शकाल अन्यथा करमणुकीत फसाल. ‘सारखा टीव्ही पहाल तर निर्बुध्द व्हाल’. अशी एक नवीन म्हण या संबंधात तयार केली आहे.  दिवसातील किती वेळ मनोरंजनात खर्च करायचा याचा सर्व युवकांनी गंभीरपणे विचार करावा.

इंटरनेटचा सदुपयोग

अद्ययावत माहिती हस्तगत करण्यासाठी इंटरनेट हे उत्तम साधन आहे.  ‘कल्पवृक्ष’ अशी मी ‘इंटरनेट’ला उपमा दिली आहे. मागाल ती माहिती तुम्हाला इंटरनेट देईल. एखादा संदर्भ पाहिजे असला की मी इंटरनेटकडे धाव घेतो.  लेख, ग्रंथ, वक्तृत्व यांच्या तयारीसाठी इंटरनेट इतके उपयुक्त साधन दुसरे नाही  विज्ञानांच्या सर्व विषयांची उत्तमोत्तम माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.  एवढेच काय अनेक दुर्मिळ ग्रंथ इंटरनेटवरुन विनाशुल्क ‘डाउनलोड’ करता येतात. आता तुमच्या भ्रमणध्वनीवरही इंटरनेट स्थानापन्न झाले आहे.

काही विघ्नसंतोषी लोक तुमच्या इ-मेलवर ताबा मिळवितात. इंटरनेटद्वारे निरनिराळे व्हायरस सोडून तुमच्या संगणकावरील माहिती विकृत करतात. इंटरनेट नावाच्या कल्पवृक्षाचे विषवृक्षात रूपांतर करण्यात ही मंडळी तरबेज असतात. तुम्हीही हळू हळू त्यामध्ये ओढले जाता. ‘चॅटिंग, निरुद्देश सर्फिंग, ऍप्स, फेसबुक, व्टिटर’ वगैरे गोष्टी तुमच्यावर भुरळ टाकतात यु-टयुब वरील व्हिडीयो क्लिप्समध्ये तुम्ही रंगून जाता. फेसबुकवर तास न तास वेळ दवडणारे लक्षावधी युवक आहेत. त्या माध्यमातून फसवणूक, गुन्हेगारी, अपहरण अशा घटना वाढत चालल्या आहेत. आता त्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे, विशेषत: युवतींसाठी फेसबुकवरील मैत्री धोकादायक ठरत चालली आहे. ‘इंटरनेट’चा ज्ञान हस्तगत करण्यासाठी उपयोग करण्याऐवजी दिवसेंदिवस तरुण वर्ग ‘इंटरनेट’चा गुलाम बनत चालला आहे. केवळ ज्ञान मिळवण्यासाठीच ‘इंटरनेट’चा उपयोग करीन असा कृतनिश्चय केलात तरच इंटरनेटच्या कचाटयातून तुमची सुटका होऊ शकेल.

जी गोष्ट इंटरनेटची तीन भ्रमणध्वनीची. आज भ्रमणध्वनीचे विविध प्रकार बाजारात आले आहेत. स्मार्टफोन, आयपॅड, टच स्क्रीन मोबाइल्स यांनी बाजारपेठा भरल्या आहेत. रस्त्यावरून चालणाऱ्यांच्या कानावरील मोबाइलवरून सातत्याने संभाषण चालू असते, त्याचा परिणाम म्हणून गंभीर अपघातही झाले आहेत. बसेस, लोकल ट्रेन्स, उपहारगृहे यामध्ये आपल्या भ्रमणध्वनीवर बोटे फिरवित किंवा गेम खेळत वेळेचा चुरा करणारी असंख्य मंडळी आपले देहभान विसरत असतात.  वेळेच्या या अपव्ययाला आळा घालणे आवश्यक आहे.

वाचाल तर वाचाल!

‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ असे समर्थ रामदासांचे वचन आहे. स्वत:ला अद्ययावत ठेवायचे असेल तर दररोज वृत्तपत्र वाचलेच पाहिजे. आपल्या नेहमीच्या विषयाशिवाय एखादा आवडीचा विषय निवडून त्या विषयावरील पुस्तके, लेख वाचत राहिलात तर तुमच्या विचारांचा आवाका वाढेल. पुढे तुम्ही त्या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकाल. नुसते वाचन करूनही उपयोग नाही. तुमच्या आवडीच्या विषयावर लिहित रहा. ते प्रसिध्द करण्याचा प्रयत्न करा. त्या विषयावर वक्तृत्व गाजवा, वक्तृत्वासाठी पाठांतर आवश्यक आहे. पाठांतर म्हणजे ‘रोट लर्निग’ नाही. वक्तृत्वामध्ये संस्कृत सुभाषितांचा उत्तम उपयोग करता येतो. त्यांचे पाठांतर अवश्य करा. त्यामुळे तुमची स्मरणशक्तीही विकसित होईल. मुद्देसूद लेखन करण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. एखाद्या विषयाचा पिच्छा पुरवावा लागतो. संदर्भ शोधावे लागतात. क्वचित वेळा लेखन पुन्हा पुन्हा करावे लागते, मी स्वत: आजपर्यंत साठ ग्रंथांचे लेखन केले आहे.  त्या सर्वांची मिळून छापील 9.5 हजार पृष्ठे होतात.  समाजात मान्यता मिळवण्यासाठी ग्रंथ लेखन हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.

भटकंती करण्यासाठी मुंबईबाहेर चला!

वेळ मिळाला की दुर्गदर्शन आणि पदभ्रमण करण्यासाठी अवश्य मुंबईबाहेर जा.  महाराष्ट्रातील किल्ले ही आपल्यासाठी दैवी देणगी आहे. जाताना त्या दुर्गाचा इतिहास डोळयाखालून घाला. दुर्गाशिवाय महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक स्थळेही आहेत. आपल्या उपक्रमात मित्र मैत्रिणींना सहभागी करून घ्या. त्यातूनच तुमचे नेतृत्व विकसित होत जाईल. इतरांबरोबर कसे वागले पाहिजे, एकमेकांना कशा प्रकारे मदत केली पाहिजे, मार्गात निर्माण होणारी विघ्ने आणि अडचणी यांना कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे याचे आपोआप शिक्षण तुम्हाला प्राप्त होईल. अशाच प्रसंगातून व्यक्तिमत्व घडत जाते. त्यासाठी कोणताही क्लास लावण्याची आवश्यकता नाही.  शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले दुर्ग ही स्फूर्तीस्थाने आहेत.  मी स्वत: दशकांच्या संखेत किल्ले पाहिले आहेत. काही किल्लयांवर अभ्यासवर्ग आयोजित केले आहेत.  कै. गो. नी. दांडेकर. श्री. बाबासाहेब पुरंदरे, श्री. निनाद बेडेकर यांच्यासारख्या महान इतिहास अभ्यासकांबरोबर दुर्ग दर्शनाचा आनंद घेण्याचे भाग्य मला आणि माझ्याबरोबर असणाऱ्या शेकडो युवकांना मिळाले आहे. रायगडावरील शिवरायांचे सिंहासन ते त्यांची समाधी या मार्गावरील तीनशे लोकांची मूक मिरवणूक अजूनही माझ्या मनात ताजी आहे.

आकाशदर्शन हा आणखी एक असा कार्यक्रम आहे की ज्याच्या माध्यमातून तुमचा शेकडो तरुणांशी संपर्क येऊ शकतो.

देवांच्या मदतीस चला तर!

