पार्ल्यातील गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट

Security camera

पार्ल्यातली सधन वस्ती आणि एकेकट्या वृद्धांचे वास्त्यव्य यामुळे चोऱ्यामाऱ्यांच्या घटना वरचेवर घडत असतात. मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून पार्ल्यात पोलीसांची गस्त, महिला पोलीसांचा पहारा यामध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे घरफोड्या, चेन-मंगळसूत्रे खेचणे, वाहनचोरी या गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे पार्ले पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ अधिक्षक रक्षा महाराव यांनी सांगितले. “2014 मध्ये पार्ल्यात सुमारे 15 मोठ्या घरफोड्यांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र यंदा हे प्रमाण घटून 7 ते 8 इतके नोंदवण्यात आले. गेल्या वर्षी चेन-मंगळसूत्र खेचण्याच्या 60 तक्रारींची नोंद करण्यात आली तर यंदा त्यात 50% कपात होऊन सुमारे 31 गुन्ह्यांची तक्रार नोंदवण्यात आली.’ असे महाराव यांनी सांगितले.

सी सी टिव्ही कॅमेऱ्यांची मदत

मध्यरात्रीच्या वेळीदेखील पोलीसांच्या गाड्या नियमितपणे रस्त्यांवर गस्त घालतात. याला आता जोड मिळाली आहे पार्ले पूर्व परिसरात मोक्याच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची. 3 मेगापिक्सेलच्या या कॅमेऱ्यामध्ये माणसांचे चेहरे, गाड्यांच्या नंबरप्लेट्‌स असे तपशील अत्यंत स्पष्टपणे टिपले जातात. या सर्व कॅमेऱ्यांमधल्या छायाचित्रणावर लक्ष ठेवण्याचे काम पोलीसांतर्फे 24 तास केले जात असल्याची ग्वाहीदेखील महाराव यांनी दिली. या कॅमेऱ्यांच्या मदतीने काही गुन्ह्यांचा जलद तपास सहज शक्य झाला आहे. अशा प्रकारच्या 200 कॅमेऱ्यांचे नियंत्रण करण्याची क्षमता सध्या पार्ले पोलीसांकडे आहे. एका कॅमेऱ्याची किंमत जोडणी, विमा इ. सहित सुमारे 37 हजारपर्यंत येते. आपल्या परिसराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्थांनी, मोठ्या सहनिवासांनी व सुजाण नागरिकांनी पुढे येऊन ह्या खर्चाला हातभार लावावा असे आवाहनही त्यांनी केले.

पार्ल्यात सीसीटिव्हीचे जाळे उभारण्यात पुढाकार घेण्याचे श्रेय जाते “शार्गी कम्प्युटरर्स ऍन्ड सेक्युरीटीज’चे मुकेश शिपूरकर यांच्याकडे. सुरुवातीचे कॅमेरे विकत घेणे, ते बसवण्याचा खर्च, वायरींग व इतर आवश्यक बाबींची पूर्तता त्यांनीच केली. यानंतर पार्ल्यातील काही दानशूर नागरिकांच्या मदतीने कॅमेऱ्यांची संख्या आज 32 पर्यंत गेली आहे. या सर्व कॅमेऱ्यांची देखभाल देखील “शार्गी’तर्फेच केली जाते. “या कामात महाराव मॅडमनी मला संपूर्ण सहकार्य केले. विशेषत: अशा कामासाठी लागणाऱ्या परवानग्या उपलब्ध करण्यासाठी त्यांनी तत्परतेने मदत केली. “ऑर्बिट केबल’चे अरविंद प्रभू यांनीदेखील या कॅमेऱ्यांच्या जाळ्यासाठी लागणाऱ्या फायबर ऑप्टिक केबल्स विनामूल्य उपलब्ध करून दिल्या, अनेक उपकरणांचा खर्च उचलला इतकेच नाही तर गरज लागेल तेव्हा तंत्रज्ञांची सेवा उपलब्ध करून दिली. “सुदर्शन केबल’ कडूनदेखील काही परिसरात केबल्सचे जाळे पोहोचवण्यात महत्त्वाची मदत झाली.’ अशी माहिती शिपूरकर यांनी “आम्ही पार्लेकर’ला दिली.

…तरीही सतर्क राहा!

गुन्ह्यांचे प्रमाण घटले असले तरीही नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सहनिवासांनी आपल्या गेटमध्ये सीसी टिव्ही कॅमेरा बसवणे, घरकाम करणाऱ्या नोकरांचे फोटो व माहीती पोलीस स्टेशनमध्ये नोंदवणे, मॉर्निंग वॉकला जाताना अथवा एकटेदुकटे फिरताना महिलांनी दागिन्यांचा वापर टाळणे या गोष्टी पाळल्या तर गुन्ह्यांचे प्रमाण कमीतकमी राहू शकते असेही रक्षा महाराव यांनी सांगितले.

पार्ल्यात जातीय तणाव नाहीत तसेच घरगुती हिंसाचार व महिलांच्या छेडछाडीच्या गुन्ह्यांचे प्रमाणही किरकोळ आहे. मात्र असे काही प्रसंग आपल्या आजुबाजुला घडत असतील तर नागरीकांनी दक्षता घेणे व गैरप्रकार करणाऱ्यांना हटकणे हे केलेच पाहिजे. गरज पडल्यास पोलिसांकडे मदत मागावी. आपल्या परिसरात काही आक्षेपार्ह गोष्टी दिसल्या तर त्या आम्हाला कळवा. आम्ही गस्त घालत असताना त्याची जरूर दखल घेऊ असेही महाराव यांनी आवर्जून सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s