ध्यास आदर्शाचा… गुणवत्तेचा

anuradha gore_3१९७५ ते २००३ अशी २८ वर्षे पार्ले टिळक विद्यालयात अध्यापन पुढील चार वर्षे राजा रामदेव पोद्दार शाळेत मुख्याध्यापिका या नात्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या अनुराधा गोरे हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे व्यक्तिमत्त्व. २००५ मध्ये कॅ. विनायक गोरे याला वीरमरण प्राप्त झाल्यानंतर खचून जाता बाईंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, तरुणांमध्ये देशभक्ती रुजवणे, समाजात सैन्यदलाप्रती जागरुकता निर्माण करणे, हुतात्मा परिवारांशी संपर्क ठेवून त्यांना मानसिक आधार देणे या कामी स्वत:ला वाहून घेतले.

वारस होऊ अभिमन्युचे, गाऊ त्यांना आरती, कथासागर भाग , ओळख सियाचेनची अशा अनेक उत्तमोत्तम पुस्तकांच्या माध्यमातून, विविध कार्यशाळांमधून, टिव्हीरेडिओवरील सादरीकरणांमधून, शेकडो व्याख्यांनांमधून त्यांचे कार्य अखंड चालू आहे. महाराष्ट्र शासनाचावीरमातापुरस्कार, सह्याद्री वाहिनीचाहीरकणीपुरस्कार, उत्तम शिक्षिका पुरस्कार असे अनेक सन्मान लाभलेल्या गोरेबाई जुलै महिन्याच्याआम्ही पार्लेकरच्या अतिथी संपादक आहेत याचा आम्हाला विशेष आनंद आहे.

नमस्कार, आज मी पार्लेकर! असं म्हणताना खूप छान वाटतं, पण सुरवातीला असं नव्हतं. इथे रहाणं, रुळणं जरा कठीणच वाटत होतं. शिवाजीपार्कच्या बरोबर समोर भलंमोठं घर, तेही माणसांनी गजबजलेलं. बिझी बी हा आम्हा उद्योगी मैत्रिणींचा ग्रुप, हे सारं सोडताना खूप जीवावर आलं होतं.

पण हळूहळू पार्ल्याची ओळख होऊ लागली. माझं माहेर सातारा आणि इथलं वातावरण यातलं साम्य भावलं. विनूला चांगली शाळा, व्यायामशाळा, हायकिंग, ट्रेकिंगचा ग्रुप, फुटबॉल, हॉकी खेळायची सोय उपयोगी पडलं. तर कॉन्व्हेंट स्कूल, नृत्य, गायन, चित्रकला, छंदवर्ग सुजाताला. मलाही नामवंत शिक्षण संस्थेत नोकरी मिळाली आणि सर्वार्थानं मी पार्लेकर होऊ लागले.

सप्टेंबर १९९५ मध्ये विनूच्या जाण्यानं माझं विश्वच पालटलं. पार्लेकरांनी मला सावरायला मदत केली. माझी उपक्रमशीलता, सर्जनशीलता या साऱ्याला त्यांनी पाठिंबा दिला, प्रेम दिलं याबद्दल मी त्यांची शतश: ऋणी आहे.

मी पार्ल्यात रहायला आले तेव्हा माझ्या घराजवळच माझे मामा-मामी, डॉ. महेश व डॉ. तारा करंदीकर हे राहात. मामा तीन विषयांत तर मामी दोन विषयांत डॉक्टरेट होत्या. त्यांच्याकडून जुन्या पार्ल्याच्या गोष्टी कळत. त्या गोष्टीमधलं पार्लं, मी अनुभवलेलं पार्लं आणि आता झपाटयान बदलणारं पार्लं खूप खूप वेगळं आहे. स्वरूपात बदल होणारच पण पार्ल्याची ओळख बदलते आहे. आत्मा हरवतो आहे असं कधी कधी वाटतं. मोठ्या संख्येने नवी पिढी परदेशी स्थिरावली आहे. मराठमोळं पार्लं कॉस्मोपॉलिटिन झालंय. जागोजागी खाण्याची दुकानं, सलोन, ब्युटीपार्लर्स, खऱ्याखोट्या दागिन्यांची दुकानं, पुनर्विकासानंतर उभ्या राहिलेल्या उंच उंच इमारती, वाहनांची गर्दी आणि झपाट्याने कमी होत चाललेला मराठीचा टक्का यामुळे कधीकधी आपलं गावच आपल्याला अनोळखी वाटायला लागतं.