आज महाराष्ट्रातील अनेक खेडयापाडयात आणि लहान गावांमध्ये सरकारी मदत न घेता, सर्वस्व पणाला लावून निरलस आणि निरपेक्ष बुध्दीने कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ति आहेत. आश्रम शाळा, वसतिगृहे, विद्यालये, वैद्यकीय मदत, महिला सबलीकरण, विज्ञान केंद्रे, असे विविध प्रकारचे त्यांच्या कार्याचे स्वरूप आहे. सर्वस्व झोकून समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती म्हणजे वर्तमान कलियुगातील देव आहेत. त्यांना युवकांच्या सहकार्याची जरूर आहे. केव्हातरी वेळ काढून त्यांचे कार्य पहा, त्यांना कशाप्रकारे मदत करता येईल ते जाणून घ्या. या संबंधात वॉरन बफेट आणि बिल गेटस् या व्यक्तींचे आदर्श आहेत.  त्यांनी आपल्या संपत्तीचा ओघ जनहितासाठी काम करण्याऱ्यांकडे वळविला आहे. जनसेवेसाठी जे कंबर कसून उभे आहेत त्यांना तन, मन, धन, स्वरुपात जेवढी मदत करणे शक्य आहे तेवढी मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.

काही मननीय विचार

व्यक्तिच्या जीवनाचे उद्दिष्ट काय हवे ?  त्यासाठी त्याने काय केले पाहिजे?  समाजात कशा प्रकारे वागले पाहिजे? या संबंधात संस्कृत वाङमयात शेकडो सुभाषिते आहे. त्यातील दोन निवडक सुभाषितांचे भाषांतर, पुढे देत आहे.

जो झोपतो त्याचे भाग्यही झोपून जाते.

जो बसतो त्याचे भाग्यही बसून रहाते

जो उठून उभा राहतो त्याचे भाग्यही उभे राहते.

जो चालतो त्याचे भाग्यही चालू लागते.

चालत रहा! चालत रहा!

– ऐतरेय ब्राह्मण

जो पर्यंत शरीर निरोगी आहे,

जो पर्यंत वृध्दत्व दूर आहे,

जो पर्यंत इंद्रिये कार्यक्षम आहेत,

जो पर्यंत मृत्यू येत नाही,

तो पर्यंत सूज्ञ व्यक्तीने

स्वत:ला श्रेयस्कर असलेले कार्य

महत प्रयत्नाने केले पाहिजे.

घराला आग लागल्यावर

विहीर खणण्यात काय अर्थ आहे

– भर्तृहरी : वैराग्य शतक

वाचा, विचार करा आणि कृती करा !

आपण काय करु शकता ?

 • पुढील कार्यांसाठी ‘घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे’ युवक हवे आहेत.
 • महाराष्ट्रातील दुर्गांची ऐतिहासिक माहिती देणारे
 • आकाशदर्शन घडविणारे
 • विज्ञान विषयांवर भाषण देऊ शकणारे
 • कार्यक्रमांचे संचालन करणारे
 • कार्यक्रमांची आखणी करुन तडीस नेणारे
 • विविध विषयांवर स्पर्धाचे आयोजन करणारे
 • अभ्यासवर्गांची आखणी करुन नियोजन करणारे
 • गुढीपाडवा स्फुर्तीयात्रेतील जबाबदाऱ्या स्वीकारणारे
 • प्राचीन भारतीय ज्ञान संपदेचा अभ्यास करणारे
 • गणित चक्रचूडामणी भास्कराचार्य यांच्या कार्यावर बोलणारे

… तर, बारभाईचे कारस्थान करावे लागेल !

