पार्लेकर असणं…एक एहसास !

झाली असतील काही वर्षं! म्हणजे पार्ले टिळक शाळेची जुनी इमारत पाडण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा मेळावा होता, त्यावेळची गोष्ट.
अचानक वाटेत थांबून मला “मग येतोयेस ना?’, “येताय ना?’ असे प्रश्न विचारायला सुरूवात झाली. मला चटकन संदर्भ कळला नाही त्यामुळे मी “बघू, बघतो, जमलं तर!’ अशी उत्तरं दिली. परंतु, एकाने मात्र मला गाठलेच.”तू कोणत्या बॅचचा रे?, आपल्या बॅचमध्ये तो जोशी नव्हता का रे? तो पुढच्या बेंचवर बसायचा, मी त्याच्या बरोब्बर मागे बसायचो!’ मी गोंधळलो कारण माझ्या बॅचमधले यच्चयावत जोशी पुढच्या बाकावर आणि कुळकर्णी/कुलकर्णी पुढून तिसऱ्या बाकावर बसायचे… तो संदर्भ लागेना तेव्हा त्या एकानं मला अजून दोन चार रेगे, सामंत, पाटील अशा नावांचे संदर्भ दिले. मग त्याच्या लक्षात आलं की मला काही उमजत नाहीये. तेव्हा म्हणाला “तू 75च्या बॅचचा ना?’ मग एकदम कोडं उलगडल्यागत म्हणाला “हां हां, तुझ्या बाबांची बदली झाली आणि तू धुळ्याला गेलास, तोच बर्वेना?’
“आपण यांना पाहिलंत का?’ हा संवाद आटोपून तो म्हणाला, “ते जाऊ दे रे, कुठच्या का बॅचचा असेनास, परवा मेळाव्याला ये म्हंजे झालं!!’
बरीच कोडी उलगडली आणि मी म्हटलं, “अरे, मी पार्ले टिळकचा विद्यार्थी नाहीये”
यावर त्या एकाने “मुझे आपसे ये उम्मीद नही थी!’ असा लुक देऊन नजरेनं सुचवलं की मित्रा, तू पार्ल्यात राहात असलास, तरी अस्सल पार्लेकर नाहीस बरं!’
ती नजर आणि लुक मनात दीर्घकाळ रेंगाळत राहिला आणि “आम्ही पार्लेकर’ मधून फोन आला तेव्हा, मला आश्चर्य वाटलं. मी तसं म्हटलंही, पण “असं काही नाहिये हो, वुई वेलकम यू टू द फोरम!’ असं उत्तर मिळालं.
मी अर्थातच होकार दिला आणि मनात माझं आणि पार्ल्याचं नातं तपासू लागलो. मनात बरेच प्रश्न उपस्थित झाले, काही मूलभूत शंका निर्माण झाल्या.
माणूस आणि त्याचा निवास, माणूस आणि त्याचं जानपद याचं नातं शोधण्याचा प्रयत्न करू लागलो, या नात्यांचे पेड किती घट्ट आणि वळसे किती वळणदार असतात याचा विचार करू लागलो.
आपल्या गावाबद्दल इतकी आपुलकी वाटण्याची मुळं कुठे गुंतलेली आहेत? ते प्रेम इतकं का टिकतं? त्या नात्यात कम्फर्ट झोन कसा तयार होतो? ते नातं हे सोशल नेट वर्किंगचा सेफ झोन असतो? की त्या नात्यात साचलेपणा येतो? नात्यामधल्या कम्फर्ट स्पेसमुळे आधार मिळतो, की त्या आधाराच्या भूमीत पाय गाडले जातात?
पार्ले पूर्व या उपनगरानं या प्रश्नांची उत्तरं शोधली आहेत, असं वाटतं. पण या नात्याच्या धाग्यांच्या गोफाचा गुंता होत चाललाय असंही वाटतं. मुळात माझ्यासारख्या काहीशा अंतर्मुख माणसाला इथल्या “सोशल लिविंग’मुळे गुदमरायला तर होत नाही ना? असंही वाटतं.
माणूस या प्राण्यानं शेती करून आपली गुजराण करता येते आणि वरकस धान्य जपून ठेवलं तर पावसापाण्यात, दुष्काळात त्याचा उपयोग होऊ शकतो, हा शोध लावला. तो कोणाच्याही नावावर लिहिलेला नाहीये कारण ती सामूहिक ज्ञानप्राप्ती होती. त्याचबरोबर, एकत्रपणे राहिल्यास अधिक सुरक्षित वाटतं, वस्तीमधल्या स्त्रिया आणि मुलांच्या संरक्षण आणि संगोपनाकरता जाणता अवकाश मिळतो याची ही जाण माणसाला आली.
