युवकांनो, वाचा, विचार करा, कृती करा!

मुंबईच्या पार्ले उपनगरात चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ माझे वास्तव्य आहे. पार्ल्याला येण्याअगोदर राजापूर, सातारा, पुणे, वाई, रत्नागिरी, अहमदाबाद, सांगली, सोलापूर, जळगाव, ठाणे आणि सरते शेवटी मुंबई, अशा अनेक शहरांमध्ये मी राहिलो आहे. या सर्व ठिकाणी प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यानंतर प्राध्यापक, पुढे विद्यार्थी परिषद आणि सामाजिक संस्था, यांच्या माध्यमातून माझा अक्षरश: सहस्त्रावधी युवकांशी संबंध आला. या काळात, आकाशदर्शन, पदभ्रमण, सायकल प्रवास, खेळांचे सामने, विविध स्पर्धा, सूर्यनमस्कार संकल्प, व्यायामशाळा, अभ्यास वर्ग, चर्चासत्र, सांस्कृतिक असे विविध कार्यक्रम मी राबविले. या संबंधात युवकांच्या दृष्टीने आजचे चित्र आशादायक नाही. विषेशत: नेतृत्वगुण असणारे, अभ्यासू, आपल्या विषयाशिवाय देश आणि जग यांच्यामध्ये चालणाऱ्या घडामोडीचे ज्ञान असणारे, वक्तृत्व गाजविणारे, आपल्या परीघाबाहेर दोस्ती करणारे युवक आज अभावानेच आढळतात. करिअर आणि त्यामधून मिळणारा पैसा हेच आयुष्याचे एकमेव ध्येय असेल तर धडपडपणाऱ्या युवकांची फळी उभी राहणे जरा अवघडच आहे. या संबंधात किमान पार्ल्यातील युवकांशी हितगुज करावे असा विचार आहे. हे हितगुज म्हणजे उपदेश नसून सूचना आहेत ही गोष्ट लक्षात ठेवावी. त्यासाठी विद्यार्थीदशेतील आणि नोकरी करणारे असे सर्व युवक माझ्या डोळयांसमोर आहेत.  या सूचना म्हणजे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडा पाषाण’, असा प्रकार नाही.  त्या त्या सूचनेच्या संबंधात मी स्वत: काय केले याचा जरूर उल्लेख करीन.

व्यायामाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास 

समाजात अग्रस्थानी यायचे असेल तर शरीरप्रकृती सुदृढ हवी. त्यासाठी दररोज प्रचंड मेहनत केली पाहिजे असे नाही. दररोज नमस्कार, योगासने व प्राणायाम एवढा व्यायाम पुरेसा आहे. मात्र मी स्वत: कॉलेजमध्ये असतानाच शतकांच्या संख्येत दंड, बैठका आणि नमस्कार घातले आहे. याशिवाय कुस्ती, डबलबार, सिंगलबार आणि वेट लिफ्टिंग हे व्यायाम प्रकार चोखाळले आहेत.  व्यायामामुळे दिवसभर शरीर उत्साही राहते. तुमच्या नुसत्या शारीरिक हालचालीतून समवयस्क युवक तुमच्याकडे आकृष्ट होतात.  नमस्कार हा भारतीय व्यायाम प्रकार इतका विलक्षण आहे की त्याचा परिणाम म्हणून सर्व प्रकारचे रोग तुमच्यापासून दूर पळून जातील.  आज पाश्चात्य देशातही या व्यायाम प्रकाराने लोकांना भुरळ घातली आहे. जर्मनीमध्ये ‘स्योनेन ग्रुस’ आणि ‘सन सॅल्युटेशन’ या नावाने हा व्यायाम प्रसिध्द आहे. तेथील महिलांनीही नमस्काराचा व्यायाम आत्मसात केला आहे. दररोज नमस्काराचा व्यायाम घेतलात तर एक वेगळेच व्यक्तित्व तुम्हाला प्राप्त होईल. सदा सर्वकाळ तुम्ही उत्साही राहाल. नमस्कार केवळ मुलांनीच घालावेत असे नाही. मुलींनीही अवश्य नमस्कार घालावेत. आज वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी मी दररोज 25 नमस्कार घालतो.  हा लेख वाचल्यानंतर निश्चय करा की दिवसात किमान सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यनमस्काराचा व्यायाम करणारच. काही महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वात बदल झाल्याचे तुमच्या लक्षात येईल.