आचार्य अत्र्यांच्या हाताखाली त्यांच्या दै. मराठात सुरवात करून गेली  52 वर्षेइंग्रजी आणि मराठी नियतकालिकातून अथकपणे आणि धीरोदात्तपणे पत्रकारिता करणारे पार्लेकर अरविंद विठ्ठल कुळकर्णी ह्यांच्याविषयी प्रसिध्द पत्रकार दिवंगत बेहराम कॉट्रॅक्टर ह्यांनी The only Journalist in Maharashtra with genuine political contacts असे लिहिले होते कारण मोराराजींपासून वाजपेयींपर्यंत आणि अंतुल्यांपासून शंकरराव चव्हाणांपर्यंत अनेक राजकीय नेत्यांचा त्यांनी संपादन केलेला विश्वास थक्क करणारा होता. आपली हिंदुत्वनिष्ठा न लपविता असा विश्वास ते मिळवू शकले त्याला कारण त्यांची निस्पृहता. शरद पवारांना वयाची 50 वर्षेपूर्ण झाली तेव्हा त्यांच्या समवेत विमानाने नागपूर-मुंबई प्रवास करणारे आणि त्यांची मुलाखत घेणारे ते एकटे पत्रकार होते. तुम्ही हे जग सोडून जाल तेव्हा लोकांनी तुमची आठवण काढावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे आजचे डावपेचाचे राजकारण कामाला येणार नाहीत. त्यापेक्षा तुम्ही रयत शिक्षण संस्थेचे जे काम कराल तेच तुमच्या उपयोगी पडेल असे अरविंदरावांनी त्यावेळी त्यांना सुचविले होते. तुमचा राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतावाद जो काही आहे तो व्यवहारात यशस्वी होताना दिसत नाही. तरी प्रत्येक जिल्ह्यात दोन प्रचारक नेमून पाच वर्षात तुमचे विचार तुम्ही लोकांपर्यंत पोचवत का नाही असा प्रश्न कुळकर्णी ह्यांनी केला होता. त्यावर, आमच्याकडे अशा कामाला कार्यकर्तेमिळत नाहीत असे उत्तर तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी दिल्यावर दोघांनी मोकळेपणाने हसून विषय बदलला होता. मुंबईच्या इंग्रजी वृत्तपत्रात मराठी भावविश्वाचे अलीकडे जे त्यातल्यात्यात बरे प्रतिबिंब पडू लागले आहे त्याला कुळकर्णी यांनी मिड-डेतील जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न बऱ्याच अंशी कारणीभूत आहेत. आतंकवाद आणि भ्रष्टाचार इत्यादी भारताच्या बहुतेक समस्या त्याचा राष्ट्रवाद अधांतरी लटकत ठेवल्याने निर्माण झाल्या आहेत हा कुळकर्णी ह्यांचा सिध्दांत असून त्यादृष्टीने दहा पुस्तके होतील इतके लिखाण त्यांच्या हातून झाले आहे. परंतु प्रकाशकांनी त्यांना गाठायचे की त्यांनी प्रकाशकांना, हा वाद न मिटल्याने ते लिखाण तसेच पडून आहे.

तरुण असताना सुमारे तीस वर्षापूर्वी मी एका परिषदेसाठी पत्रकार म्हणून सुरतेला प्रथमच गेलो होतो. रात्री एकटाच फिरायला बाहेर पडलो. अनोळखी वस्तीत असे एकटयाने रात्री बाहेर पडू नये म्हणून सहकारी मित्रांनी प्रेमाने बजावले. तेव्हा अगदी सहजपणे त्यांना म्हणालो की अरे, येथे आपले शिवाजी महाराज छाती पुढे काढून बिनधास्तपणे पूर्वी येऊन गेले आहेत. त्यामुळे आपल्याला हा भाग अनोळखी नाही. आपल्याला येथे कोणी काही करणार नाही. आज मी विचार करतो तेव्हा आणखी काही वर्षांनी ह्या विलेपार्ल्यात इतक्या आत्मविश्वासाने आपण फिरू शकू का असे मनात येऊन जाते. मी मूळचा गिरगावचा आहे नि गेली 35 वर्षे पार्ल्यात नांदतो आहे. हे मुंबईतील पुणे. सुबक, सुंदर, समृध्द तरी साधे, संपृक्त आणि आटोपशीर उपनगर. घराबाहेर कोठेही गेलो तरी सुरक्षित आणि घरातल्यासारखे मोकळे वाटायचे. परंतु वर्तमानकाळ, भविष्याविषयी चिंता वाटावी असा संशयास्पद झाला आहे. सगळेच आपले आहेत. म्हणून स्पष्टपणे लिहिणे भाग आहे.

