“मनाचा ताजेपणा, खुलेपणा आणि खोडकरपणा टिकवा!’

Dr. Jakhotiya_guest Editorविपुल, दर्जेदार लेखन आणि यशस्वी व्यवस्थापकीय कारकीर्द या परस्परविरोधी बाबी कौशल्याने जोपासणारे डॉ. गिरीश जाखोटिया हे आपल्या सर्वांच्या परिचयाचे नाव! एका मारवाड्याची गोष्ट, वंश, छत्रपती शिवाजी महाराज, द आऊटबर्स्ट, (इंग्रजी) इ. गाजलेल्या पुस्तकांसमवेत एकूण 10 मराठी (पैकी दोन काव्यसंग्रह) व 8 इंग्रजी पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे. यामध्ये व्यवस्थापन विषयावर आधारित पुस्तकांचाही समावेश आहे. उत्तम साहित्यनिर्मितीसाठी दिले जाणारे अनेक पुरस्कार तसेच अध्यापनासाठीचे पुरस्कार त्यांना देण्यात आले आहेत. लोकमान्य सेवा संघाचे उपाध्यक्ष, मुंबई ग्राहक संघाच्या पार्ले विभागाचे अध्यक्ष अशा पदांवरून त्यांनी सामाजिक कार्यातही महत्त्वाची जबाबदारी पेललेली आहे.

डॉ. जाखोटिया “आम्ही पार्लेकर’च्या ह्या वर्षारंभ अंकाचे अतिथी संपादक आहेत याचा आम्हाला विशेष आनंद आहे.

आईच्या पाठिंब्यामुळे आणि वडिलांच्या तत्त्वचिंतनात्मक सल्ल्यामुळे, तीस वर्षांपूर्वी मी सोलापूरहून मुंबईला आलो नि प्रवासाची दिशाच बदलली. जमनालाल बजाज व्यवस्थापन शिक्षण संस्थेत ‘व्याख्याता” म्हणून लागलो. मुंबईची नानाविध रूपे जसजशी कळू लागली तसतसा माझा व्यापही वाढू लागला. वसईला एका छोट्या, भाड्याच्या खोलीत आमचा संसार सुरु झाला नि वळणा- वळणांचा प्रवास करीत तो पार्ल्यात विसावला. मुंबई विद्यापीठात अध्यापनाचे काम करीत असताना बर्‍याच विद्यार्थांना माझ्या मार्गदर्शनाखाली पीएचडी मिळाली. मला बरेच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, व्यावसायिक ग्रंथांचे लेखनही झाले. सोबतीला ‘व्यवस्थापकीय सल्लागार” हे काम होतेच. हे काम वेगाने वाढले नी मग मी आणि मंजिरीने निर्णय घेतला की आता प्रवासाची दिशा बदलूयात. ‘जाखोटिया आणि असोसिएट्‌स”ने मग आकार घेतला. आज साठहून अधिक देशी- विदेशी कंपन्यांना आम्ही वित्तीय- व्युहात्मक- उद्योजकीय- व्यवस्थापकीय सल्ला देतो.

असा व्यावसायिक प्रवास चालू असताना मी सामाजिक- सांस्कृतिक बदलांचाही वेध घेत होतो. मी माहेश्वरी (मारवाडी) आणि बायको कोकणस्थ ब्राह्मण! यामुळे दोन्ही समाज आम्ही समजून घेऊ शकलो. (टिळक मंदिराचा उपाध्यक्ष असताना या अभ्यासाचा बर्‍यापैकी, उपयोग झाला!) आज मी आणि माझी बायको, स्वतःला ‘वैश्विक नागरिक” समजतो. या अशा समजण्यामुळे जाणिवांच्या कक्षा रुंदावत गेल्या. मराठी लेखनाचा समांतर प्रवास या जाणिवांमुळे सुखकर होत गेला. श्रीकृष्ण- छत्रपती शिवाजी- डॉ. आंबेडकर- स्वातंत्र्यवीर सावरकर अशा महान युगपुरुषांबद्दल बोलताना, लिहिताना वैचारिक गोंधळ होत नाही. स्वत:च्या मतांशी प्रामाणिक राहून इतरांच्या मतांबद्दल आदर बाळगला की संवादाचे मार्ग खुले होतात.

