सेवामार्गातील ध्रुवतारे

गेले संपूर्ण वर्ष आपण पार्ल्यातील सामाजिक समस्यांचा उहापोह केला. त्यासाठी महानगरपालिका, राजकीय नेतृत्व व नागरिक, पोलिस यंत्रणा सर्वांशी बातचीत केली. समस्यांवर काही उपाय, तोडगे सुचविण्याचा प्रयत्न केला. त्याला अल्पसा प्रतिसाद काहीजणांकडून मिळाला पण हवे तेवढे यश मिळाले नाही असे खेदाने म्हणावे लागते. आता महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या की हेच वर्षानुवर्षांचे प्रश्न आम्ही सोडवतो असे सांगत मते मागितली जातील. तेव्हा काय करायचे हा केवळ मतदारांचाच निर्णय असेल. कामात अपेक्षित प्रगती नसली तरी याने निराश होऊन चालणार नाही. कारण हे प्रश्न महत्त्वाचे व आपल्या दैनंदिन जिवनाशी निगडीत आहेत. मात्र काहीशा निराशाजनक परिस्थितीतही अविचलपणे व अविरत काम करणाऱ्या सेवाव्रतींचीही पार्ल्यात वानवा नाही. त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आपणही आपली वाटचाल चालू ठेवायची म्हणूनच उदाहरणादाखल अशाच काही सेवाव्रतींची माहिती इथे देत आहोत. पार्ल्यातील अनेकांपैकी ही काही निवडक व्यक्तिमत्त्वे.

प्रतिभा बेलवलकर

pratibha belvankarमुंबई महानगरपालिकेच्या फुड लॅबमध्ये नोकरी करणाऱ्या प्रतिभा बेलवलकर यांनी 1999 साली एक वर्षाचा पर्यावरण संबंधित कोर्स केला. त्यातील ध्वनिप्रदूषणाने होणारे नुकसान त्यांना स्पर्शून गेले आणि सुनिता गद्रेंबरोबर यासंबंधी कामाला त्यांनी सुरुवात केली. अभ्यास करताना असे लक्षात आले की दारावरील घंटा सुद्धा आवाजाच्या धोक्याच्या पातळीवरचा आवाज करते. काम करताना प्रदुषणाच्या इतर गोष्टी समोर आल्या आणि त्यातच त्या क्षेत्रात घनकचरा हे फार मोठे आव्हान नजरेस आले. पार्लेश्वर मंदिरातून निर्माल्य घेऊन जाणारा भरलेला ट्रक पाहिला व तेथील विश्वस्त ठोसर सरांना मी याचे खत करू कां असे विचारुन त्यांची अनुमती घेतली. प्रथम दिवसाला 5 किलोने सुरु केलेला हा प्रकल्प दिवसाला 50 किलोपर्यंत वाढला. मंदिराची जागा त्याला पुरेनाशी झाली.

त्याचवेळी 2003 मध्ये सिद्धिविनायक मंदिराचे कामही त्या करू लागल्या. तेथेही हे काम 50 किलो पासून सुरु करून पुढे दिवसाला 150 किलो पर्यंत पोहोचले. एस्सेल इंडस्ट्रीजने त्यासाठी वेगळे मशीनही दिले. पुष्कर, काशी, रतलाम व उज्जैन येथील मंदिरांनाही असा निर्माल्य प्रकल्प सुरु करण्याचा आग्रह केला मात्र त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. पण आता हळूहळू त्यांनीही वेगळ्या मशिन्सद्वारा याची सुरुवात केली आहे. पुढे गणपतीच्या दिवसातील निर्माल्य कलशात गोळा होणारे निर्माल्य, भाजी बाजारातील कचरा, महानगरपालिकेने तोडलेल्या झाडांच्या फांद्या, झावळ्या या साऱ्याचीच खतनिर्मिती सुरु केली ज्यासाठी पालिकेने जागा व इतर मदतही दिली होती. आता इतकी वर्षे काम केल्यावर पालिकेने ती जागा काढून घेतली पण दुसरी जागा देण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे आता प्रतिभाताईंनी या कामातून मागे सरायचे ठरवले. अर्थात या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी मार्गदर्शनाला त्या नेहमीच तयार आहेत. याचवेळी “प्लास्टिक ओशन’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. प्लास्टिकने कागदास मागे सारत सर्वच ठिकाणी कशी मुसंडी मारली आहे व आता हे प्लास्टिक जगासमोर कशी समस्या बनत आहे याची माहिती त्यांना मिळाली. आज गणपतीत 10 लाख किलो प्लास्टर ऑफ पॅरिस आणि 30/40 लाख प्लास्टिकच्या पिशव्या समुद्रात जातात. प्लास्टिक पुनर्वापरासाठी विकत घेणारे लोकही पिशव्या, बाटल्या अशा वस्तू घेतात. पण या व्यतिरिक्त कितीतरी प्लास्टिक तसेच कचऱ्यात जाते. ते गोळा करुन त्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुर्नवापर करावा यासाठी प्रतिभाताई प्रयत्नशील आहेत. त्यांनी काढलेल्या धक्कादायक माहितीप्रमाणे गटारातील पाणी समुद्रात सोडताना पंपिंग स्टेशनमध्ये चार दिवसाला एक टन प्लास्टिक पिशव्या जमा होतात. हे सगळे प्लास्टिक तसेच एअरपोर्ट, हॉटेल्स, लग्नाची कार्यालये यांचे लाखो टनाचे प्लास्टिक समुद्रात किंवा कचऱ्यात लोटले जाते. त्यांचा पुनरुपयोगासाठी नवीन प्रकल्प करायचा व जगासमोरील या मोठ्या प्रश्नाला तोंड द्यायचा इवलासा प्रयत्न करायचाच हा त्यांचा निर्धार आहे. यासाठी नागरिकांकडून मोठ्या मदतीची अपेक्षा त्यांना आहे. ती म्हणजे घरातील इतर कचरा व प्लास्टिक वेगळे ठेवणे. तेवढी तरी मदत नागरीक करतील?