असं असलं तरी पार्ल्याबद्दल माझं एक स्वप्न आहे. जसं आदर्श खेडं म्हणून हिवरेबाजार वा राळेगणसिद्धीचा उल्लेख होतो तसं पार्ले हे आदर्श उपनगर व्हावं. माझी मुलगी अमेरिकेतली एका रॅनचेस आणि ऑईलवेलनं समृद्ध शहरी राहते. तिथल्या साऱ्या नामवंत संस्था, उद्योग, व्यापारउदीमवाले एकत्र येऊन शहराच्या विकासाच्या पाच, तीन, एक वर्षाच्या योजना ठरवतात. त्या सर्वांच्या सहकार्यानं राबवल्या जातात. पार्ल्यात हे सहज शक्य आहे. विस्तारानं छोटं पण अनेक नामवंत, गुणीजन याचं वास्तव्य असलेलं हे गाव. हे स्मार्टसिटी होईलच, पण खऱ्या अर्थानं पार्ल्याचं पूर्वीचं वैभव असलेले अनेक छोटेमोठे ओहोळ, तलाव, विहिरी, घनदाट झाडी, पक्ष्यांचा वावर हे परत सुरू होईल. त्याला जोड असेल सौरऊर्जा, कचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचे व्यवस्थापन, रेन वॉटर हारवेस्टिंग या साऱ्यांची!

पूर्वी आसपासच्या उपनगरातून इथल्या शिक्षणसंस्थेत शिकायला विद्यार्थी येत. आता पार्ल्यातून अनेक स्कूलबस इतरत्र जातात. याचा विचार केवळ शिक्षणसंस्थांनी नव्हे तर सर्वांनीच करायला हवा. यासाठी पालक शाळा हवी. “गुरुकुल’ म्हणजे १२ तासांची शाळा हवी. नाशिक, पुणे इथे ८-९ तासांच्या शाळा, त्यात गावातील मान्यवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन, अनेक अभ्यासपूरक उपक्रमांची रेलचेल असते. खऱ्या अर्थानं नेशन बिल्डिंग, कॅरक्टर बिल्डिंगचा प्रयत्न असतो. ज्यांचे आई-बाबा दोघेही व्यावसायानिमित्त घराबाहेर असतात अशा मुलांना हे खूप गरजेचं आहे. ही गरज लक्षात घेऊन विवेकानंद, छात्रप्रबोधन, चाणक्य मंडळ, गंमत शाळा असे अनेक उपक्रम राबवले गेले. ते रुजले मात्र नाहीत. खरंतर या साऱ्या गोष्टी सामाजिक भान देतात. विश्वात्मक वृत्ती निर्माण व्हायला मदत करतात. पण शाळा आणि कोचिंग क्लासेसमध्ये जुंपलेल्या, मार्क, मार्क आणि अधिक मार्क यानं झपाटलेल्या पालकांना आणि मुलांना याची रुची निर्माण झाली नाही हे मान्य. या साऱ्याचा परिणाम होऊन मुलांचं मूलपण हरवतंय. फुलणारं, उमलणारं, मनसोक्त बहरणारं झाड न होता ती होत आहेत बोनसाय! या साऱ्यात त्यांनी काय गमावलं हे कळेपर्यंत खूप उशीर झालेला असेल.

आज अनेक संस्थांना तरुण कार्यकर्ते मिळत नाहीत, त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी असते केवळ वरिष्ठ नागरिकांची. याचं कारणपण तेच आहे. असं असूनही या संस्था असे काही उपक्रम राबवत नाहीत हे ही सत्यच आहे.

