फनेल झोनमधील रखडलेला पुनर्विकास- भाग २

fanel-zoneमुंबई महानगरीचा कायापालट करणारा नवा महत्वाकांक्षी विकास आराखडा DCR २०३४ बनवताना विकासाबरोबर इथल्या मूळ रहिवाशांचा नक्कीच विचार झाला असेल, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा. पण हा विकास आराखडा मुंबई विमानतळाच्या रनवे फनेल झोनमध्ये येणाऱ्या सांताक्रूझ, कुर्ला, विलेपार्ले, घाटकोपर परिसरातल्या चाळीस ते पन्नास वर्षं आणि त्याहूनही जुन्या इमारतींच्या मुळावरच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे! या गंभीर समस्येबाबत लेखाचा हा उत्तरार्ध.

विमानतळापासून साधारण दोन ते अडीच किलोमीटरच्या परिघातल्या या इमारतींच्या उंचीवर कमी-अधिक प्रमाणात निर्बंध आहेत. त्यामुळे केवळ विमानतळाच्या रनवे फनेलमध्ये येत असल्याने, त्यांचा पुनर्विकास आज जवळजवळ अशक्य ठरला आहे.

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या अधिकारांमध्ये राईट टू प्रॉपर्टी आणि  राईट टू एन्जॉय प्रॉपर्टी हे अधिकार येतात. त्यामुळे आपण राहत असलेल्या इमारतीचे सरासरी आयुर्मान संपल्यावर तिचा पुनर्विकास करण्याचा अधिकार आपल्याला असतो. मात्र, ही गोष्ट विमानतळ फनेल क्षेत्रातल्या इमारतींना लागू होत नाही. पुढे दिलेल्या तक्त्यावरून हे स्पष्ट होतं.

पुनर्विकास करताना रनवे फनेल क्षेत्राबाहेरच्या आणि रनवे फनेलमधल्या इमारती यांबाबत सध्या लागू नियमानुसार तुलनात्मक वास्तव खालील तक्त्याप्रमाणे :

funel_chart

विमानतळ फनेल क्षेत्रातल्या इमारतींचा पुनर्विकास करता यावा, यासाठी सरकारकडून काही उपाययोजना व्हाव्यात, म्हणून या परिसरातल्या नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यावेळी, यावर उपाय म्हणून, क्लस्टर विकासाच्या शक्यतेवर आपण अभ्यास केल्याचं लोकप्रतिनिधींनी नागरिकांना सांगितलं. मात्र, एकत्रित अथवा समूह विकास केला, तरी देखील इथल्या इमारतींना सध्या लागू असलेल्या नियमानुसार उपलब्ध FSI चा पूर्णपणे वापर करणं अशक्य असल्याचं पार्ल्यातल्या काही समाजभान असलेल्या वास्तुविशारादांच्या लक्षात आलं.

पुनर्विकासाकरताक्लस्टरअथवा समूह विकास हा उपाय विलेपार्ले सांताक्रुझ परिसरात लागू होण्यामधल्या अडचणी पुढील प्रमाणे :

 • क्लस्टर योजनेसाठी आवश्यक कमीतकमी ६०,००० अथवा ४०,००० चौरसफूट क्षेत्रफळाचा सलग प्लॉट उपलब्ध होत नाही.
 • रनवे फनेल क्षेत्रातल्या प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र समस्या, मर्यादा.
 • क्लस्टर योजनेत सहभागी होण्याची अनेक इमारतींची तसेच इथल्या बंगल्यांच्या मालकांची तयारी नाही.
 • क्लस्टर मध्येदेखील मजल्यांची उंची कमी करणे, मधली मोकळी जागा कमी ठेवणे, यासारख्या तडजोडी कराव्या लागतील.

विमानतळ फनेल क्षेत्रातल्या इमारतींना एकदोन मजले जास्त बांधकाम करता यावे, यासाठी इथल्या इमारतींच्या वतीने न्यायालयात एक  याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला दिलासा मिळेल, अशी आशा देखील व्यक्त केली जाते. मात्र यावर विसंबून राहणे व्यवहार्य नाही, त्यामागची कारणे:

 • विमानतळ परिसरातल्या बांधकामांच्या उंचीवरचे निर्बंध आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नियमावलीनुसार लागू आहेत.
 • राज्य अथवा केंद्र सरकार यात हस्तक्षेप करू शकत नाही.
 • आपण दखल केलेल्या याचिकेवर वारंवार पुढची तारीख मिळत असल्याने अद्याप सुनावणी होऊ शकलेली नाही.
 • मुंबई शहराचा नवा विकास आराखडा DCR 2034 तयार होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
 • विकास आराखड्यामध्ये फनेल क्षेत्रातल्या इमारतींचा विचारच केला गेलेला नाही.
 • विकास आराखड्याच्या मसुद्यानुसार नियम असेच कायम राहिले, तर पुढील पंचवीस ते तीस वर्षं फनेल क्षेत्रातल्या इमारतींचा पुनर्विकास शक्य होणार नाही. (वरील तक्त्यामध्ये याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.)
 • हा मसुदा कायम होण्याआधीच नागरिकांनी एकजुटीने आपल्या हक्कांबाबत जागरूक होणे आवश्यक आहे.

सांताक्रूझ इथलं विमानतळ भविष्यातही कार्यरत राहणार असल्याने इमारतींची उंची वाढवून घ्यायचा आग्रह धरण्याऐवजी इथल्या बांधकामांबाबत विकास नियमावलीमध्ये कायम स्वरुपी उपाययोजना तसेच तरतुदी करून घेण्यासाठी फनेल झोन अभियानांतर्गत नागरिकांनी सरकारसमोर ठेवलेला प्रस्ताव पुढीलप्रमाणे:

 • विमानतळ रनवे फनेल क्षेत्राला ‘सार्वजनिक प्रकल्पबाधित’ असा दर्जा मिळावा.
 • झोपू योजना, मेट्रो योजना, म्हाडा इमारती, बी.डी.डी. चाळी याधर्तीवर रनवे फनेल झोन क्षेत्रासाठी स्वतंत्र नियमावली बनवण्यात यावी. तरतुदींची योजना व्हावी.
 • नव्या विकास आराखड्यात रनवे फनेल क्षेत्रासाठी कमीतकमी ५ इतका फ्लोटींग FSI मिळावा.
 • फ्लोटींग FSI मुंबईत कुठेही विकण्याची परवानगी मिळावी.
 • मिळणाऱ्या मोबदल्यातून मूळ रहिवाशांचा तात्पुरता निवारा, कॉर्पस स्वरूपातली रक्कम, बांधकाम खर्च तसेच विविध परवानग्यांसाठीचा खर्च भरून निघेल.
 • पुनर्विकास करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या मूळ दराच्या १०% दराने मिळाव्यात.
 • विमानतळ हा सार्वजनिक प्रकल्प आहे. कमी उंचीवरून विमाने उडल्याने होणारे ध्वनी प्रदूषण, यामुळे आरोग्याला होत असलेली हानी लक्षात घेता या परिसराला महापालिका करामधून कायमस्वरुपी सूट मिळावी.

नागरिकांच्या या मागण्या अवाजवी नसून, महाराष्ट्र शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये (DCR)  पुढील काही योजनांसाठी अशा स्वरूपाच्या सवलती सध्या लागू आहेत: (योजनेसमोर नियमाचे कलम दिले आहे.)

 • Permanent Transit Camp. 14(d)
 • Redevelopment of MHADA Buildings. 33(5)
 • Incentive for rehabilitation of old chawl residents in Mumbai City. 33(7)
 • Cluster Development. 33(9)
 • Redevelopment of BDD Chawls. 33(9)b
 • Rehabilitation of slum dwellers all over city & suburbs. 33(10)
 • Contravening structures in town planning scheme. 33(15) now called as 33(12)
 • Heritage Structures. 67

वरील योजनांच्या धर्तीवर, DCR 2034 मध्ये विमानतळ फनेल क्षेत्राला प्रकल्प बाधित म्हणून वेगळा दर्जा मिळावा यासाठी नागरिकांनी एक अभियान सुरु केले आहे.

नागरिकांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळताना दिसत असून, अभियानाने आतापर्यंत गाठलेला टप्पा असा:

 • 11 नोव्हेंबर 2016 : सांताक्रूझ पश्चिमेच्या टी.पी.एस. कॉलोनी इथल्या नागरिकांनी स्थानिक स्तरावर आयोजित केलेल्या एका सभेत विले पार्ले पूर्व इथल्या नागरिकांनी भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतली.
 • 22 नोव्हेंबर 2016: विलेपार्ले इथल्या नागरिकांचे प्रतिनिधी आणि दोन वास्तुविशारद यांनी आशिष शेलार यांची बांद्रे इथल्या त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि फनेल झोन बाधित इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रश्नावर सादरीकरण दिलं.
 • शेलार यांनी समस्येची दखल घेतली आणि मुंबई मनपा आयुक्त अजोय मेहता यांच्यासमोर विमानतळ फनेल झोनमधल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा गंभीर प्रश्न मांडला आणि नव्या विकास आराखड्यात हा परिसर विशेष क्षेत्र म्हणून घोषित व्हावा, तसंच इथल्या इमारतींच्या पुनर्विकासाकरता विशेष तरतुदी व्हाव्यात, असं सांगितलं.
 • अशा स्वरूपाचा विचार प्रथमच मांडला जात असल्याचं आयुक्तांनी मान्य केलं आणि नव्या विकास आराखड्यात, विमानतळ फनेल क्षेत्रासाठी हेरिटेज इमारतींच्या धर्तीवर विशेष तरतुदी करण्याची सूचना नियोजन समितीला आपण देऊ, असं आश्वासन दिलं.
 • लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स आणि मुंबई मिरर या वृत्तपत्रांमध्ये विलेपार्ले विमानतळ फनेल झोन समस्येवर लेख प्रकाशित.
 • 5 जानेवारी 2017: ZEE 24 तास वाहिनीवर ‘आपलं शहर आपला आवाज’ कार्यक्रमात विमानतळ फनेल क्षेत्रातला रखडलेला पुनर्विकास या विषयावर कार्यक्रम सादर.
 • याच दिवशी संध्याकाळी मुंबई मनपा मुख्यालयात आशिष शेलार यांच्या बरोबर विलेपार्ले आणि सांताक्रूझ इथल्या नागरिकांनी तसंच इथल्या आर्किटेक्टसनी मनपा आयुक्त आणि विकास आराखडा नियोजन समिती सभासद यांची भेट घेतली.
 • यावेळी, ‘विमानतळ फनेल बाधित क्षेत्रासाठी7 FSI मोफत देऊ’ असे तोंडी आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले.
 • 13 जानेवारी 2017 : लोकमान्य सेवा संघात मॅजेस्टिक गप्पा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना या समस्येबाबत एक निवेदन त्यांना सादर करण्यात आले.
 • सविस्तर माहिती घेण्यासाठी भेट देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यानी दिलं.

अन्नं-वस्त्रं-निवारा या मुलभूत गरजांपैकी एक, आपल्या वाडवडीलांनी अथवा आपण स्वकष्टानं उभं केलेलं आपलं घर उद्या सुरक्षित राहील का? हा प्रश्न, विमानतळ फनेल झोन बाधित नागरिकांना सतावत आहे! आपल्याच शेजारच्या विमानतळाची भूमी बेकायदेशीरपणे बळकावणाऱ्या झोपडीधारक जनतेला कल्याणकारी राज्य या धोरणाखाली मोफत 4 FSI तसंच त्याच परिसरात पक्क्या घराची आश्वासनं मिळतात, आणि याच विमानतळाच्या फनेल झोनमुळे बाधित क्षेत्रातल्या मध्यम वर्गीय करदात्या जनतेला मात्र, पुनर्विकासाविना मोडकळीला आलेल्या आपल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखालीच गाडले जाऊ, की काय, हे भय घेऊन जगावं लागतं, हा विरोधाभास अस्वस्थ करणारा आहे!

रनवे फनेलमधल्या इमारतींचा पुनर्विकास व्यावहारिक दृष्ट्या शक्य व्हावा, यासाठी इथल्या नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक होणे आवश्यक आहे. नवीन विकास आराखड्यामध्ये आपल्या मागण्यांचा समावेश व्हावा, यासाठी शासनामधले आपले लोकप्रतिनिधी, महानगरपालिका, राज्य सरकारचे नगरविकास खाते, अशा संबंधित यंत्रणांकडे सनदशीर मार्गाने पाठपुरावा करणं आवश्यक आहे. हा लेख वाचून, या परिसरातले नागरिक आपल्या न्याय्य हक्कांसाठी एका व्यासपीठावर येऊन प्रयत्नं करतील, ही अपेक्षा आहे.

(वरील लेखासाठी आर्किटेक्ट स्वाती व निलेश बर्वे आणि आर्किटेक्ट श्रीकृष्ण शेवडे यांनी तांत्रिक माहिती आणि आकडेवारी उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद!)

राजश्री आगाशे

(विमानतळ रनवे फनेल झोन बाधित नागरिकांची प्रतिनिधी)

9819146840

rajashreeagashe@gmail.com

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s