स्वच्छ, सुंदर, मंगल पार्ल्यासाठी…

snehalata deshmukh.jpg‘आम्ही पार्लेकर’ या प्रथितयश पत्रिकेच्या अतिथी संपादनाचे आमंत्रण मिळाले आणि विचारचक्र कालचक्रातून पाच दशके मागे आणि 3 दशके पुढे फिरले, काय होते पाच दशकापूर्वी पूर्व पार्ल्यात पिढीजात वास्तव्य असलेल्या कुटुंबापैकी एक आमचे कुटुंब. छोटेखानी कौलारू बंगले, घरे, वाड्यांच्या पार्ल्यात फाटक वाडीत आमचे कुटुंब श्री गणेशाच्या सहवासात राहत असे. स्टेशनजवळ मोर बंगला मोठ्या दिमाखात उभा होता. जसे आमच्या वाडीचे रूप बदलले तसेच अनेक वाड्यांमध्ये बदल होऊन को. ऑपरेटीव्ह सोसायट्या झाल्या. मंदिरांचेही रूप पालटले.

गणेश मंदिर, महालक्ष्मी, दत्त, राम हनुमान याबरोबरच स्वामी समर्थ, साईबाबा मंदिर अशी देवस्थाने पार्ल्यात आहेत. दर चतुर्थीला श्री गणेश मंदिरात व पार्लेश्वर मंदिरात सोमवारी बरेच बुजुर्ग व शाळा कॉलेजमधली मुले दर्शनाला येतात. रोज महादेवावर पाणी व दूध अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र इथला अनेक लिटर दुधाचा अभिषेक पाहताना माझ्या मनात “खुलभर दुधाची कहाणी’ येते आणि वाटते गाभार्‍यात प्रतिकात्मक अभिषेक करून बाकीचे दूध कुपोषित बालकांना दिले तर कुपोषण थांबवता येईल. देवाला प्रसाद म्हणून पेढे देण्यापेक्षा गूळ व शेंगदाणे दिले तर  हाच प्रसाद मुलांपर्यंत पोचवता येईल. यायोगे त्यांना लोह व प्रथिने मिळतील. आम्ही रूढी परंपरा यांचे गुलाम न होता काळाप्रमाणे बदल केला तर पर्यावरण रक्षणाकरता ते उपयुक्त ठरेल. प्रत्येक सोसायटीने, इमारतीने वड, पिंपळ, कडुलिंब, बहावा, शेवगा, चाफा, जाम, जांभूळ यापैकी एक तरी झाड लावले तर हवेतील प्रदूषण काही प्रमाणात कमी होईल. प्रत्येक कुटुंबाने आपल्या गॅलरीत किंवा जिथे सूर्यप्रकाश येत असेल त्या खिडकीत दोन तुळशीची रोपे लावली तर ऑक्सिजनचे प्रमाण हळूहळू वाढेल. पुढच्याच महिन्यात आपण होळी पौर्णिमा साजरी करणार आहोत.  मोठमोठ्या होळ्या जागोजागी पेटतात, धूर पसरतो आणि धुलीकण वातावरणात पसरतात. तापमान वाढतेच पण प्रदूषणही वाढते. दमा, सर्दी, खोकला याचेही प्रमाण वाढते आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. यावर्षी आमच्या कुटुंबाने होमकुंडात अग्नी पेटवून प्रतिकात्मक होळी साजरी करण्याचे ठरविले आहे. लाह्या, धने, गूळ, बत्तासे, पुरणपोळी हा नैवेद्य असेलच परंतु धूर होईल अशी लाकडे, पालापाचोळा जाळला जाणार नाही.

