सरवटे – एक व्यासंगी कलावंत

sarvate_2.jpgरेषांचे जादुगार व ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचे अलिकडेच वृद्धापकाळामुळे निधन झाले. 3 फेब्रुवारी या त्यांच्या 90व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचा कलाप्रवास उलगडला आहे त्यांचे सुहृद राजेंद्र मंत्री यांनी.

खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 1965-70 मधली असेल. आम्ही मालाडला रहात होतो. वीणाचे संपादक उमाकांत ठोमरे नेहमी आमच्याकडे यायचे. एकदा त्यांच्यासोबत स्वच्छ पांढरा बुशकोट व साधी पॅंट, चपला घालून अगदी टापटीप पोशाखाचा, स्वच्छ गुळगुळीत दाढी केलेला, चापून चोपून केस बसवून नेटका भांग पाडलेला माणूस आला. वसंत सरवटे यांचे हे पहिले दर्शन माझ्या मनात अगदी घट्ट, रुतून बसले आहे. आमच्या चाळीतील कळकट्ट गर्दीमध्ये हा स्वच्छ, प्रसन्न आणि हसतमुख माणूस अगदी वेगळा वाटला मला!

मालाडला सरवटेंचे भाऊ (शिवराम) रहायचे. त्यांना भेटायला यायचे त्याचवेळी आमच्याकडेही येत राहिले. मग 1978 साली आम्हीच पार्ल्यात राहायला आलो. सरवटे प्रथम श्रीमध्ये रहायचे, पार्ले टिळक शाळेजवळ, मग शहाजी राजे रोडवर, उन्नतीमध्ये गेले. तळमजल्यावर आम्हा दोघांचे कोल्हापूरचे मित्र मधुकर आठल्ये, तिसऱ्या मजल्यावर वसंत सरवटे व त्यांच्याच बरोबर वरती चौथ्या मजल्यावर मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे! त्यामुळे आमच्या भेटी अधिक व्हायला लागल्या.

माझे वडील रमेश मंत्री तेव्हा USIS मध्ये होते. आणि सरवटे ACC या सिमेंट कंपनीत. दोघेही कोल्हापूरचेच. या दोघांची ऑफिसेस चर्चगेटला अगदी लागूनच होती. त्यामुळे अनेकदा सांस्कृतिक कार्यक्रमाला ते एकत्रच जायचे. दोघेही सेवानिवृत्त झाल्यावर भेटी जास्तच वाढल्या. परंतु 1992-93 सुमारास माझ्या वडिलांना पक्षाघात झाला व त्यांची वाचा गेली, हालचाल थांबली. सगळे मित्र दोन महिने भेटून गेले, पण वसंत सरवटे हा एकमेव मित्र की, जो रमेश मंत्री यांच्या मृत्यूपर्यंत (1998) आमच्या घरी येत राहिला. अगदी नियमितपणे. बाबांना बोलता यायचे नाही, पण बोललेले कळायचे त्यामुळे संवाद व्हायचा तो, मी व सरवटे यांच्यातच! अगदी एक दोन तास सहजच जात, साधारण आठ- दहा दिवसांतून एकदा. मग कधी कधी आम्ही तिघे आरे कॉलनीत आमच्या जीपने फिरायला जाऊ लागलो. अशा रीतीने सरवटे यांच्या मी अधिकच जवळ गेलो. त्यातच मी अनुभव प्रकाशन सुरु केले. त्यामुळे मुखपृष्ठांच्या निमित्ताने अधिक जवळ आलो. त्यांच्यासोबत चित्रप्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रमाला जाऊ लागलो, आणि जसा मी त्यांच्या जवळ जाऊ लागलो तसे मला सरवटे हळूहळू अधिकच मोठे मोठे दिसायला लागले!