आतापर्यंत जो एकमेवाद्वितीय म्हणून लक्षात राहिला तो पार्ल्यातला एकजिनसीपणा तसाच टिकेल की  नाही या बद्दल मला शंका आहे. सामंजस्यपूर्ण शेजारधर्माचे पालन ही ज्यांची परंपरा असे लोक जर आता संघटन आणि सलोखा ह्यापासून लांब पळत असतील तर वाढत्या लोकवस्तीचे परिणाम म्हणून काहीशा आक्रमक नि असहिष्णू घटकांचा पार्ल्यात प्रवेश झाला, तर आपण काय करणार आहोत? सगळयांनी एकमेकांना धरून राहायचे आणि एकत्वाचा जीवनप्रवाह वाहता ठेवायचा ह्या निर्धाराने महामहीम बाबुराव परांजपे आणि  त्यांचे इंदुलकरांसारखे समविचारी सहनिवासी ह्यांनी निस्वार्थ बुध्दीने, संस्कारित वस्त्यांमागून वस्त्या उठविल्या. आज त्या वस्त्यांमधले तरुण अमेरिकेत वेगवान आणि वैभवी आयुष्य जगत आहेत आणि मागे राहिलेल्या त्यांच्या मात्यापित्यांना रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. पैशाचे महत्त्व नको तेवढे वाढले आणि एकजिनसीपणा मोडला.  अथपासून इतिपर्यंतचा प्रवास बाहेर जाऊन  येण्याचा अपरिहार्य अपवाद वगळता पार्ल्यातल्या पार्ल्यातच शांतपणे आणि समाधानाने करता यावा म्हणून कितीतरी सामाजिक संस्था अस्तित्वात आल्या आणि त्यांनी एक समाजोन्मुख सुंदर संस्कृती उभी केली. आज त्यांच्याकडे तरुण कार्यकर्ते नाहीत. संचालक मंडळे डबक्यासारखी झाल्याने आणि विश्वास हरवून बसल्याने विसर्जित करावी लागत आहेत. प्रबोधन कमी, मनोरंजन अधिक होत आहे. अनेक  संस्थांना कार्यवाह नाहीत, जेथे आहेत तेथे ते एकमेकांचे तोंड बघत नाहीत. सांस्कृतिक संघटनांचे प्रमुख, अनुशासन हीनतेला प्रोत्साहन देताना दिसतात. ज्याच्याकडे पैसा अधिक तो नेतृत्व करताना दिसतो. अलीकडचा अनुभव असा आहे की पार्लेकर एखाद्या जिव्हाळयाच्या विषयावर आंदोलन करायचे ठरवितात. सभा घेतली जाते. निर्धाराने कार्यक्रम घोषित केला जातो आणि थोडया दिवसांनी लक्षात येते की सगळे बारगळले आहे. अशी अवस्था सामान्य माणसातील संशयाला आणि नैराश्याला जन्म देते. अफवांना तोंड फुटते आणि नेत्यांवराचा विश्वास उडतो. असे नेहमी होणे घातक ठरू शकते.

समस्त पार्लेकरांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यासाठी शोकसभा का झाली नाही?  बाळासाहेबांशी मतभेद असू शकतात. पण, पाकिस्तान आणि चीन ह्यांच्या मानसिक दडपणाखाली रहायचे नाकारणाऱ्या लढवय्या मराठी समाजाची निर्मिती बाळासाहेबांनी केली आणि विघटनकारी प्रवृत्तींना एका मर्यादेत धाक वाटेल अशी शक्ती निर्माण केली, हे कर्तृत्व सामान्य नाही. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे पार्लेकरांचे कर्तव्य होते.

