“नागरिकांचा जाहीरनामा’ प्रकाशित

एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा उमेदवाराचा जाहीरनामा आपण नेहमीच वाचतो मात्र आम्ही पार्लेकर’च्या पुढाकाराने आणि पार्लेकरांच्या सहभागाने तयार झालेला “नागरिकांचा जाहीरनामा’ ही संकल्पना अभिनव म्हणावी अशीच!

दि.२४ सप्टेंबर रोजी पार्ल्यातील सुजाण व मान्यवर रहिवाशांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. हा विषय सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची निगडीत असल्यामुळे हे प्रकाशन कोणा एका मान्यवराच्या हस्ते करण्याऐवजी सर्वांच्या हाती एकेक प्रत देऊन सामुहिक प्रकाशनाचा एक अभिनव पायंडा या निमित्ताने पाडण्यात आला.

स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित पार्ल्यासाठी

सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण उपनगर म्हणून आपल्या सर्वांना पार्ल्याविषयी प्रेम आणि अभिमान आहे. मात्र आपल्या पार्ल्याच्या काही समस्याही आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या समस्या आणि त्यावरील उपाययोजनांचा विचार करणे गरजेचे आहे. आपले पार्ले अधिक स्वच्छ, सुंदर व सुरक्षित व्हावे या उद्देशाने पार्लेकर नागरिकांच्या मागण्यांचा एकत्रित जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.

“आम्ही पार्लेकर’च्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात, अनेक सूचना केल्यात. याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

पार्लेकर नागरिक, निवडणूक उमेदवार तसेच निवडून आलेले लोकप्रतिनिधी अशा सर्वांना हा जाहीरनामा मार्गदर्शक ठरेल. परंतु फक्त जाहीरनामा प्रकाशित करून पुढे काहीच केले नाही तर त्याचा उद्देश सफल होणार नाही. निवडून येणाऱ्या आमदाराबरोबर तसेच इतर लोकप्रतिनिधींबरोबर ह्याविषयी चर्चा होणे गरजेचे आहे तसेच दर काही महिन्यांनी बैठक घेऊन झालेल्या कामांबद्दल आढावा घेणे व पुढील कामांची दिशा व योजना ठरवणे हेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.

वाहतूक

पार्ल्यातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या आहे. विशेषत: संध्याकाळच्या वेळी भाजीमार्केटची गल्ली, संपूर्ण महात्मा गांधी मार्ग, हनुमान रोडवरील पितळे वाडीजवळील चौक ह्या ठराविक ठिकाणच्या रस्त्यांवर नेहमीच वाहने संथ गतीने सरकताना दिसतात. दुतर्फा उभ्या केलेल्या गाड्या, सिग्नल्सच्या नियमांची पायमल्ली, रस्त्यांची अरुंद वळणे अशामुळे रस्त्यांवर चालणेदेखील अवघड होत आहे.

सूचना –

पार्ले स्टेशन ते महात्मा गांधी मार्ग यांना जोडणारा भाजी मार्केटचा रस्ता नो स्टॉपिंग झोन करण्यात यावा. वाहनांची गर्दी होणाऱ्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस नेमावा.

त्याचप्रमाणे तेजपाल रोड-वि.स.खांडेकर मार्गाचा वापर वाढवायला हवा. कॅ. गोरे पुलाखालून येणाऱ्या रस्त्याची रूंदी बिस्किट फॅक्टरीपासून विष्णूप्रसाद सोसायटीपर्यंत वाढवल्यास सनसिटी सिनेमा व पार्लेश्वर मंदिराजवळील वाहतूक कोंडी कमी होईल.

अनधिकृत पार्किंग

पार्ले परिसर हा विमानतळाच्या सर्वात जवळ असल्याकारणाने अनेक गाड्या रामभाऊ बर्वेमार्गावर (गुजरात सोसायटी समोरील भाग) रात्रभर पार्क केल्या जातात. याच ठिकाणी अनेक रिक्षा रात्रभर उभ्या केल्या जातात. यामुळे या परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नाही तर इतरही अनेक ठिकाणी विशेषत: भाजीमार्केटच्या रस्त्यावर अनेक गाड्या उभ्या केल्या जातात. यातील बहुतेक गाड्यांमध्ये ड्रायव्हर असल्यामुळे या उचलूनही नेल्या जात नाहीत. यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो.

