‘कोण आहे अस्सल पार्लेकर’? ऑगस्ट महिन्याच्या प्रश्नांची उत्तरे

1.     सहार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरू झाला? – 1982

1942 सालापर्यंत मुंबईचा विमानतळ जुहू येथे होता, मात्र समुद्राच्या खूप जवळ असल्यामुळे पावसाच्या दिवसांमध्ये विमान वाहतुकीला अडथळे निर्माण होत असे. त्यानंतर सांताक्रूझ येथे तो हलवण्यात आला. मात्र अधिक मोठया जागेच्या गरजेपायी आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी सहार येथे त्याचा विस्तार करण्यात आला. 1982 पासून सुरू झालेल्या या विमानतळाला छत्रपती शिवाजी यांचे नाव देण्यात आले.

2.    नेहरू रोडवरील आदर्श पेट्रोल पंप कुणी सुरू केला?  – शशीबेन जानी

शशीबेन जानी यांनी सुरूवातीच्या काळात साऊथ आफ्रिकेमध्ये नर्सींगचे काम केले होते. पुढे स्वत:चा व्यवसाय उभा करण्याच्या जिद्दीने त्यांनी  नेहरू रोडवरील आदर्श पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उचलली. ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या शशीबेन त्या काळातील  एकमेव महिला होत्या. व्यवसायाबरोबरच त्यांनी अनेक गरजू संस्थांना मोलाची मदत केली आहे.

3.    ‘मेरी आवाज सुनो’ स्पर्धेच्या पहिल्या सिझनची पार्लेकर विजेती कोण?

–  सोनाली भाटवडेकर (कर्णिक)

व्यास संगीत विद्यालयात संगीताचे प्राथमिक धडे गिरवणाऱ्या सोनालीने पुढे मनोहर जोशी, पं शंकर अभ्यंकर व अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. आजवर 1200 पेक्षा अधिक सुगम संगीताच्या कार्यक्रमात गायलेल्या सोनालीने 1997 मध्ये ‘स्टार प्लस’  वाहिनीवरील ‘मेरी आवाज सुनो’ ची पहिली विजेती म्हणून ‘लता मंगेशकर ट्रॉफी’ मिळवली.

4.    हे व्यंगचित्र कुठल्या पार्लेकर कलावंताने चितारले आहे?  –  वसंत सरवटे

सतराव्या वर्षापासून व्यंगचित्रकलेकडे वळलेल्या वसंत सरवटे यांच्या कुंचल्यांनी अनेक मासिके तसेच ‘पु.ल.एक साठवण’ सारखी अनेक पुस्तके सजली. ललीत मासिकातील ‘ठणठणपाळ’ अतिशय प्रसिध्द झाला. ‘ललीत’च्या गेल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांवर त्यांची व्यंगचित्रे झळकली आहेत. ‘इंडियन इंस्टिटयूट ऑफ कार्टुनिस्ट’ या संस्थेतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कलेशी संबंधीत अनेक पुस्तकांचे लेखन/संपादन त्यांनी केले आहे.

5.          ‘चौफेर’ हे गाजलेले वृत्तपत्रीय सदर लिहिणारे पार्ल्यातील साहित्यिक कोण?

-माधव गडकरी

झुंझार पत्रकार व उत्तम लेखक म्हणून मान्यता पावलेले माधवराव गडकरी यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये प्रमुख उपसंपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर ‘दैनिक गोमंतक’, ‘मुंबई सकाळ’, ‘लोकसत्ता’ या दैनिकांच्या व ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या संपादकपदाची त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली. 1990 साली त्यांना भारत सरकारने पद्मश्री किताब देऊन सन्मानित केले. तीसहून अधिक पुस्तके लिहिणाऱ्या गडकरी यांचे ‘लोकसत्ता’ मधील गाजलेले ‘चौफेर’ हे सदर राजकीय विश्लेषकांच्या व अभ्यासकांच्या दृष्टीने विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.

6.    भारतीय हवाईदल प्रमुख पदावर पोहोचलेले पा.टि.वि.चे माजी विद्यार्थी कोण?

– प्रदीप नाईक

एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक हे भारतीय हवाईदलाचे एकोणीसावे प्रमुख. नागपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. पार्लेटिळक विद्यालयात शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सैनिक स्कूल, सातारा व नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला येथे पुढील प्रशिक्षण घेतले. 1971  च्या युध्दात सहाभाग घेतलेल्या नाईक यांना अनेक सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.

7.    खो-खो या क्रिडाप्रकारासाठी 1982 साली शिवछत्रपती पुरस्कार व 1983 साली अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूचे नाव काय?

– वीणा परब गोरे

खो-खो या क्रीडाप्रकारासाठी 1982  साली महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्कार तर 1983साली राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरकाराच्या मानकरी असणाऱ्या वीणा परब गोरे यांना ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कारा’नेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. 1975 साली हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी 25 गडी बाद करण्याचा विक्रम केला होता त्याचप्रमाणे चार वेळा महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषविले आहे.

8.    पार्ल्यातील विठोबाचे एकमेव देऊळ कुठल्या रस्त्यावर आहे? – तेजपाल स्किम नं. 3

श्री. लक्ष्मीदास तेजपाल यांनी 1935 साली तेजपाल स्किम रोड नं 3  येथे विठ्ठल रखुमाई मंदिर बांधले. या मंदिरात एक देवनागरी तर एक गुजराथी शिलालेख कोरलेला आहे. येथे आषाढी एकादशी, कार्तिकी पौर्णिमा, तुळशी विवाह साजरे केले जातात.

9.  हे शिल्प कुठल्या पार्लेकर कलावंताने साकार केले आहे? – गणपतराव काशिनाथ म्हात्रे

शिल्पकलेच्या क्षेत्रात जागतिक किर्ती प्राप्त केलेले गणपतराव म्हात्रे यांनी निर्माण केलेल्या ‘टू द टेंपल’ या असामान्य कलाकृतीने अनेक मानाचे पुरस्कार मिळवले तसेच देशविदेशातील वृत्तपत्रात व जर्नल्समध्ये कला समिक्षकांनी याची विशेष दखल घेतली. राजा रविवर्मा, रवींद्रनाथ टागोर यांनीदेखील  म्हात्रे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. त्यांनी निर्माण केलेले 150पेक्षा अधिक पूर्णाकृती पुतळे भारतभरातील अनेक राजवाडे, म्युझियम्स, उद्यानांची शोभा वाढवत आहेत. ब्रिटिश सरकारने त्यांना ‘रावबहादुर’ ही पदवी दिली. पार्ल्यात पार्लेश्वर मंदिरामागे त्यांचा स्टुडियो होता. हनुमान मार्गावरील दत्तमंदिरातील सुंदर दत्तमूर्तीदेखील म्हात्रे यांनीच साकारली आहे.

10.    छपाई शाई बनविण्याचा पार्ल्यातील पहिला कारखाना कुठला ? – युनायटेड इंक्स

1929च्या काळात स्वदेशीच्या मंत्राचे सर्वत्र गारूड होते. त्यावेळी विनायक गणेश साठये यांनी संपूर्णपणे स्वदेशी व्यवस्थापनाखाली छपाई शाई बनवण्याचा देशातील पहिला कारखाना विलेपार्ल्यात सुभाष रोड येथे स्थापन केला. शरद व मधुसूदन ह्या त्यांच्या दोन्ही मुलांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व्यवसायाचा विस्तार केला. जागेची वाढती गरज लक्षात घेऊन 2000 साली हा कारखाना तळोजा येथे स्थलांतरित करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s