जी अवस्था संस्थांची तीच व्यक्तींची. एकेका क्षेत्रात चांगला पराक्रम करून नावारूपाला आलेल्या दिग्गजांची संख्या पार्ल्यात लहान नाही. ह्या मोठया माणसांना आता आयुष्यात मिळवायचे काही राहिलेले नाही. पार्ल्यातील तरुण पिढी तशी दमदार आहे. त्यांना कर्तृवाचे धुमारे फुटू शकतात. ते पार्ल्याचे वायुमंडळ सुगंधित करू शकतात. प्रज्ञा आणि प्रतिभा दोन्हीत हे तरुण कमी  नाहीत. पण त्यांचा आणि ज्येष्ठांचा म्हणावा तसा ताळमेळ नाही. कारणे काही असोत पण सातत्यात संस्कृती असते हे वरिष्ठांनी ओळखले पाहिजे आणि कनिष्ठांशी संवाद करताना थोडा तरी उत्साह दाखविला पाहिजे. टिळकांच्या काळात वेश्यांनाही नीतीमत्ता होती असे पु.भा.भाव्यांनी लिहून ठेवले आहे. टिळकांचा वारसा अभिमानाने मिरविण्यात विलेपार्ले नेहमी पुढे असते. बाबुराव परांजप्यांनी केवळ तोंडी वचनावर लोकांना घरे राहायला कशी दिली त्याच्या कथा पूर्वी ऐकायला मिळत. आता मृत्युशय्येवर दिलेली वचनेही कोणी पाळीत नाही. कारण नीतीमान माणसांचा धाक उरलेला नाही. कौटुंबिक वाद पार्ले पोलिस स्थानकात कसे भांडले जातात ह्याचा विचार व्हायला हवा आहे. पु.ल. देशपांडयांच्या पार्ल्यात आता शुध्दलेखनाचा आग्रह कमी होत आहे ही चिंतेची बाब आहे. नैतिक धाक असणाऱ्या व्यक्ती कमी होत आहेत. म्हणून आता बारभाईचे कारस्थान करावे लागेल. नारायणरावाची हत्या झाल्यानंतर हिंदवी साम्राज्य तोलून धरण्यासाठी त्यावेळचे मुत्सद्दी आणि सेनापती एकत्र आले  आणि त्यांनी संयुक्तपणे दायित्व पेलून गाडा पुढे रेटत नेला. पार्ल्यात आज तसा उठाव करावा लागणार आहे. लहानमोठया संस्था आणि व्यक्तींना एकत्र यावे लागेल आणि आपल्या निस्वार्थ सेवा आणि विधायक उपक्रमांनी लोकांचा विश्वास संपादन करून जेथे ज्येष्ठ कमी पडतात ती  पोकळी भरून काढावी लागेल. तसे केले नाही तर पैसा हा परमेश्वर होईल आणि आपल्या वाडवडिलांनी खस्ता खाऊन वाढवलेल्या  संस्था चोरापोरी जातील. काहींना ही ‘लांडगा आला रे’ अशी इसापनीती छाप आरोळी वाटेल. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की काही वेळा कोणीतरी तसे बोंबलत राहणे काळाची आवश्यकता असते.

सुसंस्कृत पार्ले स्वच्छ-सुंदर व्हावे! – श्रीधर फडके

पार्ले! मराठमोळया वातावरणाचं, मराठमोळया संस्कारांचं, विद्या – कला यांच्या समृध्दीचं पार्ले! मी आता जरी पार्लेकर असलो तरी तसा मूळचा दादरचा. माझ्या वयाची चाळीस वर्षे मी शिवाजी पार्क परिसरात राहिलो. माझं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण दादरलाच झाले. कॉम्प्युटर सायन्स या विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी मी अमेरिकेत गेलो.  अमेरिकेतच मी ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ या अभंगाला चाल लावली. बाबूजींनादेखील ती आवडली. बाबूजी आणि माझी आई (प्रसिध्द गायिका – पूर्वाश्रमीच्या ललिता देऊळकर) यांच्यामुळे आमच्या घरचे वातावरण संगीतमय होते. अनेक कलावंतांचे आमच्या दादरच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे संगीताचे उत्तम संस्कार मनावर, कानावर होत होते. दादरलाच संगीतकार म्हणून माझी जडणघडण सुरू झाली, संगीत देण्याचा छंद जडला आणि चाली द्यायला सुरुवात झाली.