सूचना –

पार्ल्यात अनेक रस्त्यांवर दोन्ही बाजुला वाहने पार्क केलेली आढळतात. रस्त्यांच्या एकाच बाजुला (सम व विषम दिवसाप्रमाणे) पार्किंग करण्यात यावे. महात्मा गांधी मार्ग नो पार्किंग झोन करावा आणि त्यापैकी पार्लेश्वर मंदिर ते भोगले चौक हा रस्ता नो स्टॉपिंग झोन करावा. अनधिकृत पार्कींगवर कडक कारवाई करावी.

फेरीवाले

पार्ल्यातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच त्या लोकांना भाजी, फळे, खाद्यपदार्थ अशा नित्योपयोगी वस्तू पुरवणाऱ्या फेरीवाल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. पासून नवीन परवाने देणे पालिकेने बंद केले आहे. साहजिकच परवानाधारक फेरीवाल्यांची संख्या अवघी च्या आसपास आहे. यामध्ये आरेचे स्टॉल्स, चांभारांची दुकाने अशांचाही समावेश आहे. जवळपास सर्वच फेरीवाले छोट्या गल्ल्यांऐवजी मुख्य रस्त्यांच्या पदपथावर आपले बस्तान बसवतात. रस्त्यालगतची दुकानेदेखील पदपथाचा सर्रास कब्जा घेतात. अनेकदा आपल्या दुचाकी, चारचाकी गाड्या वाटेतच उभ्या करून लोक त्यांच्याकडून खरेदी करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. धंदा बंद करताना अनेक फेरीवाले कचरा तिथेच रस्त्यावर टाकतात. यावर कडक निर्बंध घालण्यात यावे.

सूचना –

फेरीवाल्यांसाठी – ठिकाणे निवडून स्वतंत्र झोन निश्चित केले जावेत व त्याजागी वाहने उभी केल्यास जबर दंड आकारावा. रस्त्यालगतच्या दुकानांनी पदपथावर आक्रमण केल्यास कडक कारवाई केली जावी.

रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे

दर वर्षी रस्त्यांवर पडणारे खड्डे, उखडलेले पेव्हर ब्लॉक्स, कडा तुटलेले पदपथ हे पार्ल्यातील अनेक गल्ल्यांमधील चित्र आहे. वरचेवर तेच तेच रस्ते दुरुस्त केले जातात आणि पुन्हा पावसाळ्यात त्यांची दूरावस्था होते. दुरुस्तीसाठी लागलेला पैसा आणि मजूरी या दोन्हीची बेजबाबदारपणे नासाडी होत राहते. त्यातून पालिका, टेलिफोन निगम आणि महानगर गॅस यांमध्ये समन्वय नसल्याने पुन्हा पुन्हा रस्ते उखडले जातात. या संबंधी तातडीने कठोर पावले उचलून कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी रस्त्यांच्या नावांच्या पाट्या गायब झालेल्या किंवा तुटलेल्या दिसतात तसेच काही रस्त्यांवर रात्रीच्या वेळी अपुरा उजेड दिसतो. या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हनुमान मार्ग व न्यु एअरपोर्ट कॉलनी यांना जोडणारा भुयारी मार्ग नव्याने बांधण्यात आला. तेथेही संध्याकाळनंतर अपुरा उजेड असतो.

सूचना –

रस्त्यांचे नामफलक, दिवे याकडे तातडीने लक्ष देण्यात यावे. भुयारी मार्गावर दिव्यांची सोय केली जावी. रस्त्यांवरील ठिकठिकाणचे खड्डे आणि उखडलेले पेव्हर ब्लॉक्स दुरुस्त करावेत.

सार्वजनिक शौचालयांची सोय व देखभाल

सध्या स्टेशनच्या बाहेर (मासळीमार्केट समोर) तसेच नेहरू रोडवर सार्वजनिक शौचालये आहेत. पार्लेपरिसरात ठिकठिकाणी आढळणारे फेरीवाले, रिक्षाचालक व इतर नागरिक यांच्या सोयीच्या व आरोग्याच्या दृष्टीने किमान – ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची सोय होणे गरजेचे आहे. ही सुविधा सशुल्क केल्यास स्वच्छतेचीदेखील काळजी घेतली जाईल.

