शिल्पकार गणपतराव म्हात्रे आणि कलाप्रेमी पार्लेकरांचे कर्तव्य !

भारतातील पारंपारिक शिल्पकलेपेक्षा वेगळया अशा पाश्चिमात्य वास्तववादी शैलीतील व्यक्तीशिल्पे घडविणारे आद्य भारतीय शिल्पकार म्हणून गणपतराव म्हात्रे (1876 ते 1947)  प्रसिध्द होते. स्मारक शिल्पांच्या क्षेत्रात पाश्चिमात्य शिल्पकारांची मक्तेदारी मोडून आधुनिक भारतीय शिल्पकेलेत नव्या युगाचा प्रारंभ करणारे शिल्पकार म्हणूनही गणपतराव म्हात्रे यांचे नाव घ्यावे लागेल. विशेष म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचे वस्तव्य पार्ल्यात होते व त्यांनी आपली गाजलेली अनेक शिल्पे पार्ल्यातच घडविली. त्यांचा मातीकामाचा स्टुडीओ व ब्रॉन्झ कास्टींगची फाउंड्री पार्लेश्वर मंदिराच्या मागील बाजूस होती. त्यांनी 1896मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी घडविलेल्या ‘टू द टेंपल’ या शिल्पामुळे त्यांचे नाव कमालीचे गाजले. सुप्रसिध्द पाश्चिमात्य कलाअभ्यासक सर जॉर्ज बर्डवुड आणि जे.जे.स्कूल ऑफ आर्टसचे प्रमुख ग्रिफिथ्स व ग्रीनवूड यांनी त्यांच्या या शिल्पाबद्दल अनेक लेख भारतात व परदेशात लिहिले. थोर भारतीय चित्रकार राजा रवीवर्मा यांनी तर हे शिल्प बघून अभिप्राय व्यक्त केला की, ” The most beautiful production of the kind I have ever seen by a native.” सुप्रसिध्द बंगाली कवी व शांतिनिकेतनची प्रेरणा असणारे गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी तर या शिल्पामुळे प्रभावित होऊन 1898मधे दोन लेख लिहिले. त्यांच्या या शिल्पाला 1896 मधील बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक व 1904 मधील इंडीयन नॅशनल काँग्रेसच्या मुंबईतील प्रदर्शनात सुवर्णपदक मिळाले. याशिवाय इ.स. 1900मध्ये त्यांच्या ‘सरस्वती’या शिल्पाला पॅरिसमधील जागतिक कला प्रदर्शनात कांस्य पदक व पार्वती ऍण्ड शबरी या शिल्पाला 1903च्या दिल्ली दरबारच्या निमित्ताने झालेल्या प्रदर्शनात सुवर्ण पदक मिळाले. याच काळात म्हात्रे यांना युरोपात पाठवून शिक्षण घेता यावे यासाठी अनेक प्रयत्न झाले पण ते यशस्वी झाले नाहीत.

परंतु त्यामुळे निराश न होता म्हात्रे यांनी स्वतंत्ररीत्या शिल्पे घडविल्यास व जे. जे. स्कूलमधे शिकविण्यास सुरूवात केली. 1940मध्ये त्यांच्यावर महाराणी व्हिक्टोरिया यांचे पूर्णाकृती स्मारकशिल्प बनविण्याची कामगिरी सोपविण्यात आली. हे शिल्प करारा संगमरवरात त्यांनी उत्कृष्टरित्या साकार केले. त्यामुळे पाश्चिमात्य शिल्पकारांना  आमंत्रित करून व भरपूर पैसे देऊन स्मारकशिल्पे घडवण्याची गरज उरली नाही. परिणामी म्हात्रे हे त्याकाळी देशातील एक सर्वोत्कृष्ट व अशा प्रकारची दर्जेदार स्मारकशिल्पे घडवणारे पहिलेच भारतीय शिल्पकार म्हणून नावारूपाला येऊ लागले.

त्यांना कोल्हापूर, म्हैसूर, ग्वाल्हेर, अशा विविध संस्थानामधून स्मारकशिल्पे घडविण्यासाठी आमंत्रित करण्यात येऊ लागले. संगमरवर व ब्रॉन्झ धातुतील त्यांची शिल्पे ही आधुनिक भारतीय स्मारकशिल्पांचा मापदंड ठरली. त्यांनी आपल्या हयातीत 7 अश्वारुढ पुतळे, 62 पूर्णाकृती पुतळे, 260 अर्धपुतळे अशी अनेक शिल्पे घडवून एक विक्रमच प्रस्थापित केला. आधुनिक भारतीय शिल्पकेतील त्यांचे हे योगदान विलक्षण महत्त्वपूर्ण असून ब्रिटीश सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. म्हात्रे यांची ही कलापरंपरा त्यांचे पुत्र श्यामराव म्हात्रे यांनी आपल्या हयातीत पुढे सुरूच ठेवली. त्यांनतरही ‘म्हात्रेज आर्ट स्टुडियो’ महंत रोड, विलेपारले (पूर्व) हा आपल्या पार्ल्याचे अंदाजे 1980पर्यंत भूषण होते. आज त्यांचा तो स्टुडियो व त्यांनी घडविलेल्या शेकडो शिल्पांची प्लास्टर मॉडेल्सही काळाच्या ओघात व आपल्या असंस्कृत व करंटया वृत्तीमुळे नामशेष झाली.

आपल्या पार्ल्याचे भूषण असलेल्या कलामहर्षि शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांची काहीही स्मृती आज पार्ल्यात नाही. मुंबईतच नव्हे तर देशात अनेक शहरात व दिल्लीतील संसद भवनातही रावबहादूर गणपतराव म्हात्रे यांची शिल्पे आज दिमाखात उभी आहेत. परंतु पार्लेकरांना मात्र हा अद्वितीय शिल्पकार अज्ञातच आहे. म्हणूनच पार्ल्यातील सर्व कलावंत, कलारसिक, म्हात्रे कुटुंबिय व राजकारणी आणि समाजकारणी मंडळीनी एकत्र येऊन या थोर शिल्पकाराचे उचित स्मरण होईल असे काहीतरी करणे आपले कर्तव्यच आहे. ‘आम्ही पार्लेकर’ व आम्ही पार्लेकर आमची ही जबाबदारी पार पाडून आपली कृतज्ञता व्यक्त करण्यात हयगय व दिरंगाई करणार नाही हीच अपेक्षा!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s