सध्या एका व्यावसायिक विषयावरील पुस्तकाचे काम चालू आहे. सोबतीला ‘धर्मचिकित्सा”या नव्या ग्रंथाची तयारी करतो आहे. “Economics of Survival” या थोड्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे कार्यही होत आले आहे. जगात सर्वत्र स्थित्यंतराचे वारे वाहताहेत. नवी पिढी वैचारिक गोंधळाने ग्रासली आहे. या पिढीची प्रचंड ऊर्जा नीटपणे वापरली गेली पाहिजे. नव्या पिढीशी संवाद साधताना त्यांच्या रोख-ठोक प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे देता आली पाहिजेत. याच कारणास्तव मी “The Outburst” या नावाची कादंबरी लिहिली. ‘आक्रमण” या नावाने तिचे मराठी भाषांतरही प्रकाशित झाले आहे.

आमच्या कुटुंबात बर्‍यापैकी ‘लोकशाहीप्रधान” असे वातावरण आहे. शरयू आणि उज्ज्वल, या आमच्या दोन्ही मुलांना त्यांच्या आजीशी (माझ्या सासूबाई) भरपूर वाद घालायला आवडते. मतांचे खंडन- मंडन अगदी उत्साहाने चालू असते. अर्थात पार्ल्याच्या सांस्कृतिक- सामाजिक- अध्यात्मिक वातावरणाची साथसंगत मिळत असल्याने मुलांची विचार करण्याची पद्धत व कुवत दिवसागणिक सुधारते आहे. मी जरी गंभीर विषयांवर लेखन करणारा असलो तरी संधी मिळताच ‘मारवाडी विनोद” वापरत असतो. (अधे-मधे कोकणस्थांवरील विनोदही मग पोतडीतून बाहेर येतात!).

गेली चौदा वर्षे आम्ही पार्ल्यात राहतो आहोत. पार्ल्यातच आमचे कार्यालय आहे. ‘पक्के पार्लेकर” म्हणजे काय चीज असते हे आत्ता कळतंय. सगळी मुंबई पाहून झाल्यावर आता मी ठामपणे म्हणू शकतो की पार्ल्यासारखं ‘बहारदार, ऊबदार आणि कर्तबगार” उपनगर कुठेच नाही. पार्ल्यातली प्रत्येक घटना ही आपल्या घरचीच वाटते. पार्लं म्हणजे ‘बृहद कुटुंब”. मुंबई ग्राहक संघाच्या पार्ले विभागाचा मी सध्या अध्यक्ष असल्याने ‘पार्ल्याचा संघ” ही विशेष वाटतो. बहुतेक सगळ्या गोष्टी पार्ल्यात उत्तम आहेत. काही गोष्टी मात्र सुधारल्या पाहिजेत नी काही नव्या गोष्टी घडल्या पाहिजेत.

पार्ल्यातल्या बहुतेक सामाजिक संस्थांमध्ये युवकांचा सहभाग वाढावयास हवा. यासाठी कल्पक कार्यक्रमांची आखणी करावयास हवी. काही संस्था आता युवकांच्या हाती सोपविल्या पाहिजेत. पार्ल्यात बरेच उद्योजक, कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी, उद्योजकीय सल्लागार राहतात. या सगळ्यांनी जर ठरवले तर येथील युवकांना ‘उद्योजकीय धडे” देता येतील.

