सामाजिक संस्थांच्या साथीने नाट्यक्षेत्राची भरभराट व्हावी !

IMG_20160425_160613.jpgगेल्या चार दशकांहून अधिक काळ अभिनयक्षेत्रात कार्यरत असणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर हे पार्लेकरांच्या विशेष जिव्हाळ्याचे नाव. व्यावसायिक रंगभूमीवरील 27 नाटकांचे सुमारे 4000 प्रयोग, 50 पेक्षा अधिक दूरदर्शन मालिका, सुमारे 26 मराठी- हिंदी चित्रपट, अनेक जाहिरातपट अशी त्यांची या क्षेत्रातील समृद्ध कारकीर्द. पार्ल्याचा सांस्कृतिक वारसा पुढे नेणाऱ्या वेलणकर  कुटुंबातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा, जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेली मीरा व नाटक, मालिकांमधून दिसणाऱ्या पत्नी रजनीताई हेदेखील सुपरिचित चेहेरे. गेल्या सहा दशकांपासून पार्ल्यात वास्तव्य असणारे अभिनेते प्रदीप वेलणकर मे महिन्याच्या “आम्ही पार्लेकर’चे अतिथी संपादक आहेत याचा आम्हाला विशेष आनंद आहे.

विलेपार्ले (पूर्व)… एक शांतताप्रिय उपनगर. माझ्या स्वतःच्या येथील वास्तव्याची सुरुवात 1950 मधे हॅपी होम सोसायटीतील वात्सल्य बंगल्यात झाली. (माझा जन्म 1948 चा)… म्हणजे जवळजवळ 66 वर्षे मी या जागेत राहतोय. या पार्ल्यातील अनेक स्थित्यंतराचा मी साक्षीदार आहे. उदा. मुंबई अहमदाबाद एक्स्प्रेस हायवे आणि डोमॅस्टिक एअरपोर्ट. तसेच सध्याचे साठ्ये कॉलेज, एम.एल. डहाणूकर कॉलेज, महिला संघाची वाढीव इमारत इत्यादी. पार्ल्यातील शेतवाड्या, आमराई हे सध्याचे दूर्मिळ प्रकार! मी अनेक वर्षे यांचा उपभोग व्यवस्थितपणे घेतला आहे. तेव्हा इमारती तर इतक्या तुरळक होत्या की आमच्या दुमजली घराच्या गच्चीतून प्ले ग्राऊंडवरच्या (सध्याचे वामन मंगेश दुभाषी मैदान) क्रिकेटच्या मॅचेस आम्ही बघायचो. आणखी एक जुन्या पार्ल्यातील न विसरता येणारी गोष्ट म्हणजे येथील नाट्यमहोत्सव, संगीतसभा आणि मान्यवरांची भाषणे. भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेमन, बलराज सहानींसारखे विचारवंत… यांची भाषणे मी ऐकली तर आहेतच पण स्मरणातही आहेत. त्याखेरीज आपल्या पार्ल्यातील अविस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल. देशपांडे! त्यांचे चौफेर परफॉर्मन्स हेही आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. संगीतकार एस.एन. त्रिपाठी, लक्ष्मीकांत कुडाळकर या चित्रपटसृष्टी गाजवलेल्या संगीतकारांचे वास्त्यव्यही आपल्या पार्ल्यातलेच. खरं म्हणाल तर पार्ल्यातल्या कलावंतांची, खेळाडूंची यादी ही न संपणारी आहे.

मी स्वतः नाटक, मालिका व चित्रपट या माध्यमांत रमणारा एक कलावंत असल्याने पार्ल्याची सांस्कृतिक वाटचाल, प्रगती आणि भविष्यातील पार्ले यात मला अधिक रस आहे. पार्ले (पूर्व) हे सुशिक्षित तर आहेच पण शिवाय ते सुसंस्कृत असल्याचा लौकिकही अखंड महाराष्ट्रात आहे. पार्ल्यात संगीत, नाटक, साहित्य, चित्रकार, खेळाडू या क्षेत्रातील दिग्गजांचे वास्त्यव्य आहे. त्यांची भरभराटही या उपनगरातच झाली आणि या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना योग्य तो मान देऊन त्यांचा यथोचित सत्कारही वेळोवेळी करण्यात आला आहे.