पार्लेकर अधिकाधिक उत्सवप्रिय बनत आहेत. पावलोपावली दहिहंड्या, गणेशोत्सव मंडळे, नवरात्रींचे गरबे, साईबाबा, गजानन महाराजांच्या पालख्या इ., हे सारं साजरं करायला कर्णकर्कश आवाज करणारा डॉल्बी, बॅन्जो. या साऱ्यात होणारा पैशाचा अपव्यय, प्रदूषणात वाढ, पर्यावरणाची हानी, मुलांच्या अभ्यासाचा बोजवारा याला कोण जबाबदार? अनेक खेड्यात एक गाव एक गणपतीसारख्या प्रथा सुरू होत आहेत. जुन्या जलस्त्रोतांचं पुनरुज्जीवन होत आहे. असं असताना पार्ल्यासारख्या बुद्धिवंत, सुशिक्षित गुणवंतांच्या गावात हे शक्य व्हायला अडचण कोणती? या साऱ्या निधीतून एखादा मोठा उपक्रम उभा राहील. एखादं गाव दत्तक घेता येईल नाही का?

याचबरोबर सर्वांनी एकत्र येऊन आणखी एक निर्धार करण्याची गरज आहे. ती म्हणजे सिस्टीम बदलण्याची! आम्ही अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, पब्लिक रिस्पॉन्सिबिलिटी यावर यथेच्छ गप्पा मारतो. छोट्या स्क्रीनवरच्या चर्चा मन लावून ऐकतो. पण आमच्या कृतीत ते का उतरत नाही? एकट्यानं लढता येत नाही हे मान्य. एखाद्या परमारनं आत्महत्या केली म्हणूनही हे प्रश्न सुटणार नाहीत. सर्वांनी एकत्रितपणे लढा द्यायला हवा. आमच्या सोसायटीचा पुनर्विकास व परत आम्ही आमच्या जागेत राहायला येणं या काळात हे जास्त जाणवलं. आपल्या तत्त्वांना, मतांना काही किंमत नसते. आपण अगतिक असतो. कोणत्याही खुर्चीत बसलेला, त्याचा जन्मसिद्ध हक्क असावा अशा तऱ्हेने आपल्याला नाडत असतो. आपल्या अगतिकतेचा तो पुरेपुर फायदा उठवतो.

आणखी एक गोष्ट! १९९० ते २००० या कालावधीत पार्ल्यातील अनेकांनी सैन्यदलात प्रवेश घेतला. १९९५ नंतर तर कॅप्टन विनायक हे अनेकांचं प्रेरणास्थान होतं. आता मात्र ही परंपरा खंडित झाली आहे. एवढंच कशाला लेफ्ट. मकरंद घाणेकर, कॅ. विनायक ही नावं माहीत नसलेलेही कित्येक भेटतात.

हा पेशाच वेगळा. त्यासाठी हवं सेल्फ मोटिव्हेशन आणि आसपासच पूरक वातावरण! आपल्या शाळा-महाविद्यालयातला इतिहास १९४७ पर्यंत येऊन थांबतो. मात्र त्यानंतर गेल्या ६९ वर्षात अनेक स्थित्यंतरांबरोबरच १९४७-४८, ६२, ६५, ७१, १९८३-८४, १९९९ हे मोठे संघर्ष, अनेक ऑपरेशन्स झाली. हा पण आहे एक इतिहास. मिळवलेलं स्वातंत्र्य आपण कसं राखलं, सीमांची सुरक्षा याबाबत किती दक्ष राहिलो हे सांगणारा. या काळातील इतिहासही आहे प्रेरणा देणारा, पराक्रमाचे अनेक अध्याय यात लिहिले गेले आणि आपल्या राजकारण्यांनी अनेक घोडचुकाही केल्या. हा सारा इतिहास आपल्या वर्तमानाशी जोडला आहे. भविष्यावर परिणाम करणारा आहे. चीन-पाकसारखे शेजारी असताना खूप दक्ष रहायला हवं. यासाठी हा सारा इतिहास समाजासमोर, खास करून तरुण व किशोरवयीन मुलांसमोर मांडायला हवा. शासनाकडून हे कधी होईल, त्याची अंमलबजावणी कशी होईल हे माहीत नाही. पण शाळा, महाविद्यालयांच्या स्तरावर हे नियमितपणे व्हायला हवं. पुणे, नागपूर, नाशिक इथे असे प्रयोग सुरू झाले आहेत. आपणही आपलं मॉडेल बनवायला हवं. सुदैवानं पार्ल्याला अशी माणसं मिळू शकतात पण…!