Asha Gandhiआशाताई गांधी

सौ. आशाताई व श्री. गांधीसर प्रथमपासूनच राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते. त्यांच्या लग्नाचे साक्षीदार सुद्धा एस.एम. जोशी होते. खारच्या बी.पी.एम. शाळेत शिक्षिका म्हणून कामाला सुरुवात करुन त्या नंतर मुख्याध्यापिका झाल्या. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आणि कष्टाळू शिक्षिकेची भूमिका बजावतानाच घरकामाला येणाऱ्या बायकांना साक्षर करण्याचे काम त्यांनी सुरु केले. त्याचेच परिवर्तन जनता नाईट हायस्कूल या रात्रशाळेत झाले. आजही ही शाळा काम करून शिकणाऱ्या मुलांसाठी काम करते आहे. कामावरून आल्यावर या मुलांची भूक भागविता यावी व त्यांना पौष्टिक आहार मिळावा म्हणून त्यांनी खाऊचीही सुरुवात केली. जी आजही कार्यरत आहे. 1984 नंतर सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय भाग घेणे सोडले असले तरी आजही मेधा पाटकरांची चळवळ, आपलं घर, शांतीवन, साने गुरुजी आरोग्य मंदिर सारख्या संस्थांसाठी निधी जमवणे, यवतमाळच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा शेती करण्यासाठी मदत करणे आदि कामे त्या करतच आहेत. आजवर अनेक संस्थांना मिळून त्यांनी 60 लाख रुपयांचा निधी जमवून दिला आहे. पार्ल्याच्या महालक्ष्मी मंदिरात ओट्यांसाठी येणाऱ्या साडया गरीब, गरजू महिलांना देण्याचा उपक्रमही त्यांनी अनेक वर्षे राबविला. तसेच पार्ल्यातील सर्व महिला मंडळांना एकत्र आणून त्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम त्यांनी “अहिल्यादेवी मंचाची’ स्थापना करून केले.

pratap ankolekarप्रताप अंकोलेकर

प्रताप अंकोलेकारांनी ऑक्टोबर 2005 मध्ये “राईट टू इन्फोर्मेशन’ ऍक्ट (माहितीचा अधिकार) लागू झाल्यापासूनच त्यासाठी काम करायला सुरुवात केली. त्याआधी महाराष्ट्र इन्फोर्मेशन ऍक्टवरही ते काम करतच होते. या विषयासंबंधी आजवर त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. कायद्याचे महत्त्व लोकांना पटावे म्हणून अनेक कार्यशाळा घेतल्या. यात माहिती मिळवण्यासाठी अर्ज कसे भरावे, माहिती कशी मिळवावी आदि शिकवले जाते. माहिती अधिकाराचा उपयोग करून त्यांनी अनेक लोकांना मदत केली आहे. गुणवत्ता डावलून इतरांना प्रवेश देणाऱ्या कॉलेजला शह देऊन गुणवान विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला आहे. पार्ल्यातील मोंगीबाई रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचे सामान वापरले जात आहे हे कळताच त्याच्या ठेकेदाराला भेटून सामानाची चाचणी लॅबमध्ये करण्यासाठी त्यांनी दबाव आणला तेव्हा ठेकेदाराने माफी मागून योग्य साहित्य वापरायचे आश्वासन दिले. आजही इतर अनेक रस्त्यांच्या तुलनेत मोंगीबाई रस्ता (मार्केट) चांगल्या अवस्थेत आहे. कोकण उत्कर्ष मंडळाची जागा बॅ. अंतुलेंच्या प्रतिष्ठानची होती ती वैयक्तिकरीत्या विकली जात होती. माहिती अधिकारात त्याची माहिती काढून हा सौदा लांबवला गेला. लोकांनी या अधिकाराची माहिती घेऊन त्याचा योग्य उपयोग केला तर देशातील अनेक गैरकृत्यांना लगाम बसू शकेल असा विश्वास त्यांना वाटतो. पार्ल्यातील सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व जर आपले पक्षीय राजकारण व रागलोभ बाजूला ठेवून एकत्र आले तरच पार्ल्यातील समस्या समूळ संपवता येतील असे त्यांचे ठाम मत आहे.

