विशेष संपादकीय

_mg_0080सर्वप्रथम विलेपार्ले विभागातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे व नगरसेविकांचे हार्दिक अभिनंदन ! मुंबईतच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात सुसंस्कृत व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या पार्ल्यासारख्या उपनगराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपणास मिळत आहे. आपण आजपर्यंत सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामामुळेच पार्लेकरांनी आपल्याला हा मान दिला आहे ह्यात शंका नाही. मुंबई शहरातील बहुतेक उपनगरे आज बकाल अवस्थेत आहेत पण आपले पार्ले मात्र स्वतःचे वेगळेपण टिकवून आहे. ‘पुणे तेथे काय उणे’ असे म्हटले जाते. ही उक्ती पार्ल्यालासुद्धा पूर्णपणे लागू होते असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सभ्य, सुसंस्कृत व एकसंध समाज, शिक्षणाची उत्तम सोय, सांस्कृतिक उपक्रमांची व कार्यक्रमांची रेलचेल, पार्ल्यात सर्वकाही आहे. उगाच नाही आपल्या पार्ल्याला मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणत !

हे सर्व खरे असले तरी पार्ल्यात सामाजिक प्रश्नच नाहीत असे म्हणणे योग्य होणार नाही. रस्त्यावरील ट्रॅफिकचाच प्रश्न घ्या. अनेक रस्ते संध्याकाळी वाहनांनी तुडुंब भरलेले असतात. वाहने दिवसेंदिवस वाढत जाणार हे जरी खरे असले तरी रस्त्याच्या दुतर्फा केलेल्या पार्किंगचे काय ? ह्यात बाहेरीलसुद्धा अनेक वाहने असतात हे सर्वजण जाणतात. अनधिकृत फेरीवाल्यांनी काबीज केलेल्या फुटपाथचे काय ? सामान्य लोकांचे, जेष्ठ नागरिकांचे रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले आहे. ह्या सर्वांवर धडक कारवाई होणे तसेच पार्ल्यातील काही रस्ते वन वे करणेसुद्धा गरजेचे आहे.

पार्ल्यातील रस्त्यांवरील खड्‌ड्यांचे प्रमाण तसेच पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाले आहे हे मान्य. काही रस्त्यांची दुरुस्तीची कामे सुरू आहेत. चांगली गोष्ट आहे. पण काम सुरू करण्याआधी त्या रस्त्यावरील सहनिवासांना कामाची आगाऊ कल्पना देणे गरजेचे वाटत नाही का? काम कसले आहे? किती दिवस चालणार? कोण कॉन्ट्रॅक्टर आहे? कामाचा अपेक्षित खर्च किती आहे? कामासंबंधी काही अडचण आल्यास कोणाशी संपर्क साधावा? ह्याची माहिती त्या परिसरातील नागरिकांना असणे अत्यावश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र फक्त ‘माननीय अमुक अमुक ह्यांच्या अथक परिश्रमाने . . . . . . ‘ एवढेच फलक लागतात.

आज जरी पार्ल्यात पाण्याचा प्रश्न नसला तरी पुनर्विकासाचा वेग पाहता लवकरच आपला पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे हे नक्की. काय विचार केला आहे आपण ह्याचा? काय योजना आहेत आपल्याकडे? कुठून आणणार पाणी?

पार्ल्यातील स्वच्छता गेल्या काही वर्षात वाढली असली तरी अजूनही काही रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पडलेले दिसतात. ओल्या सुक्या कचऱ्याचे अजूनही वर्गीकरण होत नाही. काही सामाजिक संस्था, चळवळी ह्या प्रकारची जागृती करत आहेत पण त्यांना नगरसेवकांची व पालिकेची साथ मिळाली पाहिजे.

आपले पार्ले हे मुंबई शहरातील एक सुरक्षित उपनगर समजले जाते. येथे गुंडगिरी, चोरीमारी ह्यांचे प्रमाण इतर उपनगरांपेक्षा कमी आहे हे खुद्द पोलीसच मान्य करतात. अनेक ठिकाणी CC TV बसवले असल्याने परिसरावर चांगली नजर ठेवता येते. असे असले तरी चोऱ्या अधून मधून होतच आहेत. चेन स्नॅचिंगचे प्रकारही मधून मधून ऐकू येतात.

नगरसेवक मित्रांनो, आपण जरी एका पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली असली तरी आता आपण आपल्या संपूर्ण प्रभागाचे प्रतिनिधित्व करत आहात, ज्यांनी आपल्याला मते दिली त्यांचे व ज्यांनी आपल्याला मते दिली नाहीत त्यांचे सुद्धा ! पार्ल्यात असे अनेक प्रश्न आहेत जे सोडवण्याकरता पार्ल्यातील नगरसेवकांनी आपापल्या पक्षाचे झेंडे बाजूला ठेऊन विचार करणे गरजेचे आहे. काही प्रश्न पक्षीय राजकारणाच्या वरचे असतात हे आपण सर्वच जाणतो. नागरिकांनीसुद्धा आपापसात टिका करण्यापेक्षा नगरसेवकाशी (मग तो कुठल्याही पक्षाचा असो) आपल्या अडचणींबाबत बोलले पाहिजे व पालिकेच्या नियमांच्या चौकटीत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘आम्ही पार्लेकर’तर्फे वेळोवेळी नागरिक – लोक प्रतिनिधी समन्वयाच्या बैठकींचे आयोजन करण्यात येते व पार्ल्याच्या नागरी प्रश्नांविषयी चर्चा घडवून आणण्यात येते. आपल्या अंकातूनही पार्ल्याच्या प्रश्नांसंबंधी वाचा फोडली जाते त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनी राबवलेल्या लोकोपयोगी उपक्रमांचीही योग्य ती दखल घेतली जाते, यापुढेही घेतली जाईल. पार्ल्यातील समाजपयोगी उपक्रमांना / चळवळींना बळ देण्याची भूमिका ‘आम्ही पार्लेकर’ने नेहमीच घेतली आहे. पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व पार्लेकर ह्यांनी एकत्रितपणे काम केले तर पार्ल्याचे प्रश्न सुटायला कितीसा वेळ लागेल ?

पुन्हा एकदा सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे अभिनंदन व पार्ल्याला एक आदर्श उपनगर बनविण्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s