१० मे! मंगल पांडेनं १८५७ च्या बंडाचं निशाण फडकवलं तो दिवस. त्या दिवशी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आणि ते टिकवण्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांना श्रद्धांजली वहायची असं ठरलं. सुरवातीला पार्ल्यातील अनेक संस्था या शहिद दिनासाठी एकत्र आल्या. सर्वांनी जबाबदारी वाटून घ्यायची असं ठरलं. सुरवातीला २-४ वर्षे सारं ठीक चाललं. आता मात्र….! साऱ्यांना याचं बहुधा विस्मरण झालं असावं की ही केवळ कार्यमग्नता, उदासीनता की आणखी काही?

असो. मी स्वतःला भाग्यवंत, देवाची लाडकी समजते. विनूसारखा मुलगा, अत्यंत बुद्धिमान, स्वच्छ, पारदर्शी मनाचा पती, सुजातासारखी मुलगी, रिया, तन्वी सारख्या मल्टी टॅलेंटेड नाती आणि तुषारसारखा जावई, असं देवानं मला भरभरून दिलं.

‘इतरांवर अवलंबून रहाण्याची वेळ माझ्यावर कधी न यावी आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजाला काही ना काही देत राहावे’ हीच देवाकडे माझी रोज प्रार्थना असते आणि तो ती ऐकेल असा विश्वास वाटतो.

रॅपिड फायर राऊंड….

  • शिक्षण कोणत्या भाषेतून असावं असं वाटतं ?

मातृभाषेतून, पण विज्ञान व गणित इंग्रजीतच असावे आणि इंग्रजी उत्तम येण्यासाठी वेगळे प्रयत्न व्हावे.

  • आजच्या राजकारण व राजकारण्यांविषयी आपले काय मत आहे ?

मोदी सरकारकडून खूप अपेक्षा आहेत.

  • तरूणांना आपण काय सांगाल ?

स्वत:च्या पलीकडे विचार करा.

  • आवडते साहित्यिक आणि आवडतं पुस्तक ?

शरदिनी डहाणूकर आणि त्यांनी लिहिलेलं ‘फुलवा, दुर्गाबाई भागवत

  • तुमचे छंद कुठले आहेत ?

 बागकाम, शिवणकाम, भरतकाम.

  • पार्लेकरांचं वर्णन कसं कराल ?

सुसंस्कृत आणि समृद्ध.

  • विद्यार्थ्यांपुढे रोल मॉडेल कोण असावे ?

नाटक, सिनेमा आणि क्रिकेटपलीकडे असंख्य आदर्श आहेत.

  • पार्ल्यातील शैक्षणिक संस्थांविषयी काय सांगाल?

राष्ट्रीयत्त्वाची भावना मुलांमध्ये रुजवण्यापासून संस्था दूर जात आहेत.

  • हे पार्ल्यात व्हायला हवं ?

आपलं पार्लं पर्यावरणाच्या दृष्टीने आदर्श गाव व्हावं.

  • दहा वर्षांनी मुंबई कशी असेल ?

मुंबईत फारसा फरक पडणार नाही, ती लोंढे सामावून घेतच राहील.

– अनुराधा गोरे (अतिथी संपादक)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s