sarvate_1.jpgमुळातच सरवटे अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांच्या मुंजीच आमंत्रण करायला कोल्हापूरवरुन त्यांचे वडील मुंबईला आले व काही कारणाने त्यांचे निधन झाले. तेव्हापासून त्यांच्या डॉक्टर काकांनी त्यांचे संगोपन केले. त्यांच्या मामानीही अवांतर वाचनाला खूप मदत केली. मॅट्रिक, इंजिनियरिंगला जाण्यासाठी त्यांनीच प्रोत्साहित करून, मार्गदर्शन केले. तेव्हा पुण्यातील इंजिनियरिंग कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. त्यांनी सिव्हील लाईन घेतली. त्यावेळी साऱ्या भारतातून मुले यायची त्या कॉलेजला. कोल्हापूरसारख्या लहान गावातून पुण्याला आल्यावर ते सुरुवातीला थोडेसे बुजल्यासारखेच झाले. त्यात दुसऱ्याच वर्षाला त्यांना प्लूरसी- फुफ्फुसात पाणी झाले. मग ते पुन्हा कोल्हापूरला परतले. एक वर्ष वाया गेले. पण मला वाटतं कोणत्याही विषयाकडे, प्रश्नाकडे विविध अंगाने, सखोलपणे पाहण्याची वृती तिथेच, त्या काळात रुजली असावी! त्यांच्या व्यंगचित्रातूनही हेच दिसते!

चित्राचा नाद शाळेपासूनच होता. शि.द. फडणीस व सरवटे कोल्हापुरात लहानपणी गुजरी भागात एकाच वाड्यात रहायचे. तेव्हा कोल्हापूर हे खरोखरीच कलापुरच होते. साधारण 1930-40 सालाबद्दल बोलतोय मी. रंकाळा, गुजरी, मंडई, पन्हाळा येथे सरवटे रेखाटने काढायचे. राजाराम कॉलेजच्या मासिकासाठी चित्रं काढली ती अगदी सुरुवातीच्या काळातली चित्र म्हणावी लागतील!

कोल्हापूरला बाबुराव पेंटरांसारखी लिजंडरी व्यक्ति रहायची त्यामुळे तो जबरदस्त परिणाम लहानपणीच सरवटेंवर झाला. आणि मग मोहिनी घातली ती दीनानाथ दलालांनी. सरवटेंना त्यांच्या त्या चित्रांची भुरळ पडली. ती आकर्षक वाटतच, पण सोपीही वाटत. पण सोपी वाटणारी चित्रे प्रत्यक्ष काढायला कठीण होती! त्यावेळी दलाल राजकीय व्यंगचित्रेही काढायचे. त्याही प्रभावात सरवटे आले. दलालांनी जे जे केलं ते सगळं सरवटे हुबेहूब चितारायचे.

त्याकाळी कोल्हापुरातल्या करवीर नगर वाचनालयात सरवटे जात असत. ना.सी. फडके त्याचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांच्या पुढाकारानं असेल म्हणा, पण स्ट्रॅंड, कॉलीयर्स व सॅटर्डे इव्हनिंग पोस्ट अशी उत्तम अमेरिकन नियतकालिकं तिकडे यायची. यातील व्यंगचित्रांनी दोन कामं केली, दलालांच्या व्यंगचित्रकलेचा प्रभाव पुसट केला आणि सरवटे यांना एक जबरदस्त प्रेरणा, स्फूर्ती व दिशा मिळाली!

परदेशी चित्रांमधली विषयांची विविधता, सूक्ष्म आशय टिपण्याची संवेदनक्षमता, रेखाटनाच्या अगणित वेगवेगळ्या शैली, आकार, रंग व मांडणी व अनेक पैलू असलेला आशय याचा सरवटेंवर झालेला परिणाम म्हणजे जणू रॉकेट उंच अंतराळात जाण्यासाठी भरलेला दारुगोळाच होता! त्यातच सरवटेंच इंग्रजी व मराठी वाचन अक्षरशः जबरदस्तच होतं. त्यांचं म्हणणं असं की व्यंगचित्रकाराला चित्रकला कळायला हवी, साहित्य कळायला हवं, तो चांगला वाचक पाहिजे, चांगला लेखक पाहिजे, गाणं कळायला हवं (म्हणजे शास्त्र नाही), सगळ्यामधली रसिकता त्याच्याकडे हवी! आयुष्य पाहणं, वेगळ्या पद्धतीनं ते जाणवणं आणि ते मांडणं ही ताकद कलावंताकडे पाहिजेच. व्यंगचित्रकाराकडे त्यासोबत विनोदबुद्धी, चित्रकला (आकार, मांडणीचं. रेषेचं, रंगाचं ज्ञान) व मुख्य म्हणजे सामाजिक भान आवश्यक आहे.