मनोरंजनावर नियंत्रण

आज सारा महाराष्ट्र मनोरंजनात आकंठ बुडाला आहे. सामाजिक संस्था, कट्टे, दूरदर्शन, नाटयगृहे, चित्रपटगृहे सर्वत्र मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल आहे. शिवाय विविध सीरीअल्स, नटनटयांच्या मुलाखती, विनोदी कार्यक्रम यांचीही एकच गर्दी उडाली आहे. मनोरंजन या एकाच गोष्टीने आपले जीवन इतके व्यापून टाकले आहे की त्यामध्ये आपण आयुष्यातील किती अमूल्य वेळ बरबाद करतो याचे भान आपल्याला राहत नाही.  दूरदर्शनवरील सिरीअल्स पहात असताना आपण आपला मेंदू गहाण टाकतो, आपली विचार शक्ती आणि सर्जनशीलता नष्ट होते, ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. कार्यक्रमांच्या मध्यात सातत्याने होणारा जाहिरातींचा भडिमार तुमचे आयुष्य लुबाडत आहे, हे ध्यानात घ्या. चित्रपटात दाखविल्या जाणाऱ्या भीषण हाणमाऱ्या, बीभत्स नृत्ये, अचरट विनोद, तुमचे आयुष्य कुरतडून टाकीत असतात. दैनंदिन जीवनात जे अशक्य आहे तेच चित्रपटांमधून शक्य असल्याचे भासविण्यात येते. यालाच फसवणूक असे दुसरे नाव आहे.  एकदोन अपवाद सोडले तर मी स्वत:1958 सालापासून एकही हिंदी व मराठी चित्रपट पाहिलेला नाही.  त्यामुळे माझे काडीचेही नुकसान झाले नाही.

तुमच्या गप्पांमध्येही नट, नटया, क्रिकेट, सिरीअल्स मधीलप्रसंग यासारखेच विषय असतात. क्रिकेट हा आता खेळ राहिलेला नाही. कोटयावधी रूपयांची उलाढाल असणारा तो एक धंदा झाला आहे. नट, नटया आणि क्रिकेटपटू याना देवत्व देऊ नका. वरील सर्व गोष्टींवर कठोर नियंत्रण ठेवाल तरच आयुष्यात काही तरी करू शकाल अन्यथा करमणुकीत फसाल. ‘सारखा टीव्ही पहाल तर निर्बुध्द व्हाल’. अशी एक नवीन म्हण या संबंधात तयार केली आहे.  दिवसातील किती वेळ मनोरंजनात खर्च करायचा याचा सर्व युवकांनी गंभीरपणे विचार करावा.

इंटरनेटचा सदुपयोग

अद्ययावत माहिती हस्तगत करण्यासाठी इंटरनेट हे उत्तम साधन आहे.  ‘कल्पवृक्ष’ अशी मी ‘इंटरनेट’ला उपमा दिली आहे. मागाल ती माहिती तुम्हाला इंटरनेट देईल. एखादा संदर्भ पाहिजे असला की मी इंटरनेटकडे धाव घेतो.  लेख, ग्रंथ, वक्तृत्व यांच्या तयारीसाठी इंटरनेट इतके उपयुक्त साधन दुसरे नाही  विज्ञानांच्या सर्व विषयांची उत्तमोत्तम माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.  एवढेच काय अनेक दुर्मिळ ग्रंथ इंटरनेटवरुन विनाशुल्क ‘डाउनलोड’ करता येतात. आता तुमच्या भ्रमणध्वनीवरही इंटरनेट स्थानापन्न झाले आहे.

काही विघ्नसंतोषी लोक तुमच्या इ-मेलवर ताबा मिळवितात. इंटरनेटद्वारे निरनिराळे व्हायरस सोडून तुमच्या संगणकावरील माहिती विकृत करतात. इंटरनेट नावाच्या कल्पवृक्षाचे विषवृक्षात रूपांतर करण्यात ही मंडळी तरबेज असतात. तुम्हीही हळू हळू त्यामध्ये ओढले जाता. ‘चॅटिंग, निरुद्देश सर्फिंग, ऍप्स, फेसबुक, व्टिटर’ वगैरे गोष्टी तुमच्यावर भुरळ टाकतात यु-टयुब वरील व्हिडीयो क्लिप्समध्ये तुम्ही रंगून जाता. फेसबुकवर तास न तास वेळ दवडणारे लक्षावधी युवक आहेत. त्या माध्यमातून फसवणूक, गुन्हेगारी, अपहरण अशा घटना वाढत चालल्या आहेत. आता त्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे, विशेषत: युवतींसाठी फेसबुकवरील मैत्री धोकादायक ठरत चालली आहे. ‘इंटरनेट’चा ज्ञान हस्तगत करण्यासाठी उपयोग करण्याऐवजी दिवसेंदिवस तरुण वर्ग ‘इंटरनेट’चा गुलाम बनत चालला आहे. केवळ ज्ञान मिळवण्यासाठीच ‘इंटरनेट’चा उपयोग करीन असा कृतनिश्चय केलात तरच इंटरनेटच्या कचाटयातून तुमची सुटका होऊ शकेल.