धान्यधुन्याच्या या हरितशेती क्रांतीचे हे उपफायदे माणसाला कळले आणि वस्ती करून राहाण्यातलं शहाणपण त्यानं जपलं. सुरक्षितपणे राहाण्याकरता समूहानं, एकजुटीनं परस्परांना सहाय्य करीत जगण्याचं हे “ग्यान’ माणसाच्या डीएनएमध्ये ठसलं, ते कायमचं.
या घटनेला लाखो वर्षं उलटून गेली तरी आपण शहाणपणाचा तो वारसा जपून ठेवलेला आहे. अशा वस्त्या सुरूवातीला अर्थातच मोठमोठ्या जलाशयाच्या काठी, नदीच्या तटावर वसल्या पण त्या जागांना अर्थातच मर्यादा होती. शेती पाठोपाठ व्यापार उदिमाचा शोधही माणसानं लावला आणि लोकवस्तीने नदीचे किनारे आणि जलाशयाचे काठ सोडले. त्याने इतरत्र वस्ती करायला सुरूवात केली.
या घटना घडल्यानंतरही बराच काळ लोटला तोवर कुठेही वस्ती करून, परस्परांशी प्रेम आणि सहकार्याचं नातं जोडून जगण्याचा कानमंत्र माणसानं पिढ्यान पिढ्या गिरवला. सर्वसामान्य माणसाचा इतिहास हा असाच असतो. तिथी आणि सनावळ्यांच्या खुंट्यावर न टांगलेला! त्याची नोंद इतिहासकार घेत नसले तरी ती आपल्या मनावरची गोंदणं असतात. (मला पार्ल्यामध्ये अशी गोंदणं खूप दिसतात.)
माणसाच्या इतिहासातलं एक मोठं धसमुसळं पर्व जन्माला आलं आणि माणसाच्यां मनातली ही सुरक्षिततेवर आधारलेली सुव्यवस्था ढासळली. वाफेची इंजिनं इग्लंडात धडधडू लागली आणि भारतात त्याचा धूर निघू लागला.
शेतीतलं उत्पादन बेभरवशाचं वाटू लागलं. रोजगारीकरता, कारखान्यातल्या दिवस आणि रात्रपाळ्या करून हातावर नाण्यांचा खणखणाट होऊ लागला. जगभरातल्या शेती व्यवस्थेपुढे मोठी आवाहनं निर्माण झाली. गिरण्यांचे भोंगू वाजू लागले. गेटवरच्या माणसांची आवकजावक सांभाळण्याकरता माणसांची गरज भासू लागली. त्यांच्या सुट्ट्या, पगार, विक्री खरेदी, तयार माल, कच्चामाल यांची मोजदाद, नोंदणी आणि व्यवस्थापनाकरता चार बुकं शिकलेल्या बुद्धिजीवी मंडळींची गरज भासू लागली.
कामगारांच्या पाठोपाठ हा बुद्धीजीवी वर्ग झपाट्यानं शहरात स्थलांतर करू लागला. या मध्यमवर्गीय मंडळीनी मनाशी कळत नकळत खूणगाठ मारली. जोवर चटपट हिशोब करता येतोय, पत्रोपत्री करता येतेय, टंकलेखन करता येतंय, तोवर आपला निभाव लागणार. एका जाहिरातीत युवराज सिंह म्हणतो, “जब तक बल्ला चलेगा, तब तक!’ जोवर शिक्षण आहे तोवर आपण आहोत. हा कित्ता इथे गिरवला जाऊ लागला.
सुशिक्षितपणा हा सुरक्षित जीवनाचा कानमंत्र झाला. जगातल्या लाखो शहरांची ही गोष्ट आहे पण त्यात पार्ले पूर्व उपनगर आपलं वैशिष्ट्य जपून आहे कारण सुशिक्षणाचा आणि उत्तम शिक्षण देणाऱ्या संस्थाचा वसा पार्ल्यानं घेतला तितका क्वचितच कोणी घेतला असेल. हां, पुण्याची मंडळी आता चुळबुळ करू लागतील. पण पार्ल्याची गोष्ट वेगळी आहे कारण पार्ले हे अखेर मुंबईचं उपनगर आहे. मुंबईचा स्वभाव आणि वैशिष्ट्यं पार्ले पूर्वमध्ये प्रतीत होतात.
पार्ल्यानं शैक्षणिक संस्थांमध्ये भरीव कामगिरी केल्याचं इथल्या रस्त्यारस्त्यावर आढळतं. सकाळच्या वेळी नीटनेटका गणवेश घातलेली सर्व थरातील, विविध आर्थिक स्तरातली मुलं घोळक्यानं शाळांकडे कूच करतात. त्यांच्या डोळ्यातली स्वप्नं आणि सळसळणारा उत्साह बघितला की पार्ल्याच्या समृद्धतेची साक्ष पटते.