सूचना –

पार्ले परिसरात कमीतकमी पाच सार्वजनिक शौचालये बांधण्यात यावी.

मोबाइल टॉवर्स

मोबाइलच्या वाढत्या वापराबरोबरच आजकाल उंच इमारतींवर उभारण्यात येणाऱ्या मोबाइल टॉवर्सच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. या टॉवर्समधून विद्युतचुंबकीय लहरी परावर्तीत होतात. तज्ञ डॉक्टरांच्या मते उच्च प्रमाणातल्या किरणोत्सर्गाच्या ते मीटर्सच्या परिघात येणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. मोबाइल टॉवरचे अँटेना, ज्यावर ते टॉवर उभारले जातात त्या इमारतींची उंची आणि आजूबाजूच्या इमारतींमधील अंतर या संबंधी पालिकेतर्फे नियमावली तयार करण्यात आली आहे. मात्र हे टॉवर बसवताना या नियमावलीचे संपूर्ण उल्लंघन केलेले आढळते. त्रस्त नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही याबाबतीत पालिकेकडून कारवाई करण्यात आलेली नाही.

सूचना-

मोबाइल टॉवरसंबंधीच्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात यावे. टॉवर्समधून परावर्तीत होणाऱ्या किरणोत्सर्गाची पातळी नियमितपणे मोजावी.

रस्तेदुरुस्तीसंबंधी नागरिकांसाठी माहिती फलक

पार्ल्यात अनेक ठिकाणी रस्तादुरुस्तीची कामे चालू असतात. मात्र त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना यासंबंधी कुठल्याही प्रकारची आगाऊ सूचना किंवा त्या कामासंबंधी माहिती दिली जात नाही. कायद्याने बंधनकारक असलेल्या या नियमाचे सर्रास उल्लंघन केलेले आढळते. रस्तादुरुस्तीचे काम सुरू करण्याआधी या कामाचे नेमके स्वरूप काय आहे, अंदाजे किती दिवसात काम पूर्ण केले जाईल तसेच यासाठी किती खर्च अपेक्षित आहे याचबरोबर कंत्राटदाराची माहिती सूचना फलकावर जाहीर केली जावी.

सूचना –

रस्तादुरुस्तीच्या कामाचा संपूर्ण तपशील फलकावर जाहीर करण्यात यावा. कामाची आगाऊ सूचना परिसरातील नागरिकांना दिल्याशिवाय काम सुरू करू नये.

शेअर रिक्षा स्टॅंड व शटल-रिंगरुट बस सर्विस

संध्याकाळच्या वेळेस स्टेशनसमोर रिक्षा मिळणे दुरापास्त झाले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी त्याठिकाणी शेअर रिक्षा स्टॅंडमुळे उभारला जावा. त्याचप्रमाणे स्टेशनवरून सुटणारी आणि ठरलेल्या – मार्गांवरून पार्ल्यात फिरून पुन्हा स्टेशनला जाणारी बसची शटल सर्विस सुरू केल्यास अनेक रहिवासी त्याचा फायदा घेऊ शकतील. रिक्षासाठी तो एक चांगला पर्याय होऊ शकतो.

त्याचप्रमाणे काही ठराविक ठिकाणे निवडून त्याजागी रिक्षा स्टॅंड तयार केले जावेत. प्रवासी म्हणतील तिथे येण्यासाठी रिक्षावाला तयार व्हावा यासाठी तेथे दिवसाचा काही वेळ तरी पोलिस नेमून दिले जावेत.

सूचना –

शेअर रिक्षा, मॉनिटर्ड रिक्षा स्टॅंड व रिंगरुट बस सर्विस सुरू करावी.

