संपादकीय – एप्रिल २०१६

DACज्याला आपण ‘मराठी’ पार्ले म्हणतो ते मुख्यत्वेकरून विमानतळ व पश्चिम रेल्वे मार्ग ह्यामध्ये वसले आहे. जवळच रनवे असल्याने पार्ल्यात जास्त उंचीच्या इमारती बांधणे शक्य नाहीये पण गेल्या काही वर्षात बैठी घरे तसेच दोन किंवा तीन मजल्याच्या इमारती जाऊन आठ ते दहा मजल्यांचे टॉवर्स दिसू लागले आहेत. त्यामुळे इतर उपनगरांसारखा लोकसंख्येचा स्फोट पार्ल्यात झाला नसला तरी इथली लोकसंख्या वाढली आहे हे निश्चित. 1991 सालापासून भारताने आर्थिक उदारीकरणाचे जे धोरण स्वीकारले त्याचा सर्वाधिक फायदा शहरी मध्यम वर्गाला झाला. पार्ल्यापुरते बोलायचे झाले तर चाळीतले लोक सोसायटीमध्ये गेले व सोसायटीमधले अजून मोठ्या फ्लॅटमध्ये गेले. सायकल, स्कूटरच्या जागी मोठमोठ्या गाड्या आल्या. थोडक्यात म्हणजे कनिष्ठ मध्यम वर्गाचे परिवर्तन उच्च मध्यम वर्गात झाले. मग ह्या वर्गाच्या गरजा पुरवण्यासाठी अनेक ब्रॅंडसची दुकाने, तरतऱ्हेची हॉटेल्स ह्या गोष्टी मागोमाग आल्याच. पार्ल्यातील सामाजिक संस्था हळुहळू ओस पडू लागल्या आहेत. पण दुकाने आणि हॉटेल्स मात्र दुथडी भरून वाहू लागली आहेत.

ह्या सर्वामुळे पार्ल्यातील रहदारी भरपूर वाढली आहे. ज्येष्ठ नागरिकांना संध्याकाळचे रस्त्यावरून चालणे दुरापास्त झाले आहे. अनेक लोक फुटपाथचा वापर करायच्या ऐवजी चक्क रस्त्यातूनच चालतात. कचरापेटी असूनसुद्धा तिच्या आजुबाजूलाच जास्त कचरा दिसतो. रस्त्यावरील पार्किंगला तर काही धरबंधच राहिलेला नाही. अनेक रस्त्यांवर दोन्ही बाजूला पार्किंग केल्याने इतर वाहनांना व चालायला जागाच रहात नाही. बाजारात तर अनेक ठिकाणी डबल पार्किंग होते आहे. थोडक्यात पार्ल्याच्या ट्रॅफिकचा अगदी ‘मुरांबा’ झाला आहे. ह्याची जबाबदारी कोणाची? लोकप्रतिनिधींची की प्रशासनाची? मला वाटते ह्यात सर्वात जास्त जबाबदारी आपणा नागरिकांची असते. सर्व बाबतीत आघाडीवर असणारे पार्लेकर ह्या बाबतीत मात्र थोडे कमी पडतात असे खेदाने म्हणावेसे वाटते ! ! !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s