राखीव उद्यानाच्या कल्पनेला पार्लेकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा

काही कारणाने गेल्या महिन्यातील लेख ज्यांच्या वाचनात आला नसेल अशांसाठी थोडक्यात परामर्श-

मालवीय रोडवरील दीपा बिल्डिंगसमोरील मोकळा भूखंड आता महापालिकेच्या ताब्यात असून तो उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या जागेवर शारीरिक किंवा मानसिक दृष्टया विकलांग मुलांना खेळण्यासाठी एक स्वतंत्र उद्यान/क्रिडांगण उभारण्यात यावे अशी संकल्पना यात मांडण्यात आली. सर्वसामान्य मुले ज्या मैदानांत किंवा उद्यानांमध्ये खेळतात तिथे ही मुले मोकळेपणाने, सुरक्षितपणेखेळू शकत नाहीत. अशा ‘स्पेशल’ मुलांना मनमुराद बागडण्यासाठी उपनगरांमध्ये तर सोडाच पण संपूर्ण मुंबईत एकही उद्यान नाही.

त्यामुळे अशा प्रकारचे राखीव उद्यान पार्ल्यात सुरू करण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे. पार्ल्याच्या लोकप्रतिनिधींनीदेखील या संधीचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा.

या भूखंडाच्या आजूबाजूचा परिसर जर बघितला तर त्यात साठये उद्यान, डॉ. हेडगेवार मैदान, वामन मंगेश दुभाषी मैदान अशा मोकळया जागांचा पार्ल्यातील मुले आणि ज्येष्ठ नागरिक उत्तम प्रकारे उपयोग करताना दिसतात. त्यामुळे या भूखंडावर पुन्हा सर्वसामान्यांसाठी उद्यान उभारण्यापेक्षा विकलांग मुलांसाठी असे एखादे वैशिष्टयपूर्ण, सर्व विशेष सोयींनी युक्त उद्यानच व्हायला हवे.

अशा मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या अनेक शाळा पार्लेपरिसरात आहेत. या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, मार्गदर्शक, मुलांचे पालक अशा सर्वांनीच या कल्पनेचे स्वागत केले.

– x –x-x-

गेल्या महिन्याच्या ‘आम्ही पार्लेकर’मध्ये मालवीय मार्गावरील भूखंडावर ‘स्पेशल’ मुलांसाठी राखीव उद्यान उभारण्यात यावे अशी कल्पना माडण्यात आली  आणि उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला. सर्वच माध्यमांमधून म्हणजे फोन, पत्र, इमेल, फेसबुक, एसएमएस आणि प्रत्यक्ष भेटून अनेकजण या उपक्रमाला जोरदार पाठिंबा दर्शवत आहेत.

दिशा कर्णबधीर विद्यालय, उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालय, कलबाग अपंग पुनर्वसन केंद्र, आशियाना इन्स्टीटयूट ऑफ ऑटिझम, कुमुदबेन द्वारकादास व्होरा इंडस्ट्रीअल होम फॉर ब्लाईंड वुमन, आनंदी  हाफवे होम फॉर मेंटली चॅलेन्जड ऍण्ड ऑटिस्टीक चिल्ड्रन अशा पार्लेपरिसरातील शाळांमधील शिक्षकांनी व पालकांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवणारी निवेदने ‘आम्ही पार्लेकर’कडे सादर केली आहेत. यातील विशेष उल्लेखनीय निवेदन आहे, उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालयाच्या 31 विद्यार्थ्यांचे.

लोकमान्य सेवा संघाने या विषयासंदर्भात महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे एक निवेदन सादर करून उद्यानाचे आधुनिकीकरण, व्यवस्थापन आणि देखभाल याचा भार उचलण्याची तयारी दाखवली आहे. पार्ल्यातील इतर संस्थांनीही अशाच प्रकारचा पुढाकार घेऊन हा प्रकल्प तडीस नेण्यासाठी हातभार लावणे गरजेचे आहे.

उद्यानासाठी राखीव असलेल्या महापालिकेच्या या भूखंडावर जर विकलांगांसाठी असा विशेष प्रकल्प उभारला जायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी यासंबंधीचा ठराव पालिकेत मांडून तो मंजूर करून घेणे गरजेचे आहे आणि पार्ल्याचे लोकप्रतिनिधी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतील याची आम्हाला खात्री आहे.

या विषयावरील पुढल्या सर्व घडामोडी ‘आम्ही पार्लेकर’  वेळोवेळी वाचकांसमोर आणेलच.

काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया-

”आमच्या मुलांना चालणे हा मुख्य शारीरिक व्यायाम गरजेचा असतो स्वत:चा तोल सांभाळून सरळ रेषेत चालणे त्यांच्यासाठी सोपे नसते पण गरजेचे असते. सार्वजनिक ठिकाणी, गर्दीमुळे त्यांना नेणे कठीण होते. तसेच सर्व विकलांग मुलांच्या हालचाली संथ असतात त्यामुळे सार्वजनिक बागांमध्ये सामान्य मुलांशी स्पर्धा करून झोपाळा व घसरगुंडी मिळवणे त्यांना शक्य होत नाही व ती खेळाचा आनंद लुटू शकत नाहीत. त्यामुळे अशी बाग ही त्यांच्यासाठी फारच मोठी आनंदाची ठेव होऊ शकेल. – डॉ. अच्युत गोडबोले (संगणक तज्ज्ञ, लेखक)

या जागेवर राखीव उद्यान उभारण्याची कल्पना उत्तम आहे. या प्रश्नाचा पाठपुरावा करणाऱ्या ‘आम्ही पार्लेकर’चे प्रथमत: अभिनंदन.

