आदरांजली

मंगलाबाई – एक महान पर्व

मंगलाबाई म्हणजे एक महान पर्व होतं. 20व्या शतकातलं स्त्री शिक्षण, स्त्री-रोजगार, गरीब कामगाराच्या वस्त्या, समाजातील उपेक्षित घटक, त्यांचे रहाणीमान, अपुऱ्या सोयी हे सामाजिक विषमतेचे विषय त्यांना अस्वस्थ करीत. त्यांचं पोरकं बालपण इंचलकरंजीत काकांच्या कुटुंबात गेलेलं आणि त्यातून आलेलं सामाजिक भान हळू हळू डाव्या विचारसरणीकडे झुकत जाऊन वर्तनातही येऊ लागलं. माधवराव भागवतांच्या बरोबर झालेल्या विवाहानंतर त्या दादरला लेडी जमशेटजी रोडवरील “जयंत निवास’मध्ये राहण्यास आल्या आणि त्यांच्या सामाजिक जाणीवा अधिक घट्ट होत त्यानी कार्यास सुरूवातही केली. स्त्री शिक्षण, समाज सुधारणा, रूग्ण सेवा, राजकीय क्षेत्र आणि स्वातंत्र लढा, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ या सगळ्या प्रश्नांनी भेडसावणारे जीवन नुसते न्याहळत न बसता सक्रियपणे अन्य महिलांबरोबरही त्या चळवळीत उतरल्या.

साली भागवत पतीपत्नीनीं पार्ल्यात राहण्यास यायचे नक्की केले आणि नियतीनेही बाईंच्या सामाजिक कार्याची कर्मभूमी नक्की केली. त्यावेळी पार्ले, कहाणीमधल्या कथेसारखे आपटपाट नगर होते. वाड्यांची वस्ती होती. मंगलाबाईंचा आजूबाजूच्या स्त्रियांशी परिचय होत गेला. संघटनेचे विचार आणि कार्याची दिशा मिळाली. आपण आपले संसार, मुलेबाळे नीटनेटके व्हावेत म्हणून प्रयत्न करतो मग आपल्या भोवती सगळे असेच चित्र, वातावरण असावे, आपल्या स्वराज्यचे सुराज्य व्हावेसे वाटत असले तर ह्या झोपड्यांतील मुलांना माणसांना बरोबर नेले पाहिजे, तरच समाजाचा उत्कर्ष साधला जाईल. त्यासाठी प्रत्यक्ष कार्याची सुरूवात मुला मुलींच्या शिक्षणाने करता येईल. दारू, महागाई यांचे दुष्परिणाम समजावणे गरजेचे आहे पण त्यासाठी महिलांनी एकत्र येऊन स्त्री संस्था सुरू करणे महत्त्वाचे आहे असा विचार त्यांनी केला. ती संधी त्यांनी म्युनिसिपालटीच्या निवडणुकामधून ही घेतली.

जानेवारी 1952 रोजी संक्रातीच्या दिवशी महिला संघाची स्थापना झाली. मंगलाताईच्याच मागील बाजूच्या घरात बाल मंदिराची स्थापना झाली तसेच स्त्रियांचे इतर उपक्रम सुरू झाले. प्रत्येक उपक्रमात त्यांना पार्ल्यामधील स्त्रियांचे सहकार्य लाभले. समाजकार्यासाठी माणसे ओळखण्याची त्यांची नजर, हातोटी वैशिष्ट्यपूर्ण होती. संस्थेचे आर्थिक व्यवहार स्वच्छ व पारदर्शी असावे याकडे त्यांचा कटाक्ष होता. उद्योगिनी, ग्रंथालय, सकस आहार योजना, व्यायामशाळा आणि शैक्षणिक विभाग तर इंग्रजी मराठी माध्यमाच्या एस.एस.सी. पर्यंतच्या शाळा, एसएनडिटीचे महिला महाविद्यालय, निरंतर शिक्षण योजना, ग्रंथालयाचे वर्ग असा विस्तार होत गेला.

“अग्रत: पथि सदैव गम्यताय’ या बोधवाक्याप्रमाणे सर्वाथाने महिला संघ नामरूपास आले. परांजपे बी स्कीम रोड नं. 1 आणि सुभाष रोड हे जिथे भेटतात तेथील कोपऱ्यावर “विलेपार्ले महिला संघाची’ मोठी वास्तू आज दिमाखाने उभी आहे. ही जागा मिळवताना देखील मंगलाताई, त्यांचे पती माधवराव आणि सहकारी मंडळींनी खूप कष्ट घेतले. सामाजिक कार्यकर्त्यांनी एक पिढी घडवण्याचे कार्य बाईंनी अत्यंत कर्तव्य दक्षतेने केले. संस्थेने रोजगार निर्मितीची साधने निर्माण करतानाच आजच्या पिढीला येणाऱ्या नव्या बदलाचे अवकाश दिले.

या सर्व प्रवासात त्यांचे व्यक्तिगत जीवनही गुरफटत गेले. कुटुंबियांची साथ मिळाली. व्याख्यानमालेमुळे गुणीजनांच्या ओळखी दृढ होत गेल्या, नवे विचारही मांडले गेले. बाईंनी परदेशी प्रवासात स्त्रियांचे प्रतिनिधित्व केले. त्या मोजकेच पण मुद्देसूद बोलत असत. फावला वेळ, मला वाटतं त्यांच्याजवळ नसावाच.

मंगलाताई भागवतांनी वयाच्या साठीला संस्थेमधून सेवा निवृत्ती घेतली. त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या समृद्ध समाजकार्याची नोंद नानाजी देशमुखांच्या दीनदयाळ संशोधन समितीने घेऊन त्यांना पुरस्कार दिला. आपल्या विचारांशी जुळणाऱ्या या संस्थेच्या कार्यात त्या काही वर्षे सहभागीही झाल्या. बीड, अंबेजोगाई, चित्रकुट येथे भटक्या मजुरांच्या मुलांसाठी शाळा, फिरता दवाखाना, स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण अशी वेगवेगळी कामे करणाऱ्या या संस्थेच्या मुंबई येथील समितीवर त्यांनी आनंदाने काम केले.

त्यांच्या ह्या समाजकार्यात अडीअडचणी, संकटे, वादळे आली पण सर्वांशी सामना करून त्यांनी आपल्या कार्याची पूर्तता केली. त्यांच्या या कार्यासाठी “पार्ले भूषण’ बरोबरच अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. मंगलाताईंचे आयुष्य, कर्तृत्व, सामाजिकता पुरून उरणारी आहे म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्व एका महान पर्वासारखे वाटते.

-वसुधा पंडित (महिला संघ-आजीव सभासद)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s