तरी एका गोष्टीचा विचार करावासा वाटतो, या सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आपाआपली प्रगती ही स्वतःहून केली आहे. त्यांच्या जडणघडणीत त्यांचा केवळ स्वतःचा आणि त्यांच्या कुटुंबियांचाच भाग आहे. वरील क्षेत्रात काहीतरी करू इच्छिणाऱ्या तरुण पिढीला त्यांचे मार्गदर्शन मात्र निश्चित मिळू शकते. परंतु हे मार्गदर्शन केवळ वैयक्तिक पातळीवर न राहता जास्तीत जास्त शिक्षणार्थींपर्यंत झिरपायला हवे.

पार्ल्यामध्ये अनेक मान्यवर संस्था आहेत. त्यांच्याजवळ स्वतःच्या इमारती, मैदाने आहेत. त्यांची आर्थिक परिस्थितीही मजबूत आहे. अधिक पैसा मिळवण्यासाठी त्यांच्याकडे नियमितपणे काही कार्यक्रमही राबवले जातात. त्यात गैर काही नाही. परंतु त्याचा विनियोग करण्याच्या त्यांच्या सध्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये गुणात्मक, संख्यात्मक दृष्याही मौलिक भर पडून सांस्कृतिक क्षेत्रास अमूल्य मदत मिळू शकते. एक उदाहरण देतो… धी गोवा हिंदु असोसिएशन ही संस्था अनेक पातळ्यांवर कार्यरत आहे. त्यांनी स्वत:चा असा एक कलाविभाग चालवला होता. आणि त्यातून अधिक पैसा मिळवणे हा उद्देश न ठेवता अनेक वर्षे यशस्वी व दर्जेदार नाटकांची निर्मितीही या कलाविभागाने केली. अनेक लेखक, दिग्दर्शक, नट, नेपथ्यकारांची कारकीर्द बहराला आली. तसेच अनेक नवीन कलावंत रंगभूमीला लाभले. असे यशस्वी उपक्रम आपल्या पार्ल्यातही होऊ शकतात.

नाटकासाठी आवश्यक असणारा तालमीचे हॉल- त्यांच्या भाडे आकारणीला व्यावसायिक दर न लावता / पैसा मिळवणे हा उद्देश न ठेवता- अल्प दराने उपलब्ध करून दिले जाऊ शकतात. संगीताचे शिक्षण देण्यासाठी लागणाऱ्या वाद्यांची उपलब्धता आणि जागा, तसेच चित्रकला, मैदानी खेळ यांच्याविषयी जागरूकपणे आयोजन केले जाऊ शकते. आणि महत्त्वाचे म्हणजे पार्ल्यात वास्तव्य असणाऱ्या असंख्य कलावंतांची यथायोग्य मदत अत्यंत अल्पशा मोबदल्यात उपलब्ध करून दिली जाऊ शकते. या विषयी सुयोग्य आणि तपशीलवार चर्चा होऊ शकते. अशा योजनेला कुठलीही मान्यवर व्यक्ति विरोध करेल असे मला वाटत नाही. रंगमंचावर प्रत्यक्षपणे व्यावसायिक कलाकृती सादर करणे हे जरी फारसे आकर्षक राहिले नसले तरी त्याकरिता आवश्यक असणाऱ्या सुविधा अल्पदरात पुढच्या पिढीला उपलब्ध करून देणे हे गरजेचे आहे. पार्ल्यातील सुसंस्कृत, सुशिक्षित व्यक्तीला/ संस्थेला यासंबंधी विचार करण्याची विनंती आपण करू शकतो. शेवटी कुठलीही कला (परफॉर्मिंग आर्ट) ही राजाश्रय व लोकाश्रयावरच तर भरभराटीला येते. भविष्यातील पार्ल्यात याचा प्रत्यय येणारी यशस्वी सांस्कृतिक पिढी पहावयास मिळेल ही आशा!