दादरहून मी पार्ल्यात आलो ते 1990 साली. शिवाजी पार्क येथील बालमोहन विद्यामंदिरात शिकणाऱ्या माझ्या दोन्ही मुलींना पार्ल्यातल्या प्रसिध्द पार्लेटिळक विद्यालयाच्या मराठी माध्यमात प्रवेश मिळाला. त्यावेळी पार्ले हे सांस्कृतिकदृष्टया समृध्द उपनगर म्हणून जाणले जायचे – आजही आहे. इथे नेहमी दर्जेदार कार्यक्रम होतात, अनेक गुणी कलावंतांची पार्ल्यात ये-जा आहे आणि रसिकवर्ग अतिशय जाणकार आहे. कलेच्या विकासासाठी इथले वातावरण अतिशय पोषक आहे.  पार्ल्यात माझ्या अनेकांशी ओळखी झाल्या, चांगले मित्र मिळाले, जाणकार कवींशी परिचय झाला. ‘फुलले रे क्षण माझे’, ‘मी राधिका’ सारखी उत्तमोत्तम गाणी लिहिणारे  कवी नितीन आखवे हेही पार्ल्याचेच. थोडक्यात, पार्ल्यात माझ्या कलेचा हिरवा ऋतु मी अनुभवला. ‘ऋतु हिरवा’ या ध्वनिमुद्रिकेतील 6 गाण्यांच्या चाली आणि शब्द दादरला असतानाच तयार झाले होते. पार्ल्यात आल्यावर ‘फुलले रे क्षण माझे’ आणि ‘माझिया मना’ या दोन गाण्यांचे शब्द आणि चाली तयार झाल्या. पार्ल्यात आल्यावर मला अनेक सन्मान मिळाले. ती.बाबुजींच्या 80व्या वाढदिवसाचा भव्य सोहळा इथेच झाला. अशा कितीतरी हृद्य आठवणी पार्ल्याशी निगडीत आहेत. थोडं गमतीनं सांगायचं तर पार्ल्यातच मी तरूण संगीतकाराचा ज्येष्ठ (वयाने) संगीतकार झालो.

आज ह्या क्षेत्रात धडपडणारी तरुण मंडळी मला भेटतात. त्यांच्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे, ठिणगी आहे. फक्त झटपट प्रसिध्दीच्या मागे न धावता ही कला, विद्या मुळातून त्यांनी आत्मसात करायला हवी. त्यावर विचार करायला हवा. विशेषत: पालकांनी  मुलांना लहान वयात प्रसिध्दी, स्टेज शोज यापासून थोडं दूर ठेवून त्यांच्या घडण्यावर लक्ष द्यायला हवे. संगीताबरोबर आपली शैक्षणिक बाजूही त्यांनी बळकट करायला हवी. संगीतात जर करियर करायचे असेल तर शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाला पर्याय नाही. खरं तर शालेय अभ्यासक्रमातच मुलांचा कल पाहून त्यांना योग्य तो मार्ग दाखवायला हवा. सध्याच्या ीशरश्रळश्रू ीहेुी मध्ये काही गायकांचे गाणे आपल्याला आवडून जाते. वाद्यमेळ, पेहराव, सादरीकरण अशा अनेक बाबींचा तो एकत्रित परिणाम असतो. मात्र नंतर कधीकधी त्यांच्या गाण्यातल्या त्रुटी जाणवतात.

अर्थात ही पिढी बुध्दिमान आहे, मेहनती आहे, तंत्रदृष्टया प्रगत आहे. ती निश्चितच उज्ज्वल कारकीर्द घडवेल. पण ह्या मुलांनी जे जे चांगलं आहे ते ते ऐकलं पाहिजे. संगीत क्षेत्रातील एक मोठा माणूस म्हणाला होता की गाणं कधी येतं? 1% शिक्षण, 10% रियाज, 100% श्रवण असेल तर! म्हणून हे क्षेत्र श्रवणभक्तीचे आहे. आज अनेक चांगले गायक, संगीतकार आपापले काम उत्तम करताहेत. पार्ल्यातल्याच निलेश मोहरीर या संगीतकाराची गाणी मला मनापासून आवडतात. त्याच्या संगीतातलं माधुर्य विशेष लक्षणीय आहे.

