मेलबॉक्स

शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्टया संपन्न अशा पार्ल्याचा आपल्या सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. मात्र गर्दी, वाहतुकीची कोंडी, खराब फुटपाथ, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव अशा अनेक समस्यांना पार्लेकरांना सदैव तोंड द्यावे लागते. पार्ल्यातील ज्या भागात तुम्ही राहता तेथे अशा काही समस्या असतील किंवा तुम्हाला त्यावर काही उपाय सुचत असतील तर 100 शब्दांत लिहून आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही त्या समस्या/मते/उपाय पालिका प्रशासनाकडे सुपूर्द करून योग्य कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करू. आपलं पार्लं अधिक स्वच्छ, सुंदर होण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्नशील होऊया !

‘आम्ही पार्लेकर’च्या या आवाहनाला वाचकांनी दिलेला हा प्रतिसाद –

  • सर्वशिक्षा अभियान राबवताना रात्रशाळांची मात्र उपेक्षा

1952 साली जनता शिक्षण मंडळ स्थापन होऊन त्यांच्यातर्फे ‘जनता नाईट हायस्कूल’ ही शाळा सुरू करण्यात आली. महात्मा गांधी मार्गावर म्युनिसिपल प्राथमिक शाळेच्या इमारतीत ही शाळा सायं 6.45  ते 9.30  या वेळेत भरत असे. दहा वर्षांपूर्वी शाळेला भरावयाचे भाडे तुंबल्यामुळे म्युनिसिपालिटीने रात्र शाळेचे हे वर्ग सुरू ठेवण्यास नकार दिला त्यामुळे अडचण निर्माण झाली. त्यावेळी श्रीमती माई बोरकरांनी मायेचा हात देऊन महापालिकेच्या भाडयापोटी एक लाख भरून रात्रशाळा पूर्ववत सुरू केली. शिवाय ‘महिला सल्ला केंद्राने’ यासाठी कार्यकारिणी बनवून अधिकृतपणे जनता शिक्षण मंडळाचे कामकाज सुरू केले. शाळेला क्रमिक पुस्तके, विज्ञान साहित्य, नकाशे, वह्या व पूरक पुस्तिका पुरवून आर्थिक पाठबळही दिले. गेल्या सात आठ वर्षांपासून बाहेरील तज्ञ शिक्षकांची मदत घेण्यास सुरुवात झाली. दिवसभर कोठेतरी राबणारी श्रमजीवी मुले अर्धपोटी शाळेत येतात. या मुलांसाठी पूरक खाणे पुरवण्यासाठी महिला सल्ला केंद्राने 96,000 रुपयांची मदत गोळा केली. हळुहळू शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. काही निवृत्त शिक्षिकांनी इंग्रजी व गणित विषयांसाठी आपल्या घरी वर्ग सुरू केले.

या रात्रशाळेचे हे हीरक महोत्सवी वर्ष. आनंदाची बाब म्हणजे या वर्षी दहावीला बसलेल्या 11 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर एका विद्यार्थिनीने 61% गुण मिळवले.

सध्या सर्वच मराठी माध्यमांच्या शाळांना विद्यार्थ्यांची कमतरता, आर्थिक विवंचना भासत आहे. बोलूनचालून ही रात्रशाळा. दरवर्षी तुकडया कमी कराव्या लागत आहेत. आठवी ते दहावीच्या तीन वर्गात 55 ते 60 च मुले-मुली आहेत. महापालिकेची महात्मा गांधी मार्गावरील प्राथमिक शाळा बंद होऊन तेथील मुले दीक्षित रोडवरील प्राथमिक शाळेत सामावण्यात आली. हा बदल फार जाचक ठरत आहे. फक्त तीन वर्गच रात्रशाळेसाठी दिले आहेत. कार्यालय,शिक्षक कक्ष व कपाटे ठेवण्यास तर जागाच देत नाहीत. शिवाय या तीन खोल्यांचे मासिक भाडेही शिक्षक आपल्या पगारातूनच भरतात. सर्वशिक्षा अभियान चालवणाऱ्या देशातील प्रगत महापालिकेला हे भूषणास्पद आहे का?

-आशा गांधी

  • शेअर रिक्षा आहेत तरी कुठे?

