मालवीय रस्त्यावरील भूखंड

विकलांगांसाठी राखीव उद्यान साकारण्याची सुवर्णसंधी

  • सुमारे 1200 चौ.मी.चा भूखंड आता महानगरपालिकेच्या ताब्यात.
  • उद्यानासाठी राखीव.
  • पार्ले परिसरात विकलांगांसाठी अनेक शाळा/संस्था.
  • ‘राखीव जागा ही आमच्या विद्यार्थ्यांची मूलभूत गरज’ – या शाळांच्या पदाधिकाऱ्यांचे आग्रही मत.
  • मुंबईत अशा प्रकारचे राखीव मैदान/उद्यान एकही नाही.
  • सर्वसामान्यांसाठी पार्ले परिसरात अनेक मैदाने/उद्याने उपलब्ध.

Free Municipal Plot on Malviya Road

गेल्या महिन्यात ‘आम्ही पार्लेकर’ने मालवीय मार्गावरील वादग्रस्त भूखंड (अंदाजे 1200 चौरस मीटर) आता महापालिकेच्या ताब्यात आल्याची बातमी प्रसिध्द केली होती.  दीपा बिल्डिंगसमोर असलेला हा भूखंड गेल्या अनेक वर्षांपासून एका बिल्डरच्या ताब्यात होता. माजी नगरसेवक चंद्रकांत पवार यांच्या पुढाकाराने बाबा कुलकर्णी, शंकर जाधव, माजी नगरसेविका मंगलाताई जोशी व इतर अनेकांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि तो भूखंड आता महापालिकेच्या उद्यानासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

ही बातमी वाचल्यावर पार्ल्यातील ज्येष्ठ नागरिक यशवंत जोशी यांनी ‘या जागेवर मूकबधीर व अपंग मुलांसाठी स्वतंत्र मैदान उभारावे’  अशी एक अभिनव कल्पना मांडली. ही कल्पना निश्वितच स्वागतार्ह आहे. सर्वसामान्य मुले ज्या मैदानांत किंवा बगिच्यांमध्ये खेळतात तिथे ही मुले मोकळेपणाने, सुरक्षितपणे खेळू शकत नाहीत. जी गरज शारीरिक दृष्टया विकलांग मुलांची तीच, किंबहुना जास्त गरज मानसिक दृष्टया कमकुवत मुलांची असू शकते.  अधिक चौकशी केली असता असेही कळले की अशा ‘स्पेशल’ मुलांना मोकळा श्वास घेण्यासाठी, मनमुराद बागडण्यासाठी उपनगरांमध्ये तर सोडाच पण संपूर्ण मुंबईत एकही उद्यान नाही.

एकंदरीतच भारतात कुठेही रस्ते, उद्याने, स्टेशन्स, शाळा इ. सार्वजनिक ठिकाणी अपंगांच्या सुविधांचा विचार केलेला आढळत नाही. जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहताना एकूण लोकसंख्येपैकी लक्षणीय वाटा असणाऱ्या अशा नागरिकांच्या सोयीसुविधांबद्दल इतके उदासीन राहून कसे चालेल? खरे तर अशा प्रकारचे राखीव उद्यान पार्ल्यात सुरू करून एक उत्तम पायंडा पाडण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. पार्ल्याच्या लोकप्रतिनिधींनीसुध्दा या संधीचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा. या भूखंडाच्या आजूबाजूचा परिसर जर बघितला तर त्यात साठये उद्यान, डॉ.हेडगेवार मैदान, वामन मंगेश दुभाषी मैदान, नान-नानी पार्क अशा मोकळया जागांचा पार्ल्यातील मुले आणि ज्येष्ठ नागरिक उत्तम प्रकारे उपयोग करताना दिसतात. त्यामुळे या भूखंडावर पुन्हा सर्वसामान्यांसाठी उद्यान उभारण्यापेक्षा विकलांग मुलांसाठी असे एखादे वैशिष्टयपूर्ण, सर्व विशेष सोयींनी युक्त उद्यानच व्हायला हवे.

अशा मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या अनेक शाळा आहेत. तेंव्हा या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, मार्गदर्शक अशा मंडळींशी या विषयावर सविस्तर चर्चा करावी, या मुलांच्या गरजांविषयी अधिक जाणून घ्यावे अशा हेतूने ‘आम्ही पार्लेकर’ने त्यांच्याशी संपर्क साधला.  या सर्वांनी राखीव उद्यानाच्या कल्पनेचे इतक्या उत्फूर्तपणे स्वागत केले की आजपर्यंत ह्या गोष्टीचा विचार का झाला नाही याबद्दल खेद वाटला.