स्पेशल मुलांसाठी राखीव उद्यान

गेल्या वर्षी जून महिन्याच्या सुमारास मालवीय मार्गावरील अंदाजे चौरस मीटरचा भूखंड महापालिकेच्या ताब्यात आला. महापालिकेच्या उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या या भूखंडावर मानसिक व शारीरिक दृष्ट्या विकलांग मुलांसाठी उद्यान उभारण्यात यावे असे आवाहन आम्ही पार्लेकरतर्फे करण्यात आले होते. अशा मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या अनेक शाळा पार्लेपरिसरात आहेत मात्र या स्पेशल मुलांना मनमुराद बागडण्यासाठी उपनगरांमध्ये तर सोडाच पण संपूर्ण मुंबईत एकही उद्यान नाही. तेंव्हा अशा प्रकारचे राखीव उद्यान मालवीय रोडवरील भूखंडावर बांधण्याला अग्रक्रम द्यायला हवा.

सूचना –

मालवीय रोडवरील भूखंड विकलांग मुलांच्या उद्यानासाठी राखीव असल्याचे जाहीर करून बांधकामाला सुरुवात केली जावी.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता

पार्ले परिसरात विविध माध्यमाच्या सुमारे ते शाळा आहेत. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी या शाळांच्या आजुबाजूच्या रस्त्यांवर (विशेषतः पार्ले टिळक विद्यालय (इंग्रजी माध्यम), रमाबाई परांजपे बालमंदिर, महिला संघ) स्कूल बसेस, रिक्षा आणि खाजगी वाहनांची प्रचंड गर्दी होते. यामुळे इतर वाहतुकीमध्ये अडथळा तर येतोच पण शाळेत घाईघाईने जाणाऱ्या मुलांची सुरक्षिततादेखील धोक्यात येते.

सूचना –

स्कुलबसेस शाळेच्या मैदानात उभ्या करण्याची सोय करण्यात यावी. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी पोलीस नेमून वाहतुकीचे नियंत्रण करण्यात यावे.

घरफोड्या व भुरट्या चोरांपासून सुरक्षितता

सकाळच्या किंवा दुपारच्या वेळी सोनसाखळी खेचणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तसेच वाहनचोरी व घरफोड्यांचे प्रकारही सर्रास घडताना दिसतात. आजकाल पार्ल्यात पोलिसांची गस्त काही रस्त्यांवर दिसू लागली आहे मात्र रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी त्यात वाढ होणे गरजेचे आहे.

सूचना –

पहाटेच्या व रात्रीच्या वेळेस पोलिस पहाऱ्यात वाढ करावी.

रक्तपेढी व डायलिसिस सेंटर

कुठल्याही शस्त्रक्रियेच्या वेळी कमीत कमी वेळात रक्ताची उपलब्धता करणे ही रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मोठी बिकट समस्या असते. पार्ले परिसरात रक्तपेढीची सोय होणे तसेच मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी सवलतीच्या दरात कृत्रिम रक्तशुद्धिकरण (डायलिसिस) केंद्राची सोय होणे गरजेचे आहे. पालिकेच्या व्हि.एन.शिरोडकर हॉस्पिटलमध्ये रक्तपेढीची आणि डायलिसिस सेंटर उघडल्यास परिसरातील नागरिकांनाही याचा फायदा घेता येईल.

सूचना –

पालिकेच्या व्हि.एन.शिरोडकर हॉस्पिटलमध्ये किंवा इतरत्र रक्तपेढीची आणि डायलिसिस सेंटरची सुविधा उपलब्ध करावी.

शिरोडकर हॉस्पिटल आधुनिकीकरण

परांजपे बी स्कीमवरील पालिकेचे डॉ.व्हि.एन.शिरोडकर प्रसुतीगृह व हॉस्पिटल एप्रिल महिन्यापासून पुनर्बांधणीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या त्यातील जनरल ओ.पि.डि., स्त्रीरोग चिकित्सा व बालरोग चिकित्सा हे विभाग नेहरू रोडवरील महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहेत. मात्र प्रसुती आणि इतर शल्यचिकित्सा मात्र जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर येथे करण्यात येत आहेत. पार्ल्यातील रुग्णांना तिथे जाणेयेणे गैरसोयीचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे हॉस्पिटल आधुनिक सुखसोयींसह सज्ज व्हावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

सूचना –

पालिकेच्या व्हि.एन.शिरोडकर इस्पितळाच्या नूतनीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.

