‘कोण आहे अस्सल पार्लेकर’? सप्टेंबर महिन्याच्या प्रश्नांची उत्तरे

1.     हनुमान मार्ग हे नाव कुठल्या हनुमान मंदिरावरून पडले? – ठोसरांचे हनुमान मंदिर

1921-22च्या सुमारास कै.नारायण ठोसर यांनी ठोसरवाडी येथे हनुमान मंदिर बांधले. पुढे या मंदिराजवळून जाणाऱ्या रस्त्याला ‘हनुमान रस्ता’ असे नाव पडले. शिर्डीच्या साईबाबांच्या सांगण्यावरून बांधण्यात आल्यामुळे या मंदिरास ‘साई हनुमान मंदिर’ म्हणतात.

2.    पार्ल्यातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुठे सुरू झाला? – राम मंदिर (पार्ला मार्केट)

यंदा शंभर वर्षेपूर्ण केलेल्या महात्मा गांधी रस्त्यावरील राम मंदिराची स्थापना कै.विष्णू विश्वनाथ गोखले यांनी केली. 1920 साली टिळकांच्या निधनानंतर त्याच वर्षी या मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर 1923 पासून तो लोकमान्य सेवा संघाच्या गोखले सभागृहात साजरा केला जात आहे.

3.    पार्ल्यातल्या पहिल्या चित्रपटगृहाचे नाव काय? – लक्ष्मी थिएटर

सध्या ज्या जागेवर ‘सनसिटी’ चित्रपटगृह आहे त्याच जागेवर पूर्वी ‘लक्ष्मी थिएटर’ होते. 1942 साली बाबुराव जोशी, ओंकारनाथ तिवारी, चांदोरकर व बाबुभाई दोशी यांनी बांधण्यात आलेल्या या चित्रपटगृहासाठी बाबुराव परांजपे यांच्याकडून भाडेतत्वावर जागा घेण्यात आली होती. सिनेशौकिनांमध्ये हे थिएटर ‘ताडपत्री मेट्रो’ म्हणून प्रसिध्द होते.

4.    जोडया जुळवा

पार्लेकर कलाकार गाजलेली नाटके
सतिश दुभाषी माणसाला डंख मातीचा
दत्ता भट एक शून्य बाजीराव
माधव वाटवे संध्याछाया
चंद्रकांत गोखले पर्याय

5.          नेहरू रोडवरील पेट्रोल पंपाच्या समोरच्या चाळीत कुठल्या सुप्रसिध्द हिंदी

संगीतकाराचे वास्तव्य होते?

-सचिन देव बर्मन

बंदिनी, गाईड, आराधना अशा अनेक चित्रपटांमधील गाजलेल्या रचनांमुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे सुप्रसिध्द संगीतकार सचिन देव बर्मन हे 1951 पर्यंत  नेहरू रोडवरील एका कौलारू चाळीत रहात असत.

6.    महापालिकेतील शिपायाची नोकरी ते साहित्य संमेलनाध्यक्ष असा विलक्षण

प्रवास करणारे सुप्रसिध्द पार्लेकर कवी कोण?

– नारायण सुर्वे

काही काळ गिरणी कामगार त्यानंतर शिपाई, मग प्राथमिक शिक्षकाची नोकरी असे टप्पे पार करता करता 1995 च्या परभणी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तर 1998 सालचा पद्मश्री पुरस्कार असा विलक्षण प्रवास करणारे सुप्रसिध्द कवी नारायण सुर्वे पार्ल्यात जीवन विकास केंद्रानजिकच्या परिसरात रहात असत. तळागाळातल्या श्रमिकांच्या सहवासामुळे त्यांच्या कवितेतील वास्तव हे प्रत्यक्षाला अधिक भिडणारे होते.

7.    ‘कमळाचे तळे’ म्हणून ओळखला जाणारा जलाशय पार्ल्यात कुठे होता?

– हनुमान मार्ग

सुमारे 50 वर्षांपूर्वी हनुमान मार्गावर सध्या ज्या ठिकाणी गुरुप्रसाद सोसायटी आहे तिथे एक कमळांचं तळं होतं. आजुबाजुच्या परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन या तळयात केले जात असे. पुढे ते बुजवून त्याठिकाणी इमारतींचे बांधकाम करण्यात आले.

8.    जोडया जुळवा

पार्लेकर लेखक पुस्तके
मधु मंगेश कर्णिक जुईली
विजय तेंडुलकर मी जिंकलो मी हरलो
रवींद्र पिंगे शतपावली
रमेश मंत्री सह्याद्रीची चोरी

9.  हळदीपुरांचा काच कारखाना पार्ल्यात कुठे होता? – संत जनाबाई मार्ग

वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी केमिकल इंजिनियरींगची पदवी घेतल्यावर निरंजन हळदीपूर यांनी 1944 साली ‘हल्दिन ग्लास वर्क्स’ची स्थापना केली. या कारखान्यातून अनेक मोठमोठया औषध कंपन्यांना काचेच्या बाटल्या पुरवल्या जात. सध्या जिथे हायवे रोझ सोसायटी आहे त्याच्या जवळ हा कारखाना होता.

10.    पार्ल्यातील कुठल्या संस्थेने हिमालयावर यशस्वी मोहीम प्रथम पार पाडली? – हॉलिडे हायकर्स क्लब

1965 साली प्रा.आनंद चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाकर केसकर, बाबुराव काळसेकर, रामदास शिराळी आदी मंडळींनी ‘हॉलिडे हायकर्स क्लब’ ची स्थापना केली. 1978  साली या क्लब तर्फे जोगिन  3 हे हिमालयातील 20,065 फूट उंचीवरील शिखर सर करण्यात आले. यानंतर या क्लबने हिमालयात अनेक मोहिमा काढल्या. ह्या सर्व मोहिमांचे वैशिष्टय म्हणजे यात शेरपा नसत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s