आपण आपल्या गरजांबद्दल, हक्कांबद्दल किती जागरूक असतो! सरकारने हे करायला हवे, पालिकेने ते करायला हवे अशा मागण्या सतत कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मांडल्या जातात. पण या मुलांविषयी आपल्या संवेदना इतक्या बोथट झाल्या आहेत का? मुक्त खेळणे ही सगळयाच मुलांची मूलभूत गरज आहे. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हे खूप गरजेचे आहे. पण अशा वेगळया मुलांसाठी जर कुठली जागाच नसेल तर त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी करायचे काय? सामान्य मुलं ज्या बागेत किंवा मैदानात जातात त्या ठिकाणी गर्दीमध्ये ही मुले भांबावतात, धडपडतात. कधी बघ्यांच्या टिंगलीचाही विषय होतात. मग या मुलांना खेळण्यासाठी राखीव मैदान किंवा बगिचा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी कोणाची?  ही जबाबदारी त्यांच्या पालकांची, शिक्षकांची असूच शकत नाही. समाजानेच त्यांच्यासाठी असे पाऊल उचलायला हवे. आपण पार्लेकरांनी ही संवेदनशीलता दाखवायची नाही तर कुणी दाखवायची? ही मुलं ‘आपली’  आहेत हे भान जागृत असायला हवे आणि एकदा कुणाला आपलं म्हटलं की त्याच्या सुखदु:खाविषयी सहसंवेदना असणे हेही ओघाने आलेच.

ही मुलं कर्णबधीर, अपंग, अंध, गतिमंद, मतिमंद, ऑटिस्टिक वगैरे कुठल्याही प्रकारात मोडणारी असू शकतात आणि त्याप्रमाणे त्यांच्या गरजा बदलतात. उदा. कर्णबधीर मुलांसाठी ठळक साइनबोर्ड्स गरजेचे असतात. अपंगांसाठी व्हिल चेअर्स बागेत सहज फिरू शकतील अशा मोकळया, रुंद मार्गिका आवश्यक असतात. अंधांसाठी कठडयांचा वापर करावा लागतो. नुसत्या फळयांच्या झोपाळयांऐवजी सुरक्षित अशा आरामदायी खुर्चीसारख्या झोपाळयांवर झोके घेण्याचा आनंद मतिमंद मुलं मनमुराद लुटू शकतात. रोजच्या सहवासातून, अनुभवातून अशा अनेक सूचना या मंडळींन कडून समोर आल्या. प्रत्येकाने आपली मते मोठया उत्साहाने आणि आशेने मांडली. त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवणे ही आता आपली जबाबदारी आहे. आता आपण सर्वांनी मिळून या सूचनेला भरघोस पाठींबा द्यायला हवा आणि महापालिकेकडून या प्रस्तावासाठी होकार मिळवायला हवा.

हे काम तडीस नेण्यासाठी स्थानिक नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, समाजातील दानशूर व्यक्ती यांची मदत महत्त्वाची आहे.

चला, मानसिक आणि शारीरिक दृष्टया विकलांग मुलांसाठी राखीव उद्यान असलेले उपनगर अशी एक वैशिष्टयपूर्ण ओळख विलेपार्ल्याला मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊया!

मानसिक व शारीरिक दृष्टया विकलांग मुलांच्या शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, मार्गदर्शक व पालकांच्या प्रतिक्रिया

”आमच्या मुलांना चालणे हा मुख्य शाररीक व्यायाम गरजेचा असतो स्वत:चा तोल संभाळून सरळ रेषेत चालणे त्याच्यासाठी सोपे नसते पण गरजेचे असते सामान्य सार्वजनिक ठिकाणी, गर्दीमुळे त्यांना नेणे कठीण हाते. तसेच एकूण सर्व विकलांग मुलांच्या हालचाली संथ असतात त्यामुळे सार्वजनिक बागामध्ये सामान्य मुलांशी स्पर्धा करून झोपाळा व घसरगुंडी मिळवणे त्यांना शक्य होत नाही व ती खेळाचा आनंद लुटु शकत नाहीत. त्यामुळे अशी बाग ही फारच मोठी आनंदाची ठेव त्यांच्यासाठी होऊ शकेल.”

– आकांक्षा रानडे  (मुख्याध्यापक)   आनंदी  हाफवे होम फॉर मेंटली चॅलेंन्ज्ड ऍण्ड ऑटिस्टीक चिल्ड्रन

”अतिशय गरजेची व सुंदर कल्पना. परदेशात अशा जागेची फार गरज पडत नाही पण आपल्याकडे अजूनही समाज मानसिक व शारीरिक विकलांगांना आपले म्हणत नाही. त्यांचे या मुलांबरोबरचे वर्तन बहुतांशी तुसडे किंवा दया दाखवणारे असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मुलांना नेताना शिक्षकांना-पालकांना खूप त्रास होतो व मुलेही आनंद उपभोगू शकत नाहीत. शिवय अशा मुलांना काही विशेष सोईचीही गरज असते तीही तेथे पुरवता येईल. आमच्याकडून सर्व प्रकारची मदत देण्याची आमची इच्छा आहे.”

-सुहासिनी मालदे (संस्थापक व विश्वस्त) आशियाना इन्स्टिटयूट ऑफ ऑटिझम

”अतिशय अभिनव कल्पना! मुंबईत कोठेही असा बगीचा असल्याचे ऐकिवात नाही. परंतु आमच्या मुलांसाठी फार गरजेचे आहे. मुलांना घेऊन जाण्यासाठी एक सुरक्षित जागा निर्माण होईल. व्यवस्थित अभ्यास करून हा प्रकल्प राबवावा लागेल.”

