आम्ही ‘मालिक’ की ‘स्वामी’ ?

27 फेब्रूवारी हा कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन मराठी राजभाषा दिन म्हणून तर दि.26फेब्रूवारी हा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या शेकडो इंग्रजी, उर्दू भाषेतील शब्दांना स्वा.सावरकरांनी समर्पक प्रतिशब्द सुचवून मराठी भाषा अधिक समृध्द केली. त्यानिमित्त हा विशेष लेख.

स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांची रत्नागिरीतील 13 वर्षांच्या स्थानबध्दतेतून मुक्तता झाल्यावर ते मुंबईकडे यावयास निघाले. वाटेत कोल्हापुरात हंस सिनेटोन ह्या बाबुराव पेंढारकरांच्या चित्रपट संस्थेने त्यांचा सत्कार केला. पेंढारकरांचे ते चित्रपट मंदिर म्हणजे स्टुडिओ बघताना ठिकठिकाणी लावलेल्या ‘डायरेक्टर’ इत्यादी पदनामांच्या इंग्रजी पाटया बघून सावरकर अस्वस्थ झाले. त्यांनी तेथल्या तेथे  ‘डायरेक्टर’ ला ‘दिग्दर्शक’ असे प्रत्येक पदनामाला मराठी पर्याय सुचवून ते वापरण्याचा आग्रह धरला. पेंढारकरांनी ते सर्व लिहून काढले. त्याच्या प्रती काढल्या आणि भारतातील सर्व चित्रपट संस्थांना विचारार्थ पाठवून दिल्या. सुखद धक्का म्हणजे सावरकरी शब्दांचा तात्काळ सानंद स्वीकार झाला. आज चित्रपट बघतांना श्रेयनामावलीत जी संस्कृतनिष्ठ सुंदर पदनामे आपणास वाचावयास मिळतात त्यामागे सावरकरांची निर्मिती आणि प्रेरणा आहे. सावरकर हे सर्वंकष क्रांतिकारक होते आणि भाषाशुध्दी हा त्यांच्या दृष्टीने राष्ट्रीय पुनरुत्थानाचा भाग होता .

दुसरे असेच नित्य परिचयाचे उदाहरण घेऊ. हिंदुमहासभेचे गणपतराव नलावडे पुणे महानगरपालिकेचे ‘मेयर’ म्हणून निवडून आले. सगळयांनी अभिनंदन केले पण आपले गुरू आणि दैवत असलेले सावरकर ह्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद नाही म्हणून नलावडे अचंबित झाले होते. सावरकर ‘मेयर’ शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधत होते,तो सुचताच त्यांनी ‘महापौर’ नलावडे ह्यांचे लगेच भरभरून अभिनंदन केले. महापौर शब्द आज सगळया भारताने स्वीकारला आहे. ‘कायदे कौन्सिल’ असा धेडगुजरी शब्द आपण एकेकाळी सर्रास वापरीत होतो हे आज कोणाला कदाचित खरे वाटणार नाही. कारण सावरकरांनी सुचविलेला ‘विधिमंडळ’ हा शब्द आपल्या अंगवळणी पडला आहे. त्यांच्या भाषा शुध्दीची चार सुटसुटीत सूत्रे होती. प्रामुख्याने सर्व संस्कृतनिष्ठ भारतीय भाषा हा आपला सामाईक सांस्कृतिक शब्दकोश आहे. ह्या भाषांमधल्या अर्थवाही आणि नित्य वापरातल्या शब्दांचे उच्चाटन करून त्यांचे ठिकाणी तात्कालिक स्वार्थासाठी परकीय शब्द वापरण्याचा हट्ट आपण धरणार असू तर ते हत्याकांड केल्याचे पाप समजले पाहिजे. मात्र ज्या संकल्पना परकीय आहेत त्यांना पर्यायी शब्द ‘पाडण्याचा’खटाटोप करण्यापेक्षा ते शब्द तसेच्या तसे वापरावेत. उदा. जिलबी. एखाद्या परकीय शब्दाने किंवा वाक्प्रचाराने आपल्या भाषेचे सामर्थ्य आणि सौंदर्य वाढणार असेल तर ते शब्द अवश्य वापरावेत. थोडक्यात भाषाशुध्दी अभियानामागे शास्त्रशुध्द विचार आहे. परकीय शब्दांचा द्वेष नसून आपल्या शब्दांना जिवंत ठेवण्याचा कळवळा आहे. आपण ‘कायदा’ शब्द वापरतो हे सावरकरांना बौध्दिक अपंगत्वाचे आणि दास्यत्वाचे लक्षण वाटते. त्यांनी निर्बंध आणि विधी असे अनेक पर्यायी शब्द सुचविले आणि ते मध्यवर्ती आणि राज्य सरकारांच्या शासकीय परिभाषेने रूढ केले आहेत. तरीसुध्दा आपल्या जिभेवरचा आणि विचारातला ‘कायदा’ शब्द विरघळून जात नाही ह्याचे सावरकरांना अतोनात दु:ख होते. कारण निर्बंधयुक्त शासन जगात प्रथम भारतात अवतीर्ण झाले. मनुस्मृती ही जगातील पहिली आणि परिपूर्ण निर्बंध संहिता आहे. समाज ज्यावर चालतो ती मूलभूत धारणा ज्याने प्रथम निर्माण केली त्या भारतात ती संकल्पना आज परकीय शब्दाने व्यक्त होते हे पारतंत्र्याचे लक्षण आहे असे सावरकर मानत. ‘सबका मालिक एक’ असे काशीचे पंडितही म्हणतात तेव्हा त्यांना वेदना होत. कारण मालिक येण्याच्या कितीतरी आधीपासून आपल्याकडे ‘स्वामी’ शब्द लहानथोरांच्या तोंडी होता. ‘शहीद’ शब्द अरबी आहे. धर्मयुध्दात मारला जातो तो शहीद. इस्लामी आक्रमणाविरुध्द लढतांना जे भारतीय धारातीर्थी पडले त्यांना आपण जेव्हा शहीद म्हणून गौरवू पाहतो तेव्हा तो त्यांच्या बलिदानाचा अपमान असतोच पण आपल्या लढण्याचा निर्धार त्यामुळे काही प्रमाणात उणे होतो असे त्यांना वाटे. म्हणून त्यांनी आपल्या प्राचीन भावविश्वाला शोभेल असा ‘हुतात्मा’ हा पर्यायी शब्द सुचविला. तथापि हिंदुत्वनिष्ठ पक्षही शहीद शब्द वापरतात. ह्यावरून अशा विषयात तडजोड का करायची नसते ते कळते.

परिस्थिती झपाटयाने बदलत असून ज्ञानाची नवी दालने प्रतिदिनी उघडली जात आहेत. त्याकरिता नवे पारिभाषिक शब्द निर्माण करण्याकरिता सावरकरी सूत्रांचे स्मरण करीत भारत सरकारने संस्कृतनिष्ठ पर्यायांना अग्राधिकार दिला आहे. हे शहाणपणाचे लक्षण आहे. सर्वसामान्य माणसाच्या बोलीभाषेवर त्याचा परिणाम आज ना उद्या झाल्यावाचून राहणार नाही.

-अरविंद विठ्ठल कुळकर्णी (‘आम्‍ही पार्लेकर’साठी)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s