स्वर, लय, ताल, शब्दोच्चार आणि भाव यांचा संगम म्हणजे संगीत. यात कुठेही काही कमी जास्त झालं तर ते संगीत हृदयाला भिडत नाही. हे सगळे बारकावे गायकांनी, संगीतकारांनी लक्षात घ्यायला हवेत. बाबुजी आणि इतर दिग्गज संगीतकारांच्या गाण्यांचा अभ्यास करून मला अनेक चांगल्या गोष्टी उलगडल्या. पण एखादे गाणे बांधताना माझं संगीत माझं असावं याकडे माझा कटाक्ष असतो.

या माझ्या सगळया संगीतक्षेत्रातल्या प्रवासात, वाटचालीत पार्ल्याचा, पार्लेकरांचा खूप मोठा वाटा आहे. इथे मला खूप प्रेम, जिव्हाळा, आपुलकी मिळाली. पार्ल्याबद्दल जितकं बोलावं, लिहावं तितकं कमी आहे. पण आता पार्लं बदलतंय याचीही जाणीव होतेय. पूर्वीची शांतता, हिरवाई, स्वच्छता हरवत चालली आहे.

नुसतं सांस्कृतिकदृष्टया समृध्द उपनगर एवढीच पार्ल्याची ओळख न राहता ‘स्वच्छ, सुंदर आणि देखणं उपनगर’ अशीही ओळख व्हायला हवी. या प्रत्येक बाबतीत महानगरपालिकेवर अवलंबून राहता येणार नाही. सुजाण, जबाबदार नागरिक म्हणून हे आपलंही कर्तव्य आहे. पार्ल्यात अजूनही अनेक रस्त्यांवर दुतर्फा झाडं आहेत. त्यामुळे थोडी स्वच्छता राखली तर ते आपोआपच सुंदर होणार नाही का? इथला प्रत्येक रस्ता, प्रत्येक पदपथ स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने उचलली तर बरंच काही साध्य होईल. वीजकंपन्यांच्या दुरुस्तीच्या कामानंतरही खड्डे तसेच, वायर्सची भेंडोळी रस्त्यावरच पडलेली, पदपथावरचे पेव्हर ब्लॉक उखडलेले दिसतात. काही पदपथ इतके उंच आहेत की ज्येष्ठांसाठी त्याच्यावरून चालणे अतिशय त्रासदायक होते. गाडयांची ने-आण करणे सोईचे जावे म्हणून सोसायटयांच्या गेटजवळ उतार केला जातो त्यामुळे चालताना दर पाच-दहा पावलांवर इमारत आली की खाली उतरायचे, पुन्हा वर एक पायरी चढून फुटपाथवर जायचे… ह्यावर थोडा विचार व्हायला हवा.

पार्ल्याचेच नव्हे तर सर्वच शहरांचे सौंदर्य बिघडवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे होर्डींग्ज किंवा पाटया! वाढदिवसाच्या शुभेच्छा, श्रध्दांजली, अभिनंदन, अमुकच्या प्रयत्नाने तमुक काम सुरु… असे लिहिलेले मोठमोठे फलक अतिशय खटकतात. (ह्यात माझ्याही कार्यक्रमाचे फलक असतात कधीकधी) आणि ते महिनोन्महीने तसेच राहतात. फलक लावणाऱ्यांना या बाबतीत कधी विचार करावासा वाटत नाही का?

असे अनेक प्रश्न आज आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांच्या निवारणासाठी गरज आहे ती एकत्र येण्याची. पार्ल्यातल्या सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थानीही यासाठी एकत्र यायला हवं. आज स्वच्छ पार्ले, सुंदर पार्ले, सुबक पार्ले, समृध्द पार्ले अशी पार्ल्याची खरी ओळख निर्माण करायला हवी.

शब्दांकन – धनश्री लेले