ashok kiraneअशोक किराणे

आराधना ट्रॅव्हल्स या घरच्या व्यवसायात काम करत असल्या पासूनच भाजपाचे सच्चे कार्यकर्ते असणारे अशोक किराणे पार्ल्यात “किराणे काका’ म्हणूनच प्रसिद्ध आहेत. पराग अळवणी व ज्योती अळवणी यांच्या विनंतीवरून त्यांनी लोकांसाठी मृत्युचा दाखला मिळवून देण्याचे काम सुरु केले. सुरवातीला महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी यासाठी त्यांना खूप त्रास दिला. कितीतरी खेटे घालायला लावणे, अपमानित करणे असे प्रकारही त्यांनी सोसले. पण त्यांची चिकाटी व त्यांच्या कामाचे महत्त्व आता तेथील मेडिकल ऑफिसरला पटले आहे. काकांनीही या कामाला अतिशय शिस्तशीर वळण लावले. योग्य रजिस्टर सांभाळणे, योग्य वेळेत कामाला वेग देणे यामुळे आज पूर्व विभागातील या दाखल्याच्या कामाला चांगले वळण लागले आहे. मिलन फ्लायओव्हर ते गरवारे चौक व पार्ले स्टेशन ते हायवे या परिसरातील ज्या मृतांचे अंत्यविधी पारशीवाडा स्मशानभूमीत होतात अशा सर्व कुटुंबियांना ते मदत करतात. पारशीवाडा स्मशानभूमीतून मृतांची माहिती आली की मृतांच्या नातेवाइकांना घरी जाऊन भेटणे, आवश्यक फॉर्म भरून घेणे, पालिकेतून आवश्यकतेनुसार प्रति मिळवणे या कामात त्यांनी स्वतःला पूर्ण गुंतवून घेतले आहे. दुःखात बुडालेल्या मृतांच्या नातेवाईकांना या अटळ व्यावहारिक व्यापातून मोकळीक देण्याचे जे काम “किराणे काका’ करत आहेत त्याला तोड नाही.

