‘कोण आहे अस्सल पार्लेकर’? जुलै महिन्याचे उत्तरे

जुलै महिन्याचे ‘अस्सल पार्लेकर’ (विजेत्यांची नावे)

शालिमा सुशिल वालावलकर, वसंत पांडुरंग म्हात्रे

1.     सध्या अगरवाल मार्केट जिथे आहे तेथे पूर्वी एक आलिशान बंगला होता. त्याचे नाव काय? – मोर बंगला

1904 साली शेठ गोवर्धनदास तेजपाल यांनी हा प्रासादतुल्य बंगला बांधला.चार एकराच्या भव्य परिसरातील या आवारात विस्तिर्ण बगीचा, पवनचक्की, गोशाळा व पोहोण्याचा तलावदेखील होता. हा बंगला बांधायला सुमारे पाच वर्षेलागली. त्याच्या शिखरावर असलेल्या पत्र्याच्या दिशादर्शक भव्य मोरामुळे याला ‘मोर बंगला’ हे नाव पडले. स्वातंत्र्यसंग्रामातील पार्ल्यातील सर्व मोठया सभा याच बंगल्याच्या आवारात होत.

2.    वामन मंगेश दुभाषी मैदानात कुठल्या खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या जातात?

– कबड्डी

1995 पासून वामन मंगेश दुभाषी मैदानावर कबड्डीच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या जातात. पार्ल्यातील गजानन क्रीडा मंडळातर्फे आजपर्यंत 11 वेळा या स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. यात राज्यभरातून सुमारे 30-32 संघ सहभागी होतात.

3.    पार्ल्यातील सर्वात जूने देवालय कुठले?

–  पतितपावन राम मंदिर-बामणवाडा

बामणवाडा येथील पतितपावन राममंदिर हे देवालय 1905 साली एका रामदासी साधूने बांधले. या पश्चिमाभिमुख मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. हे पार्ल्यातील पहिले मंदिर.

4.    पार्ल्यात सुरू झालेली पहिली बँक कोणती?

–  फर्स्ट सिटीझन बँक

1955च्या सुमारास पार्ल्यात फर्स्ट सिटीझन बँक सुरू झाली. सध्या पार्ल्याच्या मार्केटमध्ये जिथे ‘ट्रेंड सेटर’ दुकान आहे तिथे एका टुमदार घराच्या तळमजल्यावर ही बँक होती. पुढे ती बुडणार अशा वावडया उठल्या, त्यावेळी बँकेच्या बाहेर खातेदारांनी लांबच लांब रांगा लावल्याचे जुन्या पार्लेकरांना स्मरत असेल. नंतर या बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्यात आले.

5.    साठये कॉलेजच्या पहिल्या प्राचार्यांचे नाव काय?

– प्रा. चिंतामण बळवंत जोशी

1959 साली पार्ले टिळक विद्यालयात सुरू झालेले पार्लेकॉलेज 1960 साली सध्याच्या इमारतीत हलवण्यात आले. प्रा. चिंतामण बळवंत जोशी हे या कॉलेजचे पहिले प्राचार्य. त्याआधी 1952 पासून 1959 पर्यंत ते रुपारेल कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांच्या कारकीर्दीत महाविद्यालयाचा दर्जा व प्रगती शिखरावर गेली.

6.    पार्ल्यात वास्तव्य असणाऱ्या महाराष्ट्रातील प्रथम नगरसेविका कोण?

– श्रीमती रमाबाई चेंबूरकर

सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रमाबाई माधवराव चेंबूरकर यांनी 1935 पासून लोकमान्य सेवा संघाच्या अनेक शाखांसाठी कार्य केले. सोशन सर्वीस लीगमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केले. स्त्रियांसाठी विनामूल्य शिवणकाम, भरतकाम, हिंदी भाषा वर्ग चालवले. 1938 पासून सतत 15 वर्षेत्या महानगरपालिकेच्या निवडणूकांमध्ये निवडून येत होत्या.

7.    पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले आयुर्वेदिक डॉक्टर कोण?

– डॉ.सुरेशचंद्र चतुर्वेदी

डॉ. सुरेश चतुर्वेदी हे 1951 पासून पार्ल्यात आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहेत. त्यांची आरोग्यशास्त्रावरील 25 पुस्तके प्रसिध्द आहेत. एड्स, कॅन्सर, डायबेटीस, स्थूलता, हृदयरोग यावरील संशोधनाला मान्यता मिळून त्यांना 2000 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री सन्मान बहाल करण्यात आला.

8.    लंडनच्या आर्ट गॅलरीत असलेल्या ‘डिव्होशन’या 18 फुटी चित्राचे पार्लेकर चित्रकार कोण?

– कृष्णराव केतकर

होतकरू विद्यार्थ्यांसाठी 1915 साली मुंबईत स्थापन झालेल्या ‘केतकर आर्ट इंस्टिटयुट’चे संस्थापक केतकर मास्तर म्हणजेच कृष्णराव केतकर. त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून आर्ट मास्टर पदवी घेतली व प्रतिष्ठेच्या मेयो सुवर्णपदकासह अनेक बक्षिसे मिळवली. लॅण्ड्स्केपस व पोर्ट्रेट्स मध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते. 1933 पासून पार्ल्यात ‘कलामंदिर’ मध्ये त्यांचे वास्तव्य होते. नंतर त्या रस्त्याचे ‘चित्रकार केतकर मार्ग’ असे नामकरण करण्यात आले.

9.  पार्ले टिळक विद्यालयाच्या मैदानावर चित्रीकरण झालेला मराठी सिनेमा कुठला?

– वीर सावरकर

16 नोव्हेंबर 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वीर सावरकर’ ह्या सिनेमाची निर्मिती ‘सावरकर दर्शन प्रतिष्ठान’ या संस्थेने सुप्रसिध्द संगीतकार सुधीर फडके यांच्या अध्यक्षतेखाली केली. जनसामान्यांच्या देणग्यांमधून तयार झालेल्या या सिनेमातील सावरकरांच्या एका सभेचे चित्रीकरण पार्लेटिळक शाळेच्या मैदानावर झाले होते.

10. हे व्यंगचित्र कुठल्या पार्लेकर कलावंताने चितारले आहे?

गेल्या महिन्यातील ‘कोण आहे अस्सल पार्लेकर’मध्ये ‘हे व्यंगचित्र कुठल्या पार्लेकर कलावंताचे आहे?’ या दहाव्या प्रश्नाबरोबरचे चित्र काही तांत्रिक बिघाडामुळे छापले गेले नाही. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

हाच प्रश्न पुन्हा या महिन्याच्या प्रश्नावलीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s