संपादकीय – वार्षिक विशेषांक २०१७

संपादकीय – वार्षिक विशेषांक २०१७

_mg_0080‘आम्ही पार्लेकर’चे हे 26 वे वर्ष. 1991 साली भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिकीकरणाचे व उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘आम्ही पार्लेकर’चा पहिला अंक प्रकाशित झाला. Globalisation प्रमाणेच Localisation सुद्धा गरजेचे आहे हा विचार त्यामागे होता. पार्लेकरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळेच मुंबईचे हे पहिले उपनगरीय वार्तापत्र मूळ धरू शकले, वाढू शकले, पार्लेकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले.

मुक्त अर्थव्यवस्थेच्या २५ वर्षात फक्त अर्थकारणात नव्हे तर संपूर्ण समाजातच आमूलाग्र बदल झाले. ह्यात कुठलेच क्षेत्र सुटले नाही. साहित्य, सिनेमा, कला, क्रीडा, प्रत्येक क्षेत्राचा चेहरा मोहराच पूर्णपणे बदलून गेला आहे. ह्यात सर्वात जास्त बदल हा मध्यम वर्गात झाला असे म्हणतात. या वर्गाची फक्त जीवनशैलीच नव्हे तर जीवनमूल्येही पार बदलून गेली आहेत. कुटुंबाची रचना, त्यातील घटकांचे परस्परसंबंध ह्यातसुद्धा काळाच्या ओघात खूपच फरक पडला आहे.

जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या ह्या बदलांचा परिणाम नैसर्गिकपणे पार्ल्यातील मराठी समाजावरही झाला. कनिष्ठ मध्यम वर्गात मोडणार्‍या ह्या बहुतांश समाजाचे परिवर्तन गेल्या २५ वर्षात उच्चभ्रू मध्यमवर्गात झाले आहे. जागतिकीकरणामुळे वाढलेल्या संधी व त्याला मिळालेली शिक्षणाची जोड ह्यामुळे आज पार्लेकरांच्या कर्तृत्वाची पताका पार साता समुद्रापल्याड पोहोचली आहे. अनेक उच्चशिक्षित पार्लेकर तरुण आज देशविदेशात आपल्या क्षेत्रात चमकत आहेत.  भौतिक पातळीवरसुद्धा पार्ल्यात अनेक बदल आले आहेत. अनेक ठिकाणी टुमदार घरांच्या, बैठ्या इमारतींच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. कमर्शिअल कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल्स, ठिकठिकाणी नवीन पद्धतीची eating joints ह्यांनी पार्लेनगरीचा चेहरामोहराच बदलून गेला आहे म्हणा ना! पार्ल्यात संस्थांची परंपरा फार जुनी आहे. ह्याच बरोबर गेल्या काही वर्षात येथे अनेक सांस्कृतिक, सामाजिक तसेच कला व क्रीडा क्षेत्रातील चळवळी उभ्या राहिल्या व त्यामुळे पार्ल्यातील तरुणांना व्यक्त होण्यासाठी अनेक व्यासपीठे निर्माण झाली.

पार्ल्यात व पार्लेकरांमध्ये होणार्‍या ह्या बदलांचा ‘आम्ही पार्लेकर’ हा फक्त साक्षीदारच नव्हे तर catalyst सुद्धा आहे. ‘आम्ही पार्लेकर’ ने स्थानिक बातम्यांचा ,घटनांचा लेखाजोखा तर मांडलाच पण त्याचबरोबर सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील नवनवीन कल्पनांचा, प्रयोगांचा, उपक्रमांचासुद्धा वेळोवेळी आढावा घेतला. अनेक वेळा त्यात सहभाग, तर प्रसंगी ह्या बदलांचे नेतृत्वही केले.

‘आम्ही पार्लेकर’ अंकाचे रंगरूपही ह्या काळात पूर्णपणे बदलले. कृष्णधवल अंकाचे रूपांतर रंगीत अंकात झाले. मांडणी सुबक झाली. गेल्या वर्षी रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘आम्ही पार्लेकर’ चा लोगोसुध्दा बदलण्यात आला. आमची अनेक सदरे लोकांच्या पसंतीस उतरली. ‘आठवणीतले पार्ले’, ‘आम्ही(ही) पार्लेकर’, ‘समाजभान’, ‘रंग माझा वेगळा’, ‘तिसरी घंटा’ ‘झेप’ ह्यासारख्या सदारांना वाचकांनी भरभरून पसंती दिली. छापील अंकासोबतच ‘आम्ही पार्लेकर’ने आता डिजिटल माध्यमातदेखील जोरदार मुसंडी मारली आहे. वेबसाइट, व्हॉट्स अॅप, फेसबुक ह्यामुळे आता आमचा वाचकवर्ग जगभर पसरला आहे.

ह्यावर्षीचा वार्षिक अंक ‘बदल’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. निरनिराळ्या क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षात झालेले बदल, त्यासंबंधी निरीक्षणे व मते तज्ज्ञांनी मांडली आहेत. ह्या बरोबरच मराठी माणूस आणि मार्केटिंग, अशी होती मुंबई, ताडोबाची सफर व असे रंजक लेख, चित्रपटनिर्मात्या सुमित्रा भावे, ज्येष्ठ    साहित्यिका अरुणा ढेरे, हरहुन्नरी लेखक व प्रशिक्षक वसंत लिमये, मनोरंजन क्षेत्रात क्रांती घडवणारे नितिन वैद्य, ग्रामीण विकासाचे प्रणेते प्रदीप लोखंडे अशा दिग्गजांच्या  मुलाखती व ह्याच्या जोडीला खुमासदार व्यंगचित्रे आहेतच. नेहमीप्रमाणे वार्षिक अंकाच्या मुखपृष्ठावर पार्लेकर रंगकर्मींचा हक्क आहे. ह्या वर्षीचे मुखपृष्ठ सजले आहे ज्येष्ठ चित्रकार वसंत सोनवणी यांच्या अप्रतिम कलकृतीने. असा हा 2017 चा वार्षिक विशेषांक आपल्या पसंतीस उतरेल अशी खात्री वाटते !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s