माझी जडणघडण

माझ्या जडणघडणीमध्ये माझ्या आईवडिलांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. आईने त्याकाळात संस्कृतमध्ये एम.ए. केलं होतं. ती उत्तम कविता व इतर लेखनही करत असे. वडीलांनी सुमारे 16 वर्षं सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. शेजारी, पडोसी, रामशास्त्री, पायाची दासी, भगतसिंग (शम्मीकपूरची भूमिका असलेला) अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक गजानन जहागिरदार यांच्याबरोबर काम केले. आमच्या घरी हॉलिवुडमधील चित्रपटांच्या पटकथांची अनेक पुस्तके होती. आई आणि बापू अनेकदा इंग्लिश स्पेलिंग्जवर आधारित “स्क्रॅबल’ हा खेळ खेळत. त्यांच्यात कलाक्षेत्रासंबंधी नेहमी चर्चा होत असे. कुठल्याही कलाकृतीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याचे संस्कार माझ्यावर नकळतच झाले. डहाणूकरमध्ये असताना मी प्रथमच कॉलेजच्या नाटकात काम केले त्यालाही आईचाच पाठिंबा होता.

नव्या कलाकारांसाठी…

आजची तरुण मुलं खूप हुशार आहेत, टॅलेंटेड आहेत मात्र एखादं काम चांगलं झालं की आजकाल लगेचच सिरिअल्सच्या किंवा नाटकसिनेमांच्या ऑफर्स यायला लागतात. एक्स्पोजर भरपूर मिळतं पण कलाकार म्हणून विकास काहिसा खूंटतो. आपल्याला आता सगळं जमतंय अशा समजूतीमुळे अभिनेता म्हणून वाढ होत नाही. कुणालाही अभिनयात गुरू नाही. याही क्षेत्रात गुरूची आवश्यकता आहे, मात्र ती तरुणांना जाणवत नाही. ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यातील अनुभवी मंडळींचा सल्ला घेण्याची आंतरिक भावना रुजणं गरजेचं आहे.

रॅपिड फायर राऊंड….

 • शिक्षण कोणत्या भाषेतून असावं असं वाटतं ?
 • मातृभाषेत
 • आजच्या राजकारण व राजकारण्यांविषयी आपले काय मत आहे ?
 • लालबहादूर शास्त्री आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. मात्र आजच्या राजकारणात इंटरेस्ट नाही.
 • तरूणांना आपण काय सांगाल ?
 • पेशन्स ठेवायला शिका
 • आवडते साहित्यिक आणि आवडतं पुस्तक ?
 • जयवंत दळवी आणि अंधाराच्या पारंब्या, प्रभाकर पेंढारकर आणि रारंगढांग
 • आवडते नाटक कुठले ?
 • सर्वार्थाने परीपूर्ण असलेले बॅरीस्टर
 • ड्रीम रोल ?
 • गारंबीचा बापूमधली बापूची भूमिका
 • तुमचे छंद कुठले आहेत ?
 • क्रिकेट आणि जुनी हिंदी गाणी
 • पार्लेकरांचं वर्णन कसं कराल ?
 • नशीबवान
 • हे पार्ल्यात व्हायला हवं ?
 • नाट्यक्षेत्रात गुरुकुल पद्धत रुजावी
 • दहा वर्षांनी मुंबई कशी असेल ?
 • मुंबईचं रुप सुधारेल पण परिस्थिती बिकट होईल. माझ्यासारख्या ज्येष्ठांना मुंबई सोडावीशी वाटेल.

प्रदीप वेलणकर यांच्या गाजलेल्या कलाकृती

नाटके : सुंदर मी होणार, संध्या छाया, अखेरचा सवाल, बॅरिस्टर, हमिदाबाईची कोठी, महासागर, वन रुम किचन, आम्ही लटिके ना बोलू, प्रेमाच्या गावा जावे, सोबतीने चालताना

मालिका : गजरा, चिमणराव गुंड्याभाऊ, नाती गोती, बंदिनी, रेशीमगाठी, द्विधाता, ह्या गोजिरवाण्या घरात, चार दिवस सासूचे, पुढचे पाऊल

चित्रपट : एक गाडी बाकी अनाडी, वजीर, गौरी, चकवा, मृगेळ, एवढसं आभाळ, आक्रंदन, पेज 3, रिस्क, सिंघम

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s