जी गोष्ट इंटरनेटची तीन भ्रमणध्वनीची. आज भ्रमणध्वनीचे विविध प्रकार बाजारात आले आहेत. स्मार्टफोन, आयपॅड, टच स्क्रीन मोबाइल्स यांनी बाजारपेठा भरल्या आहेत. रस्त्यावरून चालणाऱ्यांच्या कानावरील मोबाइलवरून सातत्याने संभाषण चालू असते, त्याचा परिणाम म्हणून गंभीर अपघातही झाले आहेत. बसेस, लोकल ट्रेन्स, उपहारगृहे यामध्ये आपल्या भ्रमणध्वनीवर बोटे फिरवित किंवा गेम खेळत वेळेचा चुरा करणारी असंख्य मंडळी आपले देहभान विसरत असतात.  वेळेच्या या अपव्ययाला आळा घालणे आवश्यक आहे.

वाचाल तर वाचाल!

‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ असे समर्थ रामदासांचे वचन आहे. स्वत:ला अद्ययावत ठेवायचे असेल तर दररोज वृत्तपत्र वाचलेच पाहिजे. आपल्या नेहमीच्या विषयाशिवाय एखादा आवडीचा विषय निवडून त्या विषयावरील पुस्तके, लेख वाचत राहिलात तर तुमच्या विचारांचा आवाका वाढेल. पुढे तुम्ही त्या विषयावर अधिकारवाणीने बोलू शकाल. नुसते वाचन करूनही उपयोग नाही. तुमच्या आवडीच्या विषयावर लिहित रहा. ते प्रसिध्द करण्याचा प्रयत्न करा. त्या विषयावर वक्तृत्व गाजवा, वक्तृत्वासाठी पाठांतर आवश्यक आहे. पाठांतर म्हणजे ‘रोट लर्निग’ नाही. वक्तृत्वामध्ये संस्कृत सुभाषितांचा उत्तम उपयोग करता येतो. त्यांचे पाठांतर अवश्य करा. त्यामुळे तुमची स्मरणशक्तीही विकसित होईल. मुद्देसूद लेखन करण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. एखाद्या विषयाचा पिच्छा पुरवावा लागतो. संदर्भ शोधावे लागतात. क्वचित वेळा लेखन पुन्हा पुन्हा करावे लागते, मी स्वत: आजपर्यंत साठ ग्रंथांचे लेखन केले आहे.  त्या सर्वांची मिळून छापील 9.5 हजार पृष्ठे होतात.  समाजात मान्यता मिळवण्यासाठी ग्रंथ लेखन हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.

भटकंती करण्यासाठी मुंबईबाहेर चला!

वेळ मिळाला की दुर्गदर्शन आणि पदभ्रमण करण्यासाठी अवश्य मुंबईबाहेर जा.  महाराष्ट्रातील किल्ले ही आपल्यासाठी दैवी देणगी आहे. जाताना त्या दुर्गाचा इतिहास डोळयाखालून घाला. दुर्गाशिवाय महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक स्थळेही आहेत. आपल्या उपक्रमात मित्र मैत्रिणींना सहभागी करून घ्या. त्यातूनच तुमचे नेतृत्व विकसित होत जाईल. इतरांबरोबर कसे वागले पाहिजे, एकमेकांना कशा प्रकारे मदत केली पाहिजे, मार्गात निर्माण होणारी विघ्ने आणि अडचणी यांना कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे याचे आपोआप शिक्षण तुम्हाला प्राप्त होईल. अशाच प्रसंगातून व्यक्तिमत्व घडत जाते. त्यासाठी कोणताही क्लास लावण्याची आवश्यकता नाही.  शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले दुर्ग ही स्फूर्तीस्थाने आहेत.  मी स्वत: दशकांच्या संखेत किल्ले पाहिले आहेत. काही किल्लयांवर अभ्यासवर्ग आयोजित केले आहेत.  कै. गो. नी. दांडेकर. श्री. बाबासाहेब पुरंदरे, श्री. निनाद बेडेकर यांच्यासारख्या महान इतिहास अभ्यासकांबरोबर दुर्ग दर्शनाचा आनंद घेण्याचे भाग्य मला आणि माझ्याबरोबर असणाऱ्या शेकडो युवकांना मिळाले आहे. रायगडावरील शिवरायांचे सिंहासन ते त्यांची समाधी या मार्गावरील तीनशे लोकांची मूक मिरवणूक अजूनही माझ्या मनात ताजी आहे.