‘आम्ही पार्लेकर” सारख्या वृत्तपत्रांचादेखील पार्ल्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी हाती घ्यावी असे मला वाटते. पार्ल्यात जवळपास प्रत्येक क्षेत्रात दिग्गज, अनुभवी मंडळी काम करताहेत. या मंडळींकडून स्वतःच्या कारकीर्दीतल्या दोन महत्त्वाच्या निर्णयाबद्दल लेख लिहून घ्यावेत. ते नियमित स्वरूपात छापावे. असे संपूर्ण लेखन पुस्तक स्वरूपात प्रकाशित केल्यास पार्ल्यातील (व अन्यत्र) तरुणांना त्याचा खूप उपयोग होईल. निर्णय कोणता, का, कसा घेतला गेला व त्याचा एकूण परिणाम काय झाला, कसोटीच्या क्षणी कुठले अनुभव आले असे विस्ताराने लिहिता येईल. समाजकारण- अर्थकारण- उद्योग- राजकारण- शिक्षण- खेळ- संस्कृती इ. विविध क्षेत्रातील लिखाण संकलित करता येईल. असे अनुभवाचे बोल शाळेत शिकविले जात नाहीत!

आजकाल प्रकर्षाने जाणवणारी समस्या म्हणजे पार्ल्यात बाहेरची वाहने बरीच उभी केली जातात. हा प्रकार बंद व्हायला हवा. येथील रस्त्यांवर संध्याकाळी चालणे जिकीरीचे होत चालले आहे. पार्ल्याचे ‘पार्लेपण” आम्ही टिकवायला हवे.

पन्नाशी पार केल्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक व्यापक व्हायला हवा. त्या व्यापकतेचे आयाम कळायला हवेत. महत्त्वाची बाब म्हणजे ‘मनाचा ताजेपणा, खुलेपणा आणि खोडकरपणा” टिकावयास हवा. यासाठी चार ओळी सुचल्या त्या अशा-

मैलांचे दगड ग्वाही देतात

प्रवास पुढे सरकण्याची,

प्रवासाला अर्थ देतात

उद्दिष्टे जगण्याची!

सलाम प्रत्येक प्रवाशाला

विश्वाची सफर करणार्‍या,

सलाम प्रत्येक पक्ष्याला

उडण्याची उमेद देणार्‍या!

एक सुप्रसिद्ध लेखक म्हणून डॉ. गिरीश जाखोटिया पार्लेकरांना सुपरिचित आहेत. त्यांची मते, विचार समजून घेण्यासाठी ही रॅपिड फायर राऊंड….

  • शिक्षण कोणत्या भाषेतून असावं असं वाटतं ?

मातृभाषेतून, इंग्रजी पहिलीपासून शिकवावी.

  • आजच्या राजकारण व राजकारण्यांविषयी आपले काय मत आहे ?

प्रचंड सुधारणेची गरज, संधी आहे.

  • पार्ल्यातील संस्थांना काय सांगाल ?

संस्थेत युवावर्ग कसा येईल याबद्दलच्या कल्पक योजना हव्यात.

  • तरूणांना आपण काय सांगाल ?

कुटुंब संतुलन सांभाळा, वाचन वाढवा, जुन्या, चांगल्या गोष्टींकडे वळा, उद्योजकतेकडे वळा. नवं, जुनं दोन्हीतलं चांगलं घ्या.

  • 10 वर्षाने मुंबई कशी असेल ?

सुधारणा व बकालपणा दोन्ही वाढेल. (50 वर्षाचं प्लॅनिंग नसेल तर)

  • आवडते साहित्यिक ?

मुन्शी प्रेमचंद, कुसुमाग्रज, विद्याधर नायपॉल

  • तुमचे छंद कोणते आहेत ?

गंभीर विषयांचं वाचन, जुनी गाणी ऐकणं.

  • देवावर विश्वास आहे का ?

माणसातल्या देवावर खूप विश्वास आहे.

  • पार्लेकरांचं वर्णन कसं कराल ?

प्रचंड उत्साही, चळवळया स्वभावाचे.

  • हे पार्ल्यात व्हायला हवं ?

युवकांसाठीचे उपक्रम, रहदारीवरचे नियंत्रण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s