विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत कला विषय हवेतच!

IMG_20160815_203004.jpgकेंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्याने आखण्यासाठी समिती स्थापन केली असून नव्याने धोरण ठरविण्याबाबत सध्या चर्चा चालू आहे.त्या समितीने सुचविलेल्या अहवालामध्ये या धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला असला तरी दुर्दैवाची बाब अशी की त्यात कला, क्रीडा व कार्यानुभव या पायाभूत विषयांना प्राधान्याने स्थान दिलेले दिसत नाही. राष्ट्रीय धोरण ठरवत असताना महाराष्ट्रातही या बाबतीत कसे दुर्लक्ष केले जात आहे याची सर्वांना माहिती व्हावी म्हणून हा प्रयत्न.

कला, क्रीडा व कार्यानुभव हे विषय प्राथमिक स्तरावर किती महत्त्वाचे आहेत, हे थोडक्यात सांगावेसे वाटते. चित्रकला, कार्यानुभव, संगीत, शारीरिक शिक्षण यासारख्या विषयांमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो, खरं तर सुरवातीच्या काळात चित्रं हीच मुलांची भाषा असते. ह्या विषयांमुळे मुलांचा मानसिक व शारीरिक विकास होण्यास मदत होते. कला हा केवळ एक विषय नसून शिक्षणातील एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मुलांच्या मनात घर करून बसलेल्या वाईट सहजप्रवृत्ती- तोडफोड करणे,राग, मत्सर निर्माण होणे, हट्टीपणा इ. विचारांना विधायक वळण देऊन त्यांना चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देण्याने त्यांच्यात नवनवीन शिकण्याची तसेच अभ्यासाची गोडी निर्माण होण्यास मदत होऊ शकते. कला ह्या विषयामुळे मुलांमध्ये सौंदर्यदृष्टी निर्माण होण्यास मदत होते, नीटनेटकेपणा येतो, निसर्गाशी जवळीक साधता येते. या गोष्टी अन्य विषयातून शक्य नसतात. मुलांच्या मनात लहानवयातच या विषयांची गोडी निर्माण झाल्यावर कृती करून घेणे शक्य व सोपे जाते.एकदा त्यांच्या मनातील वाईट सवयी, विचार ह्या कृतीव्दारे बाहेर पडल्यावर मुलांची मने मोकळी व आनंदी होतात. याच वयात त्यांच्यावर चांगले संस्कार करणे सोपे जाते.

IMG_20160907_101839.jpgबालमानसशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून नवनिर्मितीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यानुभव या विषयाची गरज भासते. नवनिर्मिती व शोधक प्रवृत्तीमुळे ह्या मुलांना पुढे इंजिनियर, वैज्ञानिक किंवा तत्सम चांगले करिअर साकारण्यास मदतच होईल. मुलांच्या मनात दडलेल्या (अनुवांशिक) सुप्त सहजप्रवृत्ती वेळीच बाहेर पडल्या नाहीत तर मुले वाईट गोष्टींकडे लवकर आकर्षित होतील व मोठेपणी त्याचे रूपांतर गुन्हेगारी प्रवृत्तीत होण्यास वेळ लागणार नाही. हे सध्याच्या परिस्थितीत समाजात घडत असलेल्या घटनांवरून लक्षात येईल. हे थांबविण्यासाठी शैक्षणिक धोरणात वेळीच उपाय योजना आणल्या नाहीत तर परिस्थिती फारच गंभीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पुढची पिढी हुशार व सुसंस्कारित व्हावीत हा या मागचा उद्देश आहे.

या संदर्भात प्रत्यक्ष घडलेली एक घटना सांगावीशी वाटते. मुंबईत एका चित्रकला स्पर्धेत लहान गटातील मुलाने एका स्त्रीचे चित्र काढून त्यावर पेन्सिलने जोरजोरात रेघोट्या मारून त्या पेपरवर पेन्सिल खुपसून छिद्रे पडली होती. हे चित्र परीक्षकांच्या नजरेत आल्यावर त्यावर खूप विचारपूर्वक चर्चा करण्यात आली. कारण लहान मुलांनी काढलेली चित्रे बघायची नसतात तर ती वाचायची असतात हे बालचित्रकला शिकताना वाचनात आले होते. त्या मुलाबद्दल कुतूहल निर्माण झाले. त्यामुळे त्या मुलाला प्रत्यक्ष बोलविण्यात आले. तो मुलगा बहुतेक रस्त्यावर राहणाऱ्या मुलांपैकी असावा. त्या मुलाने सांगितलेली घटना मनाला चटका लावून गेली. त्या मुलाची आई तो लहान असताना त्याला रस्त्यावर टाकून दुसऱ्याबरोबर निघून गेली होती. हा मनातील सल त्याला सतत त्रास देत होता. त्याने चित्राद्वारे हा उद्वेग बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. त्या रागामुळे त्याने पेन्सिलने त्या पेपरवर वार केले होते. लक्षात घ्या, वेळीच हा राग चित्राद्वारे बाहेर आला नसता तर मोठेपणी त्याचे रूपांतर वाईट घटनेत घडू शकले असते.