जूनच्या ‘आम्ही पार्लेकर’च्या अंकात शेअर रिक्षाची बातमी वाचली आणि हायसे वाटले. माझे वय 64 वर्षेतर माझ्या यजमानांचे 70. आम्ही राहतो कोलडोंगरीला. भाजी, खरेदी, लायब्ररी, काही कार्यक्रम, सिनेमे, नाटकं या निमित्ताने वरचेवर पार्ल्यात येणे होते. आम्हा दोघांनाही गुडघेदुखीमुळे चालायला त्रास होतो. पावसाळयात तर अक्षरश: हाल होतात. पार्ल्याहून रिक्षा मिळणे म्हणजे इतके कठीण की 10-12  रिक्षावाल्यांना विचारल्यावर एखादा तयार होतो आणि उपकार केल्यासारखा गरवारे चौकापर्यंत आणून सोडतो.

आता मात्र हा त्रास बंद होणार असे वाटले. अमुक तमुकच्या प्रयत्नाने शेअर रिक्षा सुरू झाल्या असे फलकही दिसू लागले. पण दुर्दैवाने परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. स्टेशनसमोरचे रिक्षावाले कोलडोंगरी म्हटलं की नेहमीप्रमाणे ट्रॅफिकचं कारण सांगून यायचं टाळतात. शेअर रिक्षाबद्दल विचारलं तर ‘हमको कुछ मालूम नहीं’ असं उत्तर मिळतं. या त्रासातून आम्हा ज्येष्ठ नागरिकांची सुटका कशी आणि कधी होणार?

– सौ.सरला वाटवे, अंधेरी.

  • महात्मा गांधी रोडवर फ्लायओव्हर ?

पार्ल्यात चांगली भाजी आणि खाद्यपदार्थ (स्नॅक्स) मिळतात म्हणून जुहू, अंधेरी, पवई आणि गोरेगावपासूनचे लोक पार्ल्यात खरेदीसाठी येतात. पण पार्लेकरांना मात्र त्याचा अनेकदा त्रास होतो. कारण ही मंडळी पार्ल्यातील गर्दी आणि मुख्य म्हणजे ट्रॅफीक जॅमला कारणीभूत होतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी रोड वरील चॅम्पीअन आणि जवाहर बुकडेपो समोरील परिसर. आधिच लहान रस्ता, त्यात फेरीवाले, त्यातच वाट्टेल तशा पार्क केलल्या भल्या मोठ्या गाडया, शाळा सुटायचीही तीच वेळ ! या सगळयामुळे संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत इथे इतकी प्रचंड गर्दी उसळते की गाडी चालवणे किंवा साधे चालणे ही जवळजवळ अशक्य होते. आता, बाहेरच्या लोकांना इथे यायला मज्जाव करता येणार नाही हे मान्य पण गर्दीचे, ट्रॅफीकचे काहीतरी नियोजन करायला हवे की नाही? माझ्या मते, संध्याकाळच्या वेळेत महात्मा गांधी रोड वर ‘नो पार्कींग’ करावे. जेणेकरुन वाहतूक सुरळीत राहील आणि चालणेही शक्य होईल. नाहीतर थोडयाच दिवसात तिथे एक फ्लाय ओव्हर बांधायची वेळ येईल !

– सौ.रजनी पाटील

  • पार्ल्यातला कुत्र्यांचा त्रास कधी कमी होणार ?

गेली अनेक वर्षे पार्ल्यात कुत्र्यांचा भयंकर उपद्रव सुरु आहे पण त्याबद्दल कुणीच काही करत नाही. रात्री तर पार्ल्यातील रस्त्यांवर त्यांचेच साम्राज्य असते त्यामुळे रस्त्यावर फिरणेदेखील कठीण झाले आहे. मध्यंतरी ह्याच भटक्या कुत्र्यांनी एका लहान मुलीवर हल्ला करून तिला जखमी केले होते तरीसुध्दा महापालिकेला जाग का येत नाही? आमचे नगरसेवक / नगरसेविका सुध्दा ह्या बाबतीत काहीच करत नाहीत. मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये हे ठीक आहे पण हेच मुके प्राणी आपल्या शरीराचा मुका (चावा) घ्यायला लागले तर काय करायचे? पूर्वी महापालिकेच्या गाडया अशा श्वानांना पकडून नेत असत पण आता मेनका गांधींच्या कृपेने तेही बंद झाले आहे. पार्ल्यातील काही अतिउत्साही श्वानामित्रांना तर त्यांच्या पोटात घास गेल्याशिवाय स्वतःचे अन्न गोड लागत नाही. अशा परिस्थितीत सामान्य माणसाने काय करायचे ? उद्या कोणाचा संयम सुटला व त्याने ह्या श्वानांचे काही बरे वाईट केले तर त्याची जबाबदारी कोणाची ?

 – श्री. पुरुषोत्तम म्हात्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s