कचरा व्यवस्थापन व प्रक्रिया

महानगरातील वाढत्या लोकसंख्येतून उद्भवणाऱ्या समस्यांपैकी एक प्रमुख समस्या म्हणजे कचरा व्यवस्थापन. रोजच्या रोज डंपिंग ग्राऊंडवर फेकल्या जाणाऱ्या या कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहे. फक्त पार्ले पूर्व परिसरातून अंदाजे टन कचरा निर्माण होतो. यामध्ये भाजीमार्केटातील कचरा सुमारे दोन टन, हॉटेलांमधून जमा होणारा सुमारे दीड टन, झाडांच्या फांद्या व झावळ्या इ. सुमारे एक टन तर घरगुती व देवळामधील निर्माल्य सुमारे अर्धा टन याचा समावेश होतो. या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प राबविणे शक्य आहे. साधारणपणे एक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी एक हजार स्क्वे. फुट जागेची गरज लागते. पालिकेकडून अशा प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून घ्यायला हवी. (उदा. मिलन फ्लाय ओव्हरखालील जागा.)

सूचना –

पार्ल्यातील सामाजिक संस्थांमार्फत कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प चालवला जाऊ शकतो. कचरा प्रक्रियेसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.

पालिकेच्या मैदानांची व उद्यानांची देखभाल व सुशोभिकरण

पार्ल्यात सर्व ठिकाणी जुन्या इमारती पाडून नवीन टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. या कॉंक्रीटच्या जंगलात मोकळी मैदाने व उद्याने फुफुस्सांचे काम करतात. फेरफटका मारण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी, व्यायाम करण्यसाठी, दोन घटका विश्रांतीसाठी सोयी सुविधांनी युक्त अशी स्वच्छ, सुंदर उद्याने परिसरात असणे ही आवश्यक बाब आहे. सुदैवाने पार्ल्यात पालिकेची अनेक मैदाने/उद्याने आहेत. मात्र देखभाल व सुशोभिकरण या बाबतीत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते.

काही ठिकाणी मुलांसाठी झोपाळे, घसरगुंड्या वगैरे खेळण्याची साधने मोडलेल्या, गंजलेल्या अवस्थेत आहेत.

सूचना –

पालिकेच्या मैदानांमध्ये/उद्यानांमध्ये दिव्यांची सोय, शौचालयांची सोय, बाकांची दुरुस्ती, कुंपणाची व्यवस्था, आवश्यक तिथे शोभेची झाडे लावणे या गोष्टी अग्रक्रमाने केल्या जाव्यात.

अनधिकृत होर्डिंग्ज

ठिकठिकाणी लटकवलेल्या शुभेच्छा, अभिनंदन, श्रद्धांजलीच्या होर्डिंग्जमुळे आपल्या उपनगराची शोभा बिघडते. यापैकी बऱ्याचशा फलकांवर स्थानिक लोकप्रतिनिधींचे चेहरेच पाहायला मिळतात. त्यामुळे यावर काही तोडगा काढला जाईल यावर नागरिकांच्या मनात शंकाच आहे. यावर साकल्याने विचार करून मिळेल त्या जागी, झाडांवर, चौकात दिसणाऱ्या या लहानमोठ्या होर्डिंग्जवर बंदी आणण्यात यावी आणि एका स्तुत्य उपक्रमाची सुरुवात पार्ल्यापासून करावी. पालिकेची पूर्वपरवानगी घेतलेल्या होर्डिंग्जवर नोंदणी क्रमांक व मुदत जाहीर केली जाते. त्यामुळे अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करणे सहज शक्य आहे.

सूचना –

परवानगी घेऊन लावलेल्या होर्डिंग्जवर परवाना क्रमांक घालणे बंधनकारक केले जावे व अनधिकृत होर्डिंग्ज ताबोडतोब काढण्यात यावी.