सुमारे 70-80 वर्षां पूर्वी बर्वे कुटुंब पार्ले पूर्वमध्ये घर घेऊन राहात असे तेव्हा देखील पार्ले मधील शाळा हेच प्रमुख आकर्षण होतं. कालवशात ते घरही गेलं आणि या बर्वे कुटुंबानं पार्ल्याचा साश्रुनयनानी निरोप घेतला. पुन्हा 60 वर्षांनी हा नवा बर्वे पार्ल्याशी घरोबा करायला आला. हा एक प्रकारचा “पोएटिक जस्टिस’ माझ्या बर्वे कुटुंबाशी झाला.
पार्ल्याला “आधार’ देणारी अनेक बर्वेकुटुंब आहेत. पैकी माझं घरकुल त्याच्यामधील नाही. (मूळ गाव मुंबईच्या उत्तरेकडचं वसईगाव, माझं शिक्षण तिथे बर्वे एज्युकेशन सोसायटीच्या न्यु इंग्लिश स्कूलमध्ये झालं! त्या एकाला सांगायचं राहून गेलं, ते इथे सांगतो इतकंच)
पार्ले गावाची गोष्ट सांगतासांगता आपण मानवी संस्कृतीमधल्या नागरीकरणाच्या इतिहासाचा लेखाजोखा घेतला.
त्या सर्व शहरीकरणाच्या प्रक्रियेप्रमाणे पार्ले (पूर्व) इथे मध्यमवर्गीयानी मोठी वस्ती केली. ती जगरहाटी झाली.
मग पार्ल्याचं वैशिष्ट्य काय? एका भुकेल्या माणसानं देवाकडे स्वत:करता मागणी केली. पोटाची खळगी भरण्याकरता देवानं त्याला खायला तोंड आणि राबायला हात दिले. मीठ भाकरीची व्यवस्था करून दिल्यावर तो माणूस समाधान पावून जाऊ लागला तेव्हा देवानं त्याच्या हातात एक सुंदरसं फूल दिलं. अन्नानं तुला जगता येईल तर हे “फूल’ जगायचं कशासाठी हे शिकवेल!
फुलाच्या नाजूक सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा हा आशीर्वाद पार्ले पूर्वकरांनी मन:पूर्वक स्वीकारला. पार्ल्यामध्ये “काव्य-शास्त्र-संगीत-विनोदाने’ कसं जगावं याचा उत्तम प्रत्यय येतो. काव्यशास्त्र, संगीत आणि विनोद या कलाविष्कारांच्या अनुभवात पार्लेकर गुलाबजामासारखे आनंदाने डुंबत असतात.
इथे सदैव कसली न कसली मैफल रंगलेली असते. इथल्या कट्ट्यावर चर्चा रंगतात. फक्त “शेअर मार्केट’वर नाहीत तर या “राष्ट्राचं’काय होणार या विषयावर, कोणी काय लिहिलं? कोणतं गाणं नव्यानं अवतरलं? कोणत्या नाटकामधलं नाट्य दुसऱ्या अंकातल्या तिसऱ्या प्रवेशात नंतर कसं खुलतं यावर!
पार्ल्याचं हे वैशिष्ट्य खरोखर लक्षणीय आहे. या रसिक-अभ्यासक-वाचक-श्रोत्या पार्ल्याची ओळख पटली म्हणून तर इथे आलेला पार्लेकर केव्हा इथला होऊन जातो हे त्यालाही कळत नाही.
पार्ले पूर्व इथे राहणं हा निवास नसून इथला श्वास-निश्वास आहे. पार्लेकर म्हणून वावरणं हा एहसास आहे. जगण्याचा वजूद आहे.
पार्ले पूर्व मनात भिनलं की काही जुन्या मानसिक प्रश्नांची नव्यानं उकल होते.
घराशी आणि वस्तीशी आपलं नातं जुळतं ते त्यामागे असलेल्या सुरक्षितपणा आणि परस्परसहाय्याच्या पक्क्या विणीवर. पण सुरक्षित जगणं म्हणजे नुसतं जगणं झालं. त्या जगण्याला अर्थपूर्णता येते ती संस्कृतीच्या जोपासनेतून, सौदर्यांच्या आस्वादातून आणि सृजनात्मक प्रतिभेतून आविष्कारणाऱ्या काव्य-संगीत-नृत्य आणि नाट्य या कलाप्रकारातून !
इथल्या वस्तीनं जगण्याचं हे वैशिष्ट्य मनोमन जाणलंय. तो सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतता पार्ल्यानं जपलीय!!
इथे राहतो, जगतो माणूस म्हणून आणि जीवनाचा आस्वाद घेतो रसिक म्हणून!!!
– डॉ. राजेंद्र बर्वे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s