आकाशदर्शन हा आणखी एक असा कार्यक्रम आहे की ज्याच्या माध्यमातून तुमचा शेकडो तरुणांशी संपर्क येऊ शकतो.

देवांच्या मदतीस चला तर!

आज महाराष्ट्रातील अनेक खेडयापाडयात आणि लहान गावांमध्ये सरकारी मदत न घेता, सर्वस्व पणाला लावून निरलस आणि निरपेक्ष बुध्दीने कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ति आहेत. आश्रम शाळा, वसतिगृहे, विद्यालये, वैद्यकीय मदत, महिला सबलीकरण, विज्ञान केंद्रे, असे विविध प्रकारचे त्यांच्या कार्याचे स्वरूप आहे. सर्वस्व झोकून समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती म्हणजे वर्तमान कलियुगातील देव आहेत. त्यांना युवकांच्या सहकार्याची जरूर आहे. केव्हातरी वेळ काढून त्यांचे कार्य पहा, त्यांना कशाप्रकारे मदत करता येईल ते जाणून घ्या. या संबंधात वॉरन बफेट आणि बिल गेटस् या व्यक्तींचे आदर्श आहेत.  त्यांनी आपल्या संपत्तीचा ओघ जनहितासाठी काम करण्याऱ्यांकडे वळविला आहे. जनसेवेसाठी जे कंबर कसून उभे आहेत त्यांना तन, मन, धन, स्वरुपात जेवढी मदत करणे शक्य आहे तेवढी मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.

काही मननीय विचार

व्यक्तिच्या जीवनाचे उद्दिष्ट काय हवे ?  त्यासाठी त्याने काय केले पाहिजे?  समाजात कशा प्रकारे वागले पाहिजे? या संबंधात संस्कृत वाङमयात शेकडो सुभाषिते आहे. त्यातील दोन निवडक सुभाषितांचे भाषांतर, पुढे देत आहे.

जो झोपतो त्याचे भाग्यही झोपून जाते.

जो बसतो त्याचे भाग्यही बसून रहाते

जो उठून उभा राहतो त्याचे भाग्यही उभे राहते.

जो चालतो त्याचे भाग्यही चालू लागते.

चालत रहा! चालत रहा!

– ऐतरेय ब्राह्मण

जो पर्यंत शरीर निरोगी आहे,

जो पर्यंत वृध्दत्व दूर आहे,

जो पर्यंत इंद्रिये कार्यक्षम आहेत,

जो पर्यंत मृत्यू येत नाही,

तो पर्यंत सूज्ञ व्यक्तीने

स्वत:ला श्रेयस्कर असलेले कार्य

महत प्रयत्नाने केले पाहिजे.

घराला आग लागल्यावर

विहीर खणण्यात काय अर्थ आहे

– भर्तृहरी : वैराग्य शतक

वाचा, विचार करा आणि कृती करा !

आपण काय करु शकता ?

 • पुढील कार्यांसाठी ‘घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे’ युवक हवे आहेत.
 • महाराष्ट्रातील दुर्गांची ऐतिहासिक माहिती देणारे
 • आकाशदर्शन घडविणारे
 • विज्ञान विषयांवर भाषण देऊ शकणारे
 • कार्यक्रमांचे संचालन करणारे
 • कार्यक्रमांची आखणी करुन तडीस नेणारे
 • विविध विषयांवर स्पर्धाचे आयोजन करणारे
 • अभ्यासवर्गांची आखणी करुन नियोजन करणारे
 • गुढीपाडवा स्फुर्तीयात्रेतील जबाबदाऱ्या स्वीकारणारे
 • प्राचीन भारतीय ज्ञान संपदेचा अभ्यास करणारे
 • गणित चक्रचूडामणी भास्कराचार्य यांच्या कार्यावर बोलणारे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s