दुर्मीळ व जुन्या वृक्षांचे संवर्धन

हिरव्यागार वुक्षराजींनी वेढलेले उपनगर अशी पार्ल्याची कीर्ती आजकाल उतरणीला लागली आहे. अजूनही अनेक रस्त्यांवर सावली देणारे मोठमोठे वृक्ष आढळतात. यामध्ये अनेक दुर्मीळ प्रजातींचादेखील समावेश आहे. या वृक्षांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. रस्तादुरुस्तीच्या कामाच्या वेळी या वृक्षांची मुळे दुखावली जातात तसेच त्यांच्या खोडापर्यंत सिमेंट कॉन्क्रीट घातले जाते. याची परिणिती म्हणजे अनेक दशकांपासून ताठ मानेने उभी असणारी मोठमोठी झाडं अनेक ठिकाणी उन्मळून पडत आहेत. जागेअभावी आपल्याला नवीन वृक्षांची लागवड करणे कठीण असेल पण जे आहेत त्यांचे तरी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य संवर्धन व्हायला हवे.

सूचना –

वनस्पती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली दूर्मीळ व जुन्या वृक्षांचे योग्य संवर्धन व्हायला हवे. यासाठी निश्चितस्वरूपी कृती कार्यक्रम आखावा.

बॅडमिंटन कोर्ट

शरीर आणि मन तंदुरूस्त ठेवण्यासाठी खेळासारखा व्यायाम नाही. शहाजी राजे मार्गावरील स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्रामध्ये बॅडमिंटन कोर्ट उभारले जावे यासाठी क्रीडाप्रेमी आणि प्रशिक्षक अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट पार्ल्यात तयार झाले तर अनेक खेळाडू त्याचा लाभ घेऊ शकतील.

सूचना –

आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट स्वा. सावरकर केंद्रामध्ये सुरू करावे.

भटके कुत्रे

पार्ल्यातील अनेक रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. कुत्र्यांनी चावल्याच्या घटनादेखील अधूनमधून घडतच असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकींच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.

सूचना –

भटक्या कुत्र्यांना वस्ती बाहेर सोडण्यात यावे.

आमदारनिधीचा वार्षिक जमाखर्च जाहीर करणे.

विभागातील नागरिकांच्या सुविधांसाठी ठरावीक रक्कम दरवर्षी आमदार निधी म्हणून प्रदान केली जाते. या निधीचा विनियोग कसा केला जातो याचा तपशीलवार अहवाल सर्वांना दिसेल अशा ठिकाणी (उदा. रेल्वे स्टेशनच्या बाहेर) फलकाद्वारे जाहीर करण्यात यावा.   ‘आम्ही पार्लेकर’मध्ये सुद्धा हा तपशील प्रसिद्ध करता येईल.

सूचना –

आमदारनिधीचा सविस्तर तपशील जाहीर करण्यात यावा.

संकलन प्रक्रियेतील सहभागी

अशोक पानवलकर, अरविंद कुळकर्णी, प्रा. मोहन आपटे, दीपक घैसास, प्रतिभा बेलवलकर, प्रताप अंकोलेकर, प्रसाद कुलकर्णी, अनिता चांदेकर, संजय पुरंदरे, जयंत देशपांडे, डॉ.चंद्रहास देशपांडे, पद्मजा जोग, नीला रवींद्र, संजय गीते, संजय पालकर, डॉ. अनुया पालकर, अनुराधा गोरे, तनुजा घोटीकर, मिलिंद पुर्णपात्रे, डॉ. कविता रेगे, डॉ. माधवी पेठे, डॉ. शशिकांत वैद्य, डॉ. सुहास पिंगळे, सुहास बहुलकर, डॉ. चारुशीला ओक, अजित जोशी, सुहास बेंगेरी, मालवीका बेंगेरी, दिलिप भोगले, कॅ.नरेंद्र जामनेरकर, मनिषा खांडेकर, श्रिकांत फणसळकर, नंदकुमार आचार्य, कुलकर्णी सर, सुचिता आंबर्डेकर डॉ.अजित दांडेकर, रत्नप्रभा महाजन, किशोर जावळे, अंजली पेंढारकर, श्रीधर फडके, सुमेध वडावाला, उदय पटवर्धन, प्रदीप वेलणकर, प्रवीण कणेकर, यशवंत जोशी, उमेश श्रीखंडे, अनिल गानु, सुधीर महाबळ, अमेया जाधव, इला भाटे, प्रकाश बापट, पराग साठे, कांचन ठोसर, विजय जोशी, माधव काणे, मोहन रानडे, ज्ञानेश चांदेकर, प्रज्ञा काणे, चित्रा वाघ

व इतर अनेक जागरूक पार्लेकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s