– रीतू पाटील  (मुख्याध्यापक) आशियाना इन्स्टीटयूट ऑफ ऑटिझम

”’आम्ही पार्लेकर’ने मांडलेली ही कल्पना अतिशय सूज्ञ आहे. अपंग मुलांसाठी अशा प्रकारचा बगीचा फारच मोलाचा ठरेल. मी स्वत: पार्लेकर आहे. पार्ल्यात सर्व प्रकारच्या लोकांसाठी सोई उपलब्ध आहेत. पण विकलांग मुलांसाठी वेगळी राखीव जागा नाही. मुंबई उपनगरातील सर्वात जास्त विशेष मुलांच्या सर्वाधिक शाळा/संस्था पार्ल्यात आहेत. या सर्वांना त्याचा खूप उपयोग होईल.”

– चित्रा देशमुख (मुख्याध्यापक) कुमुदबेन द्वारकादास व्होरा इंडस्ट्रीअल होम फॉर  ब्लाईंड विमेन (लल्लुभाई पार्क, अंधेरी)

”अत्यंत सुरेख कल्पना आहे. शारीरिक व मानसिक विकलांग मुलांसाठी फारच उपयुक्त संकल्पना. बागेत मुलांना चालण्यासाठी, उडया  मारण्यासाठी, सोयी करता येतील. शिवाय वेगवेगळे खेळ निर्माण करता येतील. रोटरी, लायन्स सारख्या संस्थांकडुनही मदत घेता येऊ शकते. मुख्य म्हणजे पार्लेकर सुज्ञ व सुजाण आहेत तेही यासाठी नक्कीच मदत करतील.”

– अजय शुक्ला हायटेक फॅमिली एनरीचमेंट फाऊंडेशन (पार्ले)

मूकबधिर व अपंग मुलांसाठी स्वतंत्र मैदान आवश्यक

मालवीय रोडवर नगर रचना पाचमधील प्लॉट क्रमांक 112 हा मैदान म्हणून राखीव आहे. ह्याचे अंदाजे क्षेत्रफळ 1000 चौरस मिटर आहे. काही स्थानिक समाज कार्यकर्त्याच्या प्रयत्नांमुळे हा प्लॉट गेल्या महिन्यांत महानगरपालिकेने ताब्यात घेतला आहे. आजमितीला विलेपारले पूर्व विभागात मूकबधिर व अपंग मुलांसाठी असलेल्या शाळांमध्ये अनेक विद्यार्थी शिकत आहेत. ह्या शाळांना स्वत:चे कोणतेही मैदान नाही. ह्या मुलांच्या पुढील प्रगतीसाठी, विकासासाठी अशा मोकळया मैदनावर खेळण्याची संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

हे मैदान फक्त अशा प्रकारच्या सर्व अपंग मुलांसाठी उपलब्ध झाल्यास त्यांची तर कायमची सोय होईलच शिवाय अशा प्रकारचे राखीव मैदान हे मुंबई महानगरातील एक वैशिष्टय होईल.

– यशवंत जोशी

”उत्तम कल्पना. हे झालेच पाहिजे. मुलांना याचा फार फायदा होईल. पार्ल्यात सर्व थरातील लोकांसाठी सोयी आहेत. आमच्या या मुलांनाही ही सुविधा मिळाली तर फारच छान. अशी सुविधा असणारे मुंबईतीलच नव्हे तर भारतातील पहिले उपनगर ठरण्याचा मान पार्ल्याला मिळेल.”

– रेखा शिराळी   (मुख्याध्यापक) दिशा कर्णबधीर शाळा

”पार्लेकर सुजाण नागरिक आहेत. त्यांच्यामुळेच आज पार्ल्यात इतक्या विशेष मुलांच्या शाळा कार्यान्वित आहेत. असा प्रकल्प विलेपार्ल्यात व्हावा हेच योग्य. इथले नगरसेवकही याला पाठींबाच देतील. विकलांग मुलांसाठी विचार करून इथे खूप छान सोयी करून घेणे शक्य आहे. भूखंड तसा मोठा आहे. त्यामुळे त्याचा चांगलाच उपयोग होईल.”

– साधना सप्रे  (मुख्याध्यापक) उषा जामनेरकर मूकध्वनी विद्यालय, उत्कर्ष मंडळ

”आमच्या मुलांसाठी अतिशय उत्तम कल्पना. यात एका कोपऱ्यात वाळू खेळायला ठेवली तर मुलांना खूप आनंद होईल. त्याच्या शारीरिक व्यायामासाठीही ते उपयोगी पडेल. ‘आम्ही पार्लेकर’च्या या कल्पनेला आमचा पाठींबाच आहे.”

– अंजली ठोसर (पालक व ट्रस्टी) (कलबाग अपंग पुनर्वसन केंद्र)

”कृपया या कल्पनेला कोणीही विरोध करू नका. ही कल्पना राबवाच. आमच्या व इतर असंख्य मुलांची ही फार मोठी गरज आहे.”

– मोहन रानडे (पालक)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s