IMG_20160805_190713.jpgहे सर्व सांगण्याचा मुख्य उद्देश हाच की राष्ट्रीय धोरण ठरवत असताना शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेत कला व कार्यानुभव हे विषय शिकविण्यासाठी बालकला व बालमानसशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास केलेल्या प्रशिक्षित कला शिक्षकाची नेमणूक करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेत कलाविषयासाठी कलाशिक्षक न नेमता तो विषय डी.एड. झालेल्या शिक्षकाने शिकवावा असे कळविण्यात आले आहे. मात्र डी.एड.च्या अभ्यासक्रमात चित्रकला हा विषय फक्त त्यांना शिकविण्यासाठी लागणाऱ्या शैक्षणिक साधनांपुरता मर्यादित आहे हे बहुतेक शिक्षण अधिकाऱ्यांना माहीत नसावे.

पूर्णवेळ कलाशिक्षक ठेवण्यासाठी तासिका कमी पडत असाव्यात म्हणून कदाचित हा गोंधळ निर्माण झाला असावा. अशा वेळी कलाशिक्षकाला सामावून घेण्यासाठी त्याला कार्यानुभव व कॉम्प्यूटरच्या तासिका देणे शक्य होईल. अर्थात हे सर्व मुख्याध्यापकांच्या मर्जीवर अवलंबून असणार आहे.

काही महिन्यांपूर्वी शिक्षण विभागाच्या परिपत्रकात कला व क्रीडा हे विषय शिकविण्यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नेमणूक करावी असे सूचित करण्यात आले आहे. कला व क्रीडा शिक्षक, जे मुलांचे भविष्य घडविण्यात व त्यांना चांगले संस्कारित करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, त्यांना कंत्राटी कामगारांप्रमाणे वागणूक मिळणार असेल तर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विचारक्षमतेची कीव करावीशी वाटते. ह्या परिपत्रकामुळे बहुतेक शाळांमध्ये डिप्लोमा पास झालेले शिक्षक दोन तास येऊन शिकवून जातात. ते शिक्षक ह्या विषयाला न्याय देऊ शकत नाहीत कारण त्यांचे शिक्षक-प्रशिक्षण झालेले नसते. त्यामुळे मुलांमध्ये जिव्हाळा निर्माण होवू शकत नाही व जिव्हाळा नसेल तेथे शिकण्याची त्वरित प्रक्रिया कशी घडू शकेल याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे शारीरिक शिक्षण हा विषयही तेवढाच महत्त्वाचा आहे. ह्या विषयामुळे मुलांची शारीरिक वाढ व्यवस्थित होण्यास मदत होऊन त्यांच्यामध्ये शिस्त निर्माण होते. या सर्व मुलांच्या पुढील आयुष्यास उपयोगी घडणाऱ्या गोष्टी आहेत. शालेय व्यवस्थापनातील वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांत व आंतरशालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामध्ये क्रीडा शिक्षकाचा किती महत्त्वाचा वाटा असतो हे सांगायलाच हवं का..?

मुलांच्या मनाचा विचार व शारीरिक तंदुरुस्ती याचा विचार करता पुढील पिढी उज्ज्वल घडवायची असेल तर शालेय शिक्षणात प्रामुख्याने प्राथमिक व माध्यमिक स्तरावर कला व कार्यानुभव या विषयांचा अंतर्भाव सक्तीने करणे गरजेचे आहे हे सुज्ञास सांगणे न लागे !

– प्रा. वसंत सोनवणी

माजी अधिष्ठाता, सर जे.जे. कला महाविद्यालय

9892136379

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s