या कल्पनेशी मी पूर्णपणे सहमत आहे. मानसिक व शारीरिकदृष्टया विकलांग मुलांमध्ये अंध, अपंग, मूकबधीर, मतिमंद, ऑटिस्टिक अशा अनेक प्रकारच्या मुलांचा समावेश होतो. या स्पेशल मुलांच्या गरजादेखील वेगवेगळया असतात, स्वतंत्रपणे हिंडणे, खेळणे अनेकदा कठीण असते.  या सर्व बाबींचा विचार उद्यान उभारताना करणे आवश्यक आहे.

हा परिसर पुरेसा प्रशस्त आहे त्यामुळे शक्य असल्याच या जागी एक लहानसे कौन्सेलिंग सेंटर सुरू करता आले तर त्याचा मुलांना व पालकांना खूप चांगला उपयोग होऊ शकतो. – डॉ.स्ेहलता देशमुख, माजी कुलगुरू

ही कल्पना मनापासून आवडली. अशा मुलांच्या गरजांचा संपूर्ण विचार मात्र व्हायला हवा. विशेषत: पावसाळयातदेखील ह्या जागेचा कसा उपयोग करून घेता येईल यासंबधी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. माझ्या मते या जागेवर काही छोटया खोल्या किंवा हॉल बांधला तर तिथे काही ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग सुरु करता येईल. याशिवाय या उद्यानात जर शाळेप्रमाणेच प्रशिक्षित माणसं नेमता आली तर  या मुलांच्या पालकांनाही थोडा मोकळा वेळ मिळू शकेल. विकलांग मुलांच्या गरजांचा विचार करताना त्यांच्या पालकांचाही विचार करता आला तर बरे होईल. – डॉ.माधवी पेठे, प्राचार्या – म.ल.डहाणूकर कॉलेज

पालिकेच्या भूखंडावर जर विकलांग मुलांसाठी राखीव उद्यान सुरू झाले तर ती निश्चितच एक चांगली आणि अभिमानास्पद बाब होईल. या मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शालेय शिक्षणाबरोबरच खेळाचीही आवश्यकता आहे. त्यांना सर्वसामान्य मुलांप्रमाणेच इतर सुविधा उपलब्ध करून द्यायलाच हव्यात. पार्ल्यातील अनेक संस्था अशा कामासाठी पुढाकार घेतील असा मला विश्वास आहे. या संबंधीचा ठराव पालिकेत मांडला जाईलच पण त्यासाठी काही विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते आणि त्यासाठी काही कालावधी लागेल याची आपण सर्वांनी नोंद घेणे आवश्यक आहे. मी हा ठराव पालिकेच्या सभागृहात मांडीन व तो मंजूर करूनघेण्यासाठी निश्वितच प्रयत्न करीन. – ज्योती अळवणी, स्थानिक नगरसेविका (वॉर्ड क्र.80)

मला ही बातमी वाचून अतिशय आनंद  झाला. स्पेशल मुलांसाठी शाळा असते परंतु अशा मुलांसाठी बाग,नाचण्या बागडण्यासाठी उद्यान अथवा क्रीडांगण असावे ही कल्पना  स्तुत्य आहे. – डॉ.राजेंद्र बर्वे (मानसोपचार तज्ज्ञ)

ही कल्पना अतिशय नाविन्यपूर्ण आहे. अपंग मुलांसाठी अशा उद्यानाचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. फक्त मनात आले की एवढा मोठा प्रकल्प उभारायचा तर त्यासाठी प्रचंड खर्च येईल. तो कसा उभा राहिल? प्रवेशशुल्क आकारले जाईल का? त्याची देखभाल करण्याची जबाबदारी कोण घेईल? वगैरे.

पण कल्पना खूपच चांगली आहे. ती नेटाने पूर्णत्वास न्यायला हवी. – अनुराधा गोरे, शिक्षणतज्ञ.

राखीव उद्यानाची संकल्पना चांगलीच आहे आणि निश्चितच गरजेची आहे. अनेक सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पार्ल्यात जर शारीरिक व मानसिक दृष्या विकलांग मुलांसाठी असे सर्व सोईंनी युक्त उद्यान आकाराला आले तर ते अतिशय भूषणावह ठरेल. – डॉ. कविता रेगे, प्राचार्या – साठये कॉलेज

ह्या उपक्रमाबाबत दुमत असण्याचा प्रश्नच नाही. अशा मुलांचे आपण काही देणे लागतो या भावनेतून हे साकारायला हवे. मात्र हे उद्यान उभारताना त्या त्या विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या जागेचा प्रत्येक कोपरा सुरक्षित आणि सोयीसुविधांनी युक्त होईल. संपूर्ण देशातील हे प्रथम उदाहरण होऊ शकेल. – डॉ.शशीकांत वैद्य बालरोग तज्ज्ञ

‘आम्ही पार्लेकर’ ने मांडलेली ही कल्पना ‘स्पेशल’ मुलांच्या जडणघडणीसाठी खूप महत्त्वाची आहे. अशा प्रकारचे राखीव उद्यान उभारण्यासाठी पार्ल्यातील सुसंस्कृत समाजाने पुढाकार घेणे स्वाभाविकच आहे. या प्रकल्पाला माझ्या शुभेच्छा!  – सचिन खेडेकर अभिनेता

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s