अनेक प्रकारचे डास आपल्याला सतावतात. डेंगू, मलेरिया हे रोग सर्वश्रुत आहेत पण आता ‘झिका” नावाचा व्हायरस अेडीस डासांद्वारे आपल्यावर हल्ला करतो आहे. डास निर्मुलनासाठी महानगरपालिका सतर्क आहेच. परंतु प्रत्येक सुजाण नागरिकाची ही जबाबदारी आहे. या बाबतीत स्त्रियांनी पुढाकार घेऊन 500 मीटरच्या परिसरात जनजागृती केली व तो परिसर स्वच्छ ठेऊन डासांची उत्पत्ति थांबवली. खरंच मोठे योगदान आहे हे, जसे देवी- प्लेग या रोगाचे उच्चाटन झाले पोलिओसुद्धा जवळजवळ नष्ट झाला तसेच डेंगू- मलेरियाचेही उच्चाटन करता येईल. आपली स्वतःची रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी सकस आहार हा मोठा आधार आहे. वडा-पाव, चायनीज, भेळ, पाणीपुरी खाऊन फक्त मेद वाढतो आणि शक्ती कमी होते. पूर्वी आई तूप साखर लावून पोळीची गुंडाळी करीत असे. आज मुलांच्या भाषेत पोळी भाजी गुंडाळून दिली की त्याला रॅप म्हणतात. मुलांच्या भाषेत बदल झाला आहे. तो स्वीकारला तर जीवन सुकर होईल. व्यायाम करताना मोकळ्या मैदानात करावा. सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यकिरण अंगावर घेत सूर्यनमस्कार घातले तर व्हिटामिन डी कमी होणार नाही. परंतु पार्ल्यात ‘जिम” वाढू लागलेत. मशीनद्वारे व्यायाम ही एक फॅशन झाली आहे. अनेक ‘जिम” वातानुकुलीत असतात. तिथे किती वेळा हवा बदलली जाते याची कुणालाच माहिती नसते. पोहण्याचा व्यायामही उत्तम. पार्ल्यात पूर्वी विहिरीत पोहायला शिकवीत असत. आता मुलं तरणतलावात जातात, पार्ले टिळक विद्यालयात शिक्षक आनंदाने मुलांना पोहायला शिकवायचे, विनामूल्य! आज हजारो रुपये मोजून प्रशिक्षक तरणतलावात शिकवतो. कारण पार्ल्यातल्या विहिरी बुजवल्या गेल्या आहेत. आज पार्ल्यात उंच इमारतींचा थाट आहे पण मोकळी मैदाने, फुटपाथ मात्र अतिक्रमणामुळे नाहीसे होत आहेत. पार्ल्यात शैक्षणिक संस्था मात्र उत्तम शिक्षण देत आहेत. अगदी बालवर्गापासून ते पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षणापर्यंत उत्तम सुविधा इथे आहेत. विद्यार्थी निरनिराळ्या विषयात प्राविण्य मिळवतातच पण खेळ, कला, संगीत, नाटक यातही सरस ठरत आहेत. एनसीसी, एनएसएसद्वारे विद्यार्थी पुष्कळ समाजोपयोगी कामे करीत आहेत. जुन्याचे जतन करण्यासाठी महाविद्यालयात मोडी लिपीचा अभ्यासक्रम राबवला जातो. संस्कृतप्रेमी पार्लेकर तर संस्कृत नाटकेही बसवतात. आज संस्कृतला महत्त्व येण्याचे कारण म्हणजे रामायण, महाभारत यांचा अभ्यास करून कालिदास, भवभूति, शाकुंतल यांना उर्जितावस्था आली आहे. म्हणून मुले संस्कृत विषय शिकू लागली आहेत. हा एक  चांगला बदल आहे.

प्रथितयश महाविद्यालये, शाळा, प्रशिक्षण केंद्रे ही पार्ल्याची शान आहे तर सेवाभावी संस्था हा आत्मा आहे. साहित्य, संगीत, कला, यांची इथे जोपासना करता करता आपले मन प्रसन्न ठेवण्याकरता पुष्प प्रदर्शनेही पार्ल्यात भरवली जातात. असे हे विलेपार्ले ताज्या भाजीपाल्यासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. ‘आम्ही पार्लेकर” तर्फे निरोगी पार्ले ही चळवळ हातात घेतली तर पार्ले नुसतेच स्वच्छ- सुंदर- मंगल होणार नाही तर मनमिळाऊ मन, तंदुरुस्त तन आणि मिळवलेले धवल धन अशा नागरिकांचे पार्ले होईल. इथे शक्ती- युक्ती आणि भक्तीचा त्रिवेणी संगम होईल अशी मला खात्री वाटते. कारण-

येणार्‍याला पाणी द्यावे मुखात वाणी गोड हवी

जाणार्‍याला परत फिरुनी येण्याविषयी ओढ हवी,

ऐसा सुंदर माणुसकीचा झरा वहावा मनामधे

स्वच्छ सुंदर पार्ल्याचा उत्कर्ष व्हावा जगामध्ये!

डॉ.स्नेहलता देशमुख

अतिथी संपादक

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s