sarvate_3.jpgवसंत सरवटे यांनी मुखपृष्ठे केली, रेखाटने केली, अर्कचित्रे काढली, सतत पन्नास वर्षे ‘ललित’ची मुखपृष्ठे काढली व्यंगचित्रे तर काढलीच पण त्यांच्या संवर्धनासाठी सर्वांगीण प्रयत्न केले. परकीय व्यंगचित्रे समजावून दिली. याविषयी मूलभूत लेखन केले. इतर व्यंगचित्रकारांना प्रोत्साहित केले. मधुकर धर्मापुरीकर या व्यंगचित्रवेड्या गृहस्थासोबत सुमारे वीस वर्षे त्यांनी या कलेविषयी जो पत्रव्यवहार केला, तो मी व्यंगचित्र एक संवाद या नावाने प्रसिद्ध केला. मौज, मॅजेस्टिक, लोकवाङ्मय, राजहंस, अनुभव अशा प्रकाशन संस्थेने त्यांची पुस्तके प्रकाशित केली. व्यंगचित्रांचे संग्रह, परकीय व्यंगचित्रे, व्यंगचित्रे, कलेविषयी लेखन, मित्रांविषयी लेखन असे विविध अंगांनी त्यांनी लेखन केले. चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता पन्नास वर्षे अथकपणे पु.ल. देशपांडे, जयवंत दळवी, चि.त्र्यं. खानोलकर, विं.दा. करंदीकर, विजय तेंडुलकर, रमेश मंत्री यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे काढली. ठणठणपाळ, जनु बांडे यांना व्यक्तीरूप दिले. केवळ निरीक्षण, अभ्यास, सातत्य व स्वतःमध्ये सुधारणा या तत्त्वावर उभी हयात व्यतीत करून या कलेला फार उंचावर नेऊन ठेवले. अनेक अडचणी, व्यथा निर्माण झाल्या. पण ते कधीच खचले नाहीत. हिरमुसले नाहीत. शांतपणे, संयमाने त्यांच्याशी सामना करत राहिले. आपल्या कला जीवनावर त्याचा तसूभरही परिणाम होऊ दिला नाही.

मुलांमध्ये मूल झाले. तरुणांना प्रोत्साहन दिले. समवयस्कांशी स्नेह जोडला. समाजात इतके मानाचे स्थान असले तरी कधीही गर्वाचा दर्प लागू दिला नाही. कधी गॉसीप केले नाही. कुणाविषयी कडवटपणा बाळगला नाही. राम पटवर्धन, श्री.पु. भागवत, दिलीप माजगावकर, रामदास भटकळ, केशवराव कोठावळे अशा मोठ्या प्रकाशकांसोबत जो माणूस वावरायचा त्याने तेव्हा लहान असलेल्या अशोक मुळे (डिम्पल प्रकाशन) सारख्यांच्या पुस्तकांची कव्हर्सही केली. अनिल अवचटसारख्या मातब्बर चित्रकाराच्या पुस्तकासाठी पुण्याला जाऊन, तिथे फिरून पुण्याविषयी अजरामर अशी रेखाटने काढली. ना कोणाशी वाद घातले,  ना कुणाशी तंटे मांडले. आपण बरे, आपले काम बरे या वृतीने आपलीच इयत्ता उंचावत नेली. इतकी की, आज वाटते, ते परदेशात जन्मले असते तर जागतिक पातळीवर चमकले असते!

दर दिवाळीत मी, व माझी पत्नी त्यांना भेटायचो. याही दिवाळीत आम्ही त्यांना भेटलो. त्यावेळी ते त्यांच्या खोलीत (चित्रकाराची खोली) झोपले होते. थोड्या वेळाने उठल्यावर मी त्यांच्या शेजारी, जवळ बसून म्हटलं, नाना! अहो!! झोपलात काय? उठा! चला जाऊया कोल्हापूरला! मस्त तांबडा रस्सा, पांढरा रस्सा पिऊया! धम्माल करुया

कोल्हापूर म्हटल्यावर त्यांच्या डोळ्यात चमक आली, आणि चेहऱ्यावर रुंद स्मित पसरले- म्हणाले, हो, जाऊयाच एकदा!

पण आता ते कधीच शक्य होणार नाही. ज्या चित्रकाराच्या खोलीत जन्मभर सृजनशक्तीचा अविष्कार होत होता, ती खोली आता शांत झाली आहे. एका महान कलावंत, व त्याहून महान माणूस आपल्यातून दूर गेलाय. मंगेश पाडगावकरांची कविता आठवते, आणि म्हणावेसे वाटते,

नानाआजोबांच्या खोलीत आता

धुकं… धुकं… धुकं…!

– राजेंद्र मंत्री

9029318328

rajendramantri50@hotmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s