संपादकीय – वार्षिक विशेषांक २०१८

_mg_0080‘आम्ही पार्लेकर’ ने वार्षिक अंकाची प्रथा सुरु करून दोन तपे लोटली पण प्रत्येक वेळी तो एक नवा अनुभव देऊन जातो.

गेली अनेक वर्षे मराठी साहित्य क्षेत्रात दिवाळी अंकांची परंपरा आहे. सुमारे ४०० ते ४५० दिवाळी अंक दार वर्षी प्रकाशित होतात व हा एक मान्यता प्राप्त साहित्य प्रकार झाला आहे. असे असतानाही दिवाळी अंकांची भाऊगर्दी टाळण्यासाठी व स्वतःचे वेगळे अस्तित्व जपण्यासाठी आम्ही पार्लेकर ने वार्षिक अंकाची प्रथा सुरु केली व यशस्वीपणे राबवली. काही वेळा आम्ही ह्या अंकासाठी विशिष्ठ विषय निवडले, उदाहरणार्थ  क्रीडा, घरकुल, मनोरंजन विश्व इत्यादी. पण ह्यामुळे इतर विषयांवर अन्याय होतो व अंकातील वैविध्य कमी होते असे आमच्या लक्ष्यात आले. ह्याचमुळे गेली काही वर्षे आपला वार्षिक अंक हा जास्तीत जास्त विषयांना स्पर्श करणारा असावा असा आमचा प्रयत्न असतो. ह्या निमित्ताने अनेक विषयांवर अनेक लेखकांशी, विचारवंतांशी, तज्ज्ञांशी चर्चा होते. कुठले विषय महत्वाचे आहेत ? लोकं सध्या काय वाचतात ? समाजात नवीन काय बदल घडतायत ? ह्याचे भान येते आणि म्हणूनच २०१८ चा ‘आम्ही पार्लेकर’ चा वार्षिक अंक वाचकांना सुद्धा एक नवा अनुभव देईल अशी खात्री वाटते. ह्या अंकातील मराठी जगतातील काही वैशिष्टयपूर्ण व्यक्तींशी संवाद साधणारे ”थेटभेट’, अनेक क्षेत्रात पारंपरिक गोष्टींकडे नव्याने पाहण्याच्या प्रवाहाचा लेखाजोगा मांडणारे ‘जुनं …… नव्याने’, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय माध्यमांवर २०१८ मध्ये ठसा उमटवणारे ‘न्यूसमेकर्स’ हे विभाग आपल्या पसंतीस नक्कीच उतरतील. त्याच बरोबर मराठी सारस्वतातील उत्तुंग व्यक्तिमत्वे ग दि माडगूळकर, पु.ल देशपांडे व सुधीर फडके ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना वाहिलेली मानवंदना अत्यंत वाचनीय अशी आहे. पुलंच्या विविध  व्यक्तिरेखांवर आधारित ‘व्यक्ती आणि वल्ली रिटर्न्स’ हा व्यंगचित्रांचा संच तर केवळ अफलातूनच आहे. वार्षिक अंकाच्या मुखपृष्ठावर पार्लेकर चित्रकारांचाच हक्क आहे अशी आमची अनेक वर्षांपासूनची भूमिका आहे व आजपर्यंत अनेक दिग्गज कलाकारांच्या चित्रकृती आपण पाहात आला आहेत. ह्यावेळच्या मुखपृष्ठावरील चित्र सुद्धा अश्याच एका जेष्ठ कलाकाराच्या कुंचल्यातून साकारले आहे.

सरत्या वर्षातील मासिक अंकात सुद्धा ‘आम्ही पार्लेकर’ ने अनेक विषयांना स्पर्श केला. ‘लक्षवेधी’, ‘झेप’, ‘स्टार्टअप’, ‘गुरुवंदना’ ह्यासारख्या सदारांना छापील अंकाबरोबरच डिजिटल विश्वात सुध्हा भरघोस प्रतिसाद मिळाला. पार्ल्यात अनेक जुन्या वाड्या, वस्त्या आहेत. तेथील रहिवाश्याच्या जीवनावर प्रकाश टाकणारी, त्यांच्या समस्यांचा उहापोह करणारी आमची लेखमाला सर्वांच्या पसंतीस उतरली. पुढील वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये सुद्धा ‘आम्ही पार्लेकर’ च्या मासिक अंकात अनेक वैशिष्ठ्यपूर्ण सादरे असतील ह्याची खात्री बाळगा ! ‘पार्लेकर youtube चॅनेल’ नुकताच सुरु झाला आहे. त्याला सुध्हा पार्लेकरांचा प्रतिसाद आश्वासक आहे.

आता थोडे पार्ल्याविषयी. ह्या वर्षी पावसाळ्यात पाणी जास्त तुंबले नाही ह्याचे श्रेय महानगरपालिकेच्या कामाला व त्याचबरोबर त्यांचा पाठपुरावा करणाऱ्या आमच्या लोकप्रतिनिधींना द्यावे लागेल. ह्या वर्षी अनेक रस्त्यांचे दुरुस्तीकरण सुद्धा झाले. पार्ल्यातील वाहतुकीचा प्रश्न मात्र दिवसेंदिवस उग्र बनत चालला आहे व त्याचे उत्तर शोधण्यात कोणालाच रस नाही अशी लोकांची भावना होत आहे. वाढत जाणारी गाड्यांची संख्या, पार्किंग च्या जागेचा अभाव, पुनर्विकास प्रक्रियेमुळे उभ्या राहणाऱ्या उंच इमारती, रस्त्यावर दुतर्फा वस्तीला असणारे फेरीवाले ह्या सर्वांमुळे सामान्य पार्लेकर पादचाऱ्यांचा फारच गैरसोय होत आहे. ह्या व अश्या अनेक प्रश्नांत प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे. हे मला पूर्ण मान्य आहे की मुंबईतील इतर अनेक उपनगरांपेक्षा पार्ल्यात कमी समस्या आहेत, लोकं सभ्य, सुसंस्कृत आहेत व कायद्याने वागणारी आहेत. गुंडगिरीची, चोऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. असे असले तरी अनेक बाबतीत लोकांना मदतीची गरज असते व त्याचसाठी प्रशासन आणि आपल्यातील दुआ म्हणून आपण लोकप्रतिनिधी निवडतो. अर्थात लोकांच्या अपेक्षा १०० टक्के पूर्ण करणे अशक्य असते पण आपला प्रतिनिधी आपल्यासाठी काम करत आहे ही भावना निर्माण करणे गरजेचे आहे.

समस्त पार्लेकरांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेछा !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s