 ASHA KULKARNIआशाताई कुलकर्णी

हुंड्याच्या अनिष्ठ प्रथेविरुद्ध उभे राहणारे व त्यासाठी “हुंडाविरोधी चळवळ’ स्वखर्चाने उभी करणारे सेवाव्रती स्वातंत्र्यसैनिक दा.ब. उर्फ मामासाहेब कुलकर्णी.  मामासाहेबांनी 1973 साली ही संस्था सुरु केली. त्यांचाच वसा यांच्या कनिष्ठ कन्या आशाताई समर्थपणे चालवत आहेत. अर्थ व राज्यशास्त्रात बी.ए. झाल्यावर त्यांना एका राष्ट्रीयकृत बॅंकेत नोकरी मिळाली. तेथील अधिकारी असलेल्या तरुणाशी सूर जुळले मात्र हुंड्याची अपेक्षा तो सोडेना व हुंडा न देण्याचा हट्ट आशाताईंनी सोडला नाही. यातूनच त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेऊन सर्व आयुष्य या चळवळीला दिले. आजच्या सुधारलेल्या युगातही स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते. लग्नाची गरज स्त्री पुरुष दोघांनाही असते असे असूनही मुलीच्या घरच्यांना कमीपणा घ्यावा लागतो, हे या आधुनिक युगात लाजिरवाणे आहे. आजही भारतात दर तासाला एक तर महाराष्ट्रात दर दिवसाला एक हुंडाबळी जातो. स्त्रियांना मारहाण, त्यांचा छळ करणे, नोकरदार स्त्रियांना नवऱ्याच्या संशयाला तोंड देणे यात वाढच होत आहे. यासाठी आशाताई हुंडा विरोधात तरुणांत जागृती व्हावी म्हणून व्याख्याने, वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, कथालेखन स्पर्धा आयोजित करतात. स्त्रियांच्या मदतीसाठी समुपदेशन केंद्रे चालविली जातात. चळवळ योग्य प्रकारे चालवता यावी म्हणून वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी एम.एस.डब्ल्यु. ची पदवी मिळवली. त्यासाठी “वाढत्या स्त्रीभ्रूणहत्या’ या विषयावरील त्यांच्या प्रबंधाला प्रथमवर्गात स्थान मिळाले. 26 नोव्हेंबर हा हुंडाविरोधी दिन व सप्ताह पाळण्यात यावा यासाठी आशाताईंनी महाराष्ट्र सरकारला निवेदन देऊन तो अस्तित्वात आणला. संस्थेचे सर्व अकरा सदस्य आता वृध्दत्वाकडे जात असूनही आजही उत्साहाने सर्वजण काम करीत आहेत, स्वखर्चाने संस्था चालवीत आहेत. आता हळूहळू तरुण जागृत होऊन या चळवळीत भाग घेऊ लागले आहेत. आयुष्याच्या शेवटापर्यंत हे कार्य करण्याचा आशाताईंचा ध्यास असला तरी ज्यादिवशी गरज संपून ही चळवळ बंद करावी लागेल तो सुदिन असेच त्यांना मनोमन वाटते.

Sunita Gogateसुनिता गोगटे

सुनिताताईंचं बालपण रायगड जिल्ह्यातील रेवदंडा व नंतर ठाण्यात गेले तेव्हा गावातील ठाकर, कातकरी समाजाची अवस्था त्यांनी पाहिली होती. लहानपणापासूनच आईवडिलांच्या सेवाभावी वृत्तीचे संस्कार त्यांच्यावर होते तसेच ठाण्यात अनेक साहित्यिकांची व्याख्याने, कोल्हटकर बुवांसारख्यांची कीर्तने यांनी मनाला चांगली शिकवण मिळाली. लग्नानंतर पार्ल्यात आल्यावर पार्ले टिळक शाळेत शिक्षकेची नोकरी करत उपमुख्याध्यापक पदापर्यंत गेल्या. त्यावेळी नोकरी व संसार करून समाजकार्याला वेळ देता येत नव्हता पण मनात इच्छा खूप होती. मात्र पार्ले टिळकचे तेव्हाचे मुख्याध्यापक गुरुवर्य मा.सी. पेंढारकर यांचे उत्तम मार्गदर्शन त्यांना मिळाले ज्यामुळे कोणतेही काम विनात्रुटी व शिस्तशीर करण्याची सवय झाली. निवृत्तीनंतर महाराष्ट्रातील आश्रमशाळांची स्थिती बघता या क्षेत्रात काम करायचे त्यांनी ठरवले. नाशिकच्या पुढे तीन तास अंतरावर अतिशय दुर्गम भागातील व्यापक विस्तार झालेली “गुहीची’ शाळा बघून त्यांनी या कामात झोकून द्यायचे निश्चित केले. पुर्वांचलात काम करणारे श्रीकृष्ण भिडे, अतुल जोग व पार्ल्यातील केदार कुलकर्णी यांचे काम ऐकून त्यांनी स्वतःला वनवासी कल्याण आश्रमाच्या कामात झोकून द्यायचा निश्चयच केला. सुनिताताईंनी हे काम करता करता आज 15/20 कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. वनवासी वसतिगृहांना भेटी देणे, त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, त्यांच्या गरजांची पाहणी करणे, नवनवीन उपक्रम आखून ते कार्यान्वित करणे हे त्या गेली 15 वर्षे करत आहेत. आश्रामांसाठी निधी संकलित करणे तसेच संस्थेच्या प्रचारासाठी आणि वनक्षेत्रातील मुलांनी क्रीडाक्षेत्रात पुढे यावे यासाठीही प्रयत्न चालू आहेत. पार्ल्यातील काही शिक्षक मिळून वनवासी आश्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी “रानपाखरे’ हे मासिक त्या सातत्याने गेली दहा वर्षे चालवत आहेत. धुळीत पडलेल्यांना हात देऊन वर उचलण्यासाठी आणखी अनेकांनी पुढे येऊन सहकार्य करावे एवढीच अपेक्षा त्या समाजाकडून करतात.

  • संगीता बेहेरे

Mob.: 9867758310

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s